Wednesday, 29 July 2020

कै. नानासाहेब जे. यू. ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



सकाळी साडे-अकराची वेळ असेल. अमेरिकेतील न्यूजर्सी मध्ये गेल्या दशकभराहून जास्त काळ स्थायिक असलेल्या लक्ष्मीकांत जाधव या मित्राचा फोन आला. तिथे त्यावेळी पहाटेचे तीन वाजले असतील बहुदा. मित्र रात्री उशिरापर्यंत काम करत असतो. त्याला कुठून तरी ती बातमी कळाली आणि लागलीच खात्री करावी म्हणून त्यानी मला कॉल केला. तोवर मी ही मोबाईल बघितला नव्हता. संस्थेतील कुणाला विचारून सांगतो म्हणून मी फोन कट केला आणि व्हॉट्स ऍप वर सहज म्हणून बघितले तर पुढच्या पाच मिनिटात साक्रीच्या जवळपास पंधरा-सोळा ग्रुप्स वर नानासाहेब गेल्याची बातमी येऊन धडकली.
करोनाचा बिकट काळ, दररोज काहीतरी वाईट बातमी येते आणि मन उदास होतं. नानासाहेब दवाखान्यात दाखल झाले त्यावेळपासून उलट-सुलट चर्चा चालू होत्या. पण आठवडाभरापूर्वी त्यांची खास कॅमेर्‍याला दिलेली, हॉस्पिटल मधील थम्सअप करणारी पोज बघून बरं वाटलं होतं. ते बरे होऊन परततील अशी चर्चा सर्वीकडे ऐकायला मिळत होती.
एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाची देखील तालुकाभर चर्चा होते म्हणजे ते व्यक्तिमत्त्व त्या प्रांतासाठी किती महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येईल.
अमेरिकेतील मित्र कॉल वर भरभरून बोलत होता. शाळेतील मंतरलेला काळ, तेंव्हाचा आदर्शवाद. न्यू इंग्लिश स्कूल मधील मोहरलेले दिवस आणि पर्यायाने नानासाहेबांसोबत, त्यावेळच्या विद्यार्थ्यांनी घालविलेला काळ, घटना आणि अनेक प्रसंग.
म्हणाला, राजकारण वैगरे सर्व ठीक पण त्यावेळचे सस्थेतील विद्यार्थी म्हणून नानासाहेबांबद्दल लिहायला हवं. आपल्या गावापासून इतक्या दूर परदेशात राहणाऱया मित्राला एखाद्या परक्या व्यक्ती बद्दल असं वाटतं असावं म्हणजे ती व्यक्ती निश्चितच खास असणार!
१९८५ च्या आसपास चा काळ असेल. साक्रीच्या शेतकी संघाला लागून असणाऱ्या आदिवासी कन्या छात्रालयात बालवाडीचा वर्ग भरायचा. त्यात आमच्यासारखी अठरापगड जातींची, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील मुले एकत्र शिकत होती. त्यावेळी जवळपास तीच एक बालवाडी असावी. मध्येच कधीतरी नानासाहेब तिथं चक्कर मारत. त्यावेळी सर्वांना आनंद व्हायचा. कारण, ' मामाच पत्र हरवलं' या खेळात स्वतः नानासाहेब मुलांच्या रिंगणात बसायचे आणि खेळ संपला की पार्ले-जी चे बिस्किट प्रत्येकाला वाटायचे, असं स्पष्ट आठवतं.
पुढे पाहिले ते चौथी आमची झेड पी च्या शाळेत गेली पण पाचवी पासून पुन्हा साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय.
आमचा पाचवी ते बारावी ( १९९१-१९९९) हा काळ  नानासाहेबांच्या कारकीर्दीचा देखील महत्त्वाचा पिरियड होता असं म्हणावं लागेल.
सकाळी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर आर वाय पाटील सर त्या दिवसाच महत्व माइक वर सांगत, सोबत कुणी गेल्याची बातमी असली की त्याला श्रद्धांजली वाहत. नानासाहेब दररोजच्या प्रार्थनेला नसत पण कधी ते आलेच तर तो दिवस स्पेशल वाटायचा. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या हालचाली सुद्धा बदललेल्या जाणवायच्या. कुणाला त्यांच्या समोर आपण सुरू केलेल्या प्रकल्पा बद्दल माहिती द्यायची असायची तर एखाद्याला आपल्या वर्गातील विद्यार्थाचे यश सांगायचे असायचे. नानासाहेबांची कौतुकाची थाप मिळवण्यासाठी जसे विद्यार्थी आतुर असत तसेच शिक्षक देखील धपडत करत.
संस्थेचे संस्थापक आणि नानासाहेबांचे आजोबा शंकरराव चिंधुजी बेडसे आप्पा यांच्या जयंतनिमित्त १४-१५ डिसेंबरला शाळेत वकृत्व स्पर्धा आयोजित होत. त्यात खैरणार सरांसोबत नानासाहेबांचा पुढाकार असायचा. ब्रेन ड्रेन, डंकेल प्रस्ताव किंवा अयोध्येमध्ये राममंदिर बनवायला हवे की दुसरेच काही असे तत्कालीन महत्वपूर्ण विषय तिथं हाताळलेले आठवतात.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात, राम मंदिराचा निकाल लागला होता त्यावेळी त्याची प्रकर्षाने आठवण झाली होती.
कारण निकाल आत्ता लागला तरी त्यावेळी आम्हा विद्यार्थ्यांना हा क्लिष्ट विषय समजून घ्यायला मदत झाली होती. किंबहुना सभोवतालच्या सामाजिक, राजकीय घडामोडींबद्दल मत बनवताना कुठले निकष लावायला हवेत याची जाणीव या वकृत्व स्पर्धांच्या विचारांमुळे होत होती.
स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिन किंवा बक्षीस समारंभ असो किंवा कुठले खास पाहुणे शाळेला भेट देणार असोत. नानासाहेब अश्या प्रत्येक वेळी आपल्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात करत. त्यावेळी स्वच्छ पांढऱ्या पोशाखात किंवा राखाडी सफारी सुट मध्ये असणारे नानासाहेब प्रसन्न वाटतं. विद्यार्थीदशेत खरंतर मोठमोठाली भाषणं बोर व्हायची. पण नानासाहेब बोलायला उठले की  विद्यार्थी ते लक्षपूर्वक ऐकत. कारण त्यांचं वकृत्व विद्यार्थ्यांना समजेल असं सोपं आणि मधाळ असे. उगीच पाहुण्यांना इंप्रेस करण्यासाठी ते क्लिष्ट शब्द वापरत नसत.
शाळेच्या सध्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इमारतीचे बांधकाम त्यावेळी चालू होते. सोबत ना. बू. अहिरराव छात्रालयाच्या वस्तीगृहाचे सुशोभीकरण... त्यावेळी शिक्षकांची विद्यार्थ्यांकडून श्रमदानाची अपेक्षा असायची. नानासाहेब स्वतः त्या श्रमदानाचे महत्व पटवून द्यायचे. त्यावेळी, नानासाहेबांचे शब्द ऐकून, आपण खरोखरच आपल्या शाळेच्या कामासाठी महत्त्वाचे योगदान देत आहोत असे वाटायचे आणि मुल जोमाने काम करायचे.
त्यावेळच्या राजन पवारांसारख्या तरुण कला शिक्षकाला शाळेच्या सुशोभीकरणासाठी अनेक कल्पना सुचत आणि ते  नानासाहेबांच्या मार्गदर्शनाने लागलीच पूर्ण देखील करत. डी डी नांद्रे सरांचे सुंदर अक्षरातील फलक लेखन असेल किंवा अग्रवाल सरांचे फळ्यावर लिहिलेले करंट अफेयर्स... शाळा सुंदर दिसण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते आजही तुम्हाला संस्थेच्या कुठल्याही शाखेत जाणवेल. मी तुम्हाला पैजे वर सांगू शकतो की, संस्थेच्या शाळातील रचनांमध्ये दिसणारी सौंदर्यदृष्टी इतर कुठल्याही तालुक्यातील शाळांमध्ये दिसणार नाही. याच्या पाठीमागे निश्चितच त्या संस्थेचा कार्यभार सांभाळणाऱ्या नानासाहेबांचा सिंहाचा वाटा असेल.
सातवीत असताना वर्गातील सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या मुलांची एक टीम बनवलेली आठवते. त्यात मुलांना प्रत्येकी पन्नास ते सत्तर पोस्ट कार्ड लिहायची होती. त्यात नानासाहेबांना शिक्षक आमदार पदासाठी आपण पाठिंबा द्यावा असा विनंती करणारा मजकूर होता. आजच्या फेसबुक व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या जमान्यात येथे एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्याकाळी या अशा पोस्ट कार्ड द्वारे आम्ही विद्यार्थी आणि शिक्षकांनी अनेक पत्र लिहिली होती. बोटं दुखली होती पण सुंदर हस्ताक्षराची आणि आपल्या मनातील विचार मांडण्याची सुरुवात कदाचित त्यावेळीच झाली असावी.
१९९२ ला संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाली तेंव्हा सुवर्ण महोत्सवानिमित्त शाळेच्या पटांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यावेळी तालुक्यातील आणि बाहेरच्याही अनेक खेड्यातील विद्यार्थी- शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम मोठा होता, प्रचंड गर्दी होती. प्रत्येकाची राहण्याची सोय करणं कठीण होतं त्यामुळे येथील स्थानिक विद्यार्थ्यांना आपल्या सोबत, त्यांच्या घरी एक किंवा दोन बाहेरगावच्या मुलांना मुक्कामासाठी नेण्याची शाळेने विनंती केली होती. मोठा अभिनव उपक्रम होता तो. त्यावेळी बाहेरगावच्या अनेक विद्यार्थ्यांसोबत आमची मैत्री झाली होती.
घरी या मुलांना नेलं तेंव्हा आईला देखील संस्थेच्या पंचवीस वर्ष पूर्ण झाला तो रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आठवला होता. त्यावेळी ती देखील शेवाळी येथील संस्थेच्याच शाळेची विद्यार्थिनी होती आणि तेंव्हा देखील असाच कार्यक्रम झाला होता. शेवाळीहून हे विद्यार्थी पायी दररोज साक्रीला येत होते. फक्त कार्यक्रमाची धुरा नानासाहेबांऐवजी संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब बेडसे आणि नामदेवराव अहिरराव आप्पा यांच्या कडे होती असं म्हणाली.
म्हणजे पुढे संस्थापक सदस्यांच्या कार्याची धुरा वाहणाऱ्या नानासाहेबांनी रोप्यमहोत्सवा नंतर पंचवीस वर्षांनी सुवर्णमहोत्सवी जंगी कार्यक्रम यशस्वी करून संस्थेची शान अबाधित ठेवली होती. याला जबाबदारीच्या वारसाचे उत्तम हस्तांतर म्हणता येईल.
नानासाहेबांचे नेतृत्व संस्थापक सदस्यांन इतकेच सर्वमान्य झाले होते. त्यावेळी नानासाहेबांच्या कार्यकाळात अनेक नव्या संस्था, नवे उपक्रम अस्तित्वात आले होते, त्यांची पायाभरणी केली गेली होती.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सतत नवीन विचारांचे कौतुक व्हायचे नवीन उपक्रम राबवले जायचे. आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी स्वतः डॉक्टर श्रीराम लागू आणि नरेंद्र दाभोळकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम व्हायचे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाला शाळेच्या पटांगणावर अलोट गर्दी जमा व्हायची. सानेगुरुजी कथामाला आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या वकृत्व स्पर्धांमुळे माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना लिहिण्याचा आणि बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण झालेला आठवतो.
बाबा आमटे यांच्या कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत आम्ही विद्यार्थी, साक्रीच्या जवळपासच्या खेड्यात अनेकदा प्रबोधनासाठी जायचो. स्काऊट-गाईड कॅम्प असोत किंवा आंतरभारती, छात्रभारती यांचे शिबिर. महात्मा गांधी यांचे विचार पसरवणारी अलाहाबाद विद्यापीठाची गांधी विचार परीक्षा असो किंवा गीतेचा भावानुवाद सांगणारी गीतापठण स्पर्धा. पाठ्यपुस्तकातील अभ्यासा व्यतिरिक्त देखील एक चांगला विद्यार्थी घडवणारी संस्था आणि तिचे नेतृत्व करणारे नानासाहेब आणि त्यांचा सर्वच शिक्षक वृंद कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाद्वारे चांगले संस्कार आणि चांगल्या शिक्षणाचा पाया घालत होता. जसे नानासाहेब होते तसे अनेक खरोखरच आदर्श वाटतील असे शिक्षक देखील त्याकाळी होते. कदाचित म्हणूनच नानासाहेबांना त्यांचे उपक्रम खऱ्या अर्थाने अमलात आणता येत होते.
एकदा मंत्रालयाला भेट दिली त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या केबिन बाहेर देखील कधी असं वाटलं नाही जे नानासाहेबांच्या, तिसऱ्या माळ्यावर असणाऱ्या कार्यालयाबाहेर आम्हा विद्यार्थ्यांना वाटायचं. पिन ड्रॉप सायलेन्स. त्यावेळी जबरदस्त दबदबा असणारी ती पावरफूल जागा वाटायची. कदाचित हा आदर किंवा दबदबा म्हणा हवं तर... हा नानासाहेबांच्या इतरांप्रती असलेल्या वागणुकीतून किंवा समाजात त्यांनी कमावलेल्या आपल्या ओळखीतून निर्माण झाला असावा.
१९९९ नंतर शाळेचा संपर्क तुटला. त्यानंतर तिथं काय झालं, कसं झालं याची कल्पना नाही. फक्त ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याची वृत्ती नाही. त्यामुळे आपण अनभिज्ञ आहोत असं म्हणणं वावग ठरणार नाही. अलीकडे सत्तांतर झाले वैगरे बातम्या ऐकल्या. पण काळ पुढे जातो तसे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल होतच असतात. ती नैसर्गिक प्रक्रियाच असते असं म्हणूया.
इतकी मोठी संस्था, अनेक ठिकाणच्या शाखा, शंभरावर कर्मचारी, हजारो विद्यार्थी... इतका मोठा पसारा सांभाळणे सोप्प काम नाही. उपर सामाजिक कार्य, राजकीय संघर्ष आणि त्यातही आपली सांस्कृतिक नाळ सुटू न देता, मिळालेल्या वैभवशाली वारश्याची तितक्याच संयमाने जपणूक करत, सत्तेचा माज/गर्व न करता अतिशय किचकट असं हे व्रत आयुष्यभर ताकतीने सांभाळणे फार कठीण आहे.
एकच घर सांभाळणाऱ्या सर्वसामान्यांना, संस्थेच्या माध्यमातून अशा अनेक घरांची जबाबदारी घेणाऱ्या नानासाहेबांच्या कर्तृत्वाची कल्पना येणारं नाही.
या बाबतीत नानासाहेब थोर म्हणायला हवेत.
विद्यार्थिदशेत कदाचित फार समज नसते, सगळं जग चांगलं वाटत असतं. समाजातील दुर्गुणी घटकांची जाणीव नसते. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असतो. आपणही काहीतरी चांगले निर्माण करू शकू असं मनगटात बळ असतं आणि भविष्याप्रति स्वप्न बघण्याची मनोवृत्ती असते त्यामुळे कदाचित जे जे चांगलं होतं तेवढंच आमच्या दृष्टीस पडत असेल. अनेक दुखावलेले घटकही असतील त्यांचंही म्हणणं काहीतरी वेगळं असू शकतं. पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर कसं असावं किंवा संस्थाचालकांची आपल्या शाळेतील कार्यक्रमांमध्ये किंवा एकूणच आपल्या वागणुकी मध्ये कुठले गुण असायला हवेत...याचे उत्तम उदाहरण म्हणजे कैलासवासी नानासाहेब जे. यू. ठाकरे होत.

