Wednesday, 29 July 2020

कै. नानासाहेब जे. यू. ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



सकाळी साडे-अकराची वेळ असेल. अमेरिकेतील न्यूजर्सी मध्ये गेल्या दशकभराहून जास्त काळ स्थायिक असलेल्या लक्ष्मीकांत जाधव या मित्राचा फोन आला. तिथे त्यावेळी पहाटेचे तीन वाजले असतील बहुदा. मित्र रात्री उशिरापर्यंत काम करत असतो. त्याला कुठून तरी ती बातमी कळाली आणि लागलीच खात्री करावी म्हणून त्यानी मला कॉल केला. तोवर मी ही मोबाईल बघितला नव्हता. संस्थेतील कुणाला विचारून सांगतो म्हणून मी फोन कट केला आणि व्हॉट्स ऍप वर सहज म्हणून बघितले तर पुढच्या पाच मिनिटात साक्रीच्या जवळपास पंधरा-सोळा ग्रुप्स वर नानासाहेब गेल्याची बातमी येऊन धडकली.
करोनाचा बिकट काळ, दररोज काहीतरी वाईट बातमी येते आणि मन उदास होतं. नानासाहेब दवाखान्यात दाखल झाले त्यावेळपासून उलट-सुलट चर्चा चालू होत्या. पण आठवडाभरापूर्वी त्यांची खास कॅमेर्‍याला दिलेली, हॉस्पिटल मधील थम्सअप करणारी पोज बघून बरं वाटलं होतं. ते बरे होऊन परततील अशी चर्चा सर्वीकडे ऐकायला मिळत होती.
एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाची देखील तालुकाभर चर्चा होते म्हणजे ते व्यक्तिमत्त्व त्या प्रांतासाठी किती महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येईल.
अमेरिकेतील मित्र कॉल वर भरभरून बोलत होता. शाळेतील मंतरलेला काळ, तेंव्हाचा आदर्शवाद. न्यू इंग्लिश स्कूल मधील मोहरलेले दिवस आणि पर्यायाने नानासाहेबांसोबत, त्यावेळच्या विद्यार्थ्यांनी घालविलेला काळ, घटना आणि अनेक प्रसंग.
म्हणाला, राजकारण वैगरे सर्व ठीक पण त्यावेळचे सस्थेतील विद्यार्थी म्हणून नानासाहेबांबद्दल लिहायला हवं. आपल्या गावापासून इतक्या दूर परदेशात राहणाऱया मित्राला एखाद्या परक्या व्यक्ती बद्दल असं वाटतं असावं म्हणजे ती व्यक्ती निश्चितच खास असणार!
१९८५ च्या आसपास चा काळ असेल. साक्रीच्या शेतकी संघाला लागून असणाऱ्या आदिवासी कन्या छात्रालयात बालवाडीचा वर्ग भरायचा. त्यात आमच्यासारखी अठरापगड जातींची, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील मुले एकत्र शिकत होती. त्यावेळी जवळपास तीच एक बालवाडी असावी. मध्येच कधीतरी नानासाहेब तिथं चक्कर मारत. त्यावेळी सर्वांना आनंद व्हायचा. कारण, ' मामाच पत्र हरवलं' या खेळात स्वतः नानासाहेब मुलांच्या रिंगणात बसायचे आणि खेळ संपला की पार्ले-जी चे बिस्किट प्रत्येकाला वाटायचे, असं स्पष्ट आठवतं.
पुढे पाहिले ते चौथी आमची झेड पी च्या शाळेत गेली पण पाचवी पासून पुन्हा साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय.
आमचा पाचवी ते बारावी ( १९९१-१९९९) हा काळ  नानासाहेबांच्या कारकीर्दीचा देखील महत्त्वाचा पिरियड होता असं म्हणावं लागेल.
सकाळी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर आर वाय पाटील सर त्या दिवसाच महत्व माइक वर सांगत, सोबत कुणी गेल्याची बातमी असली की त्याला श्रद्धांजली वाहत. नानासाहेब दररोजच्या प्रार्थनेला नसत पण कधी ते आलेच तर तो दिवस स्पेशल वाटायचा. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या हालचाली सुद्धा बदललेल्या जाणवायच्या. कुणाला त्यांच्या समोर आपण सुरू केलेल्या प्रकल्पा बद्दल माहिती द्यायची असायची तर एखाद्याला आपल्या वर्गातील विद्यार्थाचे यश सांगायचे असायचे. नानासाहेबांची कौतुकाची थाप मिळवण्यासाठी जसे विद्यार्थी आतुर असत तसेच शिक्षक देखील धपडत करत.
