Tuesday, 28 June 2011

आठवण

संद्याकाळीच मन उगीचः कातर होत. 
कुणाचीतरी आठवण यावी म्हणून भिरभिरत राहत...
आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर कुणीतरी जीवाभावाचे भेटलेल...
त्याच्या सोबत घालवलेले क्षण...ते दिवस...तो ऋतू... 
असे काहीतरी उगीचच मनात कुजबुजत राहत...
एकीकडे आकाशात क्षणाक्षणाला रंगांची उधळण होते...
कधी तांबडा, कधी केशरी तर कधी हळदी प्रमाणे पिवळा...
प्रत्येक रंग जणू वेगवेगळे प्रसंग घेऊन येतो.
भूतकाळाच्या वळणांवर भेटलेले ते 'क्षण'... 
आज ज्यांना आपण 'आठवण' म्हणतो....


नाहीतरी, आता आठवणी शिवाय काय उरलय माझ्या जगण्यात.
तुम्ही जाऊन आता वर्ष झाल. 
पण, अजूनही तुम्हाला वगळून विचार करायची सवय नाही झाली. 
माझ स्वतःच अस अस्तित्व होतच तरी कुठे...
लग्नानंतर काही दिवसातच कळल होत कि आपल्याला आयुष्याचा 'खरा जोडीदार' मिळाला. 
तुमची वागणूक आणि इतरांसाठी जगण्याची वृत्ती...
तेंव्हाच ठरवल होत, हे आयुष्य आता फक्त तुमच्यावर ओवाळून टाकायचं.                                                       

 
तुमच्या सोबतीच हे 'जगण', किती सुंदर होत...
किती लहान होतो आपण, लग्न झाली तेंव्हा...पण तरीही तुम्ही किती गंभीर वागायचात.
कदाचित जबाबदाऱ्यामुळे असेल पण लहान वयातही तुम्ही कधी 'अल्लड' नाही वाटलात.
घरातील कार्य, सण, समारंभ, लग्न साऱ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडत होतो.
कधी परिस्थितीशी, कधी समाजाशी तर कधी वेळ आलीच तर स्वताशीच लढत होतो.
तुमचा समाजावर आणि सामाजिक संस्थेवर प्रचंड विश्वास होता म्हणून तुम्ही नेहमी नियमानेच वागायचात 
पण त्या वागण्यावर कुठलेच दडपण नव्हत.
नदीने पठारावरून जसे अगदी 'सहज' वाहत राहावे तसे... 


त्याकाळी खूप कमी लोकांकडे गाडी असायची. 
तुमच्या बरोबर मोटारसायकलवर पाठी मागे बसून जेव्हा 'माहेरी' जायची त्यावेळी कसला अभिमान वाटायचा स्वताचा, स्वताच्या भाग्याचा...
हिरव्यागार रानातला तो कच्चा रस्ता कधी संपूच नये अस वाटायचं.
असे कितीतरी क्षण, असंख्य प्रसंग...  
भविष्या विषयीचा सकारात्मक दृष्टीकोन, कुटुंबाची स्वप्न, डोळ्यात दिसायचीत तुमच्या.
किती विश्वास होता तुमच्यावर...किती 'आधार' वाटायचा तुमच्या असण्याचा...
माझ्या विश्वासाला नेहमी फुला सारखे जपत राहिलात तुम्ही...!


दिवसामागून दिवस जात राहिले...वर्ष गेली...
सुख आली, दुखं गेली...
सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या...
तुमच्याच, शब्दात सांगायचं तर आपण 'जिंकल'....

पण...

ती पौर्णिमेच्या आधीची रात्र होती...
चंद्र खूप मोठा दिसत होता आकाशात...
हवा कुंद आणि उन्हाळलेली जमीन...

क्षणात आकाशात बदल होतायत...
संध्याकाळचा तांबडा, केशरी, पिवळा...पूर्ण 'काळा' झाला आहे...
आता बाहेर पाऊस पडतोय...
पण त्याचा एकही थेंब माझ्या वाट्याला नाही...
हि सर्व धरतीच तृप्त होते म्हणतात पाऊसाने...मी मात्र कोरडी...आता कायमच...  

Friday, 24 June 2011

Symbol

आपल्या सभोवताली कितीतरी अश्या गोष्टी असतात ज्या आपण अगदी taken for granted घेतो...!
कधी विचारच करत नाही की त्या शोधल्या कुणी आणि त्यांचा अर्थ काय, 
त्यांची निर्मिती कशी झाली किंवा त्या जन्मल्या तरी कश्या...
खूप 'फिलोसोफिकॅल' होतंय का...?