नानासाहेबांना जगभरता पसरलेल्या त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
(मध्यंतरी, शाळेचे माजी मुख्याध्यापक डी. डी. नांद्रे सरांचा नानासाहेबांच्या कार्यावर आधारित असलेला एक उत्तम लेख वाचनात आला तोही आपण वाचावा ही विनंती.)
( जेवढी नावे आठवली ती लिहिली. मला कल्पना आहे त्या पेक्षा कितीतरी अधिक मान्यवरांचा हातभार या संस्थेच्या प्रगतीला लागलेला असेल. नानासाहेबांच्या कार्यात त्यांची सोबत झाली असेल, मला कदाचित त्यांची कल्पना नाही म्हणून ती नावे लिहीन राहिलं असेल पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांचं कार्य कमी आहे किंबहुना त्यांना त्याचे श्रेय दिलं नाही. जेंव्हा एखादा वटवृक्ष वाढत असतो, तेव्हा त्याची मुळं मजबूत करणाऱ्या इतर घटकांची ही तितकीच मेहनत असते, त्या सर्वांच्या कार्याला सलाम)
दीपक बाळू पाटील.

# जगणं समजून घेतांना.




आक्का

कस्तुरा आक्का. एक वल्ली.

काल रात्रीचीच गोष्ट, जेवणा आधी आईला विचारलं, काय भाजी? म्हणाली गिलके...
थोडा मुड ऑफ झाला. पण चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. मोठं झाल्याचा हा एक तोटा असतो.
लहानपणी मात्र असं काही उत्तर आलं की माझा दुसरा प्रश्न असायचा...
मग, आक्कांकडे काय केलय?
किंवा, मम्मीकडे काय बनवलय?

...हे नातं होतं.

आक्कांच्या हातची पाटोड्याची भाजी, डबुकडे सर्वात जास्त टेस्टी. दादांना लवकर कारखान्यात, तिथून मग शेतात जायचे असायचे त्यामुळे आक्कांचा स्वयंपाक लवकर व्हायचा. दादांना टीपॉय वर आक्का एकदम सिस्टीमेटिक ताट वाढून द्यायच्या. त्या ताटात सर्वच असायचं. ते बघून जेवणाची वेळ झाली नसली तरी आपल्याला ही भूक लागायची.

लहानपणी आक्का आणि मम्मी आईला, तू काय व कुसुम... असं उच्चारायच्या आणि आई त्यांना मान द्यायची त्यावेळी मला चकित वाटायचं. पण नंतर कळलं त्यांच्यात आई मुलीच नात होतं.

आक्का, कुणालाही काहीही बोलू शकायच्या. अगदीं, समोरच्या माणसाची भीडभाड न ठेवता. कारण त्यांचा स्वभाव बिनधास्त होता. आक्कांची स्वतः ची अशी एक डिक्शनरी असावी की काय असं वाटण्या इतपत त्यांच्या कडे अहिरणीतील नवे नवे शब्द असायचे. पुन्हा गॅलरी समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना त्यांनी टोपण नाव बहाल केलेली होती. ते खास आक्कांच्या शैलीत ऐकून जाम मजा वाटायची. दुंड्या सर, पोलीस पिंट्या, ही काही उदाहरणे...

इतक्या वर्षांच्या साक्री तालुक्यातील संसारा नंतरही  आक्कांच्या बोलण्यातल माहेर संपलं नव्हतं. त्या लील्या... ऐवजी घी घ्या... असंच म्हणायच्या.

लहानपणी आमच्या दादांनी रागवल, एस जी साक्री वाल्यांनी बॉल दिला नाहीं किंवा कोठावदे बुक स्टॉल वाल्यानी काही तरी खडूस वाक्य फेकल की ज्याम राग यायचा.
पण, आक्कानी दुपारी त्यांच्या घरातून हाथ पकडून हाकलून दिलं तरी आम्हीं निर्लज्ज सारखे पुन्हा संध्याकाळी जाऊन बसायचो.
जिथं जितू दादा, बंटी आबा, भारती माई हे देखील हाकलले जायचे तिथं आपण, किस खेत की मूली असं वाटतं असावं!
त्याकाळात, कदाचित आक्का हिचं एक व्यक्ती असावी जीचा कुणाला राग येत नसावा.

माझ्या साठी आक्कांच सर्वात आवडत वाक्य म्हणजे, "दिपू खिरुज लई जाय बरका..." त्या दिवशी सर्वांच्या घरी खिरूज च्या पाटोड्या किंवा लाडू बनायचे.

मला वाटतं, गॅलरीमध्ये आक्कांच घर सर्वात जास्त हॅपनिंग आणि ग्लॅमरस होतं. त्यांच्या घरात अगदीं छोटी घटना घडली तरी ती स्पेशल असायची. त्यात सर्वांचा सहभाग असायचा. धाडण्याच्या शेतातील भाजलेल्या ओल्या शेंगा, द्रक्षांसाठी लागणारे बॉक्स आणि त्यावर मारायचा शिक्का, कपू बाईच्या लग्नातील पत्रिका घडी करून पाकिटात टाकने, प्लास्टिक चे गोल गोल डिजाइन वाले पडदे बनवणे किंवा लोकर ची पिशवी... हे सर्व आइटम्स आक्कांच्याच घरात बनवले जातील असा अलिखित नियम होता!

पुन्हा गॅलरीत कुणाकडेहि नव्हते अशा वस्तू फक्तं त्यांच्या घरी होत्या जसे की त्यांचा कलर टीव्ही, गोदरेज कपाटात ठेवलेले स्टेपलर आणि पंचिंग मशीन, नवे कोरे फ्रिज आणि पाण्याच्या बाटल्या, मधल्या घरात ठेवलेली काचेची कपाट, ज्यात सर्वात भारी कप बशी, सरबत देण्याचे काचेचे ग्लास, कपु बाईने साफ करून चमकून ठेवलेले असायचे.
त्यामुळे, यांतील कुठलीही गोष्ट लागली की आक्कांची आठवण काढली जायची.

