Wednesday, 4 November 2020

अनोळखी तो...

बऱ्याचदा तुमचं एखाद्याशी रक्ताच नातं नसतं. मैत्रीही नसते, ओळखं म्हणावी तर तसही नाही काही! 

तरीही, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आतून वाटतं राहतं. रोजचा संबंध नसतो, खरं नावही माहीत नाही. घर, मोबाईल नंबर वैगरे तर दूरच्या गोष्टी!  अनोळखी वक्तीबद्दल असे वाटण्याला काय म्हणतात मला माहिती नाही...

पण, मला आज ' त्याच्या ' बद्दल असं वाटतंय हे मात्र खरं!

रुखरुख, अस्वस्थ, चटका लावणारं असं काहीतरी.

नौपाडा पोलीस स्टेशन ते माझे घर फार अंतर नाही. पुन्हा माझी पेट्रोलिंगची ड्युटी असल्यामुळे तलावपाळी, तीनहाथ नाका, कॅडबरी पूल, रेल्वे स्टेशन, कोपरी हा सर्व भाग माझ्या रोजच्या जगण्यातला. गेल्या काही वर्षांत इथं काम करत असातांना बऱ्याच गोष्टी सवयीच्या होऊन गेल्यात. पोलिसाच्या नोकरीत तुम्हाला नाट्यशास्त्रातील नऊही रसांचा रोजच अनुभव येत असतो आणि आम्ही देखिल त्याचा निर्विकार मनाने स्वीकार करत असतो. त्रासही होतो बऱ्याचदा पण हळूहळू सवय होत जाते. 

जसा ' तो ' सवयीचा होऊन गेला होता. 

थोडे थोडके नाही तर गेली तीन वर्ष! पूर्वी कुठं राहायचा माहिती नाही. पण मला पहिल्यांदा दिसला तो भवानी मातेच्या मंदिरा बाहेर. माझ्या पेट्रोलिंगच्या गजबजलेल्या एरियात माझा हा जरा निवांत क्षण. 

ठाण्यातील मार्केटचे हे मध्यवर्ती ठिकाण, त्यामुळे सतत लोकांचा वावर. पुन्हा स्टेशनची गर्दी. त्यामुळे आम्ही कायम माणसांनी वेढलेलो. या मंदिराच्या बाहेर मात्र मी क्षणभर का होईना माझी पांढरी मार्शल बाईक थांबवतो. बऱ्याचदा मंदिरात जातही नाही, वेळही नसतो. पण बाहेर फुलवाल्याच्या दुकानाबाहेर रेंगाळतो. फुलांचा तो गंध मला माझ्या गावच्या मंदिराची आठवण करून देतो. 

तो पहिल्यांदा मला तिथेच दिसला. मी न विचारताही म्हणाला, "फूलवाला जरा बाहर गया साहब इसलिए मैं बैठा काउंटर पर, आपको दे दूं क्या कुछ फूल माला वगैरा..." 

त्याच्या सोबतचा हा पहिला सवांद. 

नंतर मात्र तो रोज दिसू लागला. फूलवाल्याच्या दुकानापासून डावीकडे कोपऱ्यात एक मिनी बस उभी राहायची. त्यात तो रहायचा. तिथंच स्वयंपाक करायचा, तिथंच आंघोळ, तिथेच झोपणे. थोडक्यात ती बस म्हणजे त्याच घर होती.

हळूहळू त्याच्याविषयी काही गोष्टी कळू लागल्या. चोवीस-पंचवीस वर्षांच्या या तरुणाने बिहारच्या कुठल्यातरी खेड्यातून पोटापाण्यासाठी मुंबईची वाट धरली होती. अनेक ठिकाणी काम करून तो आता या ड्रायव्हरच्या नोकरीत स्थिरावला होता. सतत हसत राहायचा. मला कमाल वाटायची, हा माणूस दिवसभर शहराच्या ट्रॅफिकमध्ये बस चालवतो, राहायला डोक्यावर छत नाही म्हणून मच्छर चावतात तरी कंपनीच्या या बस मध्येच झोपतो आणि तरीही खुश राहतो!

