Thursday, 1 August 2019

खूप वर्षानंतर...

अवचित भेट होते... कितीक वर्षानंतर. शाळा सोडून देखिल जवळपास दोन तप उलटलेली असतात. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय एव्हाना. किती तरी बदल झालेत सर्वीच कडे. आपल्यात ही आणि त्यांच्यात देखील.
खूप वर्षांनंतर बघितलं की बदल ठळक जाणवतात.
शाळेत स्लेटी कलरच्या युनिफॉर्म वर लाला रिबीन किंवा पांढरा हेअर बँड घालणाऱ्या त्या सर्व अचानक पोक्त बायका झालेल्या दिसतात तेंव्हा बरंच बदलल्याची जाणिव  होतेच. मम्मा... म्हणत एक लहान पोरग धावत येत नी त्यातील एकीला बिलगत तेंव्हा भानावर आल्यासारखं होत.

किती सुंदर असतं आयुष्य नाही.
बालपण, आईवडील, शाळा, मित्र-मैत्रिणी, मग हळू हळू मोठं होत जाणं...
कॉलेज, नौकरी, लग्न, संसार, आपली मुलं...
किती दूरवर आलोय आपणही.
शाळेत असताना करायचो का हा विचार कधी?
तेंव्हा मोठं होण्याची घाई झालेली असायची. वाटायचं लवकर कॉलेज ला जाऊया, नौकरी करूया, पैसे-नावं कमावूया...
आता वाटतं, पुन्हा लहान होऊया...!

भेटल्या त्यातील ' एक ' वर्गात नेहमीच हुशार. परीक्षेत अव्वल येणार्यांपैकी. माझ्याच गल्लीत राहणारी. पण कधीतरीच बोलणारी.
' दुसरी ' तर सातवीत स्पर्धा परीक्षा पास होऊन परगावी शिकायला गेलेली. केवढं अप्रूप वाटलं होत त्यावेळी तिच्याविषयी...
' तिसरी ' वर्गात कायम अबोल. पण शाळेत अगदी रेगुलर.
' चौथी ' ची तर तऱ्हाच निराळी. नेहमीच टाप टीप कपडे. स्वच्छ कोरे शूज, कलरफुल दफ्तर...!
' पाचवी ' सर्वात उंच, खेळात भाग घेणारी. दूरच्या कॉलनीत राहणारी.

लहानपणी च्या त्या सर्व जणी. कितीतरी वर्षांनी भेटल्या.
आठवणीं मध्ये त्या सर्वांचे शाळेतील हेच रूप फ्रिझ झालेले! त्यामुळे त्यांचं आजच रूप बघून जरा ' परक ' वाटतं होत.
पुन्हा तसा सवांद ही न्हवता कुणाशी.
मधल्या काही वर्षात, त्यातील कुणीतरी गावात कधीतरी दिसलेली. पण त्याला भेट तरी कशी म्हणावी.
त्यातली ' एक ' फक्त भेटलेली पुण्याला शिकत असताना. किती आनंद झाला होता त्यावेळी. आपल्या गावातील, आपल्या शाळेतील मैत्रीण अनोळखी शहरात अवचित भेटताना.

स्वतःला किंवा नेहमी भेटणाऱ्या मित्रांना बघून बदल जाणवत नसतात. कारण ते बदल आपण सतत बघत आलेले असतो. पण जेंव्हा कुणीतरी खूप वर्षांनी भेटतो तेंव्हा जाणवत, खूप काळ लोटलाय गड्या!

खूप कमी वेळ घालवता आला एकत्र. ठरलेली भेट न्हवती ती. अगदी योगायोग. बोलण्यापेक्षा त्यांना बघूनच वाचायचा प्रयत्न करत होतो. खरंतर इतक्या वर्षानंतर भेटल्यावर कुणी कसं मोकळं होईल लगेचच. तेही इतक्या कमी वेळात.

पण, आता ठरवून त्या सर्वांना भेटायचं आहे. तिथे होत्या त्या आणि नव्हत्या त्या सर्व जुन्या मित्र मैत्रिणीशी बोलायचं आहे.आयुष्यात पुढे जात असताना आपल्या प्रमाणे त्यांचेही काही अनुभव असतील ते ऐकायचे आहेत.