आक्कांच्या घरातील कुठल्याही विषयावर होणारी चर्चा हा एक अफलातून प्रकार होता. त्याची सुरवात आक्का करायच्या आणि मधूनच उठून किचन मध्ये जाऊन चहा ठेऊन यायच्या. शोभा ताई, रत्ना माई गावाहून आल्या की आम्हीं ही जाऊन बसायचो. त्या काळात मला माझे छडवेल चे नातेवाईक कोण हे कदाचित सांगता आले नसते पण मी, जगू मामा, नऱ्हा मामा, पला, कैल्या, लक्समा आक्का, मंगल, नाराबाबा, लखा मास्तर इत्यादी कॅरेक्टर्स बद्दल कॉन्फिडन्टली बोलू शकलो असतो.

गॅलरीतली दुपार म्हणजे, एक पाय लांब आणि दुसरा दुमडून जात्यावर हरभऱ्याची डाळ भरडणाऱ्या आक्का, हे चित्र माझ्या मनात पुरतं कोरल गेलं आहे.
आक्का निवांत क्वचित बसल्या असतील असं वाटतं. नेहमी काहीतरी निवड, भरड, सोल असच करतांना आठवतात. मम्मी सोबत बहिणींचं तरं देवरे मावशीं सोबत मैत्रीच नातं असावं असं मला वाटतं. मागच्या दारी यांना हसून गप्पा मारताना पाहिलेल आठवत.

शेवाळीचे भाऊसाहेब गेले ही बातमी आली तो प्रसंग सर्वात वाईट होता. गॅलरीतील प्रत्येक घरात रडारड चालू होती. तोवर रघुदादांना नेहमीच शिस्तीत आणि फ्रेश बघत आलो होतो. त्यामुळे दादा समोर आले तरी उठून उभे राहायची सवय होती. पण त्या दिवशी मधल्या घरात, शंकराच्या फोटो समोर दादांना धाय मोकलून रडतांना पाहिलेला प्रसंग आजही आठवला तरी आंगावर काटा उभा राहतो. इतके मोठे दादा अश्या पद्धतीने रडतांना बघितल्यावर त्या वयात काहीच सुचत न्हवत. पण अश्या प्रसंगात देखील आक्का खंबीर उभ्या होत्या. दादांचं सांत्वन करत होत्या.

संतू भाऊ चा अपघात झाला त्याकाळात तरं दादा बरेच हळवे झाले होते पण आक्का खंबीर राहिल्या. कदाचित आतून त्यांना वाटतं असावं पण वरून तरी त्या सर्व चांगलं आहे असा आव आणायच्या. उलट आपण त्याला जगण्याचा पॉझिटिव अप्रोच म्हणून बघितलं तरं त्याच महत्त्व लक्षात येईल. 

सकाळी भाऊंना फोन केला तेंव्हा ते म्हणाले, आक्कानी करोनाची टेस्ट केली म्हणून कदाचित कच खाल्ली असेल आणि त्यातूनच हार्ट अटॅक आला असेल... त्यावेळीं मला प्रश्न पडला, इतक्या मोठ्या मोठ्या संकटाना धिरानी सामोरी जाणारी आक्का अशी बरे कच खाईल. कदाचित हे नियतीनं ठरवलेलं प्रारब्ध असेल. कारण सत्तरी पार केली तरी अक्का मात्र कणखर वाटायच्या.

खूप वर्ष संपर्क न्हवता. नौकरी संसार तो ही दूर मुंबईत. त्यामुळे आई आणि भारती माई कडून फक्तं खबर मिळायची. पण, माझा सिनेमा आला त्याकाळात अचानक एक फोन आला. मी एका शूट वर होतो. समोरून एका ज्येष्ठ बाईंचा आवाज आला. मी अक्का बोली राहिणू.
इतक्या वर्षांनी तो आवाज ऐकत होतो तरी कोणती आक्का हे मला लगेच समजलं.
" भाऊ तूले मी टी वी वर दखं. तू आते, पाहिले पेक्षा चांगला  दिसाले लागणा. तूनी बाई भी चांगली शे..."
आक्कांचा अचानक आलेला तो कॉल, माझ्या कायम स्मरणात राहील.

बापू, वारले तेंव्हा शोभा ताई कडे भेटायला गेलो तर आक्कांनी लागलीच मुका घेतला. मला भारी वाटलं.
भेटलो, की आजही मम्मी पप्पी घेतात हे नेहमीच आहे. पण आक्कांनी ही घेतली तेंव्हा आता त्या खूप हळव्या झाल्या आहेत की काय असं जाणवलं. पण मग मी तो विचार लगेच झटकून दिला. कारण अक्कांचा तो स्वभाव नव्हता. आक्का म्हणजे कणखर ही डेफिनेशन होती.

एकदा आमची मोटारसायकल चोरीला गेली. त्यावेळीं कारखान्याचे दिवसही फार बरे नव्हते. आई तरं हळवी होऊन रडत होती. नशिबाबद्दल बोलत होती. त्यावेळी, दादा आणि आक्का घरी आले आणि म्हणाले,
"दादा मना इतला सोना सारखा जावई चोरी व्हई गया, तूना मायक फटफटी नहीं ते दुसरी कितली भी मौल्यवान वस्तू चोरी जाती ते मी रडतू नहीं..."
त्या दिवसानंतर मात्र आमच्या घरात कुणीच चोरलेल्या मोटारसायकल चा विषय काढला नाहि!

आज सकाळपासून आईशी आक्कांबद्दल बोलतोय, ती म्हणतेय, आपण सर्व मनुष्य प्राणी. त्यानुसार आपल्यात इगो असतो, कधी कधी इर्षा असते, इतरांविषयी राग येतो त्यातून आबोला होता... इतकी वर्ष शेजारी शेजारी राहिल्यामुळे कधीतरी भांड्या ला भांड लागलं ही असेल.
आक्कांसोबत क्वचित असे प्रसंग घडलेही असतील पण आक्कनी कधी राग केला नाही की कधी मनात ठेवलं नाहीं. तेवढ्या पुरता मी अक्काला ऐकूनही द्यायची, ती ही गुपचूप ऐकून घ्यायची आणि दुसर्‍या दिवशी परत कुसुम कुसुम म्हणत जवळ यायची.

पुलं देशपांडेच एक गाजलेले पात्र आहे, अंतू बरवा नावाचं. मला, आक्का त्या अंतू बरवा सारख्याच वाटतात. पुलंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, बाहेरून नारळा सारख्या कितीही टणक वाटल्या तरी आतून खोबर्‍या सारख्या मऊ!
आपल्याला पहाटे साडेचार वाजता उठून शेतात जाणारे शिस्तप्रिय दादा आठवत असतील पण त्यांना त्यावेळी चहा करून देणारी आक्का ही असेलच की.
इथ आपण एक दोन मुलांना वाढवताना थकतोय, तिथं सहा मुलामुलींना वाढवणं निश्चितच सोपं नसेल...

राजवाड्याची पडझड झाली. एक एक करून सर्वच घर सोडून जायला लागले. देवरे मावशी तर खूप आधीच धुळ्याला शिफ्ट झाल्या. नंतर आलेल्या सुनंदा आक्का ही आबा दक्षिण आफ्रिकेत गेले म्हणून गावी गेल्या. के. जे. दादांनी ही नवीन घर बांधल.
जितू दादाच लग्न म्हणून गॅलरीतून सर्वात आधी मम्मी गेल्या. मग काही दिवसांनी आक्काहि जाणारं ही बातमी आली.
त्यावेळी मला आठवतं, मी बाहेर शिकत होतो.
जोशी दादा मावशी, आक्कांचं घर आणि आमचे आई दादा इतकीच मंडळी राहिलेली. त्यात आई दादांना सर्वात मोठा आधार  आक्कांच्या घराचा होता.
आता ते ही कॉलनीत राहायला जाणार होते म्हणून बाहेर गावी होतो तरी गॅलरी सुनी झाली म्हणून लक्ष लागत नव्हत.

पडक्या गॅलरीत राहणारे आई-दादा आणि जोशी दादा मावशी आठवले की शिकणाऱ्या दिवसांत वाईट वाटायचं.
मग काही वर्षांनी जोशी मावशी गेल्या नंतर दादा. खूप वाईट वाटलं. त्यांना शेवटच्या दिवसांत आपण बघुही शकलो नाही ही खंत होतीच. मध्ये नाशिक ला एका लग्नात जोशी भाऊ भेटले. त्यावेळी दादा मावशींचा विषय निघाला तसे भाऊंचे चे डोळे पाणावलेले जाणवले. जुने दिवस आठवले. आमचे दादा जाऊनही दहा वर्षे झाली. गेल्या वर्षी के जे दादा गेले तेंव्हा राहुलनी बऱ्याच आठवणी सांगितल्या वाड्याच्या. आणि आता काल आक्का.

एखादी जागा तुम्हाला किती देऊन जाते. बालपण, संस्कार जगण्याचा अप्रोच असं बरंच काही.
आता असं वाटतं आपल ही अर्ध आयुष्य संपलं. वाड्यात फार-फार सतरा अठरा वर्षे राहिलो असेल. आता त्याहून अधिक जगल गेलं. म्हणजे वाड्यापेक्षा अधिक चा काळ बाहेर घालवला गेला. कधी बालपणीतल्या एखाद्या प्रसंगाचे स्वप्न जरी पडले तरी त्यात बॅकग्राउंडला वाडा आणि गॅलरीतील ते घरच येतं. अजूनही तिथल्या आठवणीं जात नाहीत. त्या हृदयाच्या एका कोपऱ्यात सदैव जपून ठेवलेल्या असतील. त्यात आक्कंची देखील एक फिक्स जागा असेल हे निश्चित!

बाळासाहेबा इतक्या दुरून आक्काची बातमी वाचून एका वाक्यात जर म्हणत असतील की she was like second mother to everyone... म्हणजे यातच सर्व आलं कि !

आक्का तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

मस्त रमलोय मी

मस्त रमलोय मी

आभासी या जगात, आता मस्त रमलोय मी
कुणाचं तरी स्टेटस बघून समजायला लागलं आहे मला,
समोरचा खुश किंवा दुःखी...
एखादी पोस्ट बघून नसलेला अर्थ काढायची जडलीये मला सवय...
फक्तं, टाईम लाईन बघून ' समजून ' घेतोय मी एखाद्याच जगणं.

सॉल्लिड अनालिसेस जमायला लागलाय आपल्याला...
एक्सपर्ट च झालोय म्हणा हवं तरं!

वर्षानुवर्षे एकमेकांना साधं बघितलं नाही, तरी त्याला मित्र म्हणतो कारण, कॉमन ग्रुपचे मेंबर आहोत आम्हीं...
एकाच रस्त्यांनी समोरासमोर, चालत गेलो तरी बोलत नाही, पण फेबु वर ' म्युचल फ्रेंड्स ' आहोत आम्हीं...

स्टेटस वर रेगुलर कमेंट, सोबत स्माईली
पोस्ट ला दोंचार लाईक,
कधी तरी कमेंट किंवा लव्ह...
अर्थातच, ' टच ' मध्ये आहोत आम्हीं.

हॅपी बर्थ डे, अभिनंदन, R I P
सोबत ' ग्रेट ' ही जोडलंय मी,
त्यातून नक्कीच खुश होतो समोरचा, हे आपलं सॉल्लिड analysis आहे!

