Wednesday, 24 April 2019

ओंझ कमी करायचं!


ओंझ कमी करायचं! 

एक निर्णय घेतलाय...घरातलं आणि डोक्यातलं जास्तीत जास्त ओंझ कमी करायचं!
दहा वर्षापूर्वी या घरात संसार सुरु केला तेंव्हा खूप मोजक्या वस्तू होत्या. दिवाणखान्यात एक पलंग, छोटा स्टूल त्यावर बहिणी कडून आणलेला जुना पोर्टेबल टी व्ही, आणि काही पुस्तक. किचन मध्ये गैस आणि काही मोजकी भांडी. पण संसार थाटायचा इतका आनंद होता कि या मोजक्या सामानातही खूप समाधान वाटायचं.
मुळात बारावी नंतर घर सोडलं त्याला हि दहा वर्ष झाली होती. ब्याचलर असतांना देखील मोजकच  सामान असायचं जवळ. त्यामुळे, लग्नानंतर पुन्हा ‘घर’ मिळाल्यामुळे उत्साह दांडगा होता. पण गेल्या दहा वर्षात गरजा वाढल्या कि महत्वकांक्षा... माहिती नाही. सामान मात्र वाढतच गेलं!

एक एक करून इतक्या वस्तू आल्या कि पूर्वी सारखं घरात फ्लोर वर लोळून पडण, ब्याट बॉल खेळण , बाल्कनीत पाय मोकळे सोडून पुस्तक वाचत बसण देखील कमी झालं...कारण सर्वीकडे सामानाच सामान!
सोफा, बेड, टी पॉय, बिन ब्याग्ज, कपाट, मुव्हिंग चेअर्स, बुक शेल्फ, एल सी डी टी व्ही, स्टडी टेबल, दिवाण, फ्रीज, ओवन, वॉशिंग मशीन...बाप रे! यादी खूप मोठी झाली, नि घरातील जागा अपुरी!

डोक्याचं देखील तसचं! ज्ञान मिळवण्याची पूर्वी पासून आवड, त्यामुळे वाचन खूप. मिळेल ते आणि हवं असलेल मिळवून वाचायचंच हा आवडीचा भाग. त्यामुळे वृतपत्र, वाचनालय, पुस्तकालय सर्विकडेच रपेट. त्यात कालांतराने इंटरनेट आलं आणि मग विचारायलाच नको.

पण गेल्या काही दिवसांपासून, असं वाटायला लागलं कि, ही खरंच ज्ञाना ची भूक आहे कि अपडेट राहण्याचा अट्टाहास! आणि नुसत्या माहितीला ज्ञान तरी कसे म्हणावे. माहितीचा जणू सर्वीकडून भडीमार. टी व्ही न्यूज कमी कि काय त्यावर वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्ती, अमुक डॉट कॉम, तमुक डिजिटल लाइव पुन्हा फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसऑप, टिकटॉक आणि या सगळ्यावर कडी म्हणजे यु ट्यूब. तुम्ही एक गोष्ट आवडीची बघा तसल्या आणखी दहा, ते तुमच्या समोर हजर करणार. सध्या इलेक्शन चा जोर सर्वीकडे बघायला मिळतोय. कुतूहल म्हणून कन्हैया कुमार च भाषण ऐकायला घ्यावं तर समोर ओवेसी, आंबेडकर, प्रजापती, वरून ग्रोवर, पायाल रोहतगी, विवेक अग्निहोत्री, राज ठाकरे अशी भली मोठी लाईनच समोर येते. मग आपण अपडेट राहण्याच्या नादात यांमागे धावत राहतो आणि हाती मात्र काहीच लागत नाही.

सिनेमा हे आवडीच क्षेत्र. थियेटर मधे जाऊन सिनेमा बघन ही मौज होती. ट्रेलर आवडला की सिनेमा बघायचाच ही उस्पुर्त घडणारी कृती. पण स्वतः ‘फिल्म’ केल्यानंतर मात्र आपण सर्व चित्रपट बघायला हवेत असं वाटायला लागल. पुन्हा सिनेमाचे सर्व प्रमोशन्स, रिव्हीव्ज, बॉक्स ऑफिस, ऑडियंस रियक्शन, राजीव मसंद, अनुपमा चोप्रा हे सगळ आलच!

