Wednesday, 24 April 2019

ओंझ कमी करायचं!


ओंझ कमी करायचं! 

एक निर्णय घेतलाय...घरातलं आणि डोक्यातलं जास्तीत जास्त ओंझ कमी करायचं!
दहा वर्षापूर्वी या घरात संसार सुरु केला तेंव्हा खूप मोजक्या वस्तू होत्या. दिवाणखान्यात एक पलंग, छोटा स्टूल त्यावर बहिणी कडून आणलेला जुना पोर्टेबल टी व्ही, आणि काही पुस्तक. किचन मध्ये गैस आणि काही मोजकी भांडी. पण संसार थाटायचा इतका आनंद होता कि या मोजक्या सामानातही खूप समाधान वाटायचं.
मुळात बारावी नंतर घर सोडलं त्याला हि दहा वर्ष झाली होती. ब्याचलर असतांना देखील मोजकच  सामान असायचं जवळ. त्यामुळे, लग्नानंतर पुन्हा ‘घर’ मिळाल्यामुळे उत्साह दांडगा होता. पण गेल्या दहा वर्षात गरजा वाढल्या कि महत्वकांक्षा... माहिती नाही. सामान मात्र वाढतच गेलं!

एक एक करून इतक्या वस्तू आल्या कि पूर्वी सारखं घरात फ्लोर वर लोळून पडण, ब्याट बॉल खेळण , बाल्कनीत पाय मोकळे सोडून पुस्तक वाचत बसण देखील कमी झालं...कारण सर्वीकडे सामानाच सामान!
सोफा, बेड, टी पॉय, बिन ब्याग्ज, कपाट, मुव्हिंग चेअर्स, बुक शेल्फ, एल सी डी टी व्ही, स्टडी टेबल, दिवाण, फ्रीज, ओवन, वॉशिंग मशीन...बाप रे! यादी खूप मोठी झाली, नि घरातील जागा अपुरी!

डोक्याचं देखील तसचं! ज्ञान मिळवण्याची पूर्वी पासून आवड, त्यामुळे वाचन खूप. मिळेल ते आणि हवं असलेल मिळवून वाचायचंच हा आवडीचा भाग. त्यामुळे वृतपत्र, वाचनालय, पुस्तकालय सर्विकडेच रपेट. त्यात कालांतराने इंटरनेट आलं आणि मग विचारायलाच नको.

पण गेल्या काही दिवसांपासून, असं वाटायला लागलं कि, ही खरंच ज्ञाना ची भूक आहे कि अपडेट राहण्याचा अट्टाहास! आणि नुसत्या माहितीला ज्ञान तरी कसे म्हणावे. माहितीचा जणू सर्वीकडून भडीमार. टी व्ही न्यूज कमी कि काय त्यावर वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्ती, अमुक डॉट कॉम, तमुक डिजिटल लाइव पुन्हा फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसऑप, टिकटॉक आणि या सगळ्यावर कडी म्हणजे यु ट्यूब. तुम्ही एक गोष्ट आवडीची बघा तसल्या आणखी दहा, ते तुमच्या समोर हजर करणार. सध्या इलेक्शन चा जोर सर्वीकडे बघायला मिळतोय. कुतूहल म्हणून कन्हैया कुमार च भाषण ऐकायला घ्यावं तर समोर ओवेसी, आंबेडकर, प्रजापती, वरून ग्रोवर, पायाल रोहतगी, विवेक अग्निहोत्री, राज ठाकरे अशी भली मोठी लाईनच समोर येते. मग आपण अपडेट राहण्याच्या नादात यांमागे धावत राहतो आणि हाती मात्र काहीच लागत नाही.

सिनेमा हे आवडीच क्षेत्र. थियेटर मधे जाऊन सिनेमा बघन ही मौज होती. ट्रेलर आवडला की सिनेमा बघायचाच ही उस्पुर्त घडणारी कृती. पण स्वतः ‘फिल्म’ केल्यानंतर मात्र आपण सर्व चित्रपट बघायला हवेत असं वाटायला लागल. पुन्हा सिनेमाचे सर्व प्रमोशन्स, रिव्हीव्ज, बॉक्स ऑफिस, ऑडियंस रियक्शन, राजीव मसंद, अनुपमा चोप्रा हे सगळ आलच!

टी व्ही, सिनेमा कमी की का्य, वेबसिरिज च वार येउन ठेपल Netflix, Amazon Prime, Eros Now, MX Player, Alt Balaji, Voot, Hotstar वरच्या देशी- विदेशी सिरीज... नाही म्हणायला ही खरोखर आवड तर  आहेच पण नकळत हळूहळू त्याचा देखील अतिरेक व्ह्यायला लागला. मजोरंजनापलिकड़े आपल्याला, नविन येणारी प्रत्येक सीरिज माहिती आहे कारण आपण ‘अपडेट’ आहोत असा समज झाला आणि घरा प्रमाणे डोक्यात देखील सामानाची गर्दी झाली.

त्यामुळे उशिरा का होईना, आता ठरवलंय... नसेना का अपडेट, आपण फक्त आपल्या आवडी पुरत नी  क्षमते एव्हडच घायचं. जास्तीचा सोस करायचा नाही. कुणी ‘अड़ानी’ म्हटल तरी चालेल. गेल्या आठवड्या पासून सुरवात देखिल केलीय. पेपर बंद करून टाकला, टी व्ही वर किड्स चानेल्स फक्त ठेवलेत. ट्वीटर, इन्स्टाग्राम डीएक्टिवेट केलेत. यू ट्यूब, फेसबुक App वर नाही तर log in करूनच बघायचं (म्हणजे उठ्सुठ विजिट कमी होईल). नो मोर डॉट कॉम न्यूज. WhatsApp सोडणं जरा कठीण वाटतंय, गरज झालीये ती सध्या, नात्यांची नी कामाचीही त्यामुळे त्याच बघूया पुढे.

बाकी सोफा पासून olx ची सुरवात झालीये. चांगली किमतही मिळाली. बरंचस सामान खास मिनी टेम्पो करून गावी पाठवून दिल. नशीब आई आणि बायको ला देखील निर्णय पटलाय. आता लिहितोय ते मोकळ्या हॉल मध्ये भिंतीला टेकवून. छान वाटतंय. दडपण कमी झाल्यासारखं!

अजूनही बऱ्याच गोष्टींवर काम करायचं आहे. सुरवात तर चांगली झाली...बाकी पुढचं पुढे बघू...       
  


No comments:

Post a Comment