बाबापण निभावताना
परवा आमच्या बिल्डींगमध्ये कोणाकडे तरी पाहुणे आले होते, त्या बाई बिल्डिंग मधील मुलांमध्ये छान रमल्या होत्या.
आमची स्पृहा पण तिकडे खेळायला जात होती. त्यादिवशी त्या बाईंनी मुलांना कुठलीतरी क्रीम
बिस्कीट वाटली. स्पृहा नि त्यांच्याकडून अजून एक जास्तीच बिस्कीट मागून घेतलं, म्हणाली हे माझ्या बाबांचे लहानपणीचे आवडीचे बिस्कीट होते
पण त्यांना त्यावेळी दुकानात ते एकच मिळायचं, पूर्ण पुडा न्हवता मिळत, म्हणून मी एक
बाबांसाठी नेते...हे ऐकून त्या बाईंना एवढी गंमत वाटली कि त्या . स्पृहा सोबत तीच घर
बघायला आल्या. आता त्यांना घर बघायचं होत कि बिस्कीट खाणारे खादाड बाबा हे
त्यांच्या नजरेतूनच कळायला आम्हांला फार वेळ नाही लागला.
बायको, मला म्हणाली कि तू मुलीला
लहानपणीचे काहीही किस्से सांगतो आणि मग ती ते असे बाहेर सांगते. मी पटकन म्हणालो
अग आम्ही फ्रेंडस आहोत, आम्ही
एकमेकांत सर्व शेअर करतो, हो कि नाही ग
स्पृहा...खरं तर मी हे बायकोला सांगत होतो कि स्वताला. स्पृहा फक्त सहा वर्षाची
आहे पण आतापासूनच मी कितीतरी गोष्टी तिच्यासोबत शेअर करू शकतो. एक बाप म्हणून
आपल्या चिमुरडी सोबतची मैत्री मी सध्या एन्जॉय करतोय. आपल्याकडे बऱ्याचदा आई आणि
मुलगी यांच्या मैत्रीबाबत खूप बोललं जात. मला वाटत तशी मैत्री बाबांसोबत देखील होऊ
शकते.
मध्यमवर्गीय कुटुंबात बालपण घालवलेल्या आमची, आमच्या बाबांसोबत मैत्रीच न्हवती असे मी म्हणणार नाही पण वडिलांशी बोलताना, वागतांना नेहमी आदराची भावना असायची लहानपणी.
आज स्पृहा च्या बाबतीत वडील म्हणून तिच्या शाळेचा प्रवेश असेल किंवा क्लास
वैगरेंचा निर्णय घेताना मात्र सतत एक प्रकारच दडपण मनावर असत. खासकरून मुंबई
सारख्या शहरांत राहत असतांना मुलांच्या बाबतीत असंख्य गोष्टींचा विचार पालकांना
करावा लागतो. सांताक्रूझ-बांद्रा सारख्या परिसरात इच्छा असूनही मराठी माध्यमाच्या
शाळेत प्रवेश घेता येत नाही म्हणून कुचंबना होते. मग आहे त्या शाळेतील शिक्षक आणि
मुख्याद्यापाकाना भेटून इतर विषयांबरोबर मराठी- हिंदी चा आग्रह धरणे असेल किंवा शाळेतून
परततांना, बालपणीच्या गोष्टी सांगून
आपले गाव, नाती, आपली संस्कृती या सारक्या गोष्टी मुंबईत राहूनही तिच्यात
रुजाव्या म्हणून माझ्यासारखा बाबा केविलवाणी धडपड करत असतो. काळ बदलतो आहे, जागतिकीकरण आपल्या जगण्याचा भाग झालेला आहे हे सगळे कळत
असूनही कुठेतरी मुलांमध्ये आपली मूळ कायम राहावी म्हणून मन नकळत प्रयत्न करत असते.
खरंतर हा लेख लिहितांना ठरवलं होत कि मुली सोबतच्या काही गमतीदार प्रसंगांना
शब्दबद्ध करूया जेणेकरून वाचकांना देखील ते वाचायला गंमत यावी, मात्र जेंव्हा प्रत्यक्ष लिहायला बसलो तेंव्हा गंमती ऐवजी
काळजीचेच शब्द बाहेर पडतायत...
रोज सकाळी वृतपत्र हातात घेतलं कि नको त्या बातम्या वाचायला मिळतात, आपला संबंध नाही असे म्हणून सोडून द्यायचे ठरवले तरी सोडता
येत नाही...कारण त्या दूर परदेशात नाहीत तर आपल्याच शहरात आपल्याच आजूबाजूला घडलेल्या
असतात. आणि मग नकळत, स्पृहा बाहेर खेळायला
जरी गेली असेल तरी काळजाचा ठोका हलतो. सहा वर्षाची चिमुरडी बिल्डिंग मध्येच आसपास
खेळत असेल तरी आई-बाबांना काळजी वाटते...दर पंधरा मिनिटांनी ते तिकडे एकदा तरी डोकावून
येतात...
मुलीसोबत असतांना, खेळतांना, फिरताना प्रत्येक क्षण आनंदी असतो पण तिला शाळेत सोडून
आल्यानंतर, स्विमिंग क्लास ला ती
गेल्यावर आपले डोळे सतत आजूबाजूच्या अस्तित्वावर शंका तर घेत नाही ना असे वाटत असते.
स्कूल बसचा ड्रायव्हर, शाळेतील
मदतनीस बाई असेल किंवा बिल्डींगचा चौकीदार नकळत मनात शंकेची पाल चुकचुकते. सकाळी
कोणाची नजर कशी होती याचा शोध मन घेत असते. मला खात्री आहे असे वाटणारा मी एकटा
नाहीये, बऱ्याच वेळा या गोष्टी
आपल्या नकळत होत असतात. आज मी जेंव्हा हे लिहायला बसलोय तेंव्हा मला देखील नव्यानी
या गोष्टी उमजत आहेत. एका लहान मुलीचा बाबा म्हणून आपण किती असुरक्षित आहोत याची
जाणीव होते.
मनात असंख्य प्रश्न येतात, आपल्या
लहानपणी छोट्या गावात, जिथे सर्व
शेजारी आणि गावातील बहुतेक लोक खूप आपुलकीनी वागायची, मी आणि माझ्या बहिणी खूप मनमोकळे पणाने बाहेर खेळायचो, अगदी खूपच उशीर झाला तर आई बोलवायला येत असे. नाहीतर आम्ही
दिवसभर गावभर नुसते उंडारत असायचो. आई बाबांना आमच्याकडे काळजीने चोरून बघताना
बघितलेला मला आठवत नाही.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, चुकीची आधुनिकता या सभोवतालचा देखील आपल्या ‘बाबापनावर’ परिणाम होऊ
शकतो याची जाणीव मला आज होत आहे. हि अशी परिस्थिती असेल तर समाज म्हणून आपण विचार
करायला हवा.

No comments:
Post a Comment