टी व्ही, सिनेमा कमी की का्य, वेबसिरिज च वार येउन ठेपल Netflix, Amazon Prime, Eros Now, MX Player, Alt Balaji, Voot, Hotstar वरच्या देशी- विदेशी सिरीज... नाही म्हणायला ही खरोखर आवड तर  आहेच पण नकळत हळूहळू त्याचा देखील अतिरेक व्ह्यायला लागला. मजोरंजनापलिकड़े आपल्याला, नविन येणारी प्रत्येक सीरिज माहिती आहे कारण आपण ‘अपडेट’ आहोत असा समज झाला आणि घरा प्रमाणे डोक्यात देखील सामानाची गर्दी झाली.

त्यामुळे उशिरा का होईना, आता ठरवलंय... नसेना का अपडेट, आपण फक्त आपल्या आवडी पुरत नी  क्षमते एव्हडच घायचं. जास्तीचा सोस करायचा नाही. कुणी ‘अड़ानी’ म्हटल तरी चालेल. गेल्या आठवड्या पासून सुरवात देखिल केलीय. पेपर बंद करून टाकला, टी व्ही वर किड्स चानेल्स फक्त ठेवलेत. ट्वीटर, इन्स्टाग्राम डीएक्टिवेट केलेत. यू ट्यूब, फेसबुक App वर नाही तर log in करूनच बघायचं (म्हणजे उठ्सुठ विजिट कमी होईल). नो मोर डॉट कॉम न्यूज. WhatsApp सोडणं जरा कठीण वाटतंय, गरज झालीये ती सध्या, नात्यांची नी कामाचीही त्यामुळे त्याच बघूया पुढे.

बाकी सोफा पासून olx ची सुरवात झालीये. चांगली किमतही मिळाली. बरंचस सामान खास मिनी टेम्पो करून गावी पाठवून दिल. नशीब आई आणि बायको ला देखील निर्णय पटलाय. आता लिहितोय ते मोकळ्या हॉल मध्ये भिंतीला टेकवून. छान वाटतंय. दडपण कमी झाल्यासारखं!

अजूनही बऱ्याच गोष्टींवर काम करायचं आहे. सुरवात तर चांगली झाली...बाकी पुढचं पुढे बघू...       
  


Monday, 22 April 2019

वर्गमित्र प्रविण शिंदे...एक अवलिया


वर्गमित्र प्रविण शिंदे ला भावपूर्ण श्रद्धांजली.

काही लोकांची एक्झिट अचानक होते.
प्रव्या आणि मी पहिले ते चौथी एकाच गल्लीत रहायचो. सुतार गल्ली. एकाच शाळेत जायचो.
बाजारपेठेतील मराठी शाळेत जाताना रस्त्यावर त्या वयात देखील प्रव्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितल्या प्रमाणे आम्हाला काही गोष्टी सांगायचा. मराठीचा निबंध स्वतः विचार करून नाही तर पुस्तकातून उतरून लिहायचा कारण बाईंवर त्यामुळे जास्त ‘इम्प्रेशन’ पडत. गुरुजींच पान टपरीवर जाऊन आणताना पानवाल्याकडून एक्स्ट्रा बडीशोप मागायची, आणि कुणाच्या नकळत आपल्या तोंडात टाकायची किंवा पेपर लिहितांना मोठ-मोठ अंतर ठेऊन लिहायचं म्हणजे उत्तरपत्रिका लगेच भरते वैगरे.
त्याचं सुरवातीपासूनच सगळ वेगळ होत. त्यावेळी ‘चौकटीबाहेरील विचार’ वैगरे प्रकार माहित न्हवते पण आज त्याच्या संबंधी जेंव्हा विचार करतोय तेंव्हा वाटत प्रव्या चौकटी बाहेरचा होता...