थोडक्यात सांगतो, परवा हाईवे नी जात होतो, रस्त्यावर जरा चहा प्यायला म्हणून थांबलो तर समोर एका मोठ्या निंबाच्या झाडाला 'टायर' टांगलेला दिसला आणि त्याच्या खाली 'अर्थातच' एक 'ग्यारेज' होते.
आता, ह्या ठिकाणी मी 'अर्थातच' हा शब्द एव्हढ्यासाठी  वापरलाय कि टायर टांगलेल्या झाडाखाली 'ग्यारेज' असणारच हे सर्वाना ठाऊक आहे, किंबहुना ते तिथे आहे असे सूचित करण्यासाठीच अश्या प्रकारे तिथे टायर टांगला जातो.


कुठलाही बोर्ड नाही...  काहीही लिहिलेले नाही, 
तरीही, रीपेरिंगसाठी गाड्या तिकडे वळतात. 
कमाल आहे नाही...?
एक दृष्य 'खुण', जी कुणी शोधली हे माहित नाही पण तिचा अर्थ सर्वज्ञात आहे. 
पण मग हे कुणी ठरवले कि garage साठी हा symbol राहील म्हणून...!!  


स्त्रीच्या कपाळावरचा लाल ठीबका म्हणजे ती 'विवाहित' असल्याची खुण. 
भाविकाच्या गळ्यातील रुद्राक्ष सांगतो की तो 'वारकरी' किंवा कुठल्यातरी भक्ती संप्रदायाशी निगडीत  आहे म्हणून 
कुणाची नजर लागू नये म्हणून 'नीबू मिरची'.
कपाळावर उभा गंध असेल तर 'भय्या' म्हणायचे आणि आडवा गंध असेल तर 'आण्णा'. 
करंगळी म्हणजे '.......' सगळ्यांनाच माहित आहे.
उभा अंगठा बेस्ट लक म्हणतो तर उलटा अंगठा ट्या ट्या फीस...


अर्थात, अलीकडच्या काळात अजून काही 'वेगळ्या' खुणांची भर पडली आहे... 
जसे, हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या म्हणजे 'नगरसेवक'.
अंगात सफारी आणि हातात मोबाइल म्हणजे 'शिक्षक' (अर्थात क्लासेसवाले  ...!).
भुवई वर लावलेली रिंग म्हणजे, 'क्रिएटीव्ह'.
डोक्यावर कुरळ्या केसांचा भलामोठा भोपळा म्हणजे संगीतकार माफ करा  'musician '.
हाताच्या घोटीव दंडावर ट्याटू, म्हणजे दिवसा 'फिटनेस ट्रेनर' आणि रात्री पब 'बाउन्सर'.
गणपती किंवा साई बाबा यांचे चित्र असलेली टाईल म्हणजे 'No Spitting ' चा बोर्ड.
हातात blackberry म्हणजे कमीतकमी ५० हजार पगार.
'सिगरेट' चा अर्थ होतो 'कॉर्पोरेट म्यानर्स'.
'आबा-दादा' म्हणजे राष्ट्रवादी तर 'छोटे साहेब-मोठे साहेब' म्हणजे शिवसेना.


ह्या खुणा कधी वस्तू च्या स्वरुपात असतात तर कधी शब्दांच्या,
कधी दृष्य असतात तर कधी बोलताना जाणवतात.
मजेची गोष्ट हि आहे कि अश्या कितीतरी खुणा आपल्या आजूबाजूला आहेत, गरज आहे ती फक्त थोडे लक्षपूर्वक पाहण्याची किंवा ऐकण्याची...!!


Thursday, 16 June 2011

संस्कार

बालपणी मनावर नकळत प्रभाव टाकणाऱ्या  कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात,
ज्या दिसत नाहीत, पण त्याचं अस्तित्व मात्र आपल्याला खुप काही शिकवून जात.
मनात कुठेतरी ह्या गोष्टी खोलवर जाऊन बसतात, पुढे मोठे झाल्यावर देखील त्या आपल्याला आठवत राहतात आणि वर्षानवर्ष आपण त्यांप्रमाणे वागत असतो, बोलत असतो, जगत असतो...
कदाचित यालाच 'संस्कार' म्हणतात...!



