Tuesday, 21 April 2020

राकेश आणि माझं ऑफिस

राकेश नी काही रोपं लावली होती ऑफिसात... खरं तरं तस कुणी सांगितलं नव्हतं त्याला. त्याचीच स्वतः ची आवड. खूप मायेने करायचा त्या रोपांच. माती आण, ती वेळोवेळी बदल, रोज संध्याकाळी रोपांना पाणी घाल... आजूबाजूला गवत वाढल असेल तर ते काढून टाक... तीन फुलझाड आणि एक मनी प्लांट. दुसऱ्या माळ्यावरच्या गच्चीत ही झाडं लावलेली. स्वतः बिन माय बापाचा वाढलेला हा पोरगा या झाडांना इतका जीव लावतो हे बघून कमाल वाटायची मला.

बऱ्याच वेळा मी आणि राकेश दोघेच असायचो ऑफिसला. मी नौकरी सोडून हे ऑफिस थाटलेल. स्वतःच स्वतंत्र काहीतरी करावं ही त्या मागची कल्पना. जवळच्या सर्व सेविंग्ज टाकून हे ऑफिस उभारल. राकेश माझा पाहिला एम्प्लॉइ. पहिल्यांदा इंटव्ह्यू ला आलेला तेंव्हाच म्हणाला... "सर, आप बोलेंगे वो काम करुंगा लेकीन मुझे रखलो." त्याच्या पूर्वीच्या जॉब पेक्षा थोडे कमीच पैसे मला त्याला देता येणारं होते हे स्पष्टच सांगितले. तरी तो तयार झाला. ऑफिस बॉय, कुक, स्विपर, असिस्टंट अश्या सर्वच रोल मध्ये तो फिट होता.

सकाळी आल्या आल्या राकेश ऑफिसातील गणपतीला अगरबत्ती आणि फुल चढवायचा. फुल त्यानी स्वतः कुठूनतरी तोडून आणलेली असायची. मग नाश्ता बनवायची त्याची लगबग असायची. खाली किराणा दुकानात आम्ही खाते उघडलेले. जे लागायचे ते राकेश तेथून घेऊन यायचा. कधी पोहे, उपमा, सोयाबीन चीली तरं कधी अगदी फ्रेंच टोस्ट वैगरे! त्यातील बऱ्याच रेसिपी त्यानी स्वतः इनव्हेंट केलेल्या होत्या. त्याच्या हाताला चव होती. आणि पदार्थांपेक्षा प्लेट सजवण्यावर त्याचा भर अधिक असायचा. प्रेझेंटेशन चा गुण राकेश मध्ये अनुभवतून आलेला असावा. त्यांनी पूर्वी बऱ्याच ठिकाणी काम केले होते.

राकेश खूप वेळा आजारी पडायचा. त्याचे सतत डोके दुखते अशी कंपलैन असायची. मग मी त्याला औषध सुचवायचो. तात्पुरता गुण लागे पण आजारपण कायम राही. मग तो कामावर दांडी मारायचा.

तो जॉईन झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यात मला कळलं की तो खूप छान गातो. किंबहुना इथे नौकरी करण्याचा त्याचा उद्देश हाच होता की त्याला क्रियेटीव्ह वातावरणात राहायचं होत. मुंबईतील झोपडपट्टीत वाढलेला हा मुलगा असा विचार करत होता तरं!

मग बऱ्याच वेळा आमच्या मैफिली जमत. तसेही सुरवातीला काही कामं न्हवते. मग संध्याकाळी मंद प्रकाश, देवासमोर उदबत्तीचा सुगंध आणि राकेश चे दर्द भरे नगमे... वाह, मजा येई. कैलाश खेर त्याचा फेवरेट, त्यामुळे साहजिकच त्याची गाणी जास्त. मला वाटतं तो अधून मधून चोरून सिगरेट ओढायचा त्यामुळे त्याच्या आवाजाचा पोत कमी झाला होता. पण तरीही कुठलेही शास्त्रोक्त शिक्षण नसतांना त्याची गायकी लाजवाब होती.

ऑफिसात कुणी खास आले की त्यांच्या समोर मी राकेश ला गाण्यास उभे करायचो. त्यात मोठे कलाकार होते, दिग्दर्शक होते, संगीतकार ही होते. त्यावेळी राकेश ला खूप भारी वाटायचे हे त्याच्या चेहऱ्यावरून कळे.

पुढे चित्रपटाचे काम सुरू झाले आणि ऑफिसात गर्दी वाढत गेली. असिस्टंट, कलाकार, प्रोडक्शन मधील माणसं आणि इतर लोक... गर्दी वाढली तरी राका सर्वांना पुरून उरायचा. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं एका वेळी जवळपास वीस पंचवीस लोकं रोज ऑफिसात खायायला असत. पुन्हा अधूनमधून सतत चहा दे. कुणी उशिरा आले तर मॅगी बनव. राकेश मनापासून करायचा.

मग काही महिन्यात आम्ही शुट वर निघालो तेंव्हा लोकेशनवर वर राका माझा पर्सनल बॉय म्हणून सतत धावत होता. शूटिंगच्या गडबडीत वॉलेट हरवायच, टोपी कुठेतरी विसरायचो, गड किल्ल्यावर शुट करतांना खूप कडकं उन म्हणून बॉडी डीहौड्रेट व्हयाची. राका दिवसभर बॉटल मध्ये इलेक्रट्रोल घेऊन मागे असायचा. माझा पाउच घेऊन फिरायचा.

शुट संपल. आम्हीं ऑफिसलाच एडिट करायला बसायचो. एडिटर रात्री तिथेच थांबायचा म्हणून राका त्याचे खाणे पिणे सर्वच बघायचा.

सिनेमा निर्मितीच्या प्री प्रोडक्शन, शुट, पोस्ट प्रोडक्शन या प्रत्येक स्टेज ला अनेक लोक आली आणि गेली राकेश मात्र सोबत कायम राहिला. सिनेमा रिलीज झाला तो आणि त्याच्या नंतरचा काळ अत्यंत दगदगीचा होता. सिनेमा बनवणे मला माहिती होते पण सिनेमा विकणे हा माझा प्रांत न्हवता. त्यामुळे प्रचंड मनःस्ताप होई. काही मीटिंग चांगल्या होत तर काही खूप वाईट. त्यामुळे राकेश वर चीडायचो कधी कधी. पण तो ऐकून घेई.

गणपती, दांडिया च्या दिवसांत राका ज्याम खुश असायचा. कलिना, वाकोला परिसरातच तो लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे चाळीतील, झोपडपट्टीतील अनेक पोरं त्याचे मित्र होते. बऱ्याच, दादा लोकांचा लोकांच्या पार्टीतही हा स्वयंपाक करायला जायचा. त्यामुळे एरियातील सर्वच मंडळात त्याला एन्ट्री होती.

रात्रभर लालाबागला लाईनीत उभे राहिल्यावर काय मजा येते किंवा पहाटेचे सिद्धिवनायकाला अथवा महालक्ष्मी ला बिना चप्पल पायी चालले की देव कसा पावतो. याबद्दल त्याचे मत ठाम होते. कुठली सेलिब्रिटी केंव्हा आणि कुठल्या मंदिरात भेटू शकते यावर त्याचा अभ्यास होता.

पोरगा फारच श्रद्धाळू. भुलेश्वर, मुंबादेवी, माहीम ची शितला देवी असेल, जोगेश्वरी चे रामेश्वर, गिरगावातील बाबुलनाथ किंवा वाळकेश्र्वर... जणू सर्वच देव त्याला नावानिशी ओळखतात असा त्याचा वावर...!

सतत डोकं दुखत म्हणून कुण्या बाबानी त्याला गंडा दोरा केलेला. त्यामुळे, सलग दहा दिवस त्याला एकदम बरं वाटलं होत... असं त्याचं म्हणणं होत!

राकेश ला ऑफिसात आता दोन वर्ष झाली होती. त्याच्या कुंडीतील झाडांची आणि माझ्या कंपनीची प्रगती जेमतेमच होती. झाडांना फुल येतं पण उंची मात्र तेव्हढीच! 

तिकडे यू पी मध्ये त्याच्या मूळ गावी आत्त्या त्याच्या लग्नाचा घाट घालते आहे असं तो सांगायचा. मुलगी शिकलेली आहे, हुशार आहे हे सांगताना त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसायचा.

मी आणि तो बऱ्याचदा एकटे असायचो. कामं हवी तशी न्हवते माझ्याकडे. असलीच तर लोकेशनवर शुट वैगरे. त्यामुळे ऑफिस ची गरज फारशी न्हवती. दुसऱ्या प्रोडक्शन चे काम असले की मीटिंग त्यांच्या ऑफिसला किंवा बाहेर कुठे कॉफी शॉप मध्ये. त्यामुळे माझे ऑफिस आता नावापुरते उरले होते. मीटिंग करून मी आणि दैवता थकून आलो की आम्हीं कॉस्ट कटिंग कशी करता येईल ते बोलायचो. राकेश ते कोपऱ्यात उभे राहून एेकायचा. पण बोलायचा नाहीं काहीच. निमूट चहा कॉफ आणून द्यायचा. त्याला माझ्या परिस्थिती ची जाणीव असावी कदाचित. अधून मधून म्हणायचा ही...."सर बहोत मेहनत लिए थे आप फ़िल्म पर और अभी भी कितने कोशिश करते हो। कुछ अच्छा ही होगा हमारी कंपनी का सर..."
नाही, म्हटल तरी मला ते ऐकून बरं वाटायचं.
मग पुन्हा आम्हीं दिवा मंद, अगरबत्ती आणि त्याचं गाणं... असा रिलीफ करून घ्यायचो.

त्या दिवशी ऑफिसला खाली येताच माझी नजर कोपऱ्यातील माझ्या सायकली वर पडली. ती आता राकेश वापरायचा. सायकलीचे पुढचे चाक पूर्ण वाकले होते. हैंडल देखील तुटलेले. मी रागातच वर आलो. राकेश दिसताच त्याला रागवायला लागलो. किती नुकसान केलं, असा मूर्खपणा पुन्हा नको करू म्हणून बोल बोल बोललो.
पण तो नेहमी सारखं काहीतरी कारण सांगत होता पण मला ते पटत नव्हते. हे त्याला चांगलेच माहीत होते. त्यामुळे तो चुपचाप किचन कडे वळला.
आलं टाकलेला चहा माझ्यापुढे धरत जसं काही झालंच नाही असं वावरायला लागला...

