परवा पाऊस पडला, मातीचा सुगंध आणि सोबतीला कटिंग चहा, खूप nostalgic व्हायला झाल. मराठी शाळेतील पाउस आठवला...
मी वर्गात दाराजवळ बसलोय, बाहेर पाउस पडतोय...
गुरुजी फळ्यावर दोन अंकी वजाबाकी शिकवत आहेत. पावसाचा आवाज सोडला, तर शाळेच संपूर्ण आवार शांत आहे. फक्त 'ब' तुकडीतून मराठीची कविता गाण्याचा आवाज येतोय, बहुतेक वाणी बाईंचा तास असावा.
दारातून बाहेर पाहिले, तर पाउस सारखा कोसळतोय. शाळेचे पटांगण पाण्याच्या डबकयानी भरलय.
आज सकाळीच शाळेत येताना, मी आणि पंकजनं घरून गोधडी शिवायचा दोरा आणि रिकामी आगपेटी आणलीये...हि साधनसामुग्री आम्ही समोरच्या डबक्यातील बेडकांना पकडण्यासाठी वापरणार आहोत.
पाउस जसा जोरात कोसळायला लागला, तसा 'ब' तुकडीतील पोरांचा आवाज अजून वाढायला लागलाय,
"हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे..." सगळे एकाच सुरात गातायत...
खरच, गेल्या आठ दिवसांपासून पाउस पडतोय आणि एवढ्यातच 'साक्री' चे सर्व ग्रावुंडस हिरवेगार झालेत.
अगदी नदीकाडचा शनिमंदिराचा पार, आमची गल्ली, न्यू इंग्लिश स्चूल कडेचा रस्ता, सर्वीकडे हिरवळ दिसतीये...
या पावसात किती जादू आहे नाही...?
मी, आमचा मागच्या अंगणात फुलांची रोप लावली आहेत, दोन महिने झाले, दररोज पाणी टाकूनही एवढी वाढली नाहीत आणि पावसाच्या या आठच दिवसात किती हिरवीगार दिसायला लागली आहेत.
अगदी, 'हिरवे हिरवे, गार गालिचे' या कविते सारखे...
धपाक..........
पाठीवर कसल्यातरी वेदना झाल्यासारखे..., मागून कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज, बघतो तर गुरुजी...!
मग, गुरुजींनी सांगितलं...
"दीपक, उठं पंधरा चा पाढा म्हणून दाखव, लक्ष कुठे आहे तुझं...?
आधीच वेदनांनी पाठ दुखत होती, त्यात गुरुजींनी सांगितलेला पाढा, म्हणजे धमकी प्रमाणे वाटत होता.
पंधरा एकी पंधरा, पंधरा दुनी तीस, पंधरा त्रिक...पंधरा त्रिक...
अंगातील सर्व त्राण गेल्यासारखे वाटल. मागे वळून बघतो तर सारा वर्ग माझ्याकडे बघतोय...
पण, माझी नजर 'पंकज' ला शोधत होती.
पंकजकडे पाहताच त्याने झटक्यात आपल्या हातातील आगपेटी दप्तरात टाकल्याचा भास झाला.
धपाक.....
पुन्हा पाठीत एक दणका...आई ग...!
वर्गात कुजबुज...काहीसा हशा...
"शिकवताना लक्ष बाहेर दारात असत, मग कसा शिकशील...?
मोठा झाल्यावर काही बनायचे आहे कि नाही?"
गुरुजींचा हा प्रश्न सुन्न करून गेला. माझी मान अजूनही खाली, गुरुजी खूप काही-काही बोलत होते,
खर म्हणजे, ते रागवत जास्त आणि बोलत कमी.
पण, अजूनही माझ लक्ष दारातच...
दूरवर झेंडया साठी तयार केलेला खांब, पटांगणाच्या मध्यभागी उभा आहे. त्याचा पायथ्याशी सिमेंटचा ओटा बनवला आहे. त्या ओट्यावर ती 'बेरकी' बेडकं चढतायात , उड्या मारत ड्राव ड्राव करत आहेत.