दिवेलागणीला दुरून येणारा बैलगाडीचा आवाज, 

हनुमान मंदिराच्या पारावर होणारी भजन,

नागपंचमीला दुध सोडलेली गावाबाहेरील वारूळ,

वटसावित्रीला पूजा केलेलं वडाचे झाड,

सकाळी बेलपत्र घरी आणून देणारा गुरव ,

संद्याकाळी 'शुभम करोति कल्याणंम' म्हणणारी आई,

तुळशी वृन्दावांनासमोर दररोज सकाळी पूजा करणाऱ्या शेजारच्या काकू,


जत्रेत एक रुपया देऊन बघितलेला 'शिनेमा',

दत्त मंदिरात होणारी गुरुवारची पारायण आणि तेथे फुकटात मिळणारा पोटभर प्रसाद,


दुग दुग दुग... आवाज करणारी दादांची 'राजधूत' मोटारसायकल,

श्रावण सोमवारी भरपेट खालेली रताळी,

दसरयाच्या दिवशी सोने शोधण्यासाठी दूरवर केलेली पायपीट,

होळीसाठी वाडीतून चोरलेल्या गवऱ्या,

मराठी शाळेच्या पाठीमागे असणारा भुताटकी रस्ता,

रविवारच्या बाजारात बघितलेला डोंबारीचा खेळ,

शाळेचा गणवेश शिऊन घेण्यासाठी शिंप्याच्या दुकानात घालवलेला आख्खा दिवस,

सायकलचा 'पंक्चर' काढण्यासाठी केलेले प्रयत्न,

नवीन 'भवरा' घेण्याकरिता वडिलांसमोर धरलेला हट्ट,

रंगपंचमीच्या दिवशी अंग स्वछ करण्यासाठी डुबकी मारलेला पाण्याचा ओढा,

नदीवर आंघोळ केली असे घरी कळू नये म्हणून केसांना लावलेली माती,

खडूस दुकानदाराला अद्दल घडवण्यासाठी केलेला पण फसलेला प्रयत्न...

कैरी, चिंचा, बोर तोडण्यासाठी खाल्लेला मार,

सेकण्डहयांड सायकल नवीन  करण्यासाठी तिच्यावर केलेले प्रयोग,

पोळ्याला गावी गेल्यावर चुलत भावांबरोबर बैलांची केलेली विभागणी,

गणपती बसवण्या करिता गोळा केलेली वर्गणी,

जुन्या पानांपासून बनवलेली शिकवणीची नवीन वही,

पाच पैशांची बोर, दहा पैशांची चोकलेट आणि पंचवीस पैशांचे क्रीम भिस्कीट,

दळणासाठी 'चक्की' वाल्याकडे लावलेला नंबर,

वर्ग सजावटीचे पताके चिकटवण्यासाठी गव्हाच्या पिठापासून तयार केलेला 'खळ',

वकृत्व स्पर्धेत भाग घेण्याकरिता भाषणाचे केलेले पाठांतर,

कुंडीतील गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर साखरेत मुरऊन तयार केलेला गुलकंद,


दहाव्या प्रयत्नात यशस्वीपणे वाजवलेली हनुमांनाची घंटा,


बे एक बे चे पाढे आणि त्याची मित्रांबरोबर केलेली घोकंपट्टी,

उन्हाळ्यात रात्री पाणी भरण्यासाठी हाथ पंप वर लावलेला हंडा,

संद्याकाळी स्टोव्हची पिन विकत घेण्यासाठी आख्या गावभर फिरून शोधलेले दुकान,

गणिताच्या सरांना बाजारात टाळण्यासाठी मागच्या गल्लीतून काढलेला खुष्कीचा मार्ग,

सकाळी शाळेत जन गण मन म्हणताना वाटणारा अभिमान,



निंबू सरबतासाठी पन्नास पैशाचा विकत आणलेला बर्फ,

पंधरा ऑगस्टला पहाटे निघालेली प्रभात फेरी,

व्यायाम शाळेत अंगाला चोळलेली आखाड्यातील लाल माती,




अश्या कितीतरी वस्तू, घटना, जागा, व्यक्ती...
लहानपणी मनावर प्रभाव करून गेलेले हे प्रसंग आयुष्भर आपल्याला 'जगण' शिकवत असतात,
आपल्यावर 'संस्कार' घडवत असतात...!

 

 
 


Friday, 10 June 2011

भेटी लागी जीवा

आताशा चांगला पाउस पडायला लागलाय....शेतीच्या कामांची लगबग सुरु झाली असेल...
रामप्रहरी  उठून, सकाळची आन्हिक लगबगीने आवरून, शेतकरी राजा आपल्या पोरीबाळींसह निघाला असेल आपल्या शेतात...!