आता पूर्वी सारखा मी प्रत्यक्ष भेटतच नाहीं कुणाला,
उगाच वेळ जातो.
मित्रां सोबत खांद्यावर हाथ टाकून फिरण्यात कसली आलीय गम्मत
ना मी कुणाजवळ व्यक्त झालोय ना कुणी माझ्या खांद्यावर डोकें ठेवून रडलयं.
फालतू चा ड्रामा सगळा,
मी आपला खुश आहे...नेहमीच!

आपल्या सवडीने प्रवेश करतो आभासी दुनियेत,
काही मिनिटे, काही कमेंट्स
अनेक लाईक्स...
थोडे analysis थोडे judgemental
कशाला हवयं फ्री मधे tension

आभासी या जगात, आता मस्त रमलोय मी
आभासी या जगात, आता मस्त रमलोय मी


(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)

काहीही असंबद्ध

काहीही असंबद्ध

दिवेलागणीला मन आतुर होत...
नकळत दुरवर कुठेतरी पोहचत
अस्पष्ट अधुंक काहीबाही आठवत राहतं.
उगीच आवंढा गिळला जातो.
कुणाची तरी आठवण येत राहते.
धुकं धुकं...
कुठले तरी दिवस
दूरवरची एखादी जागा...
अनोळखी ठिकाणचा प्रसंग...
एखादी व्यक्ती...कसले तरी आवाज
कदाचित गाणं किंवा संगीत
अगदीं काहीही...
आठवल की मग अस्वस्थ वाटतं. हुरहूर लागून राहते.
आपल्याच भावना, पण त्यावर आपला ताबा कुठे असतो.
कधी डोळ्यांच्या कडा ओलावतात तरं कधी खोलवर अडकून राहतं आत काहीतरी...

माळरानांवरचं एखादं झुडूप
जुन्या मंदिराच्या घुमटावर वाढलेलं शेवाळ
पायवाटेवरच वळणं
ओसाड हायवेवरची एखादी छोटी टपरी
रस्त्याच्या बाजूला उभ्या बैलगाडी खालच्या चुलीवर शिजनारी खरपुस भाकर
मध्येच शांततेचा भंग करत ट्रिंग ट्रिंग करत जाणारी सायकल
दूरवरच्या त्या एकट्या बंगल्या समोर भुरभुर पडणारा पाऊस
परतीच्या वाटेवर असणाऱ्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांचा नाद

खरंतर या सर्वांचं संबंध आहे तरी काय एकमेकांशी? काहीही असंबद्ध.
पण मग या हुरहुरनाऱ्या कातरवेळी,
डोक्यातील विचारांचं ही असच नाहीं का, काहीसं!


(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)


अंतिम भाग - पांझरा कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष


प्रस्तावना:-
एक लेख लिहिला.
तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून अनेक प्रतिक्रिया आल्या. कुणी राग व्यक्त केला तरं कुणी हळहळ. त्यातून अनेकांनी आठवणींना उजाळा दिला तर काहींना आपल्या या भूतकाळाची बोच मनात टोचून राहिली.
त्यातून दुसरा लेख लिहिला.
लोकं भावनिक झालीत. मग सावरली. म्हणाली, जे झालं ते वाईटच, पण काहीतरी करायला हवं.
मग अनेक प्रश्न उपस्थित झाले.
का करायला हवं? कुणी करायला हवं?
मग, आज हा अंतिम भाग लिहिला.
गावी अधून मधून येतंच असतो. सध्या करोना चा काळ, म्हणून इथलं वास्तव्य वाढलं. वेळ सत्कारणी लावावा म्हणून भटकंती. गावातल्या दुकानात जशी मंडळी भेटली तशी शेता खेताच्या बांधावर. सध्या पेरणीचा मोसम म्हणून बळीराजा कुटुंबासह रानातच भेटला. बाकी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जवळ आहेत. त्यांचे ही विचार कळले. त्यातून हे लिखाण घडून आलं.
निचरा झाला म्हणून समाधान मानायच की इतक्या वर्षात काहीच कसं झालं नाही याची खंत!
पण असो, हे चालतच राहणार. तिघीही लेख एकत्र वाचता यावेत म्हणून हा खटाटोप.
कुणीतरी म्हटलंय, लोकशाही टिकवायची असेल तर समाजातील विचारी घटकांनी व्यक्त व्हायला हवं. समाजाला दिशा मिळाली तर उत्तमच पण किमान सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी इतकीच अपेक्षा.
वाचकांचे आभार.
दीपक बाळू पाटील.
(लेखक - दिग्दर्शक)
M. 8108555442
( या आधीच्या लेखांना फेसबुकवर जॉईन असलेल्या अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यात. नाव नसल्यामुळे व्हॉटसअप वर मात्र अनेकांची अडचण झाली. त्यामुळे या लेखात नाव आणि नंबर देतोय. प्रतिक्रियेसाठी आपण मेसेज करू शकता. आपला अभिप्राय मोलाचा आहे. धन्यवाद.)



अंतिम भाग - पांझरा कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष



शालेय शिक्षण पूर्ण झालं तसं साक्री सोडलं. ते सोडावच लागणार होतं. त्याशिवाय पर्यायच न्हवता. गेली वीस- बावीस वर्ष अनेक शहरात राहिलो. कधी शिक्षणासाठी तर कधी कामासाठी भटकंती चालूच आहे. अनेक जवळचे, दूरचे प्रांत बघितले. कित्येक देशांना, तेथील शहर आणि गावांना भेटी दिल्या पण साक्री मात्र डोक्यातून जात नाही. 

आता गावं बदललं, जागा बदलल्या आणि माणसंही बदललीत. तरीही सुट्टी मिळाली की गावी येण्याची ओढ कायम असते. 

साक्री शहराची अगदी मध्यवर्ती जागा म्हणजे लक्ष्मी रोड. एस जी साक्रीवाला, ओम शांती, होम गार्ड ऑफिस, दिना स्टोअर्स, जिथं आम्हीं राहायचो तो राजवाडा आणि तिथला तो मध्यवर्ती चौक. त्यामुळे त्या काळात तालुक्यातील कुठल्याही घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार!
त्यावेळचा इथला ' चार्म ' वेगळा होता. ती खऱ्या अर्थाने तालुक्याची मध्यवर्ती जागा होती.

1990 ते 99 या दशकात साक्री तालुका देखील बऱ्यापैकी चळवळ्या होता. देशाचा विचार करता, एक तालुका म्हणजे अगदीच छोटा प्रांत. पण देशभरात ज्या महत्वपूर्ण घडामोडी होत होत्या त्याचे पडसाद मात्र निश्चितच साक्रीतही दिसून यायचे.

"कसम राम की खाते हैं, मंदिर वहीं बनाएंगे ", म्हणणाऱ्या अडवाणींच्या देशपातळीवरील चळवळीची अगदी छोटी का होईना झलक इथं होती. 
हातात लाल बावटा आणि छातीवर लाल बिल्ला टोचून शरद जोशींच्या शेतकरी चळवळीच्या आंदोलनाची ठिणगी तिथं पेटताना मी बघितली आहे.
राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या जवळपास तीस वर्ष चालेल्या सरकारची सद्दी संपवून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना भाजपच्या युती सरकारच्या रुपात पहिल्यांदाच झालेला बदलाव आणि त्या पाठोपाठ गल्ली गल्लीत त्यांचे लागलेले पोस्टर्स आणि त्या खाली लिहिलेलं 'गर्व से कहो हम हिंदू है', चे घोषवाक्य मला आजही त्यावेळच्या किराणा दुकानात कुठल्या भागात चिटकवलेले होते हे सांगता येईल. 

कुडकुडणाऱ्या थंडीत, सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला पहाटे, माध्यमिक शाळांच्या प्रभात फेऱ्या आणि त्यात मनापासून, "भारत माता की जय" म्हणणारे विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी आजही आठवले की अंगावर काटा उभा राहतो.
उसाला भाव मिळालाच पाहिजे म्हणून पोट तिडकीने ओरडणाऱ्या शेतकऱ्यांचा लांबच लांब मोर्चा... 
कारखान्याच्या कामगारांचे शेतकी संघाच्या पटांगणावर होणारे उत्स्फूर्त मेळावे. त्यात त्या काळच्या तडफदार कामगार नेत्यांची भाषणे. 
ताठ कण्याचे, प्रसंगी संस्था चालकांबद्दल देखील उघड बोलणारे, खऱ्या अर्थाने असलेले 'आदर्श शिक्षक' असोत किंवा आपण शेतकरी आहोत हे अभिमानाने सांगणारे तालुक्यातील मान्यवर शेतकरी. प्रत्येकाचा वावर हा असा ठाशीव आणि रुबाबदार होता. 

पांढरा शुभ्र सदरा, डोक्यावर गांधी टोपी, एका हातात धोतराची कास तरं दुसऱ्या हातात काठी, पायात कोल्हापुरी वहाणा किंवा कासाऱ्याच्या मोची वाड्यातून बांधून घेतलेले बूट... अश्या रुबाबदार अवतारात वावरणारे म्हसदी, कासारे, मालपूर, धमणार, दहिवेल, पिंपळनेर, छडवेल कोरडे, निजामपूर, भाडणे, दारखेल, छाईल किंवा वसमार चे प्रगत शेतकरी. जे तालुक्याच्या गावी देखील आपली आब राखून होते. त्यात काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकही होते. त्यावेळी खऱ्या अर्थाने ' शेतकरी राजा' या शब्दाला अर्थ होता. आत्तासारखी, ज्यांच कुठेच काही झालं नाही म्हणून, आमचा पुतण्या शेती करतो अशी व्याख्या नव्हती! 

पांडुरंग शास्त्री आठवलेंची ' स्वाध्याय ' ही आध्यात्मिक चळवळ असेल किंवा दाभोळकरांची 'अंधश्रद्धा निर्मूलन' जनजागृती मोहीम.
यदुनाथ थत्ते यांची 'राष्ट्र सेवा दल' चळवळ, 
साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित 'अंतर भारती' शिबिर असू देत की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान प्रत्येक ठिकाणी साक्रीकरांची गर्दी व्हायची. 

आम्हीं लहान होतो, फार कळायचं नाही पण या गर्दीचा भाग होऊन जे कानावर पडायचं, डोळ्यांना दिसायचं, त्यानी आमचा पिंड घडत गेला.
ज्याला आजच्या भाषेत आपण ' इनडायरेक्ट इफेक्ट ' असं म्हणतो! 

हा 'इनडायरेक्ट इफेक्ट' जसा संस्काराचा असतो तसाच इकॉनोमी चा देखील असतो. 

एखादा उद्योग व्यवसाय जेंव्हा तालुक्यात उभा राहतो तेंव्हा अनेकांना नोकऱ्या मिळतात. त्यावर त्या नोकरदाराचे अख्खे कुटुंब पोसले जाते, शेतकऱ्यांचा कच्चा माल आकर्षक किंमतीत विकला जातो. हे झाले डायरेक्ट फायदे.
पण इनडायरेक्ट फायदे देखील अनेक असतात. जे आपल्याला सहज दिसत नाहीत.