संस्थेचे संस्थापक आणि नानासाहेबांचे आजोबा शंकरराव चिंधुजी बेडसे आप्पा यांच्या जयंतनिमित्त १४-१५ डिसेंबरला शाळेत वकृत्व स्पर्धा आयोजित होत. त्यात खैरणार सरांसोबत नानासाहेबांचा पुढाकार असायचा. ब्रेन ड्रेन, डंकेल प्रस्ताव किंवा अयोध्येमध्ये राममंदिर बनवायला हवे की दुसरेच काही असे तत्कालीन महत्वपूर्ण विषय तिथं हाताळलेले आठवतात.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात, राम मंदिराचा निकाल लागला होता त्यावेळी त्याची प्रकर्षाने आठवण झाली होती.
कारण निकाल आत्ता लागला तरी त्यावेळी आम्हा विद्यार्थ्यांना हा क्लिष्ट विषय समजून घ्यायला मदत झाली होती. किंबहुना सभोवतालच्या सामाजिक, राजकीय घडामोडींबद्दल मत बनवताना कुठले निकष लावायला हवेत याची जाणीव या वकृत्व स्पर्धांच्या विचारांमुळे होत होती.
स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिन किंवा बक्षीस समारंभ असो किंवा कुठले खास पाहुणे शाळेला भेट देणार असोत. नानासाहेब अश्या प्रत्येक वेळी आपल्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात करत. त्यावेळी स्वच्छ पांढऱ्या पोशाखात किंवा राखाडी सफारी सुट मध्ये असणारे नानासाहेब प्रसन्न वाटतं. विद्यार्थीदशेत खरंतर मोठमोठाली भाषणं बोर व्हायची. पण नानासाहेब बोलायला उठले की  विद्यार्थी ते लक्षपूर्वक ऐकत. कारण त्यांचं वकृत्व विद्यार्थ्यांना समजेल असं सोपं आणि मधाळ असे. उगीच पाहुण्यांना इंप्रेस करण्यासाठी ते क्लिष्ट शब्द वापरत नसत.
शाळेच्या सध्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इमारतीचे बांधकाम त्यावेळी चालू होते. सोबत ना. बू. अहिरराव छात्रालयाच्या वस्तीगृहाचे सुशोभीकरण... त्यावेळी शिक्षकांची विद्यार्थ्यांकडून श्रमदानाची अपेक्षा असायची. नानासाहेब स्वतः त्या श्रमदानाचे महत्व पटवून द्यायचे. त्यावेळी, नानासाहेबांचे शब्द ऐकून, आपण खरोखरच आपल्या शाळेच्या कामासाठी महत्त्वाचे योगदान देत आहोत असे वाटायचे आणि मुल जोमाने काम करायचे.
त्यावेळच्या राजन पवारांसारख्या तरुण कला शिक्षकाला शाळेच्या सुशोभीकरणासाठी अनेक कल्पना सुचत आणि ते  नानासाहेबांच्या मार्गदर्शनाने लागलीच पूर्ण देखील करत. डी डी नांद्रे सरांचे सुंदर अक्षरातील फलक लेखन असेल किंवा अग्रवाल सरांचे फळ्यावर लिहिलेले करंट अफेयर्स... शाळा सुंदर दिसण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते आजही तुम्हाला संस्थेच्या कुठल्याही शाखेत जाणवेल. मी तुम्हाला पैजे वर सांगू शकतो की, संस्थेच्या शाळातील रचनांमध्ये दिसणारी सौंदर्यदृष्टी इतर कुठल्याही तालुक्यातील शाळांमध्ये दिसणार नाही. याच्या पाठीमागे निश्चितच त्या संस्थेचा कार्यभार सांभाळणाऱ्या नानासाहेबांचा सिंहाचा वाटा असेल.