मधे काही दिवस गेले.
आणि त्या दिवशी शेवटी मला न आवडणारा प्रसंग आलाच. खरंतर हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे हे आता मला कळलय. मी कुठल्याही बाबतीत इमोशनल होतो. बऱ्याचदा उगीच!

नौकरी सोडली की त्या ऑफिस बद्दल,
एखादं लांब शूटिंग स्केडुल संपल की कधी तेथील कामा बद्दल,
तिथल्या सेट किंवा स्टुडिओ बद्दल,
तिथं होणाऱ्या संध्याकाळी बद्दल,
तर कधी कधी मला दिवसभरातून आठ वेळा चहा आणून देणाऱ्या स्पॉट बॉय विषयी सुध्धा मी भावनिक होऊ शकतो. मला निरोपाचे क्षण भयंकर टोचतात.

आणि इथे तरं माझ्या कडे दोन वर्ष कामं करणाऱ्या राकेश बद्दल बोलायचं होतं. शेवटी तो माझा पहिला एम्प्लॉयी होता!
मी शब्दांची जुळवाजुळव करत होतो. पण जमत न्हवत. कदाचित गेल्या काही दिवसांच्या घडामोडींमुळे त्याला लक्षात आले असावे. शेवटी जड अंतःकरणाने, यापुढे तुला नौकरी वर ठेवता येणे परवडणार नाही... असं सांगावं लागलं.

तो समजायचं ते समजला. जाण्यास निघाला. फार डगमगला नाही माझ्या वाक्यांनी.
कदाचित रस्त्यावर वाढलेल्या, त्यानी असे अनेक प्रसंग पाहिले असतील आयुष्यात. त्यामुळे त्याला एवढे काही वाटले नसेल. असं मला त्या क्षणाला वाटलं. त्यामुळे थोड तरी हलक वाटलं.

मला वाटलं त्याला एकदा शेवटचं गायला सांगावं. पण ते बरं वाटलं नसतं. म्हणून मी काहीच बोललो नाही.
तो खाली आपले समान घेऊन निघाला देखील. मी त्याला बाल्कनीतून जातांना बघत होतो. तो काहीतरी आठवल्या प्रमाणे थांबला आणि वर माझ्याकडे बघून हसला.
त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या मला जाणवल्या. कदाचित माझ्याही...

त्यानंतर, काही महिन्यांनी मी ते ऑफिस सोडलं. मला भाडे परवडणारे न्हवते. सर्वच सामान कुठे कुठे नेऊन टाकला. शेवटी बाल्कनीतील त्या चार कुंड्या तेवढ्या उरल्या.
मी बिल्डिंग च्या वॉचमन ला सांगून त्याच्या खोली जवळ त्या आणून ठेवल्या. त्याला काही पैसे दिले. बदल्यात त्यांना रोज पाणी देण्याचे वचन!

मग अधून मधून त्या रस्त्यानी गेलो की वॉचमन च्या पाठीमागे ती रोप दिसतं. मनी प्लांट मोठा झाला होता.  बाजूच्या नारळाच्या झाडावर चढण्याचा त्याचा प्रयत्न असावा असं वाटलं. उरलेल्या तीन कुंडीतील ती लाल, पांढरी आणि पिवळी फुलं मात्र मस्त फुललेली होती. जणू मधल्या काळात काही झालंच नाही...

Sunday, 19 April 2020

स्विकार

आज पर्यंत खूप टीका केली देशावर वेळोवेळी.

खरंतर शाळेत असताना प्रचंड देशभक्ती वाटायची. स्वातंत्र्य संग्राम, आपला इतिहास, क्रांतिकारी, महापुरुष या साऱ्यां विषयी वाचले तरी आंगवर शहारे यायचे.

शाळा कॉलेज मधून बाहेर पडलो. नौकरी धंद्याला लागलो. प्रचंड स्पर्धेला सामोरे गेलो. कधी यशस्वी झालो तर कधी प्रचंड वाट लागली... हळूहळू अनुभव वाढत गेला आणि मत परिवर्तन व्हायला लागलं. खरा आणि खोटा इतिहास स्पष्ट दिसायला लागला. राजकीय आणि सामाजिक व्यवस्था कश्या पद्धतीने माहिती manipulate करते याची जाणीव झाली. अजून दृष्टिकोन विस्तारत गेला.

दरम्यान, अनेक देश बघण्याची संधी मिळाली. खास करून युरोप बघून भारावून गेलो. नकळत आपली आणि त्यांची तुलना मन करू लागलं. ते ' विकसित ' आपण मात्र कायमच कसे ' विकसनशील '...
त्यांचे रस्ते, शहरं, तेथील लाईफ स्टाईल बघून सुप्त इर्षा तयार झाली. आपल्याकडे असे का नाही म्हणून मन प्रश्न विचारायला लागलं.
पण मग आपल्या देशातील काही चांगल्या गोष्टींचा चा उदो उदो करून त्यांचं ' अमुक ' चांगलं म्हणून काय झालं आपल ' तमुक ' किती भारी आहे असा समज करून मनाचे समाधान करून घेतलं. पण म्हणतात नं, खोट्याच सोंग किती काळ घेणारं.

मुंबईतील ट्रॅफिक मध्ये फसलो, कधी कामात स्पर्धेला घाबरलो नाहीं पण त्यातील राजकारणाने वैतागलो, चांगल्या सोबतच बऱ्याच विचित्र लोकांना सामोरे गेलो. अगदी पोलीस कोर्ट कचेरी देखील केली... कधी चांगले अनुभव आले तर बऱ्याचदा वाईट. मग त्या त्या वेळी देशाबद्दल राग निर्माण व्हायला लागला. पूर्वी जपून बोलायचो पण नंतर उघडं विरोध करायला लागलो. देशातील प्रत्येक गोष्ट आवडीनाशी झाली. टीका करायला लागलो. सुरवातीला सभ्य शब्दात. नंतर, घंटा फरक पडत नाहीं या देशात... इतका प्रवास झाला!

मग पूढे पुढे त्याचाही त्रास व्हायला लागला. आपल्या हातात काहीच नाही मग उगीच कशाला त्रास करून घ्यावा असा पक्का समज करून घेतला. त्यामुळे भोसड्यात गेलं सर्व असं म्हणून तटस्थ झालो. बधीर करून घेतलं स्वतःला.

पण आजच हे सर्व सांगण्याचा हेतू हा की, सद्या कोरोना मुळे जगातील प्रगत राष्ट्र देखील जिथे हतबल झालेत तिथे आपला दीडशे कोटी लोकसंख्या असलेला,
जाती धर्माची विचित्र गुंतागुंत असलेला,
भाषा, प्रांत, मान्यता सर्वच बाबतीत विविधता असलेला...
अत्यंत तुटपुंजे रिसोर्सेस, निधी चा अभाव, टेक्नॉलॉजी ची कमतरता...

असलेला आपला देश ज्या धीराने या संकटाला सामोरे जातोय. ते खरंच कौतुकास्पद आहे. इतरांच्या तुलनेत अजूनही आपण बऱ्यापैकी कंट्रोल स्थितीत आहोत. आपले पोलीस, डॉक्टर्स आणि इतर सर्व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतायत ते अवर्णनीय आहे.
उदारहण म्हणून फक्तं कल्पना करा, मुंबई सारख्या शहराला अश्या परिस्थितीती होणारा पाणीपुरठा, गॅस, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, दूध... सोबत दवाखाना. खूप कठीण आहे हे. पण अजूनही सुरळीत चालू आहे सर्व.

काल वाचनात आले की अमेरिकेने त्यांच्या देशात बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप रद्द केलीय, स्टूडेंट लोन बंद केलय. H1B वाल्यांना सहा महिन्याची नवीन नौकरीची मुदत दिली आहे.
कमाल आहे. संकट नक्कीच मोठं आहे पण त्याला सामोरं न जाता लगेच आपल-तुपल करायला लागलीत ती लोकं...

आणि माझा देश, आधीच दीडशे कोटींच्या आसपास. तरीही जगातील कुठल्याही भारतीयांना नागरिकत्व देण्याची तयारी दाखवतो. किती विशाल हृदय असावं लागतं याला...

नेहमी म्हणायचो, " आपल काय, आपला देश तर भगवान भरोसे..." यात श्रद्धा पेक्षा उपरोधित स्वरच अधिक असायचा.

पण आज सपशेल माघार. कल्पना आहे करोना चे संकट अधिक भयंकर आहे. अजूनही सर्व चाचण्या व्हायच्या आहेत. आकडा वाढू ही शकतो. पण जे होणारं असेल ते होईलच. पण ज्या पद्धतीने आपली लोकं आणि सर्वच प्रशासन कामं करतायत ते अभिमानास्पद आहे. कुणीतरी आहे हा विश्वास नागरिकांत निर्माण करणे ही काय छोटी गोष्ट नाहीं. इथून पुढे देशाला आणि पर्यायाने इथे जन्माला आलो म्हणून स्वतः च्या नशिबाला कोसने बंद!

नैंटीजची लवइष्टोरी

नैंटीजची लवइष्टोरी, साक्रीतल्या अजय देवगण आणि काजोलची


सध्या लॉकडाऊन सुरूय. कोरोनाचे सिरियस लेख तुम्ही वाचतच आहात. पण थोडं कोलाज स्पेशल हटके काही. नव्या पिढीचा डायरेक्टर दीपक बाळू पाटील यांची ही कथा. तो म्हणतो यातलं सगळं काल्पनिक आहे. पण आपल्या सगळ्यांच्याच गावात असा अजय देवगण आणि काजोल होतेच. त्यांची इष्टोरी आपल्या सगळ्यांनीच बघितलीय आपापल्या गावात.

………….

त्याला तसं लहानपणापासून बघत आलो होतो. गावं फार मोठं न्हवतं. त्यामुळे कुणाशी ओळख नसली तरी माणूस बघून माहिती असायचा. तो आमच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा. पण त्याच्या ग्रुपबरोबर ग्राउंडवर क्रिकेट खेळताना दिसायचा.

त्यावर्षी मात्र तो गावात अचानक फेमस झाला. इंद्रायणी थेटरवर अजय देवगणचा ‘फूल और कांटे’ लागला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेल!