मागचे लेख वाचून असंख्य प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील एक, आमच्या छडवेल पखरूणच्या मित्राची होती. पांझरा कान कारखाना चालू होता त्यावेळी त्यांची छडवेल फाट्यावर एक छोटी किराणा टपरी होती ज्यातून सुरत कडून येणारे ऊस तोडणी मजूर खरेदी करायचे. दुकान छोटे होते पण शेतीला जोडून असलेले ते त्यांचे महत्वाचे उत्पन्न होते. पण जिथं कारखानाच बंद पडला तिथं या बिचाऱ्या छोट्या टपरीची आणि त्यावर चालणाऱ्या कुटुंबाची दखल कोण घेतय?
अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येकाची कहाणी इथं लिहिणं शक्य नाही पण वरील प्रतिक्रिया प्रातिनिधिक  होती.

परवा आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक भेटले. त्यांनीही लेख वाचला होता. म्हणाले, मला ही कारखान्याच्या नोकरीची संधी मिळाली होती. पण त्यावेळी मी छडवेल कोरडेला उपशिक्षक म्हणून रुजू झालो होतो. कारखान्याचा पगार अनेक पटींनी जास्त होता म्हणून मला ती नोकरी करायची होती. पण खूपच विचार करत राहिल्यामुळे हातची संधी गेली आणि ती नोकरी हुकली. 

साक्रीच्या बाजारपेठेत दुकान असलेला एक व्यापारी मित्र म्हणाला, तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक - शिक्षिका, थोडे इतर सरकारी आणि बैंक वैगेरेचे कर्मचारी हे आमचे प्रमुख कस्टमर. बाकी शेतकरी जीवनावश्यक वस्तूंच्या पलीकडे जात नाहीत. त्यामुळे सध्या फक्त या पगारदार मंडळींमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही!

खरंतर, आज संपूर्ण साक्रीची बाजारपेठ चालवण्यात 80 टक्के हाथ शिक्षकांच्या पगाराचा आहे आणि एक माजी शिक्षक कारखान्याच्या नोकरी बद्दल असं बोलत होते. यावरून त्यावेळचा कारखाना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराचे महत्त्व लक्षात येईल. 

गेल्या पंधरा सोळा वर्षात आठवून बघा, आपल्या आजूबाजूची मित्रमंडळी. कुणी इंजिनिअरिंग केलंय. कुणी BE, Diploma किंवा ITI. कुणी BSc Agri, किंवा शेतकी. Pharmacy, MBA झालेली ही अनेक मंडळी आहेत. त्यांपैकी किती लोकं तालुक्यात कामाला आहेत? बोटांवर मोजण्या इतके किंबहुना त्याहून कमी!

कारण, त्यांच्या शिक्षणाला साजेस कामच इथे नाही. 
BEd, DEd, BPhEd ची तर फौज आहे.
त्यातील ज्यांच्या ओळखी होत्या, संस्था चालकांना वीस पंचवीस लाख देण्याची तयारी होती, अशांना नोकऱ्या मिळाल्या. बाकी बिचारे मात्र शेताच्या बांधावर बसून आपण खरंच इतकं शिकायला हवं होतं का? हा विचार करत बसलेत.

एखाद्या संध्याकाळी, कासाऱ्याच्या समर्थ मंदिराकडचा रस्ता, म्हसदीचा धमनार रोड किंवा साक्री चा पेरेजपूर्, आंबापुर रस्ता... अश्या कुठल्याही ठिकाणी जा, तिथं रिटायर्ड मंडळी भेटतील. तुम्ही विचारले नाही तरी ते स्वतःच आपला मुलगा मुंबई, पुण्यात कसा पन्नास हजार महिना कमावतो, स्वतःच फ्लॅट घेऊन पंधराव्या माळ्यावर राहतो, कुणाच्या अध्यात ना मध्यात राहता कसा कंपनीच्या गाडीत ऐटीत प्रवास करतो, असल्या फुशारक्या मारतांना दिसतील. 

पण त्याचवेळी तो मुलगा बिचारा दोन-दोन तास शहरातील ट्रॅफिकमध्ये अडकून पडत असेल, लोकलच्या गर्दीत गुदमरून जात असेल... वनबीएचके चा ई.एम.आय. भरता भरता आपले अख्खे तारुण्य वाया गेले असा विचार करत असेल...
गावात आल्यावर, शेजार पाजाऱ्यांसमोर बापानी इतकं कौतुक करून ठेवलं असेल की ते पोरगं गुपचूप परत शहरात मिळेल ती नोकरी करत बापाच्या फुशारकीला जपत गपगुमान जगत असेल. 

सोशल मीडियाच्या दुनियेत जसं एक आभासी विश्व असतं. जिथं फक्तं आनंदी फोटोंमध्ये, आनंदी चेहरे असतात... तशीच काहीशी ही 'आभासी प्रगती' म्हणता येईल!

फार पूर्वी पुण्याच्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे  त्यास रिटायर्ड लोकांचे शहर म्हणायचे. आता तसंच साक्रीला देखील म्हणायला हवं. 
' रिटायर्ड लोकांचा तालुका' !
कारण, इथं फक्तं म्हातारे मायबाप किंवा शाळकरी वयातील मुलं राहतात. काम करणारी, कमावती तरुण पोरे मात्र सूरत, बडोदा, मुंबई, पुणे नाशिक... वाट मिळेल तिकडे...

कारण, आपल्या तालुक्यातच राहण्याची इच्छा असूनही त्यांना संधी कुठे आहे?

इथं पूर्वी सारखी ना कुठली चळवळ शिल्लक राहिली आहे ना कुठले आंदोलन. एकमेव उद्योग होता तोही बंद. 
दुसरं नोकरी मिळू शकेल असं कुठलच साधन नाही. 
नाही म्हणायला, इथलं भौगोलिक महत्व जाणून,  
' सुजलॉनची ' विंडमील आणि ' गेल ' चे सोलार पॅनल आलेत. पण तिथल्या पेक्षा कुठल्यातरी स्मशानभूमीत  जास्त कर्मचारी कामे करत असावेत अशी परिस्थिती!

गावे ओस पडलीत. पर्याय नाही म्हणून शेती. काही अपवाद आहेत, जोड धंद्यातून प्रगती करणारे. पण त्यांनाही फार पर्याय नाहीत. त्यातला एक होतकरू मित्र म्हणाला,
गेल्या वर्षी कधी न्हवे इतका पाऊस झाला. पांझरा, कान जामकी, तालुक्यातील होते नव्हते ते ओढे नदी-नाले सर्वच ओसंडून वाहत होते. विहिरी भरल्या. उसाची आठवण आली. 
म्हणाला, दहा एकर क्षेत्रात एकच मोठं पिकं घेतलं तर मेंटेनन्स ला सोपं जातं. आपला कारखाना बंद म्हणून,
' द्वारकाधीश ', ला नंबर लाऊन पाहिला. पण त्यांच्याच परिसरातील अनेक नंबर्स होते. ते साक्री तालुक्याला कसे प्राधान्य देतील. काहींना बिवारे मिळालं ही. आम्हाला मात्र नाही. म्हणून, कांदा लावला. पिक जोरदार झालं. त्यामुळे साठवून ठेवला. आता करोना आला. विक्री नाही म्हणून अर्धा सडून जातो की काय ही भीती आहेच.

दुसरा म्हणाला, जोड धंदा म्हणून म्हशी घेतल्यात. साक्रीला जाऊन सर्व दूध विकणे परवडत नाही. विकलेही जात नाही. शहरात साठ सत्तरचा भाव मिळतो, गावात चाळीस पंचेचाळीसला सोडून द्यावं लागत. 

पूर्वी एक भाऊ, साक्रीत नोकरीला तर दुसरा गावी शेतीत, अशी रचना होती. नोकरी करणारा किराणा बघायचा तर शेतीवाला अन्नधान्य. त्यामुळे त्या कुटुंबाचा बॅलेन्स होऊन जायचा. 
पण आता परिस्थिती बदलली. नोकरी करणाऱ्याची मुलं शहरात वनबीएचके च्या चक्कर मध्ये अडकलीत तर गाववाल्यांची मातीच्या छपराच्या डागडूजीत!

नव्वदच्या काळातील साक्रीच्या, शेतकी संघात ऐटीत वावरणारा शेतकरीच काय तरं ' शेतकी संघ' देखील नामशेष झालाय. ना कामगारांचे अस्तित्व आहे ना शेतकऱ्यांचे. त्यामुळे, कुठली आलीत आंदोलनं नी कुठली आलीय चळवळ? म्हणून मग शेतकी संघाच्या पटांगणाचा देखील काय उपयोग? टाकलीत तिथं दुकाने बांधून!

हा देखील एक, ' इनडायरेक्ट इफेक्ट ' बरं का!

महाराष्ट्रातील, ' लातूर ' हा असा तालुका आहे जिथं उन्हाळ्यात पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. टँकरच  काय तर पिण्याच्या पाण्याची रेल्वे तिथे पोहचवावी लागते. तरीही तिथं साखर कारखाना आहे. MIDC आहे. थ्री स्टार हॉटेल्स आहेत, अहो, थियेटर, मल्टिप्लेक्स देखील आहेत... कारण इच्छाशक्ती आहे. 

तरीही, मराठवाडा किंवा विदर्भाचं समजू शकतो. तिथल्या काही तालुक्यात खरंच निसर्गाने अवकृपा केलीय. पाणी नाही. जमिनी नापीक आहेत. 
पण आपल्याकडे तर सर्वच आहे. सुपीक जमीन, मुबलक पाणी, तरीही...

' झुंज ', नावाचा एक जुना मराठी सिनेमा होता. त्यात तमाशातील एका गाण्यात सवाल-जवाब आहे. त्याच्या ओळी पूर्वीच्या आणि आत्ताच्या साक्री तालुक्याच्या परिस्थितीला अगदीं चपखल बसतात...

कोण होतास तू, काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू...

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला टायटॅनिक नावाचं अतिप्रचंड ब्रिटिश जहाज पाण्याखाली बुडालं. त्यात अनेक लोकं मेली. अजूनही अधून मधून संशोधक पाण्याखाली उतरून त्या जहाजेत कसला कसला शोध घेत असतात. 
आज बावीस वर्ष झालीत, पांझरा-कान बंद आहे. उद्या महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच असच संशोधन करायचं झालं तरं संशोधकांना अजून काही वर्षांनी इथला पत्रा तरी सापडेल काय याची शंका वाटते!

त्यामुळे एक शेवटचा प्रयत्न म्हणून हे प्रकरण समजून घ्यायला हवं.

कुणीतरी मित्राने मागच्या लेखावर कमेंट केली, आता तालुक्यातील तरुणांनी पुढे यायला हवे.
म्हणजे, गेल्या बावीस वर्षात तालुक्यात मुलं तरुण झालीच नाहीत काय...?
दुसऱ्या एका नी सांगितलं, तरुणांनी पेटून उठाव करायला हवा.. 
मी म्हटलं, कुणाविरुद्ध आणि कसा?

एका महाशयांनी तर चक्क कैलासवासी झालेल्या जुन्या पुढाऱ्यांना खेचून आणून जाब विचारायला हवा असं मत मांडलं.