काय, हिम्मत यांची? यांना चांगले दोरांनी बांधायला हव, अस मला कळकळून वाटल.
गुरुजी पुन्हा, " अरे लक्ष कुठे आहे तुझ...?
एवढ्यात दारावर कुणाची तरी सावली, त्यापाठोपाठ शिपाई, त्याच्या हातात हेंडमास्तरांची जाड वही
(दादा त्याला रजिस्टर म्हणतात...हं तीच हि वही...!)
म्हणजे नोटीस वाटत...!
गुरुजी नोटीस वाचून दाखवतात...
" पावसाळा सुरु झाल्यामुळे, शाळेची साफसफाई करण्याचे ठरविले आहे, तरी त्यासाठी ह्या तासा नंतर विद्यार्थ्यान कडून सामुहिक श्रम अपेक्षित आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला ह्या श्रम दानासाठी थांबावयाचे असेल त्यांनी थांबावे व शाळेच्या मदतनीस बाईना आणि शिपाई काकांना मदत करावी. ज्यांना थांबावयाचे नसेल त्यांनी काहीही गोंधळ न करता निमुटपणे घरी जावे."
सही- मुख्याद्यापक.
अरे वा! मुलांचा एकच गोंधळ...तेवढ्यात घंटा वाजते...
टन टन टन....
गुरुजींच्या बोलण्याकडे लक्ष हि न देता आणि शिपायाला अगदी दरवाज्यातच अडकवत सगळे बाहेर पळतायत..."शाळा सुटली, पाटी फुटली...हे... हा... हुर्रे हुर्रे ....
" पंक्या, थांब आपण शाळेची सफाई करायला थांबू, मजा येईल यार,
नदीवर जायला मिळेल, बेडकं पण पकडू....", मी पंक्याच्या पाठीमागे वर्गातून केंव्हा बाहेर पडलो हे गुरुजींनाच काय, पण मला हि कळल नाही.
पटांगणातून पळता-पळता कुणीतरी मागून पायात पाय घालून 'च्याट' मारली, मी सरळ डबक्यात...
"आयला, सगळे कपडे खराब झालेत यार",
"दिप्या, तो नक्की 'ब' तुकडीतील अतुल असणार यार", पंक्या बोलला.
"माजलेत यार 'ब' तुकडीवाले, दाखवायला पाहिजे त्यांना एकदा", चंदू येऊन मिळाला.
कमरेचा बेल्ट आणि दफ्तरातील पाट्या बाहेर निघाल्या.
" पकड, त्या अतुल ला, तो बघ बाजाराकडे पळतोय", चंदू ओरडला.
आम्ही सर्व अतुल च्या मागे...
अतुल मात्र तेथून क्षणात सटकला, शेवटी उद्या त्याला 'सुगडी', वाटताना धरायचे अस ठरलं.
आता आम्ही सर्व पटांगणात परतलो, पाउस आता थोडा कमी झालाय.
आमची कौलारू शाळा पावसानी धुऊन निघाली आहे.
मागच्याच महिन्यात रम्याच्या दुकानातून शाळेचा बोर्ड नवीन 'कलर' होऊन आला होता...
त्यामुळे मस्त दिसत होता.
आयला, त्या दिवसापासून रम्याचा फॉर्म काय वाढला...?
पण, रम्या देखील त्याच्या वडिलांसारखीच सुंदर चित्र काढतो, त्यामुळे रम्या मला आवडतो.
आमच्या ग्रुप मध्ये सर्व असेच आहेत...
पंक्याच हॉटेल आहे, त्यांच्या हॉटेलात मिसळ लय भारी...!
लोनारी च्या वडिलांकडे घोडा आहे. तो ते लग्नांत भाड्याने देतात, लोणारी कधी-कधी आम्हाला त्याच्या घोड्यावर बसू देतो.