‘फूल और कांटे’ची गाणी भयंकर फेमस. प्रत्येक सलून, पानटपरी, सोडावाला, अंडाभुर्जीची लारी सर्वीकडे एकच गाणं, `कोई जन्नत की वों हूर नहीं, मेरे कोलेज की एक लड़की हैं`. आणि एक दिवस याला कोणीतरी सांगितलं, `पिंट्या, तू हुबेहूब त्या हिरोंना मायक दिसस!`

मग काय गडी चेकाळला. अजय देवगणचा अभ्यासच सुरु केला त्यानी. सेम हेअर स्टाईल, सेम जीन्स, ज्याकेट, शूज. भाई फूल ऑन तयारीला लागला. मोटारसायकल आधीच येत होती. हिरो होंडा फोर एस. वर काळा गॉगल. त्यानंतर मात्र ‘इंद्रायणी’ असो नायतर ‘रत्नदीप’, देवगणच्या प्रत्येक पिच्चरला हा सर्वात पुढे.

इतरांना असतात तसे याचेही मित्र महानालायक. झाडावर चढवायला पुढे. तिकडे पडद्यावर देवगणनी डायलॉग मारला की इकडे मित्र याला खांद्यावर घेऊन शिट्या मारत.     

‘फूल और कांटे’चा फिवर संपतो न संपतो अजय ‘जिगर’ घेऊन आला. आणि पिंट्या देवगणवर दडपण आलं. उजव्या हाताच्या पंज्यानी वरच्या वर अंड्याचा अर्धा भाग फोडणं म्हणजे खायचं काम न्हवतं.

पण पिंट्याच्या मित्रांनी हेही शिवधनुष्य लीलया पेललं. न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस सुरू झाली. पिंट्या देवगणला रोमांटिक सोबतच ऍक्शनमधेपण पारंगत होणं महत्वाचं वाटू लागलं.

पिंट्या हिरो होंडा फोर एसवर स्टंट मारायला शिकला. मित्र बाईक चालवायचा आणि हा मागे सीटवर उभा. मोटारसायकल ह्यांडबॉलच्या गोल पोस्टमधे घुसायची आणि पिंट्या वरच्यावर पोल पकडायचा. आम्ही कोपऱ्यात उभं राहून हे बघायचो. पिंट्याला दुरून दादही द्यायचो.

पिंट्या मात्र आपल्या मस्तीत. एव्हाना बरेच स्टंट त्याला यायला लागले होते. पण अंड्याचं प्रकरण जरा कठीणच. पिंट्या अंड्यावर प्रहार बरोबर करायचा पण अर्ध्या ऐवजी अंडं पूर्ण फुटायचं. पण प्रॅक्टिस चालू होती. आता पिंट्या ‘प्रति अजय देवगण’ म्हणून अख्ख्या ‘साक्री’ गावात वर्ल्डफेमस झाला होता. न्यू इंग्लिश स्कूल असो वा सिगो पाटील कॉलेज, पिंट्याला सर्वीकडच्या मुली ओळखायला लागल्या होत्या. पिंट्या देवगण फॉर्मात होता.

देवगणचे ‘विजयपथ’ आणि ‘दिलवाले’ एकाच वर्षी आले आणि दोघांचं संगीतही हिट झालं त्यामुळे पिंट्याच बरं चाललं होतं.

पण एक दिवस अचानक ती बातमी येऊन ठेपली. पिंट्या पांझरा कॉलनी समोरच्या नाल्यात पडला. पडला तर पडला, नाल्याची गटार झाल्यामुळे चिखलाने माखला. माखला तर माखला, समोरून ट्युशनला जाणाऱ्या ग्रुपमधल्या मुली त्याच्यावर फिदीफिदी हसल्या. हसल्या तर हसल्या. त्या सर्वात पुढे ‘कासार गल्लीतली काजोल’ही होती. इतर कुणी हसतं तर ठीक होतं. पण गेल्या सहा महिन्यापासून पिंट्याचा क्रश ठरलेली कासार गल्लीतली काजोलपण हसली. पिंट्या नाराज झाला.

त्या दिवसापूर्वी त्याला ती साक्रीच्या पोळा चौकात त्याच्या मागे मागे तब्बूसारखी ‘रुक रुक रुक अरे बाबा रुक, ओह माय डार्लिंग गिव मी द लुक’ असं म्हणताना दिसायची. अर्थात स्वप्नातच.

आता मात्र  नाला प्रकरणानंतर त्याला तिच्यात `दिलवाले`ची बेवफा ‘रविना’ दिसायला लागली. तो `जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता` हे गाणं गुणगुणायला लागला. उदास उदास राहायला लागला.

कासार गल्लीतली मुन्नी थोरातपण अशीच अचानक पिंट्यासारखी रातोरात साक्रीत वर्ल्डफेमस झाली होती. त्याच झालं असं, काजोलचा ‘बाजीगर’ हिट झाला आणि गावातला कन्हैया कुल्फीवाला आपल्या बासरीवर ‘बहारो फुल बरासाओ, मेरा मेहबूब आया है’ ऐवजी ‘मेरा दिल था अकेला, तुने खेल ऐसा खेला’ वाजवायला लागला. काजोल साक्रीत हिट व्हायला हे कारण पुरेसं ठरलं.

लोकमतच्या धुळे आवृत्तीच्या एका लेखात आलं होतं, ‘गल्लीबोळात दिसणारं सौंदर्य म्हणजे काजोल सौंदर्य’. मुन्नी लोकमतची पुरवणी रेगुलर वाचयची. शेजारच्या जोशीबाईंकडून आवर्जून मागून आणायची आणि वाचायचीच. मुन्नी थोरातला ‘मेरा दिल था अकेला’ आधीच आवडलेलं. त्यातली काजोल आणि आपल्यात साम्य आहे, असं तिने स्वतःशीच म्हटलेलं. पण पेपरच्या त्या बातमीने तिचा आत्मविश्वास वाढला. कारण मुन्नी थोरात देखील कासार गल्लीच्या बोळात वाढली होती!

घरी आरश्यात ती स्वतःला न्याहाळायला लागली. मैत्रिणीला हळूच बोलून दाखवलं तर तिने ही दुजोरा दिला, `हा वं माय, तू बी ते काजोल नां मायक दिसस!`. तेव्हापासून मुन्नीची चाल बदलली. एक वेगळा आत्मविश्वास दिसायला लागला. गल्लीतल्या पोरांनी ते हेरलं असावं. कॉलेजच्या ग्यादरिंगमधे मुन्नीवर फिशपाँड पडला. `स्वताला समजते बाजीगरची काजोल, घरी खाते बिन तेलचं बेसन.`

बस्स! त्या दिवसापासून मुन्नी थोरात कासार गल्लीतली काजोल म्हणून आख्या साक्रीत फेमस झाली. सुरवातीला मुन्नी ऑकवर्ड व्हायची. पण हळू हळू तिला आवडायला लागलं सगळं.

`इंद्रायणी` आणि `रत्नदीप` थेटर म्हणजे साक्रीचं सांस्कृतिक वैभवच. गावात नवीन पिच्चर आला की पोरं ताश्याच्या गजरात गावभर पिच्चरची पाटी फिरवून आणायचे. आता काजोलचा पिच्चर लागला की पाटीवाले कासार गल्लीत जरा जास्त जोर लावून ताशा वाजवायला लागले.

मुन्नी थोरात धावत बाहेर यायची नि पाटी बघून खुश व्हायची. शेजारच्या शीलाकडे बघून डोळा मिचकावून आज रात्री लवकर जेवण करून थेटरात जायचंच असं ठरवून टाकायची. ओपन थेटरात अंधार पडल्या शिवाय पिच्चर लागत नाही. हिवाळ्याच्या दिवसात सूर्य लवकर मावळतो. त्यामुळे पहिला शो लवकर लागतो.

त्या दिवशी ‘रत्नदीप’च्या गेट वर पिंट्या उर्फ पोळा चौकातला अजय देवगण आणि मुन्नी थोरात उर्फ कासार गल्लीतली काजोल यांची पहिल्यांदा नजरा नजर झाली. पिंट्या आख्या गावात आधीच फेमस होता त्यामुळे मुन्नीला तो माहिती होता. पण  पिंट्या मुन्नीविषयी फक्त ऐकून होता. आज पहिल्यांदाच पाहत होता आणि पाहताच त्याला खात्री पटली, हीच माझी हीरोईन. तब्बू, रविना, करिष्मा हे सर्वे वरवरचे चेहरे. आतून हीच खरी माझी काजोल.

त्या दिवसापासून पिंट्याच्या कासार गल्लीत चकरा वाढल्या. गल्ली तशी बऱ्यापैकी अरुंद. पण तिथं पिंट्या लीलया मोटारसायकल स्टंट करू लागला. कासार गल्लीत राहणारा बधीर अव्या आता त्याचा जवळचा मित्र झाला. अव्याच्या अंगणात पाणी पिण्याच्या बहाणे पिंट्या हळूच मुन्नीच्या घराकडे डोकवायचा. मुन्नीने मात्र अजून पिंट्याकडे खास लक्ष दिलं न्हवत.

आणि अचानक त्या दिवशी पिंट्या नाल्यात पडला आणि मुन्नी त्याच्यावर फिदीफिदी हसली. प्रपोज व्हायच्या आताच ब्रेकअप झाल्याची फिलिंग पिंट्याला आली. त्याला `दिलवाले`ची सर्व गाणी तोंडपाठ झाली. आता थेटरात पिंट्याचं लक्ष लागेना. मोटारसायकलचे स्टंट चुकू लागले. पिंट्याचा काळा गॉगल हरवला. पिंट्या उदास उदास राहू लागला.

तिकडे बधीर अव्याने, शीलाला आणि शीलानी मुन्नी थोरातला पिंट्याची हकीकत सांगितली. पिंट्या देवगण आपल्यावर मरतो याची कल्पना मुन्नीला होतीच. पण त्यावर तिचं उत्तर होतं, मैंने कभी तुम्हें उस नजर से देखा ही नहीं. तेव्हाच्या सर्व हिरोईनी असंच सांगायच्या.

या उस नजरचा पिंट्याला प्रचंड राग होता. त्यामुळे त्यानेपण कासार गल्लीतला वावर कमी केला. मित्रांमधे पिंट्या देवगण आता ‘सुलझा हुआ कॅरेक्टर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘गोल्डी’वर चहा पिताना पिंट्या डावा हाथ केसांवर फिरवत म्हणायचा, `हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डूबी वहां, जहां पानी ही कम था.` पोरं वाह वाह करत आणि हळूच कश्तीऐवजी मोटरसायकल नाले में कैसे डूबी विचारत. पिंट्या अजून उदास होई.