या सर्वांच्या भावना आपण समजू शकतो. या प्रतिक्रियांमागे फक्त तालुक्याचे कल्याण व्हावे. इथं एक सक्षम उद्योग उभा रहावा इतकीच सर्वांची इच्छा आहे. अपेक्षा मात्र फक्त  राजकारण्यांकडून आहेत. आणि इथेच गल्लत होतेय असं वाटतं. जिथं फायदा नाही तिथं अहो, राजकारणी तरी कसे हाथ टाकतील. 

अगदी स्पष्टच सांगतो-

तालुक्याचे भूमिपुत्र आणि देशाच्या राजकारणात अत्यंत मानाचं पद भूषवलेले माननीय माजी मंत्री साहेबांनी ज्यावेळी गेल्या टर्मला शपथ घेतली त्यावेळी तालुक्याच्या सुकलेल्या वृक्षालाही आशेची पालवी फुटायला लागली होती. त्यात चूक काही नव्हतं. पाऊस पडला की दोन थेंब आपल्यावरही पडावेत अशी अपेक्षा चराचरात निर्माण होते. पण हे ढग दिवसभर आपलेच वाटत असले तरी, संध्याकाळी त्यांच्याच मतदार संघात बरसतील हा निसर्गनियम आपण विसरलो आणि भाबडी आशा लाऊन बसलो. जन्म इथे झाला म्हणून काय झालं, कार्यक्षेत्र तर दुसरं आहे हे विसरून कसं चालेल!

दुसरे कारखान्याचे शेवटचे माजी. इथल्या चिमणीच्या राखेचा टिळक ज्यांनी भाळी लाऊन आपली प्रगती करून घेतली. अनेकांच्या उध्वस्त संसाराचा घास नुसताच गिळला नाही तर पचवला देखील. त्यामुळे ते महाशय आता इतके समाधानी आहेत की पुन्हा कशाला या विस्तवावर हाथ टाकायचा, हा त्यांना पडलेला प्रश्न रास्त आहे!

तिसरे आणि शेवटचे ज्यांच्याकडून ' तरुण ' म्हणून अपेक्षा होती. पण ते विधानसभेच्या मृगजळामागे धावत बसलेत. तेही परक्या तालुक्याच्या भरवशावर... अहो, तितकीच ऊर्जा इथं लावली असती तर मंत्रालयाचं सुखं नाही पण जन्मभर पुरेल इतकं पुण्य नक्कीच कमावलं असतं तुम्ही, तालुक्याच्या आशीर्वादाने!

बाकी, वर्षभर शाल-श्रीफळ देऊन एकमेकांचा वाढदिवस करणारे आणि कॅलेंडर मध्ये दिलेल्या महापुरूषांच्या व्हॉट्स ऍप जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करणाऱ्या, आपल्याच कोशात राहणाऱ्या भाऊ, दादा, तात्या, साहेब यांच्या कडून काय अपेक्षा करणार...?

नव्वद च्या दशकात तालुक्याने अंगार बघितला आहे. चळवळ अनुभवली आहे. त्याची पुनरावृत्ती कठीण असली तरी अशक्य नाही.

कारखान्याकडे राजकारण म्हणून नव्हे तर अनेकांच्या उपजीविकेचे साधन ठरणारा एक प्युअर उद्योग - व्यवसाय म्हणून बघायला हवं. 

राजकारण विरहित. उद्योगस्नेही. माणसांच्या चांगुलपणावर विश्वास असणाऱ्या आणि दगडालाही पाझर फोडणाऱ्या वृत्तीच्या तरुण फळीची आज गरज आहे. ती कुणी राजकारणाचा वारसा नसली तरी चालेल. पण इथल्या मातीची कळकळ त्यांच्यात असायला हवी. 
स्वतःच्या उच्च शिक्षणाचा, अनुभवाचा फायदा घेत 
' स्वदेस ' या सिनेमातील नायकाप्रमाणे एक नाही तर दहा 'मोहन भार्गव' तालुक्यात परतायला हवेत.
वर म्हटल्या प्रमाणे इथले शिक्षित, वन बीएचके च्या ई.एम. आय. च्या चक्रव्यूह मध्ये अडकलेले. तरीही, स्वतःच्या गावाची ओढ असणारे...
आणि शेताच्या बांधावर आपल्या डिग्रीचा उपयोग काय असा विचार करणारे...
हे सर्व तरुण एकत्र आले पाहिजेत. 

इथून बाराशे किलोमीटर दूर अयोध्येच्या मंदिरासाठी जर आमच्या तालुक्यातून विटा पोहचत असतील तर इथल्या अस्मितेच्या प्रश्नासाठी, अनेक कुटुंबांच्या रोजगारासाठी आणि तालुक्याच्या उन्नतीसाठी, पुन्हा एकदा का शपथ घेत नाहीत? पुन्हा एकदा का म्हणत नाही-
कसम राम की खाते हैं, मंदिर (कारखाना) वहीं बनायेंगे...


(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)






भाग दोन - पांझरा कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष

भाग दोन - पांझरा कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष

संध्याकाळी जाऊन कारखान्याच्या डोंगरावर सूर्यास्त बघत राहणे ही जुनी सवय. समोर कारखान्याचा परिसर, बाजूला कोकले, नागाई, कासारे मालपूरची शेती. दूरवर दिसणारा चिराईबारी चा डोंगर आणि काटवानची अनेक गावे. पाठीमागे पेरेजपुरच्या पलीकडे असलेल्या सालटेकच्या डोंगररांगा. पूर्वेकडे दूर भामेर किल्ला, शेवाळी, महिर, तामसवाडी पर्यंत दिसणारा परिसर.
एका नजरेत साक्री तालुक्याचा जवळपास तीस पस्तीस टक्के परिसर अनुभवण्याची स्वर्गीय जागा म्हणजे हा कारखान्याचा डोंगर.

परवा देखील सवयी प्रमाणे तिथं होतो. त्यावेळी मनाला वाटलं ते लिहून काढलं. लेख पब्लिश होताच, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. लिहितांना मला अजिबात अपेक्षा न्हवती इतक्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची. मी माझ्या मनातलं लिहिलं होतं. पण आज कारखाना बंद होऊनही तेवीस चोवीस वर्ष झाली तरी लोकांचे इतके प्रेम पांझरा- कानला असेल याची कल्पना नव्हती. लोकांनी उत्स्फूर्त पणे व्हॉट्स ऍप वर तो शेअर केला. वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये त्या बद्दल चर्चा घडून आल्या. अनेकांनी अगदी भावनिक होऊन आपल्या आठवणी सांगितल्या. तर काहींनी तावातावाने राजकीय चर्चा घडवून आणल्या.

कुणाचा बाप तिथं कामाला होता तर कुणाचा आजा. कुणाचं ते मामाच गावं होतं तरं कुणी नवीन संसाराला तिथून सुरुवात केली होती. कुणाच्या लेकराच बाळसं तिथं झालं होत. अनेक ज्येष्ठ कामगारांनी, शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी आपली खंत बोलून दाखवली. अनेकांनी कुठून कुठून माझा नंबर मिळवून फोन केले, मेसेजेस लिहिले.

साक्री परिसरासोबतच मुंबई-पुणे ठाणे, कल्याण, नाशिक अगदी सूरत बडोद्याहूनही मंडळीनी मेसेज केले, कमेंट्स टाकले.

पुण्याहून, एका ताईंचा कॉल आला. आपला भूतकाळ पाठीमागे टाकून आता त्या आपल्या संसारात बऱ्याच पुढे  गेलेल्या आहेत. नशिबानं आर्थिक सुबत्ता ही आहे. पण आपल्या कारखान्यातील बालपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत म्हणाल्या. कारखाना असा बंद झाल्यामुळे आई बाबांच्या संसाराची कशी लक्तर झाली हे सांगताना मात्र त्यांना गहिवरून आलं.

नाशिक चे एक ज्येष्ठ पत्रकार मित्र त्या वेळच्या दिवसांचं वर्णन करताना थकत न्हवते. त्यांच्या त्या काळच्या शाळेतील मित्रांच्या ग्रुप मध्ये लेख वाचून प्रचंड हळहळ व्यक्त झाली म्हणाले.

मुंबई पोलीस मधला एक मित्र जो स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांनी मला एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाठवला. ज्यात 1985 सालच्या स्टेट लेव्हल कब्बडी खेळाडूंचा संघ होता. हा कब्बडीचा संघ कारखान्यातील कामगारांचा होता. त्यात त्या मित्राचे वडीलही होते.
कारखाना सुरू असता तर हा संघ नॅशनल लेव्हलला खेळणार होता म्हणाला.
कारखाना बंद पडला, बेरोजगार बाप शेती करू लागला. संध्याकाळी घरी आला आणि ही मुलं कब्बडी खेळताना दिसली, तर त्यांना काठीनं मारू लागला.
माझ्या ' पक्क्या खेळाडू ', बापाला खेळाचा तिटकारा करताना बघायचो त्यावेळी कळायचं नाही, पण आता ते आठवलं की अंगावर काटा येतो म्हणाला!

दुसऱ्या एका बाईंनी खूप वर्षानंतर, कारखाना परिसराला भेट दिली होती. त्यावेळी तेथील दुरावस्था बघून त्यांना आपण उगीच तिथं आलो असं झालं होतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, डोंगरावरून दिसणारा पांझरा-कान नदीचा संगम, हिरव्या गार रंगांच्या विविध छटानीं पसरलेली शेती, खेळणारी मुले, उसाच्या गाड्या, मळीचा वास, नागाई मंदिरातील पाण्याचे झरे, केवड्याचे बन असं काहीच न्हवत. सगळं उदास, भकास उगीच गेलो असं वाटलं म्हणाल्या.

आमच्या शाळेतील एक जुना शेतकरी मित्र तर फोनवर रडायला लागला. कारखान्याच्या कार्यक्रमात तो, "जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला..." या गाण्यावर दरवर्षी नाचायचा. त्याला त्यासाठी अनेक बक्षिसंही मिळाली होती म्हणाला. आलेला हुंदका गिळत तो हळूच माझा डान्स मात्र माझ्या मुलात उतरला आहे बरं का हे डोळे पुसतच सांगू लागला...

एका सद्गृहस्थांनी सांगितलं, कारखाना माझ्या मामाच गावं. आजोबा तिथं कामाला होते. आम्हीं सुट्टीत तिथं खूप गम्मत करायचो. रस पिणे, नागाईला पोहणे, ऊसाच्या गाडीतून ऊस ओढणे, तिथल्या पटांगणावर मामाच पत्र हरवलं, क्रिकेट, विट्टी दांडू असले खेळ खेळायचो...

माझ्या स्वतः च्या आईचा एक किस्सा आहे. आता आम्ही त्यावर हसतो देखील. पण त्याकाळात तिला काय वाटले असेल याची कल्पना करवत नाही.
एका शिक्षकाची पत्नी आजारी होती. गल्लीतील इतर बायकांसोबत आई देखील त्यांना बघायला गेली. कुणी चिक्कू सोबत नेले होते तर कुणी सफरचंद. आईंनी चार रुपयाचा पार्ले जी. तो दिला त्यावेळी त्या बाई, आईला म्हणाल्या, " ताई, तू कसाले इतला खर्च करा, तुना कारखाना ते बंद पडेल शे. हाऊ पुडा परत लई जाय, तितलाच तूना लेकरे खाऊ खातीन..."