पोलीस स्टेशनला हजेरी लावली की मी माझी बाइक घेऊन पेट्रोलिंगला निघायचो. रात्री दहाच्या सुमारास तिकडून जायचो त्यावेळी त्याची बस नसायची. पण साडेअकरा - बाराच्या दरम्यान दुसऱ्या राऊंडला मात्र त्याची बस माझं लक्ष वेधून घ्यायची कारण तिथून फोडणीचा खमंग वास बाहेर यायचा! तो बसच्या खिडकीतून नेहमी हाक मारायचा, "साहब एक बार हमारे हाथ का खाना चख कर तो देखो, आप भी याद रखोगे " 

मला वाटतं ते खोटं नसावं, त्याच्या फोडणीचा वासच इतका टेस्टी होता. बऱ्याचदा इच्छा असूनही मी टाळायचो कारण ड्युटीवर असताना अशा आमिषांना दूर ठेवायचं असतं, इतक्या वर्षांच्या सर्व्हिस मध्ये माझ्या अनुभवांनी मला शिकवलं होतं. 

त्या दिवशी मात्र पर्याय नव्हता. रात्री साडेबाराची वेळ असावी. मी नेहमीप्रमाणे राऊंड वर होतो तिथून जात असतांना त्याच्या बसमधून जोरात ओरडण्याचे आवाज यायला लागले. मी आणि माझा सहकारी धावत तिथं गेलो. आत बघतो तरं  काही गर्दुल्ले त्याला मारत होते. तो बिचारा गयावया करत होता. त्या गर्दुल्याना त्याच्या बस मध्ये बसून दारू प्यायची होती. त्याने नकार दिला म्हणून ही मंडळी त्याला बिहारी म्हणून शिव्या देत होती, मारत होती. पोलिसांना बघताच ते पळाले. आम्ही तिथं पोहचलो म्हणून तो वाचला नाही तर त्याच काही खरं नव्हतं. 

गर्दुल्ले आता निघून गेले होते, बसमध्ये तो एकटाच होता. त्याच्या स्टोव्ह वर चिकनची भाजी शिजत होती आणि चेहरा मात्र सुजला होता. मी त्याला गेले सहा महिने बघत होतो पण दुरूनच. आज पहिल्यांदाच त्याच्या बस मध्ये शिरलो होतो आणि समोरचे दृश्य बघून चकित झालो. ती बस इतकी टापटीप होती की मला आश्चर्य वाटलं. 

एका कोपऱ्यात कपडे सुकवण्याची दोरी, बाजूला एक लोखंडी ट्रंक त्यात त्याचे कपडे घडी करून ठेवलेले. कोपऱ्यात महादेवाचा फोटो समोर दोन पेटत्या अगरबत्ती आणि त्यांचा सुवास त्यात त्याच्या फोडणीचा वास. एकूणच आपण बस मध्ये नाही तर एखाद्या छोट्या पण नीटनेटक्या संसारी घरात आहोत असा मला भास होत होता. 

त्या दिवसानंतर मात्र त्यानी सलाम साहब, म्हटलं की मी हसून त्याच्या सलामचा स्वीकार करायला लागलो. 

त्याच्या बस जवळ रात्री चहा विकणाऱ्या पोऱ्याची सायकल उभी राहायची. रात्रपाळीला जाणारे आणि रात्रपाळी करून पहाटे परतणारे या सर्वांना  हे सायकलवाले चहा पुरवत असतात. आम्ही ही कधीतरी तिथं चहा प्यायचो. त्यावेळी तो आमच्यापाशी येऊन गप्पा मारायचा. त्याच्या गावाकडच्या गोष्टी सांगायचा. घरी म्हाताऱ्या आई-वडिलांना ज्या दिवशी बँकेतून पैसे पाठवायचा त्या दिवशी तो फार आनंदी असायचा. एकदा ' सत्तू ' नावाचा पदार्थ त्यानी बनवला होता. तो त्यानी आम्हाला बळजबरी खाऊ घातला. तो पदार्थ खाऊन मला माझ्या आईच्या हाथच्या पुरणपोळीची आठवण झाली होती. 

