Wednesday, 4 November 2020

माझ्या बापाचा स्पर्श

 माझ्या बापाचा स्पर्श


जेंव्हा खेळता खेळता, माझी चिमुरडी जोरात धावत येऊन मला कवटाळते,

माझ्या पोटाला तिचं नाक, ओठ, चेहरा घासला जातो,

खरं सांगतो, त्या वेळी मला माझ्या बापाच्या पोटाचा स्पर्श आठवतो.


दुपारी कधी माझं अंग दुखतं म्हणून ती पाठीवर जेंव्हा चालते

तिची छोटी छोटी पावले माझ्या अंगावर जेंव्हा काळजीपूर्वक हालचाल करतात, 

माझ्या शरीराचा शीन घालवतात,

तेंव्हा, तिच्या रोल मध्ये मी आणि माझ्या जागेवर माझा बाप असतो

खरं सांगतो, त्या वेळी माझ्या बापाच्या पाठीचा, कमरेचा, पायाच्या तळव्यांचा स्पर्श मला आठवतो.


बाईकवर जेंव्हा ती मला घट्ट धरून बसते, 

मी तिला गावाकडच्या गोष्टी सांगत असतो,

त्या वेळी खरं सांगतो, 

आपल्या गावाची, नात्यांची गोडवी सांगणारे  माझ्या बापाचे शब्द, माझ्या ओठातून नकळत बाहेर पडत असतात.


तिला शाळेत सोडून जेंव्हा मी बाहेर पडतो, 

टाटा करणारा हाथ जेंव्हा खाली घेतो,

तेंव्हा खरं सांगतो, 

एस्टी स्टँड वर सोडायला आलेल्या, 

डेपो मधून बाहेर पडणाऱ्या गाडीच्या खिडकीतून बेकरीच्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या,

माझ्या बापाचा टाटा मला आठवतो.


शेविंग करतांना, माझी चिमुरडी जेंव्हा जवळ येते,

मी गम्मत म्हणून तिला ब्रश लावतो,

ती हसत तेथून पळ काढते,

मी पुन्हा आरश्याकडे वळतो

खरं सांगू,

त्या पांढऱ्या फोम मध्ये मला माझ्या बापाचा चेहरा दिसतो...


निलगिरीच्या तेलाने, 

मला लहानाचे मोठे करणाऱ्या माझ्या बापाच्या शरीराला मालिश करतांना,

मला जाणवतो तो शेवटचा स्पर्श,

इथून पुढे जन्मभर तो स्पर्श मिळणार नसतो,

त्याच्या शिवाय जगायचं असतं

मी दुःखी असतो

मोडलेला असतो

खरं सांगतो, 

त्यावेळी, मला कल्पना नसते,

हा स्पर्श मला मुलीच्या सहवासात पुन्हा मिळणार असतो...


No comments:

Post a Comment