प्रव्या अभ्यासात तसा जेमतेम. पण त्या गोष्टीचा त्याला कधी खेद तर सोडा तर जाज्वल्य अभिमान होता. पाचवी ते दहावी पहिल्या  बाकावर बसायचा, अर्थात कोपऱ्यातल्या भिंतीजवळ...! बाजूच्या खिडकीतून बाहेरची ये जा बघता यायची आणि सर्व वर्गावर देखील नजर ठेवता यायची हा हेतू. जुन्या गावातून प्रव्या जेंव्हा कॉलनीत राहायला गेला त्यावेळी स्वारी भयंकर खुश होती. त्यानी स्वताच्या हातानी आपल्या नवीन घराच्या पत्त्याचे ‘व्हिजिटिंग कार्ड्स’ बनवले होते, अक्षर अर्थात.....पण त्याला कोण सांगणार! त्याच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वास होता. लांबून यायचा म्हणून सर्व ग्रुप मध्ये मला वाटत त्याच्याकडे पहिल्यांदा सायकल आली. बापरे... या सायकल वर प्रव्या असला भारी भरायचा. एक चक्कर मारायचा म्हटलं तरी याच्या दहा अटी. हुशार पोरगा असेल तर त्याच्याकडून होमवर्क करून घे. खेळातला असेल तर त्याच्या टीम मध्ये घेण्याची हमी घे आणि एखादा बावळट असेल तर मग विचारू नका...पप्रव्या त्याची अक्षरश: ..... ठेवायचा!


नववी-दहावीतला प्रव्या मौजी होता. मस्तवाल होता. अफलातून होता. टेक्निकल ला त्याचा विषय, ‘कारपेंटरी', पण सरांशी याची दोस्ती त्यामुळे ‘जॉब’ करण असेल किंवा ग्राफिक्स च ‘शीट’ पण याची काम सहज व्हायची. शीट काढतांना हातात पेन्सिल धरली तर याच तोंड सतत उघड...आं करून लिहायचा म्हणून आम्ही चिडवायचो. टेक्निकल च्या वर्गातील याची अतुल सोबतची जुगलबंदी आणि ‘म्हातारी शाम्पू नि आंघोळ करायची’ हि गोष्टी म्हणजे भयंकर गमतीशीर प्रकरण होत. फुटबॉल खेळता यायचा नाही तरी हा टीम मध्ये आघाडीवर कारण कप्तान भूपेश याचा मित्र. मग काय प्रव्या सर्व टीमला शिकवायचा ‘ट्रीपलिंग’ आणि ‘हेडिंग’ कस करायचं...हा भाग वेगळा कि खेळतांना याच्या कडे कधीच बॉल येत नसे...पण, “पास पास पास...”म्हणत, याचाच आवाज सर्वात जास्त!  


मोराण्याला फुटबॉल सामने खेळायला गेलेलो त्यावेळी तर सामना न खेळता हि प्रव्या ‘स्टार’ ठरला. कारण याचे जोक्स आणि कोमेंट्री आणि मग ते बोलताना तो कुणालाच नाही घाबरायचा. त्याच्या भाषेत, घंटा आपल्याला फरक पडत नही! बिनधास्त होता तो.
हायवे ला दुरून सांगायचा येणारी एस टी कुठली आहे ते. वडील एसटी महामंडळात त्यामुळे लहानपणी देखील याचे सर्व ड्रायवर-कंडक्टर ओळखीचे. हा चालत्या बस ला हात द्यायचं, आणि गाडीतील ड्रायवर याला रामराम करायचा...हे बघून आम्हाला ज्याम भारी वाटायचं. अश्यावेळी वर्गातल्या मुली देखील प्र्व्याकडे बघून स्माईल द्यायच्या. मग काय गडी चेकाळायचा, पुन्हा जोक सुरु. वेज-नॉन वेज त्याला बंधन न्हवत कुणाच. गडी निडर होता.

स्त्री आणि पुरुष यांच्यात नात का निर्माण होत आणि ते किती काळ टिकत या विषयी ज्यावेळी तो बोलायचा, वाटायचं यानी त्यात Phd केली आहे कि काय. फुल टू Knowledge..! ‘प्रेम वैगरे गोष्टी त्याला भंपक वाटायच्या. नातं गरजेतून निर्माण होत. मानवी उत्पत्ती हे म्हत्वाच कारण बाकी सगळा टायमपास ह्या स्वताच्या फिलोसोफी पर तो ठाम होता. खरतरं त्याच्या शब्दात मांडलेली फिलोसोफी इथं लिहिता येणार नाही, कारण मग 'सेन्सोर' ची गरज भासेल... पण प्रव्या मात्र त्या वयात देखील इतका ‘पुढचा’ होता हे आज जाणवतंय. भाई ‘बोल्ड’ होता एकदम.