कधी सिग्नल वर, तीन हाथ नाक्याच्या पुलाखाली तर कधी कापूरबावडी परिसरात चालत्या बसच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूने आवाज आला तर मी समजून जायचो, हा तोच! 

तो सलाम साहब इतकंच म्हणायचा. त्यामुळे तेवढ्या गर्दीतही तो लक्षात राहून जायचा. 

खरंतर, मी काम करतो त्या स्टेशन आणि कोपरी परिसरात प्रचंड गर्दी असते. अनेक व्यवसायिक आहेत, दुकानदार, कामगार-मजूर, फेरीवाले, अशी बरीच पोटापाण्यासाठी या शहरात राबणारी माणसं आहेत. काही चांगली तर काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं असतात. आमची पोलिसांची नजर हमेशा या लोकांकडे लक्षपूर्वक बघत असते. 

पण या तीन वर्षात या मुलासोबत मात्र फार न बोलता ही ओळख निर्माण झाली होती. कदाचित मला ड्रायव्हर या जाती विषयी थोडी अधिकच कणव असावी. पोलिसात भरती होण्यापूर्वी मी देखील ड्रायव्हरची नोकरी केली होती, गाडी चालवून पूर्ण भारत पालथा घातला होता आणि त्याच पैशातून माझं शिक्षण झालं होतं. 

... आणि शेवटी माझ्या तेरा वर्षाच्या नोकरीत आणि अडतीस वर्षाच्या आयुष्यात बघितली नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती करोना मुळे निर्माण झाली. २०-२२ मार्च च्या दरम्यान संपूर्ण देशात आणि आमच्या ठाणे शहरात देखील टाळेबंदी जाहीर झाली आणि सर्व उद्योग ठप्प झाले. ज्यांना घर होती ती मंडळी सुरक्षित आपल्या घरातच राहिली पण ज्यांना घर नव्हती ती सर्व लोक रस्त्यावर उघडी पडली. सुरवातीच्या आठवड्यात लोकं थोडी फार खाण्यापिण्याची मदत करत होते नंतर मात्र तेही थांबलं. दुकान बंद, बाजार बंद, भयंकर परिस्थिती होती. 

रस्त्यावर राहणारे उपाशी होते. त्यात ' तो ' ही होता. बस मध्ये कोंडून बसलेला. आता रात्री त्याच्या बस मधून फोडणीचा वास येणं बंद झालं. आमच्या सर्व पोलीस दलाला जमेल तशी आम्ही मदत करत होतो. अन्नाचे पॅकेट्स या लोकांना पुरवत होतो. त्याला ही चार पाच-वेळा ते पॅकेट्स मी जाऊन दिले. आमच्या ड्युटीवर प्रचंड ताण होता. आपल्या घरात सुरक्षित असलेले माझे कॉर्पोरेट मध्ये मोठं मोठ्या पदावर काम करणारे मित्र मला व्हाट्सअप वर काळजी घेण्याचा सल्ला देत होते. गावाकडून म्हातारे आईबाप रोज फोन करायचे. घरी गेल्यावर दुरूनच बायकोशी बोलावे लागायचे. तिला नुकताच चौथा महिना लागला होता त्यामुळे तिची काळजी घेणं गरजेचं होतं. कमी अधिक प्रमाणात माझ्या सर्वच पोलिस मित्रांची परिस्थिती अशीच होती त्यातही आमचे वरिष्ठ आमचं मनोबल वाढवत होते. 

या सर्व धावपळीत त्याला मी विसरून गेलो होतो. काम वाढली होती. करोनानी मोठं संकट उभं केलं होतं. त्या दिवशी रात्री बस समोरून जात असताना मला तिथं कुणीच दिसलं नाही म्हणून मी सरळ बसच्या आत गेलो. तर आत मध्ये तो मला बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला लागलीच खांद्यावर टाकले आणि जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. त्यावेळी दवाखान्यातील स्टाफ ही अशा पेशंटला घ्यायला नकार देत होता किंबहुना घाबरत होते. मी त्यांच्या विनवण्या करत होतो. शेवटी PPE किट घातलेल्या डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर आणलं. 

