Thursday, 1 August 2019

ती गावी जाते तेंव्हा...

तिला गावी जायचे म्हणून गेल्या आठवड्या पासून तयारी चालली होती.
तारीख एकदा ठरली की ती कुणाचच ऐकत नाही.
शुगर टेस्ट.. डॉक्टर.. दोन महिने पुरतील तेवढी औषधे...
डोळे तपासणी.. नवीन चष्मानव्या चप्पलशूज...
असं एक एक करून टू डू लिस्ट पूर्ण करण्याची धडपड चालेली तिची.

पुन्हा इथल्या घरातील आवरसावर...
स्वतःच बेड शीट, पांघरायची चादर, टॉवेल.. धुवून घडी करून कपाटात ठेव,
तर कधी, नागलीच पीठ उरलय त्यात अजून एकदाआंधन घालता येईल याच्या सूचना दे.
सोबत तीळीची चटणी कुठे ठेवली आहेउपमाकरण्यासाठी रवा भाजून कुठे ठेवला ते सांग,
किंवा सरबत-लस्सी करायची तर पिठी साखर दळून कुठल्या डब्यात भरली आहे,
मुंग्या लागतात म्हणून शेंगदाणे फ्रीज मध्ये कोणत्या कोपऱ्यात ठेवलेत याच्या सारख्या सूचना...

लोणचे संपत आले म्हणून गेल्या आठवड्यापासून हिचीसारखी बडबड...
मोहरी पडलीय घरात, फक्तं टेरेस वर जाऊन चार कैऱ्या तरी तोडून आण..”, म्हणून मागे लागलेली.. खरं तरं, ती लोणचं खातच नाही पण मला मात्र लोणच्याशिवाय भागत नाही म्हणून तिची ही धडपड...!

एक ना हजार गोष्टी तिच्या डोक्यात चालेल्या...साक्रीला जाण्याआधीच शेजारी फोन करून कामवाल्या बाईला निरोप देणे.. मग, नेमकी ती कामाला येते त्याच वेळी तिला शेजाऱ्यांच्या फोनवर गाठून, गोडी गुलाबीने कामावर येण्यासाठी पटवणे.
गेल्या चार महिन्यात साक्रीत कुणा कुणाकडे ‘दारावर-बारावर’, जायचे आहे याची यादी बनव. कुणाच्या हळदीला, बारश्याला कुठली साडी किंवा गिफ्ट देता येईल याचा हिशेब ही इथूनच करून ठेवलाय तिने...

आज ती गावाला जाणार म्हणूनकोपऱ्यात तिची बॅग भरून ठेवलेली...
सामान मावत नाही म्हणून मदत करायला गेलो तर नकार देत स्वतःच चेन लावायचा प्रयत्न करत होती... मगं मीच बळजबरीने सर्व सामान बाहेर काढलं आणि पुन्हा नव्याने बॅग भरायला घेतली... तर त्यात हा मोठाऐवज...!

बिना आल्याचा चहा तिला घोटवत नाही (ऐनवेळी तिकडे आणून द्यायला कुणी नाही) म्हणून आल्याचा छोटा तुकडा...
ओवा-शोपा ची छोटी डबीहिरवी मिर्ची,
कुलदेवीला जाताना नेता येतील म्हणून दोन नारळ,
होळी-पाड्व्या पासून खास आखाजी साठी जपून ठेवलेले साखरेचे हार कंगण..
कामवालीला आणि इतरांना वाटता येतील अश्या कापडी पिशव्या..
देव्हाऱ्यातील वातींसाठी, दुधाची साय साठऊन तयार केलेले तूप..
संगु दीदी ला तिचा किचन ओटा धुवायला कामी येईल म्हणून छोटा ब्रश (लाखांत टर्न ओवर असलेल्या कंपनीची मालकी असलेली मुलगी !)
...पण तुम्ही तिला म्हणूच शकता नाहीत, कि हे तिकडे देखील मिळू शकते...
तीच उत्तर ठरलेलं असत...
मिळायला काय सर्वीकडे सर्व मिळत, पण आणायची आठवण कोण ठेवणार...
खरंय तीच...आठवण ठेऊन एखादी गोष्ट जपून ठेवायला आईचच काळीज असायला हवं !      

तिच्या सर्वात जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे दर मंगळवारी घरी भरणारे स्वाध्याय केंद्र. पण गेल्या काही महिन्यांपासून तिला ते अस्वस्थ करत होते. मुंबईला आली तरी साक्रीला स्वाध्याय केंद्र चालावे म्हणून तिची धडपड...मंगळवारी दिवसभर ती संध्याकाळी भारती माई च्या फोन ची वाट बघत असते. आज केंद्र भरले होते का, किती बायका आल्या होत्या हे ऐकण्यास तिचे कान आतुर झालेले असतात...या वेळी जातांना ती मनाशी कसली तरी तयारी करत असावी असं वाटलं...कदाचित स्वाध्याय केंद्र बंद होणे कसे टाळता येईल याबद्दल विचार करत असावी...

कसं असत नाही माणसाच, जे दूर आहे, त्याची सतत ओढ असते आणि जवळ आहे ते देखिल सोडवत नाही. एकीकडे जिथं तिचा जन्म गेला ते गावं, जिथे जोडीदारा सोबत संसार केला आणि खूप अपेक्षेने बांधले ते घर...
तर दुसरीकडे शहरात राहवत नाही तरी मुलगा-सून आणि नातीची असलेली ओढ.
आयुष्य असं विभागल गेलंय तीच. पण तिची तक्रार नसते कधीच, जिथे असेल तिथे समाधानी.

पूर्वी शिक्षणासाठी घर सोडलं तेंव्हा आई-दादा घरून निघताना हजार सूचना द्यायचे. पोहचला कि नाही याकडे त्याचं लक्ष लागून राहायचं आणि मी मात्र बिनधास्त.
पण आता उलट झालय, असं वाटतं. वयस्कर आईला आरामदायी बस मध्ये बसवल तरी खिडकी बाहेरून हात हलवताना जीव कासावीस होतो, सतत तिला सूचना देत राहतो...
पोहोचली तरी तिकडे एकटी कशी राहील याचच मन काळजी करत राहत...
पण गेल्या काही वर्षात एक अनुभव आलाय, वेळ सर्व काही शिकवते माणसाला.
आईला एकट जगायलाही...आणि
आपल्याला तिच्याशिवाय राहायलाही...!

No comments:

Post a Comment