"असाच पाउस पडत राहिला, तर यंदा 'भात' पेरूया... 
देवा विठ्ठला, पांडूरंगा असाच पाउस पडू दे रे बाबा...
पेरणी झाली कि लगेच येतो तुझ्या दारी......पंढरीची वारी...!"



भक्ती रंगली या रंगे,
वसे पांडुरंग सर्वांगे.

अबीरगुलाल उधळीत रंग
हरीभक्तीत होऊनिया दंग

पताका नारंगी झळके अंबरी
राउळीचा हिरवा घाट भरजरी

सोनेरी तेजानं सजली विठू माउली
विठ्ठल नामात दुमदुमली पंढरी.      








Thursday, 9 June 2011

ये रे ये रे पावसा...!

परवा पाऊस पडला, मातीचा सुगंध आणि सोबतीला कटिंग चहा, खूप nostalgic व्हायला झाल. मराठी शाळेतील पाउस आठवला...  

मी वर्गात दाराजवळ बसलोय, बाहेर पाउस पडतोय...
गुरुजी फळ्यावर दोन अंकी वजाबाकी शिकवत आहेत. पावसाचा आवाज सोडला, तर शाळेच संपूर्ण आवार  शांत आहे. फक्त 'ब' तुकडीतून मराठीची कविता गाण्याचा आवाज येतोय, बहुतेक वाणी बाईंचा तास असावा.
दारातून बाहेर पाहिले, तर पाउस सारखा कोसळतोय. शाळेचे पटांगण पाण्याच्या डबकयानी  भरलय.


आज सकाळीच शाळेत येताना, मी आणि पंकजनं  घरून गोधडी शिवायचा दोरा आणि रिकामी आगपेटी आणलीये...हि साधनसामुग्री आम्ही समोरच्या डबक्यातील बेडकांना पकडण्यासाठी वापरणार आहोत. 
पाउस जसा जोरात कोसळायला लागला, तसा 'ब' तुकडीतील पोरांचा आवाज अजून वाढायला लागलाय,
"हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे..."   सगळे एकाच सुरात गातायत...
                          

खरच, गेल्या आठ दिवसांपासून पाउस पडतोय आणि एवढ्यातच  'साक्री' चे सर्व ग्रावुंडस हिरवेगार झालेत.
अगदी नदीकाडचा शनिमंदिराचा पार, आमची गल्ली, न्यू इंग्लिश स्चूल कडेचा रस्ता, सर्वीकडे हिरवळ दिसतीये...
या पावसात किती जादू आहे नाही...?

मी, आमचा मागच्या अंगणात फुलांची रोप लावली आहेत, दोन महिने झाले, दररोज पाणी टाकूनही एवढी वाढली नाहीत आणि पावसाच्या या आठच दिवसात किती हिरवीगार दिसायला लागली आहेत.
अगदी, 'हिरवे हिरवे, गार गालिचे' या कविते सारखे...

धपाक..........

पाठीवर कसल्यातरी वेदना झाल्यासारखे..., मागून कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज, बघतो तर गुरुजी...!
मग, गुरुजींनी सांगितलं...
"दीपक, उठं पंधरा चा पाढा म्हणून दाखव, लक्ष कुठे आहे तुझं...?
आधीच वेदनांनी पाठ दुखत होती, त्यात गुरुजींनी सांगितलेला पाढा, म्हणजे धमकी प्रमाणे वाटत होता.
पंधरा एकी पंधरा, पंधरा दुनी तीस, पंधरा त्रिक...पंधरा त्रिक...
अंगातील सर्व त्राण गेल्यासारखे वाटल. मागे वळून बघतो तर सारा वर्ग माझ्याकडे बघतोय...
पण, माझी नजर 'पंकज' ला शोधत होती.
पंकजकडे पाहताच त्याने झटक्यात आपल्या हातातील आगपेटी दप्तरात टाकल्याचा भास झाला.
धपाक.....
पुन्हा पाठीत एक दणका...आई ग...!
वर्गात कुजबुज...काहीसा हशा...
"शिकवताना लक्ष बाहेर दारात असत, मग कसा शिकशील...?
मोठा झाल्यावर काही बनायचे आहे कि नाही?"
गुरुजींचा हा प्रश्न सुन्न करून गेला. माझी मान अजूनही खाली, गुरुजी खूप काही-काही बोलत होते, 
खर म्हणजे, ते रागवत जास्त आणि बोलत कमी. 
पण, अजूनही माझ लक्ष दारातच...
दूरवर झेंडया साठी तयार केलेला खांब, पटांगणाच्या मध्यभागी उभा आहे. त्याचा पायथ्याशी  सिमेंटचा ओटा बनवला आहे. त्या ओट्यावर ती 'बेरकी' बेडकं चढतायात , उड्या मारत ड्राव ड्राव करत आहेत.