तो दिवस मात्र वेगळा होता. सप्टेंबरच्या महिन्यात साक्रीत थंडीला सुरवात होऊन जात असे. ताश्यावाले नवीन पिक्चरची पाटी घेऊन बाजार पट्टी, लक्ष्मी रोड, सुतार गल्ली व्हाया पोळा चौक ते राजवाडा, मोहल्ला करत करत कासार गल्लीत येऊन पोचले. पिक्चर होता `हलचल.` काजोल आणि अजय देवगण पहिल्यांदा एकत्र सिनेमात आलेले. त्याच्या महिनाभर आधीच लोकमत आणि आपला महाराष्ट्रला त्या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या छापून आलेल्या.

संध्याकाळी मुन्नी थोरात शीलासोबत `इंद्रायणी`ला आलेली. कोपऱ्यावर पिंट्या देवगण मित्रांसोबत लारीवर तिखट बटाटा खात होता. मुन्नीला बघताच पिंट्याला ठसका लागला. लारीवाल्या नझीमनं तत्काळ पिंट्याला पाण्याचा मग दिला. मग पिंट्या भानावर आला. जाताजाता मुन्नी पिंट्याला स्माईल देऊन गेली.

तसा पिंट्या नेहमी थेटरात चार रुपये भरून वाळू वर बसायचा. पण आज गेटकीपर उत्तम पैलवानने स्वतः त्याला पाच रुपयेवाल्या खुर्चीच्या गेटनी आत सोडलं. पिंट्या मित्रांसोबत तर मुन्नी मैत्रीणीसोबत एकमेकांना सामोरासमोर दिसतील अशा अंतरावर बसले.

`हलचल` सुरु झाला. अजय देवगणच्या एण्ट्रीला पोरांच्या शिट्ट्या नि टाळ्या. पिंट्या मात्र चूप. मुन्नीला काजोल आणि अजय एकत्र बघून जाम भारी वाटत होतं. अधूनमधून ती पिंट्याकडेदेखील बघत होती. पिंट्या मात्र शून्यात. गाणं लागलं. थेटरवाल्यानं आवाज डबल करून दिला. पिंट्या अचानक शुद्धीवर आला. गाणं सुरू झालं होतं, `आय एम सिक्स्टीन, गोईंग ऑन सेवंटीन, दिल क्यूं ना धक धक् करे.`

काजोल गाण्यात पुढाकार घेऊन अजयशी जवळीक साधत होती. तर इकडे मुन्नीला परवाच सतरावं पूर्ण झालं होतं. म्हणून शीला तिला कोपरा मारत चिडवत होती. मुन्नीचं लक्ष मात्र पिंट्याकडे. दोघांची शेवटी नजरानजर झालीच. गाणं पुढे सरकत होतं.

मिटादे दूरियां क्या हैं मजबुरियां,

ढूंढे दिल ये मेरा तेरी नजदीकियां

...रात हैं, रंग हैं, जिंदगी हैं

फिर भी ऐसा लगे कुछ कमी हैं

दिल क्यूं न धक् धक् करें

नेमक्या धक् धक् वर मुन्नीचे डोळे चमकलेले पिंट्यानी बघितले. मुन्नी जागेवरून उठली आणि सरळ बाहेर जाऊ लागली. जाता जाता पिंट्याकडे बघून स्माईल करून गेली.

पिंट्या अवाक. मुन्नी दाराबाहेर गेली. तसा पिंट्यादेखील जागेवरून उठला. `इंद्रायणी` थेटर गावच्या नदीजवळ. थेटरच्या मागे जरा चाललं की धबधबा लागतो. मुन्नी अंधारात त्या दिशेनी चालायला लागली. पिंट्या तिच्या मागोमाग. धबधब्याजवळ येताच पिंट्यानी देवगणसारखा केसांवर हाथ फिरवला. मुन्नीने पण काजोलसारखं नाकाजवळ बोट नेलं आणि पिंट्या ला काही बोलणार एवढ्यात...

पिंट्या पुढे होत मुन्नीचा हाथ हातात घेत विचारायला लागला, `क्यां तुम भी मुझसे उतना ही प्यार करती हो, जितना मैं तुमसे?` मुन्नीने मान हलवत पिंट्याला होकार दिला. पिंट्यानी मुन्नीला अलगद आपल्या मिठीत ओढलं. मुन्नीनेदेखील समाधानाने त्याच्या बाहुपाशात स्वतःला झोकून दिलं.

पाठीमागे थेटरात चालू असलेल्या ‘हलचल’चे डायलॉग ऐकू येत होते. अजय देवगणच्या संवादांना पिंट्या ओठ हलवत होता. तर काजोलच्या वाक्यांवर मुन्नी. दोघीही ‘कान’ नदीच्या त्या वाहत्या धबधब्याच्या साक्षीने आयुष्यभर एकमेकांवर असंच प्रेम करत राहण्याच्या आणाभाका घेत होते.

आता या प्रसंगालादेखील मोठा काळ लोटून गेला. परवा अजय देवगण पन्नाशीचा झाला आणि पिंट्या देवगण पंचेचाळीशीचा. मागे एकदा त्याच्या दुकानावर चप्पल घ्यायला गेलेलो. त्यावेळी त्यानी ‘सिंघम’सारखी मिशी ठेवली होती. आता केस जरा उडालेत त्याचे पण स्टाईल आजही कायम आहे.

दुकानात स्पीकरवर ‘दिलवाले’चं `जिता था जिसके लिये` चालू होतं. तीन चार जोडे ट्राय केल्यानंतर मी त्याला हळूच विचारलं, पिंट्या, मुन्नी भेटस का कधी?

त्यावर तो हसून अभिमानाने म्हणाला, ` पुण्यामा रास पण अजूनभी आपलाच दुकान न्या चप्पल वापरस. वर्षातून एकदा हमकास दिवाळीला दुकानात येतेच. मी पण त्या वर्षाची सर्वात फेशानेबल जोडे काढून ठेवतो तिच्यासाठी. तेवढंच माहेरचं गिफ्ट.` हे म्हणताना पिंट्या देवगण मनमोकळा हसला. हसताना गुटख्याने पिवळे झालेले त्याचे दात करुण दिसत होते.

‘हलचल’ रिलीज झाला त्याच्या पुढच्या वर्षी काजोलचा, ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ आला होता. पिच्चर खूप हिट झाला, पण पिंट्याला तो आवडला नाही. कारण त्या पिच्चरमधे काजोलबरोबर अजय नसून शाहरुख होता. पिंट्या देवगण आणि मुन्नीच्या प्रेमाची खबर मुन्नीच्या बापाला कळली. त्याच वर्षी त्यांनी तिचं आपल्याच जातीतला मुलगा बघून लग्न लावून दिलं.

दिलवाला दुल्हनियां घेऊन पुण्याला सेटल झाला. आणि पिंट्या साक्रीत एकटा पडला. मुन्नीच्या लग्नावेळी पिंट्या एवढा रडला नसेल, जेवढा पुढे काही वर्षांनी रडला. तेव्हा अजय देवगण आणि काजोलच्या खऱ्या लग्नाची बातमी आली होती.

फसलेली रेसिपी आणि 'सुकवेल' (सुख-वेल)

फसलेली रेसिपी आणि 'सुकवेल' (सुख-वेल)

काय केलं नाहीं त्यासाठी...बटाटे टाकले, भाज्या टाकल्या खूप साऱ्या, पुलाव मसाला, खडकफुल, तेजपान, इलायची, दालचनी, तूप काय तेल काय विचारू नका. शिजवले देखिल अगदी प्रमाणात. छान प्लेट ही सजवली. सोबत दही सलाड, पापड, लोणचे होतेच.

अर्धी प्लेट संपली होती. पण आई, बायको आणि मुलीच्या चेहऱ्या कडे बघून खरं काय ते कळत न्हवत. ते उगीच माझ्याकडे न बघता टी व्ही वर, ' आई कुठे काय करते ' चा रिपीट टेलिकास्ट बघण्यात गुंग होते. निदान तसे भासवत तरी होते.
मग मी पहिला घास खाल्ला, नंतर दुसरा, तिसऱ्याला रियालिटी कळली!

स्वतःला धक्के देऊन समजावलं...
हां हां हां...तुझ्या व्हेज पुलाव ला चव नाहीं...
अजिबात नाही!

शेवटीं अतर्मुख होऊन कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेंव्हा लक्षात आलं... कारण होत तांदूळ!
हो. बासमती नावाचा उच्चभृ तांदूळ मी वापरला होता पुलावसाठी.

तुम्हीं म्हणाल, सर्वच पुलाव मध्ये तोच तरं तांदूळ असतो!

पण ज्यांना हा प्रश्न पडला असेल आणि जे साक्री तालुक्यातील नसतील त्यांना जरा फ्लॅश बॅक स्टोरी सांगावी लागेल.

आमच्याकडे म्हणजे साक्री तालुक्यात जवळपास दररोज संध्याकाळी खिचडी खाण्याची प्रथा आहे. आणि ही खिचडी असते त्या तांदुळाचा दर्जा विचारू नका!
अहाहा...

माझा अनुभव विचाराल तरं, मी (मुंबईत) जर संध्याकाळी घरी आलो आणि गाडी पार्क करतानाच खाली तो ओळखीचा सुगंध दरवळला की समजायचं...
हा नक्कीच आपल्या घरातील, आपल्या खिचडीचा आहे!
म्हणजे १२ स्वयंपाक घरांमधून मधून देखील आपल्या किचन चा गंध ओळखता येत असेल तर समजून घ्या...
हवं तर श्री. चटोरे पाटील म्हणा...!

आता ज्या (चटोरे) कुटुंबाला खिचडी इतकी स्वादिष्ट खाण्याची सवय असेल त्यांच्या पुलाव कडून किती अपेक्षा असतील हे तुमच्या लक्षात येईल!

आजवर खूप तांदूळ खाऊन पाहिले.
कोलम चे विविध प्रकार असतील,
बासमती,
नाशिक चा इंद्रायणी,
घोटी चा तांदूळ,
विदेशातील चिकट राईस,
गोवा - कोकणातील फिश करी सोबतचा निरस राईस, गंगासागर, चिमणसाळ, नागपूर बावीस,
जळगांव पास, कुमुद, सरबती, आंबेमोहोर,
छडवेल च्या पाटस्थळ मधला भवाडे...

पण एकालाही ' सुकवेल ' ची सर नाहीं!

दिसायला तो बासमती सारखा हँडसम नाहीं,
कुमुद सारखा नाजूक ही नाहीं,
कोलम सारखे त्याचे सतराशे साठ प्रकार नाहींत,
आणि इंद्रायणी सारखे देखणे रूपही नाहीं.