काळजी, अपमान, ईर्ष्या, हेटाळणी की अजून दुसरच काही...?

आर्थिक पिळवणूक, सांस्कृतिक दुरवस्था, राजकीय उपहास सोबत हा सामाजिक दुष्परिणाम ही तितकाच घातक होता.

प्रतिक्रिया तर अनेक होत्या. सर्वच लिहिणे शक्य नाही. पण वरच्या प्रातिनिधिक म्हणून नमूद केल्या. अजूनही अनेक असतील, ज्या माझ्या पर्यंत पोहचल्या नाहीत. कदाचित काहींना शब्दात व्यक्त होता येत नसेलही, पण त्यांच्याकडे काहीच सांगण्यासारखंच नसेल असं कुठे आहे?
आत कुठेतरी खोलवर दडून असेलच काहीतरी.

त्या कमेंट्स, मेसेजेस वाचतांना मात्र माझ्या डोक्यात वेगळेच विचार खेळ खेळू लागले.
त्या पुण्याच्या बाईंना आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट  करतांना, कारखान्यामुळे आपल्या आई बाबांच्या संसाराची झालेली वाताहत आठवून त्यांच्या गळ्याखाली केक उतरला असेल काय?

ते पत्रकार मित्र आणि त्यांची लेखणी या अनुभवामुळे जगाकडे कायमचं दुःखी दृष्टिकोनातून बघत, लिहीत असतील का?

मामाच पत्र हरवलं, हे बालपणी खेळणारे ते गृहस्थ एक दिवस आपल्या आठवणीत भावनिक होऊन अनावधानाने  माझ्या 'मामाच छत्र' हरवलं असचं तर म्हणाले नसतील?

जवा नविन पोपट हा... या गाण्यावर आपल्या उजाड शेतात नाचणारा तो शेतकरी मित्र कसा दिसत असेल?

नशिबाने खेळाडू मित्राने, खेळाची आस सोडली नाही म्हणून पोलिसात लागला. बापाच्या भीतीनं त्यानी खेळणं सोडून दिलं असतं तर?

मला स्वतःला स्ट्रगलिंगच्या दिवसात पार्ले-जी च्या त्या बिस्किटाचा आधार होता पण जर मी ते हेटाळणीच बिस्कीट नाकारलं असतं तर त्या चार रुपयात माझं पोट भरलं असतं का?

एखादं गाव, एखादं ठिकाणं, एखादी जागा... तुम्हाला किती देऊन जाते... पण त्याचीच जर जखम झाली तर तुमचं सर्वस्व सोबत नेते!

तुम्ही म्हणाल, प्रकल्प बंद होत नाही का, कंपन्या डबघाईला जात नाहीत का... अनेक प्रायव्हेट प्रोजेक्ट ही बंद पडतात, तिथं हा तरं सहकारी?
अहो, सहकार चळवळीतून उभा राहिला होता म्हणूनच तर वाईट वाटतंय. आमच्या कामगारांच्या, शेतकऱ्याच्या शेअर्सवर उभा राहिलेला उपक्रम. तालुक्यातील एकमेव उद्योग. असा अवेळी बंद पडतो. कुठलेही ठोस कारण न देता?
एक साधी नोटीस ही नाही?
कामगारांना एक साधं पत्रही नाही, की उद्या पासून कामावर येऊ नका म्हणून...
शेतकऱ्यांना साधा निरोप नाही, की जुनं पेमेंट तर विसराच पण पुढच्या वर्षापासून ऊसही लावू नका...

कामगार रोज आशेने ड्युटी वर येत राहणार...
शेतकरी चक्कर मारत राहणार...
एकदिवस तिथली एस टी बंद होईल.
मग स्वतःच्या फटफटी वर येणार...
शेवटी फटफटतीत टाकायचं पेट्रोल ही परवडेनासे होईल... मग स्वतःच बंद करेल तिथं येणं...!

हे असं, ' बंद करणं ', केंव्हा आणि कसं ठरवलं असेल त्यांनी? आणि पुढच्या क्षणी काय निर्णय घेतला असेल?
तालुक्याचे ठिकाण सोडून गावी परतण्याचा?
तिथं असणारी दोन-पाच एकर जमीन कसण्याचा?
त्या जमिनीचा वाटा कसा मागितला असेल भांवडांकडून? दिरानी-जेठाणीचे त्यावरून वाद झाले नसतील कशावरून?
कदाचित गोष्टी कोर्ट-कचेरी पर्यंत तर गेल्या नसतील ना?

की मग, तालुक्यातच राहून तो किंवा त्याची पोरं दुकानात कामाला लागली असतील? कारखान्यात मिळायचा त्या पगाराच्या कदाचित फक्त वीस टक्के प्रमाणात?
त्यातलं एखादं पोरगं गणितात हुशार असेल ही , पण आता ते शिक्षण सोडुन आठवडे बाजारात झिंगे - बोंबिल विकून वजन काट्यावर हिशोब करत नसेल कशावरून?

एखाद्या पोराला इतिहास नागरिकशास्त्रात गती असेल, आता ते तुमच्या राजकारण्यांच्या जीपांमागे झेंडा धरून धावत असेल. चिकन - मटण आणि दारूच्या लालसेपायी पोट तिडकीन तुमच्या नावाच्या झिंदाबादच्या घोषणा देत देत, एक दिवस लिव्हर खराब होऊन मेला नसेल कशावरून?

कारखान्याचे राजकारण संपलं तरी तुमच्यासाठी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, झेड पी, आमदारकी, खाजदारकी असेल.
फार्म हाऊसवर तुमचं पोरगं जेंव्हा व्हाईट सदरा, व्हाईट पॅंट, व्हाईट शूज, मनगटात सोन्याची घड्याळ, गळ्यात सोन्याची चेन घालून आरश्यासमोर बघत उभा राहत असेल त्यावेळी कोण अभिमान वाटत असेल नाही, तुम्हाला तुमच्या राजबिंड्या पोराचा...?

त्यावेळी, तुमच्या मनात जरा ही विचार आला असेल का हो... की आमच्या देशोधडीला लागलेल्या कामगारांची, पिचलेल्या शेतकऱ्यांची पोरं दूर चाकण, सातपूर, सिन्नर, तळोजा, वापी, वाडाच्या कुठल्यातरी MIDC मध्ये लोखंड वितळवत असतील, गोण्या उचलत असतील नाहीतर निळे  एप्रन घालून फिटिंगची कामे करत असतील...

शहरात परवडत नाही म्हणून त्यांचा बाप पायली पायली गहू बाजरी एस्टी मध्ये, लोकल मध्ये टाकून, शहरात येत असेल... बिचारा गर्दीला बिथरून जात असेल. शेवटी कसा तरी सांगवी, भोसरी, मुंब्रा, कळवा, दमन, सूरतच्या कुठल्या तरी गलिच्छ गल्लीत पोराचा संसार बघायला येत असेल.
ते पोरगं निघतांना स्वतःचा महिन्याचा हिशोब ठेऊन आपल्या बापाच्या हातात, बायकोला लपवत, किडुक-  मिडूक काहीतरी टेकवत असेल.
त्या परतीच्या वाटेवर त्या बापाला काय वाटत असेल हो?
प्रवासभर तो काय विचार करत असेल?

तुमची मुलं-नातरे डुन स्कूलला शिकली असतील.
इंग्लिश फाडफाड बोलत सुट-बूट घालतं कधीतरी गावी चक्कर मारून इथल्या तुमच्या प्रगती बद्दल बोलत असतील...
त्यावेळी आमच्या कारखान्याच्या कामगाराचं, शेतकऱ्याचं पोर बाजरपट्टीतील कुणा सिंधी किंवा मारवाड्याच्या दुकानावर पुड्या बांधत असेल किंवा तोंडात गुटखा खात खात रेडिमेड स्टोअर्स मध्ये बनियान अंडर पॅन्टच्या घड्या घालत असेल...
त्याच्या तोंडात वर्षानुवर्ष साचलेले ते गुटखारुपी विष तुमच्या नावानं गावाच्या वेशीवर थुंकला तरं चालेल का हो...?
चला क्रांती नाही पण त्याच्या समाधानासाठी तो इतकं तर निश्चितच करूच शकतो की!


(कुणीतरी म्हणाले, व्हॉट्स ऍप वर लेख वाचला पण खाली कुणी लिहिला हे नावं न्हवत म्हणून समजलं नाही. मी म्हणालो, नाव लिहून काय करायचं आहे. शब्द माझे असले तरी भावना आपल्या सर्वांच्याच नाहीत काय...?)

(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)

पांझरा-कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष

पांझरा-कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष


आयुष्य कुणासाठी कधीच थांबत नाही. तुम्हीं ही पुढे जात राहतात. तुमचा भूतकाळ पाठीमागे सोडून. पण काही जुन्या जखमा असतातच ठसठसणाऱ्या...

मी जिथे बसलोय त्या डोंगरावरून मला कारखान्याचा संपूर्ण परिसर दिसतोय. साधारण तीनशे साडेतीनशे एकराचे क्षेत्र. प्रचंड मोठा परिसर.

ऊसाचे ट्रक्स, बैलगाड्या. कामगारांची, शेतकऱ्यांची प्रचंड वर्दळ. वातावरणात एक प्रकारचा उत्साह. मध्येच बाराच्या ठोक्याला भोंगा वाजतोय. शिफ्ट बदलली म्हणून कामगार घाईत आत जातांना दिसतायत. तर शिफ्ट संपवून थकलेले जीव निवांत गप्पा मारत बाहेर पडतायत.
नाक्यावर प्रत्येक गाडीची नोंद केली जाते आहे. चिमनीतून धुराबरोबरच ' उत्साह ' ही विसर्जित होतोय. कारखान्याच्या गुरुदत्त मंदिरात आरती चालली आहे. कालपासून कुठली तरी भजनी मंडळी आहेत मुक्कामाला. मधूनच त्यांच्या टाळ, मृदुंगाच्या सरावाचा आवाज. कोपऱ्यावरच्या तिघी चौघी हॉटेल्स माणसांनी गजबजून गेल्यात. शेतकऱ्यांनी आपली न्याहारी त्यांच्या टेबलावर मांडलीय. सोबत गरमा गरम भजीची ऑर्डर घेऊन पोरगं गेलंय आत. वर घट्ट दुधाचा चहा. कारखान्याची अधिकारी मंडळी रुबाबात आपल्या ऑफिसमध्ये ये जा करतेय. परिसरातल्या शाळेतील विद्यार्थी प्रार्थनेसाठी पटांगणावर जमलेत. साखरेच्या थैल्या आणि गुळाच्या भेल्या व्यवस्थित बाजूच्या गोडाऊन मध्ये ठेवल्या जात आहेत. तिथून पुढे त्या देशभर प्रवास करणार आहेत.