सातवीत असताना वर्गातील सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या मुलांची एक टीम बनवलेली आठवते. त्यात मुलांना प्रत्येकी पन्नास ते सत्तर पोस्ट कार्ड लिहायची होती. त्यात नानासाहेबांना शिक्षक आमदार पदासाठी आपण पाठिंबा द्यावा असा विनंती करणारा मजकूर होता. आजच्या फेसबुक व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या जमान्यात येथे एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्याकाळी या अशा पोस्ट कार्ड द्वारे आम्ही विद्यार्थी आणि शिक्षकांनी अनेक पत्र लिहिली होती. बोटं दुखली होती पण सुंदर हस्ताक्षराची आणि आपल्या मनातील विचार मांडण्याची सुरुवात कदाचित त्यावेळीच झाली असावी.
१९९२ ला संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाली तेंव्हा सुवर्ण महोत्सवानिमित्त शाळेच्या पटांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यावेळी तालुक्यातील आणि बाहेरच्याही अनेक खेड्यातील विद्यार्थी- शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम मोठा होता, प्रचंड गर्दी होती. प्रत्येकाची राहण्याची सोय करणं कठीण होतं त्यामुळे येथील स्थानिक विद्यार्थ्यांना आपल्या सोबत, त्यांच्या घरी एक किंवा दोन बाहेरगावच्या मुलांना मुक्कामासाठी नेण्याची शाळेने विनंती केली होती. मोठा अभिनव उपक्रम होता तो. त्यावेळी बाहेरगावच्या अनेक विद्यार्थ्यांसोबत आमची मैत्री झाली होती.
घरी या मुलांना नेलं तेंव्हा आईला देखील संस्थेच्या पंचवीस वर्ष पूर्ण झाला तो रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आठवला होता. त्यावेळी ती देखील शेवाळी येथील संस्थेच्याच शाळेची विद्यार्थिनी होती आणि तेंव्हा देखील असाच कार्यक्रम झाला होता. शेवाळीहून हे विद्यार्थी पायी दररोज साक्रीला येत होते. फक्त कार्यक्रमाची धुरा नानासाहेबांऐवजी संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब बेडसे आणि नामदेवराव अहिरराव आप्पा यांच्या कडे होती असं म्हणाली.
म्हणजे पुढे संस्थापक सदस्यांच्या कार्याची धुरा वाहणाऱ्या नानासाहेबांनी रोप्यमहोत्सवा नंतर पंचवीस वर्षांनी सुवर्णमहोत्सवी जंगी कार्यक्रम यशस्वी करून संस्थेची शान अबाधित ठेवली होती. याला जबाबदारीच्या वारसाचे उत्तम हस्तांतर म्हणता येईल.
नानासाहेबांचे नेतृत्व संस्थापक सदस्यांन इतकेच सर्वमान्य झाले होते. त्यावेळी नानासाहेबांच्या कार्यकाळात अनेक नव्या संस्था, नवे उपक्रम अस्तित्वात आले होते, त्यांची पायाभरणी केली गेली होती.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सतत नवीन विचारांचे कौतुक व्हायचे नवीन उपक्रम राबवले जायचे. आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी स्वतः डॉक्टर श्रीराम लागू आणि नरेंद्र दाभोळकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम व्हायचे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाला शाळेच्या पटांगणावर अलोट गर्दी जमा व्हायची. सानेगुरुजी कथामाला आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या वकृत्व स्पर्धांमुळे माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना लिहिण्याचा आणि बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण झालेला आठवतो.
बाबा आमटे यांच्या कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत आम्ही विद्यार्थी, साक्रीच्या जवळपासच्या खेड्यात अनेकदा प्रबोधनासाठी जायचो. स्काऊट-गाईड कॅम्प असोत किंवा आंतरभारती, छात्रभारती यांचे शिबिर. महात्मा गांधी यांचे विचार पसरवणारी अलाहाबाद विद्यापीठाची गांधी विचार परीक्षा असो किंवा गीतेचा भावानुवाद सांगणारी गीतापठण स्पर्धा. पाठ्यपुस्तकातील अभ्यासा व्यतिरिक्त देखील एक चांगला विद्यार्थी घडवणारी संस्था आणि तिचे नेतृत्व करणारे नानासाहेब आणि त्यांचा सर्वच शिक्षक वृंद कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाद्वारे चांगले संस्कार आणि चांगल्या शिक्षणाचा पाया घालत होता. जसे नानासाहेब होते तसे अनेक खरोखरच आदर्श वाटतील असे शिक्षक देखील त्याकाळी होते. कदाचित म्हणूनच नानासाहेबांना त्यांचे उपक्रम खऱ्या अर्थाने अमलात आणता येत होते.