काय, हिम्मत यांची? यांना चांगले दोरांनी बांधायला हव, अस मला कळकळून वाटल.

गुरुजी पुन्हा, " अरे लक्ष कुठे आहे तुझ...?

एवढ्यात  दारावर कुणाची तरी सावली, त्यापाठोपाठ शिपाई, त्याच्या  हातात हेंडमास्तरांची जाड वही 
(दादा त्याला रजिस्टर म्हणतात...हं तीच हि वही...!)
म्हणजे नोटीस वाटत...!
गुरुजी नोटीस वाचून दाखवतात...

" पावसाळा सुरु झाल्यामुळे, शाळेची साफसफाई करण्याचे ठरविले आहे, तरी त्यासाठी ह्या तासा नंतर विद्यार्थ्यान कडून सामुहिक श्रम  अपेक्षित आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला ह्या श्रम दानासाठी थांबावयाचे असेल त्यांनी थांबावे व शाळेच्या मदतनीस बाईना आणि शिपाई काकांना मदत करावी. ज्यांना थांबावयाचे नसेल त्यांनी काहीही गोंधळ न करता निमुटपणे घरी जावे."
                                                                                     सही- मुख्याद्यापक.

अरे वा!  मुलांचा एकच गोंधळ...तेवढ्यात घंटा वाजते...
टन टन टन....
गुरुजींच्या बोलण्याकडे लक्ष हि न देता आणि शिपायाला अगदी दरवाज्यातच अडकवत सगळे बाहेर  पळतायत..."शाळा सुटली, पाटी फुटली...हे... हा... हुर्रे हुर्रे ....

" पंक्या, थांब आपण शाळेची सफाई करायला थांबू, मजा येईल यार, 
नदीवर जायला मिळेल, बेडकं पण पकडू....", मी पंक्याच्या पाठीमागे वर्गातून केंव्हा बाहेर पडलो हे गुरुजींनाच  काय, पण मला हि कळल नाही.

पटांगणातून पळता-पळता कुणीतरी मागून पायात पाय घालून 'च्याट' मारली, मी सरळ डबक्यात...
"आयला, सगळे कपडे खराब झालेत यार", 
"दिप्या, तो नक्की 'ब' तुकडीतील अतुल असणार यार", पंक्या बोलला. 
"माजलेत यार 'ब' तुकडीवाले, दाखवायला पाहिजे त्यांना एकदा",  चंदू येऊन मिळाला.
कमरेचा बेल्ट आणि दफ्तरातील पाट्या बाहेर निघाल्या.
" पकड, त्या अतुल ला, तो बघ बाजाराकडे पळतोय", चंदू ओरडला.
आम्ही सर्व अतुल च्या मागे...
अतुल मात्र तेथून क्षणात सटकला, शेवटी उद्या त्याला 'सुगडी', वाटताना धरायचे अस ठरलं.




आता आम्ही सर्व पटांगणात परतलो, पाउस आता थोडा कमी झालाय.
आमची कौलारू शाळा पावसानी धुऊन निघाली आहे.
मागच्याच महिन्यात रम्याच्या दुकानातून शाळेचा बोर्ड नवीन 'कलर' होऊन आला होता...
त्यामुळे मस्त दिसत होता.
आयला, त्या दिवसापासून रम्याचा फॉर्म काय वाढला...? 
पण, रम्या देखील त्याच्या वडिलांसारखीच सुंदर चित्र काढतो, त्यामुळे रम्या मला आवडतो.
आमच्या ग्रुप मध्ये सर्व असेच आहेत...
पंक्याच हॉटेल आहे, त्यांच्या हॉटेलात मिसळ लय भारी...!
लोनारी च्या वडिलांकडे घोडा आहे. तो ते लग्नांत भाड्याने देतात, लोणारी कधी-कधी आम्हाला त्याच्या घोड्यावर बसू देतो.
नाझींमच्या अब्बांचे भंगाराचे दुकान आहे. आई मला नेहमी स्टोव्ह रिपेयर करायला तिथे पाठवते, गर्दीत पन  आपला नंबर लवकर लागतो.
चंदू चे वडील पेरेशपुरच्या शाळेत गुरुजी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे रंगीत खडू नेहमी असतात.
आयला, आपल्या ग्रुप मध्ये सर्व कामाची लोकं आहेत, 'युसलेस' (ताई, हा शब्द नेहमी वापरते) असे कुणीच नाही.