पण चव... एक नंबर!
वास... ह्म्म्म...
(खासकरून गचकणाऱ्या खिचडीचा)
जणू, प्रेयसीच्या केसातील पारिजातच्या गजऱ्याचा...!
मदहोश करणारा. आतुरता वाढवणारा...

' सुकवेल ' तसा जरा महाग. पण त्या समोर तुम्हीं आपल्या पैश्यांचा गर्व करून उपयोगाचं नाहीं. कारण पैसा असला तरी तो इतका सहाजा सहजी उपलब्ध होत नाहीं. त्यासाठी कष्ट घेण्याची आणि संयमाची तयारी असावी लागते.

कारण तो मिळतो पार तिकडे कोकणात. ( हे कोकण वेगळे... साक्री तालुक्याच्या पिंपळनेर वरच्या पट्ट्याला जो गुजरात ला लागून आहे, त्याला कोकण्या असं म्हणतात.)
पुन्हा त्यासाठी अडव्हान्स बुकिंग करावी लागते.

तुमची संदेश किंवा भूपेश प्रमाणे तालुक्यांतीलच सासुरवाडी असेल तर तुम्हीं नशीबवान! सासऱ्यांकडून बिनदिक्कत तुम्हाला हा ' वानोळा ' मिळेलच!

पण नसेल सासुरवाडी तरं स्वतःलाच त्यासाठी स्ट्रगल करावी लागेल. कुणाच्या तरी मदतीने आधी बुकिंग मग डिलीव्हरी. एखाद वर्षी पीक मुबलक आलं तर इझी नाहीतर रावण्या...(विनवण्या)

मागे मुंबईत, ' सरस ' नावाचं महिला बचत गटवाल्यांच प्रदर्शन भरले होते बांद्र्यात. अनेक स्टॉल्स होते. तासभर फिरलो. पण त्यातील पस्तीस मिनिटे मी एकाच स्टॉल वर उभा होतो.
त्या स्टॉल वर बोर्ड होता, ' सूकवेल '
एखाद्या सासुरवाशीनीला, अचानक दादरच्या गर्दीत माहेरच्या घरा शेजारील प्रेमळ काकू भेटल्या तरं कसं वाटेल... अगदीं तसचं मला त्या स्टॉल वरच्या मावशींना भेटून झालेलं...

आजची रेसिपी

आजची रेसिपी:-

सध्या रेसिपीज बनवण्याचा आणि ते टाकण्याचा ट्रेण्ड आहे आपल्या ग्रुप वर... माझ्यासाठी मात्र आजची ही रेसिपी वेगळी होती, चॅलेंजिंग होती, थरारक होती !

ही बनवणार म्हणून मी घरातल्यांची गेल्या ४ -५ दिवसांपासून वेगवेगळ्या गप्पांच्या माध्यमातून मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांचा प्रतिसाद समजू शकला नाही, कारण आई आणि बायको ने चेहऱ्यावरची एक रेषा देखील हलू दिली न्हवती. त्यामुळे अंदाज येत न्हवता.
शेवटी ही रेसिपी आज खायायचीच असं ठरवलं. पण खालील गोष्टींची काळजी घेतली.

१) कॅलेंडर मध्ये आजचा दिवस पहिला, शुक्रवार होता. (नशीब सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार न्हवता!)

२) डावीकडची शेजारी...ब्राह्मण पांडे बाई, नवऱ्यासोबत मास्क लावून बाजार करायला सकाळीच जातांना दिसली होती

३) उजवीकडची माळकरी, ' गर्जे म्हातारी ' लॉक डाऊन मुळे कुर्ल्यातील मुला कडे रहायला गेली आहे हे माहीतच होतं.

४) मुद्दा १,२,३ मुळे हरिपाठ करणाऱ्या आई चा आपल्याकडे बघतानाचा तुच्छता दर्शक लुक पचवणे सोपे झाले होते

५) बायको आणि मुलगी दोन्ही अजूनही गाढ झोपेत होत्या. तरीही रिस्क नको म्हणून मी त्या दोन्हीं बेड रूमस चे  दरवाजे बाहेरून घट्ट बंद करून घेतले.

६) शेवटी आई ती आईच न राहून मदतीला आली बिचारी. मी हळूच, अगदी किचन च्या ओट्या खाली, सिलेंडर च्या पाठीमागील पिशवी काढली. पिशवीच्या आता अजून एक पिशवी होती... ती ही काढली. मग हे चार वेळा करून सर्व पिशव्या संपल्या आणि एक डब्बा निघाला.
तो डब्बा उघडून, त्यातून दुसरा डब्बा काढला...
आणि त्यातून शेवटी निघाले साक्री च्या बहिणीने प्रेमाने दिलेले... ते बोंबिलचे मौल्यवान तुकडे!

७) फटक्यात फोडणी दिली, लगेच सर्व खिडक्या उघडल्या, ताट करून लागलीच जेवलो. माझं जेवणं संपत नाही तेवढ्यात आई ने भाजी ची कढई धुवून ओटा साफ केलेला होता. मग मी देखील गुपचूप आपल ताट धुवून टाकलं.

८) अगरबत्ती आणि फॅन लाऊन होम निर्जंतुकीकरण केलं

९) एव्हाना मुलगी - बायको उठले होते. पण मी आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवत जसं काही झालंच नाही असे चोरीचे भाव ठेवत ' पट्यारा ' सारखी ढेकर दिली!

१०) थोबाड ब्रश करून, बडीशोप खाऊन चुपचाप बेडरूम मध्ये येऊन सेल्फ क्वारांटाईन होऊन बसलो, आणि हा मेसेज लिहिला.

११) अर्थात, तरीही, मला हे करतांना किती मजा आली असेल, असा प्रश्न कृपया विचारू नये...!

आपला,
व्हेजीटेरियन घरतला मी नॉन व्हेजीटेरियन.

मैत्री... त्या दोघींची!

मैत्री... त्या दोघींची!

चित्रपट लेखक सलीम खान यांच्या एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की, चांगला माणूस कसा ओळखायचा...?
त्यावर त्यांचं उत्तरं फार मार्मिक होत...

"जिसका दोस्त और नौकर पुराना हैं, वही हैं सही आदमी।"

कधी कधी ही दोस्ती इतकी ' पुराणी ' असते की कपाटातील त्या कोपऱ्यात जाऊन पडते.
ते दुमडलेल प्लास्टिक, आत पुठ्ठ्या चा बॉक्स,
त्यात चूरगळलेल्या अस्वस्थेतील ती सारी पत्र...
पोस्ट कार्ड, आंतरदेशीय तरं कधी जागा कमी पडतेय म्हणून अगदीं पोस्ट पाकीट...

किती भरभरून लिहायचो आपण त्या दिवसात.
शाळा/ कॉलेज ला एकत्र होतो पण नंतर दुरावलो.
तू या गावात तरं मी त्या...
कधी शिक्षणासाठी तर कधी नौकरीसाठी.
नवीन मित्र- मैत्रिणी मिळालेच म्हणा तिथे ही... पण... पण... आपली बातच निराळी.

काहीही शेअर करायचं असलं की हक्काची जागा, म्हणजे एकमेकिंचा खांदा!
सॉरी, मी कितीतरी वेळा रडून रडून ओला केलाय तुझा.
पण तूही काही कमी नाही हां...सर्व हट्ट पुरवून घ्यायचीस. अंगात ताप भरला की तुला मंचाव सूप आठवायच...
मग, त्या चायनिज च्या गाडीचा शोध आणि वन बाय टू ची ऑर्डर. तुझ्या त्या तापाचा आणि चायनिज सूप चा काय संबंध हे मला न उलगडलेलं कोडं!

काही ग्रिटींग्ज आणि काही कविता ही आहेत ग यात...
त्यानी दिलेल्या.
पण, मी त्या स्वतः बघण्या आधी तुझी वाट बघत बसायची. माझं हे असं होत. प्रत्येक गोष्टीत तुझं मत महत्वाचं वाटायच.

दूरावलो पण पत्रांद्वारे संपर्क होताच की.
मग कधी तरी STD...
लाईनीत उभ राहायचा कंटाळा यायचा. पण एकदा तुझ्याशी बोलले की कसं हलकं वाटायचं!

आता काळ पुढे जातच राहतो. रहाटगाडा चालूच आहे. जबाबदाऱ्या आहेत. संसाराच्या, मुलांच्या, नोकरीच्या...
आणि तशीही मैत्री जाणारं तरी कुठे...?

फोन होतोच की महिन्यातून एखाद वेळा. नाहीतर व्हॉटस अँप ग्रुप आहेच की. दिवसभर कुणाचा तरी फॉरवर्ड असतोच एखादा. नाहीतर कोण कुठे गेला त्याचा फोटो. जग किती जवळ आलंय नं... या सर्वांमुळे.
कुणी आज काय खाल्ले हे देखील क्षणात समजत!

पण तरीही, आज ही सर्व पत्र, ग्रिटींग्ज बघून अस्वस्थ का वाटतंय... व्हॉट्स ऍप वर तर आता व्हिडिओ कॉल ही आलाय. पण तरीही हुरहुर आहेच. एकटेपणा आहेच. तू सोबत असली की नाही वाटायचं असं कधी.

नाहीतर तुझी ही पत्र... कितीतरी वेळा वाचायची मी पुन्हा पुन्हा... वाटायचं तू जवळच आहेस कुठेतरी. ती मजा या मोबाईल मध्ये नाहीं ग...

अरेच्चा, धूळ साचलीये या पत्रांवर किती.
झटकली पाहिजे... थांब.

...या मेसेज आणि फोन पेक्षा एकदा प्रत्यक्ष कडकडून भेटलो पाहिजे... मग बघुया, कशी धूळ साचते ती...

भक्ती संगीत

भक्ती संगीत

मला आठवतं, पुण्यात शिकत असतांना चितळे, रानडे, कुलकर्णी, बापट या मित्रांच्या गप्पात सहसा बोलायचा चान्स मिळायचाच नाहीं. कारण त्यांच्या पुण्यातील बऱ्याच गोष्टी रीलेटच व्हायच्या नाहीत. त्यामुळे शांतच असायचो. पण मुलं छान होती.

एके दिवशी त्यांची भक्ती संगीताबद्दल जोरदार चर्चा चाललेली. कुणाला कुमार गंधर्व उजवे वाटतं होते. कुणाला भीमसेन जोशी तर कुणाला वसंतराव देशपांडें ची गाणी जास्त इंटेंस वाटतं होती. चर्चेचे सूर वाढत गेले. आता सुई माझ्यावर थांबली होती.