दहावीनंतर मात्र आमचं भेटन खूप कमी झालं. गाव सोडून शिक्षण-नौकरी साठी बाहेर पडलो त्यामुळे फक्त वर्ष दोन वर्षात दिवाळी-आखाजी भेट. प्रव्या त्याच्या आवडीनुसार व्यवसायिक ‘ड्रायवर’ झाला होता. स्वतची गाडी होती. एकदा एका लग्नात भेटला. नवरदेव ची सजवलेली गाडी चालवत होता. म्हटलं प्रव्या मजा आहे तुझी, कितीक नव्या संसाराच्या सुरवातीला तुजा हातभार लागतोय. म्हणाला ...गीरी आहे सगळी. बिनकामाची पैश्याची उधळपट्टी, साला कोर्ट म्यारेज बर, पण जाऊदे आपला गाडी चा धंदा तर होतो म्हणाला. सुरातीपासूनच हा असा, बिनधास्त विचार करणारा.


गेली खूप वर्ष भेट नाही. त्याचा भाऊ गेला मग आई-वडील. हि बातमी कळली पण त्याला खास असं भेटता नाही आल. आणि आज अचानक ग्रुप वर तो गेल्याची बातमी कळली. फोन केले तेंव्हा कळल, आजारी होता म्हणे कधी पासून. 
लिवर, दारू हे सर्व सालं निमित्त असत... काही लोकांच आयुष्यामानच कमी त्यामुळे आयुष्यातील सर्व धडे ते पटापट शिकतात. किती वर्ष जगायचं हे ‘तो’ ठरवतो, पण जेवढे जगलो त्यात काय अनुभव घेतले हे महत्वाच. मला वाटत, प्रव्या कमी वयात जीवनाचे ‘सर्वच’ अनुभव घेऊन एक्झिट झाला.
बिनधास्त, निडर, रोकठोक...मित्रा तू कायम आठवणीत राहशील यार.   


गुरुदत्त मंदिर आणि परिसर, साक्री

गुरुदत्त मंदिर आणि परिसर, साक्री


ऐंशी आणि नव्वद च्या दशकांत साक्रीत बालपण घालवलेल्या प्रत्येकाला हळहळ वाटेल अशी अवस्था आज गुरुदत्त मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची झालेली आहे.

लहानपणी वडिलांचा बोट धरून ताडी बगीचा मार्गे, नदीचा पुल ओलांडून गुरुदत्त मंदिर गाठता येत असे. त्यावेळी गावातील सर्वात दूरवरच ठिकाण म्हणजे हे मंदिर.

वडिलांची जागा मग शाळेतले मित्र आणि त्यांच्या सायकलीनी कधी घेतली जाई कळतं नसे.

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करणे म्हणजे गुरुदत्तच्या मंदिरात जाणे असा एक अर्थ असायचा.

दहावी-बारावी चा निकाल लागला कि आधी गुरुदात्ताला नारळ...

मग आयुष्यात हा सिलसिला अगदी कॉलेज चे अडमिशन, पहिला जॉब ते लग्न या पर्यंत सुरूच राही. त्यावेळी गुरुवारी मोठी आरती व्हायची आणि सोबत गव्हाचा शिरा मिळायचा...

आज दिसत ते गणपती मंदिर किंवा अलीकडचे ‘सोय’ म्हणून आलेले मारुती नव्हते तेंव्हा.

 समर्थांचं केंद्र आणि छोटे पण टुमदार गुरुतत्त मंदिर एवढच...!                               

गावाच्या वेशीवरच ग्राम दैवतच जणू...

रंगपंचमीला गावातील पोर रंगानी माखलेले अंग घेऊन समोरच्या नकट्या बंधाऱ्यावर अंघोळीला जात,

येताना गुरुदत्त मंदिरात साखळीने बांधलेल्या ग्लास नि पोटभर पाणी प्यायचे आणि मार्केट मधल्या शेंगा खाऊन ढेकर द्यायची, हि एक आवडती सवय...


न्यू इंग्लिश स्कूल असेल किंवा आदर्श शाळा, बाई/सर कधीतरी अख्खा वर्ग घेऊन या परिसरात हजेरी लावायचे, सहल कम स्टडी टूर व्हायची...!                                 

वयोमानानुसार प्रत्येकाला या परीसारचे महत्व माहित होते...                         

जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी संद्याकाळी काठी धरत पाय आणि मन मोकळे करण्याचे हक्काचे ठिकाण...                               