एकदा मंत्रालयाला भेट दिली त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या केबिन बाहेर देखील कधी असं वाटलं नाही जे नानासाहेबांच्या, तिसऱ्या माळ्यावर असणाऱ्या कार्यालयाबाहेर आम्हा विद्यार्थ्यांना वाटायचं. पिन ड्रॉप सायलेन्स. त्यावेळी जबरदस्त दबदबा असणारी ती पावरफूल जागा वाटायची. कदाचित हा आदर किंवा दबदबा म्हणा हवं तर... हा नानासाहेबांच्या इतरांप्रती असलेल्या वागणुकीतून किंवा समाजात त्यांनी कमावलेल्या आपल्या ओळखीतून निर्माण झाला असावा.
१९९९ नंतर शाळेचा संपर्क तुटला. त्यानंतर तिथं काय झालं, कसं झालं याची कल्पना नाही. फक्त ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याची वृत्ती नाही. त्यामुळे आपण अनभिज्ञ आहोत असं म्हणणं वावग ठरणार नाही. अलीकडे सत्तांतर झाले वैगरे बातम्या ऐकल्या. पण काळ पुढे जातो तसे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल होतच असतात. ती नैसर्गिक प्रक्रियाच असते असं म्हणूया.
इतकी मोठी संस्था, अनेक ठिकाणच्या शाखा, शंभरावर कर्मचारी, हजारो विद्यार्थी... इतका मोठा पसारा सांभाळणे सोप्प काम नाही. उपर सामाजिक कार्य, राजकीय संघर्ष आणि त्यातही आपली सांस्कृतिक नाळ सुटू न देता, मिळालेल्या वैभवशाली वारश्याची तितक्याच संयमाने जपणूक करत, सत्तेचा माज/गर्व न करता अतिशय किचकट असं हे व्रत आयुष्यभर ताकतीने सांभाळणे फार कठीण आहे.
एकच घर सांभाळणाऱ्या सर्वसामान्यांना, संस्थेच्या माध्यमातून अशा अनेक घरांची जबाबदारी घेणाऱ्या नानासाहेबांच्या कर्तृत्वाची कल्पना येणारं नाही.
या बाबतीत नानासाहेब थोर म्हणायला हवेत.
विद्यार्थिदशेत कदाचित फार समज नसते, सगळं जग चांगलं वाटत असतं. समाजातील दुर्गुणी घटकांची जाणीव नसते. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असतो. आपणही काहीतरी चांगले निर्माण करू शकू असं मनगटात बळ असतं आणि भविष्याप्रति स्वप्न बघण्याची मनोवृत्ती असते त्यामुळे कदाचित जे जे चांगलं होतं तेवढंच आमच्या दृष्टीस पडत असेल. अनेक दुखावलेले घटकही असतील त्यांचंही म्हणणं काहीतरी वेगळं असू शकतं. पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर कसं असावं किंवा संस्थाचालकांची आपल्या शाळेतील कार्यक्रमांमध्ये किंवा एकूणच आपल्या वागणुकी मध्ये कुठले गुण असायला हवेत...याचे उत्तम उदाहरण म्हणजे कैलासवासी नानासाहेब जे. यू. ठाकरे होत.

नानासाहेबांना जगभरता पसरलेल्या त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
(मध्यंतरी, शाळेचे माजी मुख्याध्यापक डी. डी. नांद्रे सरांचा नानासाहेबांच्या कार्यावर आधारित असलेला एक उत्तम लेख वाचनात आला तोही आपण वाचावा ही विनंती.)
( जेवढी नावे आठवली ती लिहिली. मला कल्पना आहे त्या पेक्षा कितीतरी अधिक मान्यवरांचा हातभार या संस्थेच्या प्रगतीला लागलेला असेल. नानासाहेबांच्या कार्यात त्यांची सोबत झाली असेल, मला कदाचित त्यांची कल्पना नाही म्हणून ती नावे लिहीन राहिलं असेल पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांचं कार्य कमी आहे किंबहुना त्यांना त्याचे श्रेय दिलं नाही. जेंव्हा एखादा वटवृक्ष वाढत असतो, तेव्हा त्याची मुळं मजबूत करणाऱ्या इतर घटकांची ही तितकीच मेहनत असते, त्या सर्वांच्या कार्याला सलाम)
दीपक बाळू पाटील.

# जगणं समजून घेतांना.




No comments:

Post a Comment