खरं सांगू का, तोवर या पैकी कुणालाच मी ऐकले न्हवते. आणि ऐकलं असेल तरी हे त्यांचच गाणं आहे हे ओळखण्या इतकी अक्कल न्हवती. 
ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या सारख्या ला कुठून आली आहे संगीताची जाण वैगरे...
पण त्या क्षणी मला एक गाणं आठवलं...
मी बोलून गेलो, प्रल्हाद शिंदे यांचं... चंद्रभागेच्या तीरी...


त्या क्षणापर्यंत मला माझ्या आयुष्यातील या गाण्याचं महत्त्वच माहीत न्हवत!

लहानपणी साक्री च्या चाळीत राहायचो. छोटंस गावं. चाळ गावाच्या अगदीं मध्यवर्ती भागात. चाळीच्या समोर उजवीकडे एक परीट (इस्त्री वाला) होता.
मी डोळे चोळत अगदीं जिवावर आल्यासारखं सकाळी उठायचो... ट्युशन साठी.
मग जिना उतरून खाली सायकल काढायची. तिच्याच्यावरची धूळ झटकायची.

साखळी, कुलूप, दफ्तर... हे सोपस्कर करत असताना पाठीमागे न कळत त्या गाण्याचे स्वर ऐकु येत. ते गाणं त्या इस्त्री वाल्याने लावलेले असायचे.
कोळशाची इस्त्री.
पहाटे पासूनच तो कोळसा पेटवायला घेत असावा.
तो धूर आणि ते संगीत. त्यातही गाणं हेच.
रेडिओ ऐकायचा की टेप रेकॉर्डर वर माहिती नाहीं.
पण हे गाणं लूप वर चालू असायचं.
तेंव्हा प्रसन्न वैगरे माहिती न्हवत. पण ज्याम फ्रेश वाटायचं.

पुढे थोडफार कळायला लागलं. वरील सर्वच दिग्गजांच संगीत ऐकलं. मत्रमुग्ध ही झालो. अजूनही होतो.
पण प्रल्हाद शिंदेचा तो आवाज.
तो दूरवरचा विठुराया.
ते जय हरी म्हणणारे शब्द...
आहाह...
आजही तितक्याच इंटेंसिटी ने काळजात घुसतात.

अध्यात्मा विषयी नंतर बोलता येईल पण हेचं माझं भक्ती संगीत हे मात्र मी निश्चित सांगू शकतो!

( आत्ता, जरा निवांत असाल तर कोरोणाची काळजी सोडून कोपऱ्यातल्या खिडकीत जाऊन उभे रहा. आणि कानात इअर फोन लावून हे गाणं एकदा तरी नक्की ऐकाच.)

आठवण

कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी कधीतरी आठवण येतेच.
तो/ती आपापल्या आयुष्या पुढे गेलेले असतात.
वेळ सरत जातो. आयुष्य कुणासाठी कधीही थांबत नाही.
घर संसार, नवरा/बायको, मुलं, करीयर हे चक्र कुणाला चुकलंय!
आयुष्याच्या टप्प्यावर कधीतरी झालेली भेट.

तशी ती भेट खास नसतेच मुळी.
पण तो काळ खास असतो.

उम्मेदीचा, नव्या कोऱ्या तारुण्याचा, फ्रेश स्वप्नांचा...
त्यामुळे त्या काळातील सर्वच खास असतं.

ती मैत्रीण, तो मित्र, ते गावं, ती शाळा, ते कॉलेज...
तो रस्ता, पारिजात चे ते झाडं, तो गुलाब, लायब्ररी चा तो कोपरा...
ती कॅन्टीन, कटिंग चहा, तो पाऊस, ती गझल...
ती बिनधास्त सिगरेट, बाईक वरचा तो थरारक प्रवास, तो अबोला, तो दुरावा...
सर्वच खास!

त्याच्या लेदर ज्या जॅकेट चा खास असा गंध...
तिच्या नुसत्या ओढणीचा खास रोमांचक स्पर्श...
एकमेकांसोबत घालवलेले ती शेवटची खास कातरवेळ...


मधे बराच मोठा काळ, खूप वर्ष, कितीतरी पाऊस आणि बऱ्याच संध्याकाळी...
कधी गैरसमज, कधी मजबुरी तरं कधी इगो...
सुरवात कोण करणार,
समजून घेणारं का,
आपणच का...
तो का नाही...
ती का नाही...
....................
त्यामुळे मध्ये ही मोठी कोरी रेषा...!

दरम्यान खूप भेटलेत.
कामाच्या ठिकाणी,
वेगळ्या गावात,
नव्या जगात...

पण त्या साऱ्यांना...
' ती ' ची सर नाहीं
' त्या ' ची सर नाहीं

आणि मग अश्याच एखाद्या, लॉक डाऊन कातरवेळी... आठवण तरं येणारच....

(हे गाणं त्या आठवणीं साठी)

ती आणि कोर्टाची पायरी

ती आणि कोर्टाची पायरी

सर्वीकडे वर्दळ. हातात बंदुकी ऐवजी फाईल धरलेले पोलिस, पांढरा झगा आणि मावळा टोपी घातलेले पट्टेवाले, सर्वसामान्य माणसं आणि निर्विकार चेहऱ्याने इथून तिथून ये जा करणारे इथले युनिफॉर्म धारी काळे कोट.

तीन वर्षांपू्वी तिला कुणी सांगितलं असतं की काही दिवसांत हे सर्व, तुझ्या जगण्याचा भाग होणार आहेत... तर कदाचित तिने विश्वास ठेवला नसता. सतत हसरा चेहरा. समोरच्याला समजून घेणारा आणि परक्यांमध्ये देखील अलगद सामावून जाणारा स्वभाव. खरं तरं तिच्या व्यक्तिमत्त्वातील हे महत्त्वाचे वैशिष्ट्य.

असं म्हणतात की, बालपणी तुम्हीं कुठल्या वातावरणात वाढतात त्यावर तुमचा स्वभाव ठरतो. तिचं ही काहीसं असच असणार. वडील सैन्यात असल्यामुळे त्यांच्या सतत होणाऱ्या बदल्या. एके ठिकाणी मोठा काळ थांबायचे म्हटले तरी घरं अश्या ठिकाणी जिथे धर्म, जात, प्रांत अशी कुठलीही विभाजनी नाहीं. आर्मी कॅन्टोन्मेंट एरियात  राहणाऱ्या लोकांसाठी ठळक असे दोनच प्रकार असतात. एक कॉलनी मेट्स आणि बाहेरचे सिव्हीलियंस!

मद्रासी, बंगाली, साऊथ इंडियन, पंजाबी, मराठी असे सर्वच शेजारी. त्यामुळे प्रत्येकाकडे येणे जाणे. मित्र मैत्रीणी देखील तेथीलच. पुन्हा कॉलनी ची शाळा देखील स्वतंत्र. केंद्रीय विद्यालय, ज्यात सर्व सैनिकांची मुलं. भाषा, संस्कृती आणि धर्म - जातींचे सुंदर मिश्रण बघायचे असेल तर अश्या कुठल्याही कॅन्टोन्मेंट एरियात जा.
त्यामुळे हा ' आपल्यातला ' किंवा तो ' परका ' हा फरक खरंतर तिने कधी अनुभवलेलाच नसतो.

"केस नंबर पाच. बी के सी पोलीस स्टेशन, समोर या..."
पट्टेवाला जोरात आवाज देतो आणि ती आपल्या विचारातून बाहेर येते. नेहमी प्रमाणे जज प्रश्न विचारतो आणि तिची वकील उत्तरं देते. समोर सरकारी वकील असतो. तो कोण कोण आलेत आणि कोण अनुपस्थित आहे ती सर्व नावं नोंदवून घेतो. जज बाजूला बसलेल्या टायपिस्ट ला काही सूचना करत पुढची तारीख देतात. ज्याने तिच्यावर केस केली आहे तो आणि त्याचा वकील कोपऱ्यात उभे राहून गालातल्या गालात हसत असतात.
नेहमीप्रमाणे आपली बॅग आणि साडी सावरत ती बाहेर पडते. गेल्या अडीच वर्षांपासून आता तिला हे सवयीचे झालेले असते.

एव्हाना सूर्य डोक्यावर आलेला असतो. दक्षिण मुंबईतील या परिसरात जरा जास्तच उष्मा जाणवतो. कोर्टाच्या कोपऱ्यावर एक बाई आपल्या लहान बाळाला सावरत कानातले, नाकातले, बांगड्या असले काही बाही विकत असते. तिच्या बाजूला अजून तीन चार स्टॉल मांडून पुरुष मंडळी देखील तसलेच काहीतरी विकत असतात. किंमत ओरुडून सांगितली की लोकं आकर्षित होतात. त्यामुळे पुरुषांच्या स्टॉल वर गर्दी असते. विकणारी बाई मात्र पुरुषांच्या दुकानावरील गिऱ्हाईकांकडे अपेक्षेने बघत असते. त्यातील कुणीतरी चुकून तिच्याकडे आलंच तरं तिला ते विकायचं असतं. पण मधूनच तिचं बाळ रडायला लागल की गिऱ्हाईक देखील उशीर होतो म्हणून तिथे थांबत नाहीं.

ती मात्र तहान लागली म्हणून रसवंती शेजारी उभे राहून आपला ग्लास येण्याची वाट पहाते.
कधी रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या स्त्री कडे तरं कधी उसाचा रस काढणाऱ्या यंत्राकडे बघत आपल्या विचारात हरवून जाते.
...आपल्यात आणि वस्तू विकणाऱ्या तिच्यात फरक काय? हा प्रश्न तिला सतावत असतो. आपण तिच्या पेक्षा नशीबवान म्हणून आपल्याला उच्च शिक्षण घेता आले. खासगी क्षेत्रातील मोठ्या पॅकेज चा पर्याय असूनही आपण आवड म्हणून ही सरकारी नौकरी स्वीकारली. गेली बारा वर्षे ती प्रामाणिकपणे करतही आलो.
वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवताना कधी तिला तिच्या कामाचे वेगळेपण जाणवत नसे. पण वर्ष अखेरीस मुलं जेंव्हा कॉलेज-विद्यापीठ सोडून जात त्यावेळी तिच्या पाया पडत. काही ग्रिटींग्ज देत, काही पुष्गुच्छ तर काही स्वतः लिहिलेले पत्र... त्या सर्वात तिच्याविषयी इतकं भरभरून लिहिलेलं असे की ते वाचून तिला भरून येई. पास आऊट झालेले विद्यार्थी जेंव्हा कधी बाहेर भेटत त्यावेळी देखील मुलांचा स्वर कौतुकाचा असे. "तुम्हीं शिकवलत मॅम म्हणून आम्ही इंडस्ट्रीत अभिमानाने नोकरी करतो ", "अनेकदा कामात तुम्हीं शिकवलेल्या कानमंत्राची आठवण येते आणि चुटकीसरशी प्रॉब्लेम सोलव्ह होतात" अश्या वेळी तिला सर्वात जास्त ऊर्जा मिळे. आपण केलेल्या कामाचे समाधान वाटे.