माझा युनिफॉर्म मात्र घामानी आणि मातीने माखला होता. दुसऱ्या दिवशी माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरं सोडून दूर आपल्या गावी परतत होते. मिळेल ती बस, ट्रक, रिक्षा सर्विकडे माणसच माणसं! 

मी यापूर्वी अनेक वर्ष गणपती विसर्जनाची ड्युटी केली होती, शिवजयंतीच्या गर्दीतही लोकांना शिस्तीत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, मोहरम, ईद, मोर्चे, राजकीय पक्षांच्या सभा या सर्वीकडे गर्दी आणि माणसं पहिली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यााठी माझ्या खाकीच्या कर्तव्याला अनुसरून प्रामाणिक ड्युटी केली होती. 

पण...

या करोना महामारीची परिस्थिती अत्यंत भयंकर होती! मोबाईल वर सतत वाईट बातम्या येत होत्या. एकामागून एक, आमचे सहकारी दवाखान्यात ऍडमिट होत होते. भीती भयंकर होती तरीही डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून माझे पोलीस मित्र रस्त्यावर उभे होते. 

दुसऱ्या दिवशी तो जरा बरा झाला. मात्र सतत रडत होता म्हणून दवाखानावाल्यांनी मला फोन करून बोलावून घेतलं. मी जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मला नेहमी त्याचा हसरा चेहरा बघण्याची सवय होती, अगदीं लोकांनी त्याचे मारून तोंड सुजवले होते त्यावेळी देखील त्याचा चेहरा हसरा होता. 

आज मात्र त्याचा रडवेला चेहरा बघून मला  कसंसंच वाटलं. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची आठवण काढून तो सारखा रडत होता. तीन दिवस उपाशी असल्यामुळे तो बेशुध्द झाला होता. आम्ही त्याला पोटभर खाऊ घातलं. सोबत दोन दिवस पुरतील इतक्या पोळ्या बांधून दिल्या. इलेक्ट्रॉलचे सात - आठ पाकिट आणि दोन-तीन पाण्याच्या बाटल्या त्याच्या हवाली करून मुलुंड टोलनाक्यावर  बिहारकडे निघालेल्या एका ट्रक मध्ये त्याला बसवलं आणि निरोपाचा हाथ वर केला. तो म्हणाला...

" साहब हम लोग तो पहुंच जाएंगे अपने गांव लेकिन आपका क्या होगा ? इस महामारी में आप लोग नहीं जाओगे क्या अपने गांव...? " 

मी त्याला म्हणालो, 

" ये पुरा देशी ही हम पुलिसवालों का गाव है, हम कहां जाएंगे?"

पण त्या एका क्षणात, गावी असलेले माझे म्हातारे आई-वडील माझ्या डोळ्यांसमोर येऊन गेले. या महिन्याची त्यांची औषधे पाठवायचे राहून गेली होती. ती मला काहीतरी व्यवस्था लाऊन पाठवावी लागणार होती, तोवर गावी शेजारी राहणाऱ्या मित्राला तात्पुरता त्यांची मदत करण्यासाठी मेसेज लिहावा म्हणून मी मोबाईल हातात घेतला...

तर, शाळेतील मित्रांच्या व्हॉट्स-ऍप ग्रुप वर कुणी घरी बसून पिझ्झा बनवला होता तर कुणी चायनीज! ती मंडळी लॉक डाऊन मध्ये खाण्यापिण्याचे प्रयोग करत होती आणि कमेंट टाकून एकमेकांच कौतुक करत होती मी देखील तिथं एक कमेंट टाकली...

मित्रांनो, तुम्ही घरातच रहा, 

तुमच्या सुरक्षेसाठी आम्हीं खाकीवाले आहोत रस्त्यावर...


(ठाणे पोलीस मधील मित्र भूपेश भामरे याच्या अनुभवावर आधारीत लिहिलेली कथा)










No comments:

Post a Comment