नाझींमच्या अब्बांचे भंगाराचे दुकान आहे. आई मला नेहमी स्टोव्ह रिपेयर करायला तिथे पाठवते, गर्दीत पन आपला नंबर लवकर लागतो.
चंदू चे वडील पेरेशपुरच्या शाळेत गुरुजी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे रंगीत खडू नेहमी असतात.
आयला, आपल्या ग्रुप मध्ये सर्व कामाची लोकं आहेत, 'युसलेस' (ताई, हा शब्द नेहमी वापरते) असे कुणीच नाही.
आम्ही सगळे 'व्होलेन्टीयर ' हातात शाळेच्या बादल्या (त्यांच्यावर लाल रंगाचा ठीबका आणि शाळेचे नाव आहे) घेऊन नदीवर निघालो...
दुपारच्या शाळेतील काही मुली पण होत्या बरोबर,
पण आपण त्यांना भाव देत नाही...छे! मुलींशी कोण बोलणार?
नदीकडे जाणारा रस्ता 'इंद्रायणी' थियेटर कडून जातो.
"अरे बघ, अनिल कपूर चा 'रामलखन' लागलाय, लय फायटिंगचा पिक्चर आहे", पंक्या खुश होऊन सांगत होता.
शेवटी आम्ही सर्व धबधब्याजवळ...सगळे म्हणतात 'साक्री' चा धबधबा खूप डेंजर आहे...
पण, आपण कुठे घाबरतो...?
पावसाळ्यात 'कान' नदीला खूप पाणी असत.
"साक्रीच्या नदीला 'कान' का म्हणतात रे पंक्या? पाय, हाथ, नाक का नाही?" चंदूचा प्रश्न.
पाठीमागून बोरसे गुरुजी येऊन थडकले,
"अरे लवकर भरा बदली...शाळा धुवायची आहे ना...!"
आम्ही सर्व पाण्यानी भरलेली बादली घेऊन शाळेकडे निघालो...
रस्त्याने चालताना बादलीतील पाणी सारख डबकत होत.
आज शाळा साफ करायला खूप मजा येणार होती, पाणी भरून झाल्यानंतर शेण आणायला जायचं होत.
मग वर्ग शेणानी सारवायचे होते. गेल्या वर्षी आमचा शेणानी सरावलेला वर्ग होता. त्यावर बसल्यावर खूप थंड वाटायचं. पण ह्या वर्षी शाळेनी काही वर्गांमध्ये फरशी बसवली, त्यामुळे आता ४ थीत आम्हाला फरशीचा वर्ग मिळाला.
पण मला शेणानी सारवलेला वर्गच जास्त आवडतो, काय रे पंक्या?
हो न यार...पंक्या क्षणात बोलला.
अजून खूप काम होती. आज वर्ग नाही, पाढे नाहीत, गणित नाही, धडा नाही कि पाठांतर नाही.
दिवसभर फक्त पाणीच पाणी...पाऊसच पाऊस...!
आम्ही शाळेत पोहचलो, सगळ्यांनी आपआपल्या बादलीतील पाणी, टाकीत टाकल.
माझा नंबर आला आणि मी पुढे सरकलो तर सर्व हसायल लागले...
हे सगळे का हसतायत 'पेशल' करून या शिष्ट मुली...! मला काहीच कळत न्हवत.
तेवढ्यात...धाप -धपाक...पाठीत काहीशा वेदना...
गुरुजी ओरडले, " दिप्या, सर्व पाणी रस्त्यावर सांडून आला लेका"
मी लाजेन लालेलाल झालो होतो, वर बघायची हिम्मत होत नव्हती.
खाली मान घालून माझ्या बादलीकडे बघत होतो.
सगळेच मला पाहून हसत होते.
तेवढ्यात,
माझ्या बादलीतून एका छोट्या बेडकांनी, टुणकन उडी मारली आणि तो त्या मोकळ्या हिरव्यागार पटांगणाकडे पळायला लागला...



No comments:
Post a Comment