वर्गमित्र प्रविण शिंदे ला भावपूर्ण
श्रद्धांजली.
काही लोकांची एक्झिट अचानक होते.
प्रव्या आणि मी पहिले ते चौथी एकाच गल्लीत
रहायचो. सुतार गल्ली. एकाच शाळेत जायचो.
बाजारपेठेतील मराठी शाळेत जाताना रस्त्यावर
त्या वयात देखील प्रव्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितल्या प्रमाणे आम्हाला काही
गोष्टी सांगायचा. मराठीचा निबंध स्वतः विचार करून नाही तर पुस्तकातून उतरून
लिहायचा कारण बाईंवर त्यामुळे जास्त ‘इम्प्रेशन’ पडत. गुरुजींच ‘पान’ टपरीवर जाऊन आणताना पानवाल्याकडून एक्स्ट्रा बडीशोप
मागायची, आणि कुणाच्या नकळत आपल्या तोंडात टाकायची किंवा पेपर लिहितांना मोठ-मोठ
अंतर ठेऊन लिहायचं म्हणजे उत्तरपत्रिका लगेच भरते वैगरे.
त्याचं सुरवातीपासूनच सगळ वेगळ होत. त्यावेळी ‘चौकटीबाहेरील
विचार’ वैगरे प्रकार माहित न्हवते पण आज त्याच्या संबंधी जेंव्हा विचार करतोय
तेंव्हा वाटत प्रव्या चौकटी बाहेरचा होता...
प्रव्या अभ्यासात तसा जेमतेम. पण त्या गोष्टीचा
त्याला कधी खेद तर सोडा तर जाज्वल्य अभिमान होता. पाचवी ते दहावी पहिल्या बाकावर
बसायचा, अर्थात कोपऱ्यातल्या भिंतीजवळ...! बाजूच्या खिडकीतून बाहेरची ये जा बघता
यायची आणि सर्व वर्गावर देखील नजर ठेवता यायची हा हेतू. जुन्या गावातून प्रव्या
जेंव्हा कॉलनीत राहायला गेला त्यावेळी स्वारी भयंकर खुश होती. त्यानी स्वताच्या
हातानी आपल्या नवीन घराच्या पत्त्याचे ‘व्हिजिटिंग कार्ड्स’ बनवले होते, अक्षर
अर्थात.....पण त्याला कोण सांगणार! त्याच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वास होता.
लांबून यायचा म्हणून सर्व ग्रुप मध्ये मला वाटत त्याच्याकडे पहिल्यांदा सायकल आली.
बापरे... या सायकल वर प्रव्या असला भारी भरायचा. एक चक्कर मारायचा म्हटलं तरी
याच्या दहा अटी. हुशार पोरगा असेल तर त्याच्याकडून होमवर्क करून घे. खेळातला असेल
तर त्याच्या टीम मध्ये घेण्याची हमी घे आणि एखादा बावळट असेल तर मग विचारू
नका...पप्रव्या त्याची अक्षरश: ..... ठेवायचा!
नववी-दहावीतला प्रव्या मौजी होता. मस्तवाल
होता. अफलातून होता. टेक्निकल ला त्याचा विषय, ‘कारपेंटरी', पण सरांशी याची
दोस्ती त्यामुळे ‘जॉब’ करण असेल किंवा ग्राफिक्स च ‘शीट’ पण याची काम सहज व्हायची.
शीट काढतांना हातात पेन्सिल धरली तर याच तोंड सतत उघड...आं करून लिहायचा म्हणून
आम्ही चिडवायचो. टेक्निकल च्या वर्गातील याची अतुल सोबतची जुगलबंदी आणि ‘म्हातारी शाम्पू
नि आंघोळ करायची’ हि गोष्टी म्हणजे भयंकर गमतीशीर प्रकरण होत. फुटबॉल खेळता यायचा
नाही तरी हा टीम मध्ये आघाडीवर कारण कप्तान भूपेश याचा मित्र. मग काय प्रव्या सर्व
टीमला शिकवायचा ‘ट्रीपलिंग’ आणि ‘हेडिंग’ कस करायचं...हा भाग वेगळा कि खेळतांना
याच्या कडे कधीच बॉल येत नसे...पण, “पास पास पास...”म्हणत, याचाच आवाज सर्वात
जास्त!