आम्ही सगळे 'व्होलेन्टीयर ' हातात शाळेच्या बादल्या (त्यांच्यावर लाल रंगाचा ठीबका आणि शाळेचे नाव आहे) घेऊन नदीवर निघालो...
दुपारच्या शाळेतील काही मुली पण होत्या बरोबर, 
पण आपण त्यांना भाव देत नाही...छे! मुलींशी कोण बोलणार?
नदीकडे जाणारा रस्ता 'इंद्रायणी' थियेटर कडून जातो. 
"अरे बघ, अनिल कपूर चा 'रामलखन' लागलाय, लय फायटिंगचा पिक्चर आहे", पंक्या खुश होऊन सांगत होता.

शेवटी आम्ही सर्व धबधब्याजवळ...सगळे म्हणतात 'साक्री' चा धबधबा खूप डेंजर आहे...
पण, आपण कुठे घाबरतो...?
पावसाळ्यात 'कान' नदीला खूप पाणी असत.

"साक्रीच्या नदीला 'कान' का म्हणतात रे पंक्या? पाय, हाथ, नाक का नाही?" चंदूचा प्रश्न.

पाठीमागून बोरसे गुरुजी येऊन थडकले, 
"अरे लवकर भरा बदली...शाळा धुवायची आहे ना...!"
आम्ही सर्व पाण्यानी भरलेली बादली घेऊन शाळेकडे निघालो...
रस्त्याने चालताना बादलीतील पाणी सारख डबकत होत.
आज शाळा साफ करायला खूप मजा येणार होती, पाणी भरून झाल्यानंतर शेण आणायला जायचं होत. 
मग वर्ग शेणानी सारवायचे होते. गेल्या वर्षी आमचा शेणानी सरावलेला वर्ग होता. त्यावर बसल्यावर खूप थंड वाटायचं. पण ह्या वर्षी शाळेनी काही वर्गांमध्ये फरशी बसवली, त्यामुळे आता ४ थीत आम्हाला फरशीचा वर्ग मिळाला.
पण मला शेणानी सारवलेला वर्गच जास्त आवडतो, काय रे पंक्या?
हो न यार...पंक्या क्षणात बोलला.
अजून खूप काम होती. आज वर्ग नाही, पाढे नाहीत, गणित नाही, धडा नाही कि पाठांतर नाही.
दिवसभर फक्त पाणीच पाणी...पाऊसच पाऊस...!


आम्ही शाळेत पोहचलो, सगळ्यांनी आपआपल्या बादलीतील पाणी, टाकीत टाकल.
माझा नंबर आला आणि मी पुढे सरकलो तर सर्व हसायल लागले...
हे सगळे का हसतायत 'पेशल' करून या शिष्ट मुली...! मला काहीच कळत न्हवत.
तेवढ्यात...धाप -धपाक...पाठीत काहीशा वेदना...
गुरुजी ओरडले, " दिप्या, सर्व पाणी रस्त्यावर सांडून आला लेका"


मी लाजेन लालेलाल झालो होतो, वर बघायची हिम्मत होत नव्हती.
खाली मान घालून माझ्या बादलीकडे बघत होतो.
सगळेच मला पाहून हसत होते. 
तेवढ्यात,
माझ्या बादलीतून एका छोट्या बेडकांनी, टुणकन उडी मारली आणि तो त्या मोकळ्या हिरव्यागार पटांगणाकडे पळायला लागला...
 
  

Tuesday, 7 June 2011

झाड

तुम्ही कधी एखादे झाड लावले आहे का हो...?
वाढणं, आनंदात डुलणं, मोहरण, डवरून येणं, हे झाडाचे किती सहज गुण आहेत नाही...?
भुरभूर पाऊस, हिरवळ, तर्हेतर्हे ची फुलं, पक्षी, त्यांचे चित्र विचित्र आवाज, ओढाळलेला ओढा, खळखळ वाहणारी नदी, गरजणारा दर्या, उंच उंच डोंगर...
ह्या सर्वांमध्ये असणारी सहजता आपल्या जगण्यामध्ये उतरली पाहिजे, नाही...?