"मॅडम, आपका ग्लास",  म्हणून रसवंती वाला ओरडतो.
तशी ती विचारातून बाहेर येते. रसाचा ग्लास ओठाला लावते त्याचवेळी समोरच्या बाईचे बाळ जोरजोरात रडायला लागते. हातातलं गिऱ्हाईक सोडून ती बाई बाळाला धरायला जाते. त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते.

...तिला देखील मुलीची आठवण येते. सकाळी निघताना तिला शाळेत सोडलेल असतं. एका तासात शाळा सुटण्याची वेळ होणार असते. तीला नेण्यास उशीर नको म्हणून ती लागलीच आपला ग्लास संपवून निघते.
" मॅडम आज कुछ नहीं लेंगी क्या... कुछ तो लिजिये..." मागून त्या बाईचा आवाज येतो.
तीन चार पिना, हेअर बँड असले काहीतरी उचलते, तिच्या हातात पैसे ठेवते. छुट्टा रखलो म्हणत ती घाईतच निघते. दरवेळी सारखी विचारपूस करत नाही म्हणून वस्तू विकणारी बाई देखील हिरमुसते. पण निदान सकाळ पासून काहीतर विकलं गेलं म्हणून तिला बरं वाटतं.

टॅक्सी ने इतक्या लवकर पोहोचणं शक्यच नसत. मग ती स्टेशन गाठते. ट्रेन मध्ये दुपारीही प्रचंड गर्दी. निदान उभे राहायला तरी जागा मिळाली म्हणून तिला समाधान वाटतं. एकूणच गुदमरणार वातावरण. त्यात महिला डबा आणि तेथील आरडा ओरडा. सहसा ती कानात इअर फोन घालून गुलजार ऐकणं पसंद करते पण आज मात्र तिचं लक्षच नसतं कुठे. पुन्हा पुन्हा ' विकणारी बाई ' आणि ' ती ' स्वतः यांच्यात तिचं मन तुलना करत राहतं.

त्या बाईला ही ओरडता यायला हवं होत म्हणजे तिच्याही सामानाची विक्री झाली असती...बाळ नसतं तर गिऱ्हाईक लगेच निघून गेले नसते... थोड अधिक शारीरिक बळ असतं तर जास्त सामान भरता आलं असतं... संध्याकाळी उशिरापर्यंत विक्री करता आली असती... एक ना अनेक शक्यता होत्या.

विचारांचे आवर्तन सुरू होते. ' ती ' च्या वरून विचार स्वतः वर यायला फार वेळ लागत नाही. प्रत्येक वेळी आवाजच महत्त्वाचा असतो का? त्याही पलीकडे स्त्री मधे अनेक गुण असतात. काही निसर्गाने दिलेले तर काही तिने या पुरुष प्रधान जगात स्वतःच्या अस्तित्वासाठी कमावलेले!

कामाच्या ठिकाणी फक्त पगार मिळाला की सर्व संपत का? त्यापलीकडे एखाद्या स्त्री ची कुवत असेल तर तिला त्या प्रमाणात संधी का मिळत नाही. एखादीने प्रयत्न केलाच तर तिला किती अडचणींना सामोरे जावे लागते. पुरुषांच्या जगात आपला हक्क मिळवण्यासाठी भांडलो तर अगदी चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंत मजल जाते. आणि तरीही बाई भांडली तर त्याला स्त्री-पुरुष वाद न समजता सरळ जातीवाचक कलम लाऊन लॉक अप मध्ये बंद करण्याची धमकी!
मग सुरू होतो कधीही न संपणारा खेळ. पोलिस स्टेशन, कोर्ट, मागासवर्गीय आयोग, महिला आयोग, कार्यालयातील आय सी सी कमिटी, स्पेशल इंकवायरी...

आपल्या हक्कांसाठी भांडलो तर केस होते...
पुरुषांच्या अरे ला कारे नी उत्तर दिलं तर जातीवाचक कलम लावले जाते...
स्वतःच्या सन्मानासाठी लढलो तरं काऊंटर केस म्हणून हिणवले जाते...

आणि विशेष म्हणजे या सर्व खेळात स्वतःच्या माणसां व्यतिरिक्त तिच्या सोबत कुणीही नसतं.
एक तप ज्यांच्यासाठी काम करत आलो ते स्वतःचे कार्यालय हात वर करते...
इतक्या मोठ्या संस्थेत आय सी सी नावाची खास स्त्रियांसाठी बनवलेली यंत्रणा अॅक्टिव नसते. तिच्या फॉलो अप नी ती पुनः सुरू करण्यात येते. पण त्याचा काही उपयोग होत नाही. शोभेची बाहुली म्हणून फक्तं त्या कमिटी ला उभे केले जाते... इतक्या नावाजलेल्या संस्थेला गालबोट लागू नये याची कमिटीचे सदस्य पुरेपूर काळजी घेतात...
आम्ही स्त्रियांसाठी खूप कामं करतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न कमिटी करते... आणि हे सगळं फक्त कागदावर...!
महिला आयोगात काम करणारे ही पुरुषच... ते ही पत्रापत्रीचा खेळ सुरू करतात....
तिच्या कार्यालयातील सर्वोच्च स्थानी बसलेले साधी भेटही नाकारतात... आपली नेमणूक पाच वर्षांची त्यामुळे नको त्या भानगडीत कशाला पडायचं...!
ती कुठल्या कुठल्या आयोगात जाते आणि सगळीकडे मदतीची आशा बाळगते... उलट तिलाच धमकीचे पत्र मिळतात.
चार चौघात, व्हॉट्स अप ग्रुप वर देखील लायकी काढण्याचा प्रयत्न होतो.
ती जाईल तिथे आणि करेल त्या कामात आडकाठी कशी निर्माण होईल यासाठी चोख व्यवस्था केली जाते...

लहानपणी आर्मी एरियात राहताना सर्व मित्र - मैत्रिणी - शेजारी तिला समान भासत. या अनुभवानंतर मात्र तिला माणसांच्या जाती दिसायला लागतात. जात बघून लोकं आपला की परका ठरवतात. कौतुक करायचे की अपमान, सपोर्ट करायचा की विरोध हे फक्त जात बघून ठरवणारी माणसं...एकाच ठिकाणी कामं करणारी, वास्तव्यास राहणारी पण कागदाच्या तुकड्यावर लिहिल्या गेलेल्या विशिष्ट जाती मुळे विभागली गेलेली माणसं... एकीकडे विद्या दानासारखे पवित्र कामं करणारी तरं दुसरीकडे त्यातही विद्यार्थ्यांची जातवार विभागणी करणारी माणसं... तिला कळत नाहीं, आपण पूर्वी हा फरक बघू शकत नव्हतो का? आपल्याला तसली दृष्टी नव्हती का? की आत्ता आपली दृष्टी विस्तारली? पण विस्तारली म्हणून हेचं योग्य आहे का? मग पूर्वी एकत्रित राहायचो ते काय होत... तिचा गोंधळ होतो. काय खरे नी काय खोटे हे देखील आपल्याला ठरवता येऊ नये म्हणून स्वतःचाच राग येतो.

जो गुन्हा केलाच नाही तो सिद्ध करण्यासाठी अख्खी यंत्रणा तिच्या विरोधात उभी करण्याचा घाट घातला जातो.
सुरवातीला ती या सर्व प्रकरणी हादरून जाते. मोडून पडते. क्षणोक्षणी आपण आता कधीही कोलमडून जाऊ असं वाटतं राहत. असंख्य उंबरे झिझवते. पण कुठेही न्याय मिळत नाही. आता फक्तं कोर्टाच्या तारखांना हजर रहावे आणि आलेला दिवस घालवावा एवढेच तिच्या हाती उरते. महिन्यातील किती तरी काळ ती या केस मध्ये गुंतून पडते. जो वेळ ती पूर्वी इतर चांगल्या कामासाठी वापरे तो आता केस पायी तिला गमवावा लागतो.

आता समोर दोनच पर्याय असतात.
एक...या षडयंत्रा समोर झुकून जायचं
दोन... सर्व शक्ती निशी याचा प्रतिकार करत रहायचा

एव्हाना शाळेच्या गेट मधून तिची चिमुरडी धावत येऊन तिला बिलगते. तिला मिठीत घेताच मघाचे विचारचक्र मोडून पडते. क्षणभर रस्त्यावर वस्तू विकता विकता आपल्या बाळाला सांभाळणारी ' ती ' तिला आठवते. त्या दोघींमध्ये एक साम्य असतं... त्या दोघींनीही दुसरा पर्याय निवडलेला असतो...!

कासारे (आत्याच गावं)

कासारे:-

वस्तू, जागा, घर, इतकंच काय तर अंगावरच्या कपड्यांपासून तर पायातल्या चपलांपर्यंत मनुष्य सर्व काही इथेच सोडून जातो. मागे राहतात त्या फक्त आठवणी.

दोन वर्षांपूर्वी बायजा गेली मग मागे आण्णा... परवा आक्का देखील गेली. आज तिला जाऊन पाच दिवस झालेत म्हणून दहव्याचा हा कार्यक्रम! मुंबई हून रात्री चा प्रवास करून आलो पण झोप अशी नाहीच...
बालपणीच आत्याच हे गाव सारखं डोळ्या समोर येतं होत.
कासारे म्हटल की बायजा- आक्का हे समीकरण पक्कं!  त्यांच्या शिवाय या गावात जाण्याचा तसा संबंध न्हवताच!
आणि आज त्या दोघीही इथे नाहीत... आता कासाऱ्यात कुणीच नाही, म्हणजे ही आपली इथली शेवटची भेट तरं!