शाळेतल्या एकाच गेट मधून एकाच वेळी बाहेर पडलेलो आम्ही सर्व. आपापल्या आयुष्यात कुठे कुठे पोहचलो.
निश्चितच कुणाचीच वाट सोपी नसणार. फुलांसोबत काटे असतील. काही सरळ तर काही आडवाटा असतील... कधी अश्रू तर कधी हास्याचे मळे असतील... ते सर्व सर्व जाणून घ्यायायचं आहे. त्यांच्या अनुभवातून स्वतःला समृध्द करता आल तरं ठीक नाही तर समवयस्क मित्रांसोबत दोन क्षण घालवल्याच समाधान तरी मिळेल याची खात्री आहे.

प्रवासात भेटलेली ती...

बाहेर जितका जास्त पाऊस पडतो आहे,
तितकाच आत ही...
गेल्या काही महिन्यांपासून खूप गर्मी झालेली,
वातावरणात आणि मनात देखील...

त्यामुळे काल जेंव्हा पाऊस पडायला लागला,
त्याला प्रवासाचे वेध लागले. या शहराच्या गर्दीतून कधी एकदा बाहेर पडून पाऊस अनुभवतो असं झालं.

मुद्दामहून, बस पकडली जेणेकरून, 'ओल्या अनुभवांना' कार ची बंदिस्त चौकट नको.
बस च्या खिडकीतून जशी हवा खेळायला लागली तसे मन ही प्रफुल्लित झाले.

मग एक एक करत मन विचारात गुंतून गेले.
सुरुवात आठवणींनी झाली...
जुन्या पावसाच्या,
भिजण्याच्या,
अंधारल्या वाटेवरच्या
तर कधी,
कसोटीच्या क्षणांच्या.

पण अचानक मन वर्तमानात आले
कारण, बाजूच्या सिट वर ' ती ' येवून बसली.
खरंतर, डिस्टर्ब होण्या सारखं न्हवत तिचं येणं.
रिकामी जागा बघून अलगद स्थिरावली होती ती.

एका क्षणात डोळेही लागले बहुतेक तिचे.
तिच्या कडे बघून त्याला तिचा हेवा वाटला
प्रवासात क्षणात झोप लागते, त्यांना तो नशीबवान समजतो
कारण ठरवूनही त्याला तसे जमत नाहीं.
तिकीट काढतांना मात्र तीला उठावच लागलं...

त्याला वाईट वाटलं, कारण खरंच निवांत झोपली होती ती.
पण तिकिटाच्या निमित्ताने त्याचं संभाषण सुरू झाल
बहुदा, सुरुवात त्यांनीच केलेली.

तसा, तो कमी बोलणारा. मोजक्याच लोकांत मिसळणारा
पण जेंव्हा जेंव्हा प्रवासाला निघतो तेंव्हा आपला स्वभाव बदलू पाहतो.

माहिती नसलेल्या वाटा, अनोळखी लोकं...
नेहमीच नवीन अनुभव घेऊन येतात हा त्याचा अनुभव!
त्यामुळे, अनोळखी अनुभवासाठी तो नेहमीच उत्सुक असतो.

तिच्याकडे बघून त्याला आपल्या सुरवातीच्या जॉब च्या दिवसांची आठवण येत होती.
उत्साह, फ्रेशनेस, आपण करत असलेल्या कामाबद्दल कुतूहल, रूटीन, दगदग...
आणि मग आजच्या सारखं विक एंड ला प्रवास...
तोही आपल्या आवडत्या घरी.
आई-बाबा, भाऊ, आपली खोली, त्यातील आपला कोपरा, ती खिडकी...
आईच्या हातचं जेवण, बाबांनी केलेली विचारपूस, मग संध्याकाळी कुठेतरी मित्रांकडे भटकणं असेल किंवा घरी नुसतंच पडून राहणं... सर्वच ज्याम भारी!

खरंतर, यातील काहीच ती बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातील या कल्पना तो वाचू शकत होता.
माणूस जेंव्हा आपल्या आवडीच्या गोष्टींविषयी बोलू लागतो तेंव्हा त्याचे डोळे एका वेगळ्या पद्धतीने चमकतात.
ती चमक बहुदा त्या नी बघितली असावी.