केन पेमेंट घेऊन मुरार पाटील मिशीवर ताव मारत खुशीने गावी परततोय. त्याला तालुक्याला जाऊन भरपूर सामान घ्यायचं आहे. तालुक्यातील प्रत्येक व्यापारी त्याच्यावर खुश असणार आहे कारण तो लागलीच सर्वांचे पेमेंट करून मोकळा होणार आहे.

पहिली शिफ्ट संपवून, रतन भोई म्हाताऱ्या आईला घेऊन जिल्ह्याची गाडी पकडणार आहे. कारखान्यानी दिलेल्या इन्शुरन्सवर तो आपल्या आईचे डोळ्यांचे ऑपरेशन  करू शकणार आहे.

दादू भिल्लाचा ट्रक, ऊसाच्या फेऱ्या मारून थकला आहे. तो पेमेंट झाल्यावर दोन दिवस आपल्याच शेतातील काम आटोपून घेणार आहे. तर इब्राहिम दादानी या सीझनला आपल्या हॉटेल चे रिनोवेशन करण्याचे मनावर घेतले आहे.

या सिझनला प्रत्येकाकडे काहीतरी प्लॅन आहेच. आपल्या पाठीमागच्या असंख्य पिढ्या दारिद्र्यात जगल्यात आणि त्यातच मेल्या. आपण मात्र नशीबवान म्हणून यांच्यातील प्रत्येकजण संपन्न जगण्याचं स्वप्न आता सत्यात उतरत आहे म्हणून, त्या कारखान्याचा भोंग्याला आणि चिमनीतून  निघणाऱ्या धूराला खुशीने आपल्या शरीरावर भस्मासारखे चोळून घेतोय. रोमारोमात साठवून घेतोय.

में... में... करत समोरून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाने मात्र माझी तंद्री घालवली. एका रांगेत चरणाऱ्या त्या मेंढ्या खुशाल कारखान्याचे कुंपण पार करून आतील चारा खाताना दिसू लागल्या.
गेल्या आठवड्यात हा माळरान अत्यंत भकास दिसत होता. आता दोन पाऊस झालेत आणि सर्वत्र हिरवळ दिसायला सुरुवात झालीय.
निर्विकार चेहऱ्याने बँकेचा चौकीदार बसलाय गेटवर शून्यात टक लाऊन...
कारखान्याच्या वस्तीवर आपले कुठेच काही नाही म्हणून तिथेच राहणारी काही बिऱ्हाड...
बरीच मंडळी आता तालुक्यावर दुकानात काम करतात तर बाकीची शेती.

वीस-बावीस वर्षांचं एक कोवळ पोरगं मला तिथे भेटतं. लहानपणापासुन तो याच वस्तीवर वाढला आहे. आपला बाप कधी काळी या कारखान्यात काम करायचा असं सर्व म्हणतात म्हणून तो ही म्हणतो. कारण त्याच्या जन्मापासून कारखान्याच्या चिमनीत त्यानी कधी धूर पाहिलाच नाही. तो जन्मला तसा हा परिसर बंदच!
बाप दीड एकर शेतात राबतो, तालुक्याला आठवडे बाजारात अगरबत्तीची खाट लावतो. मग स्वतःला ' फिटर ' का म्हणवून घेतो हे त्याला अजूनही कळत नाही. शाळेतील मास्तरांनी विचारलं, की तुझा बाप काय करतो? तर तू नेहमी ' फिटर ', असंच उत्तर दे... म्हणून सांगत आलाय त्याला इतकी वर्ष! कलेक्टरपेक्षा कारखान्याचा फिटर जास्त भारी...असं मानणाऱ्या बापाची त्याला गम्मत वाटते.

आता त्या मेंढ्या, हॉटेलच्या जागेवर चरतायत. किंबहुना तिथेच त्या जास्त वेळ रेंगाळलेल्या दिसतात. कदाचित त्याच जागेवर बावीस वर्षांपूर्वी तळल्या जाणाऱ्या इब्राहिम दादाच्या गरम भजीची चव त्यांच्या जिभेला तर जाणवतं नसावी!

...स्वतःशीच केविलवाणे हसत मी पुढें जात रहातो.

शाळेतील पटांगणावर मोकाट कुत्र्यांची कवायत चालू आहे.
गुरुदत्त मंदिराच्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या दिसतात. कुणी येथे येऊन प्रार्थना करूच नये असं त्याला वाटत असावं कदाचित...

वजन काटा, गोडाऊन, पतपेढीचे ऑफिस, चेअरमन, पदाधिकारी बसतात ती इमारत अश्या प्रत्येक ठिकाणी, पिंपळाच्या झाडाची पसरलेली अक्राळविक्राळ मुळं आणि कोळी-कीटकांच्या कित्येक पिढ्या तिथं नांदलेल्याचे भयंकर वास्तव मला नजरेआड करता येत नाही.
नाही म्हणायला, तिथं राहणाऱ्या कामगारांची कौलारू बंगली वजा घरे आणि चटई चाळ सुस्थितीत राहिली आहेत.  वसाहतीच्या सर्व गरजा भागवणारी एक टपरी देखील आहे मधोमध.

सध्या करोनाचा काळ म्हणून माझ्याकडे अविश्वासाने बघणाऱ्या, दोघांकडे मी स्वतःहूनच जातो.
कारखान्याचे ते दिवस, ऊसाचे हंगाम, इलेक्शनची धामधूम, गणपतीचा सोहळा, तिथं होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मेनस्ट्रीम नाटकांचे होणारे प्रयोग, मळीचा वास आणि
' त्या काळी ' असणाऱ्या वैभवाच्या दोन गोष्टी करतो.
त्यांना आणि मला ही माहीत असतं आता याचा काही उपयोग नाही. सर्वच कालबाह्य झालंय. तरीही, म्हणतात ना माणसाला भूतकाळात रमायला आवडतं आणि तो वैभवशाली असेल तर निश्चितच!
शेवटी, जुन्या ओळखी, काही आठवणीं आणि बराचसा निरुत्साह सोबत घेऊन मी त्यांचा निरोप घेतो.

पटांगणावर, मधोमध महाराजांचा छोटा पुतळा मला दिसतो. पण त्या ही पेक्षा त्यांच्या मागे थोडी दूर असलेली  एका जुनाट कार्यालयाची खोली दिसते. कुतूहल म्हणून मी खिडकीत डोकावून बघतो तर आत प्रचंड धूळ, काही फायली आणि वर चित्रात दिसणारी काही गंज लागलेली पुरस्कार रुपी ढाल आणि कप!

साखर नेली, रोजगार नेला, तालुक्याच्या चेहऱ्यावरचा पुरता आनंद नेला, पण, हे पुरस्कार मात्र कुणीही नेले नाहीत. कदाचित, यांची भंगारात देखील जाण्याची किंमत नाही असं ' त्या नेणाऱ्याना ' वाटलं असावं!

मला विंदा करंदीकरांच्या ओळी आठवतात,
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हाथ घ्यावे!

पांझरा कान सहकारी साखर कारखाना हा असाच देणारा काळपुरूष ठरलाय. ज्यानी आपलं सर्वस्व,
' त्या नेणाऱ्याना ' देऊन टाकलंय.
आता बसलाय एकटा समाधी लावून. निश्चल. निर्विकार.

दुसऱ्या महायुद्धानंतर पुरातत्व खात्यांना अनेक कागदपत्रांचे दस्तावेज सापडले. त्यात नेदरलँड्स या देशातील एका कुमारवयीन मुलीची रोजनिशीही होती. तिचं नाव, ' द डायरी ऑफ ॲन फ्रँक'. हिटलरच्या नाझी दहशतवादामुळे दोन वर्ष त्या मुलीला एकाच ठिकाणी लपून रहावं लागलं होतं. त्या काळात ज्यू लोकांचा कसा छळ होत होता या विषयी तिने लिहिलेलं. पुढे जाऊन हे पुस्तक साहित्य विश्वात अजरामर झालं.

इथे, अत्याचार करणारा कुणी ग्लॅमरस हिटलर न्हवता. त्यामुळे त्याला चेहरा न्हवता. अनेक चेहऱ्यांच्या अजगराने मात्र हा कारखाना गिळला. पण त्यांच्या छळाची आणि देशोधडीला लागलेल्या कामगार - शेतकऱ्यांची कुणी डायरी लिहिली नाही आणि लिहिली असती तरी ॲन फ्रँक प्रमाणे ती साहित्यात अजरामर वैगरे झाली नसती याची देखील खात्री आहे. कारण सरकार कुणाचं ही असलं तरी, माझ्या महाराष्ट्राला शेतकरी आणि कामगारांच्या छळवणूकीची सवयच झाली आहे आता!

महाराष्ट्राच्या ग्रामीण ओद्योगिक क्रांतीचे कधी ऑडिट झालेच तरं कृपया या बंद पडलेल्या कारखान्याचे देखील एखादे छोटेखानी का असेना प्रकरण नक्कीच छापा.
त्यात जरूर छापा, शिवाजी राज्याच्या या महाराष्ट्राची आम्ही भरभरून प्रगती केली. अगदी उजाड माळराने फुलवली. मुंबई, पुणे, नागपूर आणि अवघा पश्चिम महाराष्ट्र आम्ही भरभराटीला आणला. जिल्ह्याजिल्ह्यात संस्थानिकांना लाजवतील असे सहकार सम्राट उभे केलेत. पडतीच्या काळात त्यांना पेकेजेस मंजूर करून त्यांच्या  चीमण्यातून धूर काढला. निवडणुका जिंकवून त्यांना या राज्याच्या प्रगतीचे शिलेदार बनवले.

सत्तेचे आणि प्रगतीचे एकाच ठराविक ठिकाणी केंद्रीकरण झाले, म्हण्यापेक्षा प्रगती झाली हे महत्वाचे.
शेवटी मतांचं आणि निवडून आणलेल्या जागांचं काही गणित असतच की नाही?
त्यामुळे, जो भाग राखीव, आवाज नसलेला त्याला कशाला हवी पेकेजेस आणि संधी...

तुमच्या भागासाठी, तुम्ही जगातील कुठलही पाणी वळवून घ्या, आम्ही बोलणार नाही
तुम्ही संस्था काढा, त्यांचे व्यवस्थापक किंवा अध्यक्ष व्हा,
आम्ही बोलणार नाही
तुमच्या चिमण्यातून सोन्याचा धूर निघू दे,
आम्हाला आनंदच आहे.
फक्त एक करा,
आमच्या सारख्या दुर्लक्षित, अतिमागास, उद्योगविरहित तालुक्यातील अश्या असंख्य गंजलेल्या कारखान्यांना, उद्योगधंद्यांना महाराष्ट्रच्या गतवैभवाचे स्मारक तरी घोषित करा किंवा वर्षानुवर्षे गंज लागत सडणारं इथलं लोखंड वितळवून आमच्या शेतकऱ्यांची अवजार तरी बनवून द्या!

दूर राजधानीत बसणाऱ्या आणि एकाच प्रांतांमधून निवडून येणाऱ्या राज्यानों, तुम्हीं आमच्यासाठी इतकं कराच!


(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)