मी इथे या ओट्यावर बसलोय... पलीकडच्या गल्लीत अक्काचा कार्यक्रम चालू आहे तर बाजूच्या गल्लीत बायजा चे घरं... सवयी प्रमाणे बायजा कडे जावे तरं तिथे कुणीच नसणार... भयंकर वाटतंय. इच्छा असूनही त्या गल्लीत आपण आता शिरणारच नाहीं का कधीही...

अंगावर अक्षरशः काटा येतोय... म्हणजे जीवनाचं हे देखील एक रूप असतं तरं!

आण्णा-बायजा, आप्पा-आक्का, बापू... एका गांवात राहणारी ही रक्ताची माणसं... बालपणातील एक काळ आणि असंख्य आठवणी आहेत कासाऱ्या च्या...

प्रत्येक दसऱ्याला दादांनी सकाळी मोटारसायकल धुतली की पहिली भेट साक्रीच्या गुरुदत्त मंदिरात आणि मग तिथून पुढे सरळ कासारे. मी पुढे टाकीवर तर दीदी दादांच्या मागे... असा तो प्रवास. बायजा किंवा आक्का कडे जायचे म्हटले की दादा मोटारसायकल नेहमी मागच्या दारून  घ्यायचे.
बस स्टँड वरून मागचा रस्ता सोपा पडायचा. पुन्हा वाटेत.   'दरबार बँड पार्टी '  वाल्यांची घरं नी त्या समोर ठेवलेले ढोल ताशे बघितले तरी लग्नात नाचल्याचा आनंद व्हायचा.

बायजा च्या घरी मागून पुढे जायचे म्हटले तर एक अरुंद पण लांबलचक बोळ होती. त्यातून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकत असे. तिथून चालायला गम्मत वाटायची. पण कधी तरी समोरून बैल आला तर आमची पळता भुई व्हायची! पूर्वी बायजा च्या घरासमोर प्रचंड मोठा वाडा होता. जुन्या मराठी सिनेमात पाटलाचा वाडा असायचा तसा त्याचा फिल होता. एका बाजूला कधी कधी गुर बांधली जात तर दुसरी बाजू मोकळी. माईचा नारळाचा कार्यक्रम याचं वाड्यात झाल्याचं आठवतंय. बायजा आण्णाना नातवंड खूप. सुट्टीत ती मंडळी आली की धमाल करायची. माझ्याहून मोठे असूनही ते मला मामा म्हणायचे त्यावेळी राग यायचा. पण नंतर कळलं की वय कमी असल तरी आमच्यात मामा- भाच्याचेच नाते होते.

बायजा कडे गेलो की सर्वप्रथम खोल बशीत चिवडा आणि घट्ट दुधाचा चहा मिळायचा. ओसरीत मधोमध एक लाकडी खांब होता ज्याला पकडून सर्व भाचे मंडळी दिवसभर धावत पळत, तरं मोठी माणसं त्या खांबाला टेकून निवांत बसत.
बाजूला धान्यसाठी दोन मोठी कोठार होती. त्या कोठरांच्या खाली छोटा दरवाजा फार गंमतीशीर वाटायचा त्यावेळी.

लहानपणी आण्णांची थोडी भीती वाटायची त्यामुळे त्यांच्याशी बोलणे कमी व्हायचे पण बायजा कडे मात्र आम्ही मोकळेपणाने बोलायचो. दसऱ्याच् सोन दिलं की बायजा हातात वीस पैसे ठेवायची त्याचा खूप आनंद व्हायचा. दादा मात्र आणांसोबत नेहमी मोकळे बोलतांना दिसायचे.

बायजा कडून आक्का कडे जायला निघालो की मागच्या दारात बायजा चा जोरात आवाज येई, " जेवाले आठेच ये बरं का दादाभाऊ "
दादा बायजला हसून होकार तरं देत पण मनात आता, आक्काला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसे आणि मग आम्ही त्यांच्यावर हसायचो.

माई च्या लग्नानंतर तिला कासाऱ्याला घ्यायला जायचं ही माझी जबाबदारी होती. फक्तं सतरा- अठरा वर्षाची माई. म्हणायला मोठी बहीण पण लग्न झालेली सासुरवाशीण म्हणून खूप लहान!  माईला घ्यायला गेलो की तिला खूप आनंद व्हायचा. पण बायजा मात्र आम्हाला लवकर सोडतच नसे. आत्याच्याच घरी दिल्यामुळे थोड हक्कान बोलता यायचं पण त्या बाबतीत बायजा बरीचशी कर्मठ. मग, मीही दोन तीन दिवस थांबणे का होईना पण माईला सोबत घेऊनच जाईल म्हणून बायजा मागे लागायचो.
मग दिवसभर बाजारात (दर्जा) फिरून झाले की बोर व्हायचे.

संध्याकाळी मागच्या हौदात उडी मारून आंघोळ करायचो, मजा यायची पण लगेचच समोर एवढ्याश्या बहिणीला जड साडी आणि पदर सांभाळत भांडी घासताना बघून कसचच व्हायचं... साक्री ची लाडकी भारती माई मात्र इथे सूनबाई म्हणून वावरतांना कुणीतरी परकी वाटायची!

पण रात्री ओपन थेटरात वाळू वर बसून सिनेमा पाहिला की कासाऱ्याचा मुक्काम सार्थकी लागायचा. पुन्हा थेटरात मालपुरचा भय्या दादा भेटला की फुकट तिकीटाची सोय व्हायची, तेवढेच पाचं रुपये वाचायचे. त्यावेळी सिनेमा बघणे म्हणजे एक मोठा सांस्कृतिक सोहळा असायचा कासाऱ्यात. घरोघरींचे बाया बापडे चादरी गोधडी घेऊन सिनेमा आवर्जून बघायचे. विरासात, बाजिगर, हीरो नंबर वन, राजू बन गया जेंटलमन इत्यादी सिनेमे कासाऱ्यात ओपन टाकीत मोकळ्या आकाशाखाली बसून बघितलेत. वाचकांना खोटं वाटेल पण ' चेन्नई एक्स्प्रेस ' या सिनेमाच्या जाहिराती शुट करतांना मी हे प्रत्यक्ष शाहरुख खान ला ही सांगितले होते. त्यावेळी त्यांनी देखील ओपन थियेटर ला हसून दाद दिली होती.

बायजा ला भेटून झाले की आक्काकडे निघायचो. आक्काच्या मागील दारी बोरांच झाडं आणि अळूची पान लावलेली असायची. पुन्हा वाटेत काळ्या गंगूताईचे झाडे लागत...ती गंगूताई तोंडात टाकत आक्काचे घर गाठायचो.

आक्का कडे घरात घुसताच आपण स्वतःच माठातून पाणी घ्यायची पद्धत होती. त्यानंतर आक्का बशीत दही टाकून सांजोरी द्यायची. त्यावेळी आक्का कडे दूध धुपते भरपूर असल्यामुळे घट्ट दुधाची मऊ दही मिळायची. पुढच्या ओट्यावर अप्पा नेहमी दोरी बनवताना दिसतं. इतकी दोरी बनवून अप्पांनी नक्कीच शंभरावर खाटा बनवल्या असतील असं वाटायचं. आक्काच्या घरी नेहमी खाऱ्यातील लोणचे असायचे. बरणीतील लोंच्या पेक्षा त्याची चव भन्नाट वाटायची. मग मी हळूच खोलीत शिरून ते लोणचं खायचो. बाजूला बोरं सुकायला टाकलेली असत. ती देखील मुठभर खिशात ओतायचो. भज्यांची आमटी आणि भात ही आक्काची स्पेशालिटी. आक्काच मागचं दार मला खूप आवडायचं. त्या दारातच सर्व जण बसत. दाराला मोठं मोठे किल्ल्यावर असतात असे खिळे लावलेले होते. त्यावेळी त्याचं डिजाइन खूप आवडायचं.

माणूस बालपणी जे बघतो ते त्याच्या कायम स्मरणात राहत. वाचता यायला लागलं तेंव्हा कथा कादंबऱ्यातील गावं खेड्याचे वर्णन आले की कासाऱ्यातील आक्काच्या  घरासारखा दरवाजा किंवा पुढची पडवी, बायजा सारखा वाडा, मधली बोळ...छडवेल सारखं खळ किंवा खोल्या... तामसवाडी सारखा पार किंवा मळा हेच इमॅजिन व्हायचं. किंबहुना आजही होतंय.

हळू हळू वर्ष सरत गेली. मोठे झालो तरी बायजा आक्कला भेटायला कासाऱ्याला जायचंय हा नियम होता. दादा गेल्यानंतर मात्र माझ जाणं तसं कमी झालं. मधल्या काळात तिथे देखील खूप बदल झालेत. व्यावहारिक विचार करून राजू दादा आणि बापूंनी घराचा वाडा पाडून नवीन घर बांधलं आणि मागची जागा मोकळी केली. तिथला हौद तोंडून टाकला. जमीन तीच पण घर बदललं. उंच चिरी म्हणून अण्णांना घराचा अभिमान वाटायचा. पण मला मात्र प्रत्येक भेटीत तिथला तो वाडा आणि हौद च आठवायचा.
आक्का चं घर होत तसचं राहिलं पण काळानुरूप निगा नसल्यामुळे ते ही अधिक भकास वाटायला लागल.

शिक्षण संपवून मुंबईला नौकरी करायला लागलो. संसारात रमलो मग मध्येच आप्पा गेल्याचा फोन आला तेंव्हा कासाऱ्याला गेलो. बापू वारले तेंव्हा गेलो. बायजा च्या वेळी प्रचंड पावसात रात्रीची गाडी चालवत गेलो पण अंतिम दर्शन झाले नाही. आण्णांच ही तसचं. प्रत्येक प्रवासात कासाऱ्याच्या आठवणीं यायच्या. पण यावेळी जरा वेगळं वाटतंय. आक्का जणू कासाऱ्याचा शेवटचा मेंबर.

कुणी नुसतं, मामाच गावं म्हटलं तरी ' तामसवाडी ' डोळ्यांसमोर उभं राहतं. पण आत्ताचं नाहीं. जुनं. धरणात बुडालेले. मनाला हुरहूर लागते की ते गावं आपण पुन्हा कधीच बघू शकणार नाहीं म्हणून. पण तामसवाडी बाबत निदान ही कल्पना असते की ते खरंच धरणात बुडालय. पण कासाऱ्याचे काय...? गावं तिथेच आहे. घरं आहेत. पण तेथील माझी माणसं कुठे आहेत... आणि माणसचं नसतील तर गावाला तरी, काय अर्थ आहे...