Thursday, 1 August 2019

खूप वर्षानंतर...

अवचित भेट होते... कितीक वर्षानंतर. शाळा सोडून देखिल जवळपास दोन तप उलटलेली असतात. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय एव्हाना. किती तरी बदल झालेत सर्वीच कडे. आपल्यात ही आणि त्यांच्यात देखील.
खूप वर्षांनंतर बघितलं की बदल ठळक जाणवतात.
शाळेत स्लेटी कलरच्या युनिफॉर्म वर लाला रिबीन किंवा पांढरा हेअर बँड घालणाऱ्या त्या सर्व अचानक पोक्त बायका झालेल्या दिसतात तेंव्हा बरंच बदलल्याची जाणिव  होतेच. मम्मा... म्हणत एक लहान पोरग धावत येत नी त्यातील एकीला बिलगत तेंव्हा भानावर आल्यासारखं होत.

किती सुंदर असतं आयुष्य नाही.
बालपण, आईवडील, शाळा, मित्र-मैत्रिणी, मग हळू हळू मोठं होत जाणं...
कॉलेज, नौकरी, लग्न, संसार, आपली मुलं...
किती दूरवर आलोय आपणही.
शाळेत असताना करायचो का हा विचार कधी?
तेंव्हा मोठं होण्याची घाई झालेली असायची. वाटायचं लवकर कॉलेज ला जाऊया, नौकरी करूया, पैसे-नावं कमावूया...
आता वाटतं, पुन्हा लहान होऊया...!

भेटल्या त्यातील ' एक ' वर्गात नेहमीच हुशार. परीक्षेत अव्वल येणार्यांपैकी. माझ्याच गल्लीत राहणारी. पण कधीतरीच बोलणारी.
' दुसरी ' तर सातवीत स्पर्धा परीक्षा पास होऊन परगावी शिकायला गेलेली. केवढं अप्रूप वाटलं होत त्यावेळी तिच्याविषयी...
' तिसरी ' वर्गात कायम अबोल. पण शाळेत अगदी रेगुलर.
' चौथी ' ची तर तऱ्हाच निराळी. नेहमीच टाप टीप कपडे. स्वच्छ कोरे शूज, कलरफुल दफ्तर...!
' पाचवी ' सर्वात उंच, खेळात भाग घेणारी. दूरच्या कॉलनीत राहणारी.

लहानपणी च्या त्या सर्व जणी. कितीतरी वर्षांनी भेटल्या.
आठवणीं मध्ये त्या सर्वांचे शाळेतील हेच रूप फ्रिझ झालेले! त्यामुळे त्यांचं आजच रूप बघून जरा ' परक ' वाटतं होत.
पुन्हा तसा सवांद ही न्हवता कुणाशी.
मधल्या काही वर्षात, त्यातील कुणीतरी गावात कधीतरी दिसलेली. पण त्याला भेट तरी कशी म्हणावी.
त्यातली ' एक ' फक्त भेटलेली पुण्याला शिकत असताना. किती आनंद झाला होता त्यावेळी. आपल्या गावातील, आपल्या शाळेतील मैत्रीण अनोळखी शहरात अवचित भेटताना.

स्वतःला किंवा नेहमी भेटणाऱ्या मित्रांना बघून बदल जाणवत नसतात. कारण ते बदल आपण सतत बघत आलेले असतो. पण जेंव्हा कुणीतरी खूप वर्षांनी भेटतो तेंव्हा जाणवत, खूप काळ लोटलाय गड्या!

खूप कमी वेळ घालवता आला एकत्र. ठरलेली भेट न्हवती ती. अगदी योगायोग. बोलण्यापेक्षा त्यांना बघूनच वाचायचा प्रयत्न करत होतो. खरंतर इतक्या वर्षानंतर भेटल्यावर कुणी कसं मोकळं होईल लगेचच. तेही इतक्या कमी वेळात.

पण, आता ठरवून त्या सर्वांना भेटायचं आहे. तिथे होत्या त्या आणि नव्हत्या त्या सर्व जुन्या मित्र मैत्रिणीशी बोलायचं आहे.आयुष्यात पुढे जात असताना आपल्या प्रमाणे त्यांचेही काही अनुभव असतील ते ऐकायचे आहेत.

शाळेतल्या एकाच गेट मधून एकाच वेळी बाहेर पडलेलो आम्ही सर्व. आपापल्या आयुष्यात कुठे कुठे पोहचलो.
निश्चितच कुणाचीच वाट सोपी नसणार. फुलांसोबत काटे असतील. काही सरळ तर काही आडवाटा असतील... कधी अश्रू तर कधी हास्याचे मळे असतील... ते सर्व सर्व जाणून घ्यायायचं आहे. त्यांच्या अनुभवातून स्वतःला समृध्द करता आल तरं ठीक नाही तर समवयस्क मित्रांसोबत दोन क्षण घालवल्याच समाधान तरी मिळेल याची खात्री आहे.

No comments:

Post a Comment