बऱ्याच वडिलधाऱ्या मंडळीनी आपल्या मुला-नातवांची लग्न इथेच उभ्याउभी चर्चा करून ठरवलेली...                                     

जावा-जावा नि घरात मोकळ बोलता येत नाही म्हणून गुरवारी इकडचा रस्ता धरलेला...   

कॉलेज ला जाणारे ‘तो’ असेल किंवा ‘ती’ अबोलपणे एकमेकांना इथेच भेटत...

कितीतरी साक्रीकारांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि घंटांचा साक्षीदार हे मंदिर असेल...कितीकांनी आयुष्यात आपण काय मिळवायचे हे या दत्तच्या साक्षीने ठरवले असेल... 

गाव सोडून बाहेरगावी शिकायला निघालेली पोर एसटी च्या खिडकी मधून हळूच दत्ताचा आशीर्वाद मागत असतील...

सासरी निघालेल्या कितीतरी लेकी सुनांनी गाडीतूनच साश्रू नयनांनी या मंदिराचे दर्शन घेतलं असेल... तिच्या आणि त्याच्या चोरून झालेल्या शेवटच्या भेटीला हा परिसर साक्षीदार नसेल कश्यावरून...

गाव सोडून जाताना सर्वात शेवटी दिसत ते हे मंदिर...आणि गावी परत येताना स्वागताला सर्वात आधी येत तेही मंदिरच...

गुरुदत्त मंदिर आणि परिसराची आजची हि अवस्था बघून वाटत कि उद्या हे मंदिरच नसेल तर...

...तर आठवणीत काय ठेवायचं...?





बाबापण निभावताना


बाबापण निभावताना

परवा आमच्या बिल्डींगमध्ये कोणाकडे तरी पाहुणे आले होते, त्या बाई बिल्डिंग मधील मुलांमध्ये छान रमल्या होत्या. आमची स्पृहा पण तिकडे खेळायला जात होती. त्यादिवशी त्या बाईंनी मुलांना कुठलीतरी क्रीम बिस्कीट वाटली. स्पृहा नि त्यांच्याकडून अजून एक जास्तीच बिस्कीट मागून घेतलं, म्हणाली हे माझ्या बाबांचे लहानपणीचे आवडीचे बिस्कीट होते पण त्यांना त्यावेळी दुकानात ते एकच मिळायचं, पूर्ण पुडा न्हवता मिळत, म्हणून मी एक बाबांसाठी नेते...हे ऐकून त्या बाईंना एवढी गंमत वाटली कि त्या . स्पृहा सोबत तीच घर बघायला आल्या. आता त्यांना घर बघायचं होत कि बिस्कीट खाणारे खादाड बाबा हे त्यांच्या नजरेतूनच कळायला आम्हांला फार वेळ नाही लागला.


बायको, मला म्हणाली कि तू मुलीला लहानपणीचे काहीही किस्से सांगतो आणि मग ती ते असे बाहेर सांगते. मी पटकन म्हणालो अग आम्ही फ्रेंडस आहोत, आम्ही एकमेकांत सर्व शेअर करतो, हो कि नाही ग स्पृहा...खरं तर मी हे बायकोला सांगत होतो कि स्वताला. स्पृहा फक्त सहा वर्षाची आहे पण आतापासूनच मी कितीतरी गोष्टी तिच्यासोबत शेअर करू शकतो. एक बाप म्हणून आपल्या चिमुरडी सोबतची मैत्री मी सध्या एन्जॉय करतोय. आपल्याकडे बऱ्याचदा आई आणि मुलगी यांच्या मैत्रीबाबत खूप बोललं जात. मला वाटत तशी मैत्री बाबांसोबत देखील होऊ शकते.