मोराण्याला फुटबॉल सामने खेळायला गेलेलो
त्यावेळी तर सामना न खेळता हि प्रव्या ‘स्टार’ ठरला. कारण याचे जोक्स आणि
कोमेंट्री आणि मग ते बोलताना तो कुणालाच नाही घाबरायचा. त्याच्या भाषेत, घंटा आपल्याला
फरक पडत नही! बिनधास्त होता तो.
हायवे ला दुरून सांगायचा येणारी एस टी कुठली
आहे ते. वडील एसटी महामंडळात त्यामुळे लहानपणी देखील याचे सर्व ड्रायवर-कंडक्टर
ओळखीचे. हा चालत्या बस ला हात द्यायचं, आणि गाडीतील ड्रायवर याला रामराम
करायचा...हे बघून आम्हाला ज्याम भारी वाटायचं. अश्यावेळी वर्गातल्या मुली देखील
प्र्व्याकडे बघून स्माईल द्यायच्या. मग काय गडी चेकाळायचा, पुन्हा जोक सुरु. वेज-नॉन
वेज त्याला बंधन न्हवत कुणाच. गडी निडर होता.
स्त्री आणि पुरुष यांच्यात नात का निर्माण होत
आणि ते किती काळ टिकत या विषयी ज्यावेळी तो बोलायचा, वाटायचं यानी त्यात Phd केली आहे कि काय. फुल टू Knowledge..! ‘प्रेम’ वैगरे गोष्टी त्याला भंपक वाटायच्या. नातं गरजेतून
निर्माण होत. मानवी उत्पत्ती हे म्हत्वाच कारण बाकी सगळा टायमपास ह्या स्वताच्या
फिलोसोफी पर तो ठाम होता. खरतरं त्याच्या शब्दात मांडलेली फिलोसोफी इथं लिहिता
येणार नाही, कारण मग 'सेन्सोर' ची गरज भासेल... पण प्रव्या मात्र त्या वयात देखील इतका ‘पुढचा’ होता हे आज जाणवतंय. भाई ‘बोल्ड’
होता एकदम.
दहावीनंतर मात्र आमचं भेटन खूप कमी झालं. गाव
सोडून शिक्षण-नौकरी साठी बाहेर पडलो त्यामुळे फक्त वर्ष दोन वर्षात दिवाळी-आखाजी भेट.
प्रव्या त्याच्या आवडीनुसार व्यवसायिक ‘ड्रायवर’ झाला होता. स्वतची गाडी होती.
एकदा एका लग्नात भेटला. नवरदेव ची सजवलेली गाडी चालवत होता. म्हटलं प्रव्या मजा
आहे तुझी, कितीक नव्या संसाराच्या सुरवातीला तुजा हातभार लागतोय. म्हणाला ...गीरी
आहे सगळी. बिनकामाची पैश्याची उधळपट्टी, साला कोर्ट म्यारेज बर, पण जाऊदे आपला
गाडी चा धंदा तर होतो म्हणाला. सुरातीपासूनच हा असा, बिनधास्त विचार करणारा.
गेली खूप वर्ष भेट नाही. त्याचा भाऊ गेला मग
आई-वडील. हि बातमी कळली पण त्याला खास असं भेटता नाही आल. आणि आज अचानक ग्रुप वर
तो गेल्याची बातमी कळली. फोन केले तेंव्हा कळल, आजारी होता म्हणे कधी पासून.
लिवर,
दारू हे सर्व सालं निमित्त असत... काही लोकांच आयुष्यामानच कमी त्यामुळे
आयुष्यातील सर्व धडे ते पटापट शिकतात. किती वर्ष जगायचं हे ‘तो’ ठरवतो, पण जेवढे
जगलो त्यात काय अनुभव घेतले हे महत्वाच. मला वाटत, प्रव्या कमी वयात जीवनाचे ‘सर्वच’
अनुभव घेऊन एक्झिट झाला.
बिनधास्त, निडर, रोकठोक...मित्रा तू कायम
आठवणीत राहशील यार.
No comments:
Post a Comment