मध्यमवर्गीय कुटुंबात बालपण घालवलेल्या आमची, आमच्या बाबांसोबत मैत्रीच न्हवती असे मी म्हणणार नाही पण वडिलांशी बोलताना, वागतांना नेहमी आदराची भावना असायची लहानपणी.
आज स्पृहा च्या बाबतीत वडील म्हणून तिच्या शाळेचा प्रवेश असेल किंवा क्लास वैगरेंचा निर्णय घेताना मात्र सतत एक प्रकारच दडपण मनावर असत. खासकरून मुंबई सारख्या शहरांत राहत असतांना मुलांच्या बाबतीत असंख्य गोष्टींचा विचार पालकांना करावा लागतो. सांताक्रूझ-बांद्रा सारख्या परिसरात इच्छा असूनही मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेता येत नाही म्हणून कुचंबना होते. मग आहे त्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याद्यापाकाना भेटून इतर विषयांबरोबर मराठी- हिंदी चा आग्रह धरणे असेल किंवा शाळेतून परततांना, बालपणीच्या गोष्टी सांगून आपले गाव, नाती, आपली संस्कृती या सारक्या गोष्टी मुंबईत राहूनही तिच्यात रुजाव्या म्हणून माझ्यासारखा बाबा केविलवाणी धडपड करत असतो. काळ बदलतो आहे, जागतिकीकरण आपल्या जगण्याचा भाग झालेला आहे हे सगळे कळत असूनही कुठेतरी मुलांमध्ये आपली मूळ कायम राहावी म्हणून मन नकळत प्रयत्न करत असते. खरंतर हा लेख लिहितांना ठरवलं होत कि मुली सोबतच्या काही गमतीदार प्रसंगांना शब्दबद्ध करूया जेणेकरून वाचकांना देखील ते वाचायला गंमत यावी, मात्र जेंव्हा प्रत्यक्ष लिहायला बसलो तेंव्हा गंमती ऐवजी काळजीचेच शब्द बाहेर पडतायत...


रोज सकाळी वृतपत्र हातात घेतलं कि नको त्या बातम्या वाचायला मिळतात, आपला संबंध नाही असे म्हणून सोडून द्यायचे ठरवले तरी सोडता येत नाही...कारण त्या दूर परदेशात नाहीत तर आपल्याच शहरात आपल्याच आजूबाजूला घडलेल्या असतात. आणि मग नकळत, स्पृहा बाहेर खेळायला जरी गेली असेल तरी काळजाचा ठोका हलतो. सहा वर्षाची चिमुरडी बिल्डिंग मध्येच आसपास खेळत असेल तरी आई-बाबांना काळजी वाटते...दर पंधरा मिनिटांनी ते तिकडे एकदा तरी डोकावून येतात...
मुलीसोबत असतांना, खेळतांना, फिरताना प्रत्येक क्षण आनंदी असतो पण तिला शाळेत सोडून आल्यानंतर, स्विमिंग क्लास ला ती गेल्यावर आपले डोळे सतत आजूबाजूच्या अस्तित्वावर शंका तर घेत नाही ना असे वाटत असते. स्कूल बसचा ड्रायव्हर, शाळेतील मदतनीस बाई असेल किंवा बिल्डींगचा चौकीदार नकळत मनात शंकेची पाल चुकचुकते. सकाळी कोणाची नजर कशी होती याचा शोध मन घेत असते. मला खात्री आहे असे वाटणारा मी एकटा नाहीये, बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्या नकळत होत असतात. आज मी जेंव्हा हे लिहायला बसलोय तेंव्हा मला देखील नव्यानी या गोष्टी उमजत आहेत. एका लहान मुलीचा बाबा म्हणून आपण किती असुरक्षित आहोत याची जाणीव होते.  


मनात असंख्य प्रश्न येतात, आपल्या लहानपणी छोट्या गावात, जिथे सर्व शेजारी आणि गावातील बहुतेक लोक खूप आपुलकीनी वागायची, मी आणि माझ्या बहिणी खूप मनमोकळे पणाने बाहेर खेळायचो, अगदी खूपच उशीर झाला तर आई बोलवायला येत असे. नाहीतर आम्ही दिवसभर गावभर नुसते उंडारत असायचो. आई बाबांना आमच्याकडे काळजीने चोरून बघताना बघितलेला मला आठवत नाही.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, चुकीची आधुनिकता या सभोवतालचा देखील आपल्या बाबापनावर परिणाम होऊ शकतो याची जाणीव मला आज होत आहे. हि अशी परिस्थिती असेल तर समाज म्हणून आपण विचार करायला हवा.


पुन्हा नव्याने...


गेल्या काही वर्षात लिहिण तस बरंच कमी झालं. 
व्यक्त होण्यासाठी इतर माध्यमात गुंतलो होतो म्हणून असेल किंवा अजून काही कारणे 
पण जे आहे ते मान्य करून आता तरी पुन्हा लिहूया असं ठरवलंय. 
म्हणून पुन्हा हा ब्लॉग प्रपंच...! 

(२२ एप्रिल २०१९)