जॉब, फिल्म्स, क्रिकेट आणि ' ती ' ची अक्टिंग ची आवड
सर्वच मनमोकळे पणानी बोलत होती ती.
तो नुसताच ऐकत होता. अधूनमधून प्रश्णाद्वारे तिला पुन्हा बोलत करत होता. त्यातून अनोळखी पात्राच्या ओठातील अनुभव त्याच्या गाठी येत होते जे त्याला हवे होते.

बाहेर रिमझिम पाऊस, सर्वत्र हिरवळ पसरलेली.
बस आता एका ढाब्यावर थांबलेली. वाफाळलेल्या चहा सोबत दोघांच्याही गप्पा रंगात आलेल्या.
ढाब्यावरच्या गर्दीकडे बघून तिचं वाक्य, जे त्याला ज्याम आवडल...
"एवढ्या पावसात देखील इतकी सर्व लोकं प्रवासाला निघालीत, आणि आपण उगीच घरी बसून पावसाचं टेन्शन घेत असतो."
कित्ती, खरं होत ती च हे म्हणणं...!

ढाब्या नंतर मात्र ती अबोल झाली. कधी कानात हेड फोन तरं कधी मोबाईल वर मेसेज...
ती चा, ' मी टाईम ' सुरू झाला असावा बहुतेक,
म्हणून त्यांनी देखील तिला डिस्टर्ब केलं नाही.
प्रत्येकाची आप आपली स्पेस असते आणि ती त्याला द्यायलाच हवी अश्या मताचा तो होता.

खरंतर, तो स्वतःच्या काही क्रियेटीव्ह कल्पना घेऊन प्रवासाला निघालेला. त्यावर त्याला मोकळ्या वातावरणात विचार करायचा होता. पण त्या ऐवजी नकळत तो तिच्याच विचारात पडला.
कोण कुठली ती, कुणाशी बोलत असेल.
तिच्या त्याला तर नाही ना ती मेसेज करत असेल.
ती चा तो कसा असेल?
की तो नसून दुसरच कुणी असेल... कदाचित मैत्रीण, भाऊ किंवा कलिग...

त्याचा या सर्वांशी खरंतर अजिबात संबंध न्हवता.
दोन तासांपूर्वी त्यांच्यात संभाषण सुरू झालं होत
आणि पुढच्या दोन तासात ते दोघेही आप आपल्या मार्गाला निघून जाणार होते... तरीही...
कसं असतं नाहीं माणसाच, जो वर त्याला एखादी गोष्ट ठाउक नसते तोवर त्याचे अप्रूप त्याला नसते.
पण एकदा जर ओळख झाली तर त्याला कुतूहल निर्माण होत.

तिच्या विषयी कुतूहल असं न्हवत
पण दोघांत छान गप्पा झाल्या होत्या
एरवी अनोळखी लोकांसोबत गप्पा नेहमीच होतात
पण मैत्री होईल असा कनेक्ट नेहमीच निर्माण होईल असं नसत...!

आयुष्य किती सुंदर असतं नाही.
आपण सर्वच या जगात टेंप्ररी असतो. तरीही आपण नाते बनवतो, ते निभवतो. आपल्या माणसंच जग निर्माण करतो. कधी त्यात हेवेदावे असतात तर कधी प्रेम.
कधी नाती असतात तर कधी निखळ मैत्री.

त्या अनोळखी मैत्रिणीला तिच्या जगात खुश राहण्याच्या शुभेच्छा देत तूर्तास तरी त्यांनी ती चा विचार सोडून नवीन प्रवासाकडे आपले लक्ष केंद्रित केले होते...
यावेळी, एक क्युट आज्जी त्याच्या बाजूच्या सिट वर होत्या. त्या ही तिच्या सारख्याच खूप बोलक्या होत्या.

आत्ता, आज्जींचा डोळा लागला म्हणून, त्यांनी मागच्या प्रवासातील ' ती ' च्या आठवणी शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला एवढंच...!

ती गावी जाते तेंव्हा...

तिला गावी जायचे म्हणून गेल्या आठवड्या पासून तयारी चालली होती.
तारीख एकदा ठरली की ती कुणाचच ऐकत नाही.
शुगर टेस्ट.. डॉक्टर.. दोन महिने पुरतील तेवढी औषधे...
डोळे तपासणी.. नवीन चष्मानव्या चप्पलशूज...
असं एक एक करून टू डू लिस्ट पूर्ण करण्याची धडपड चालेली तिची.

पुन्हा इथल्या घरातील आवरसावर...
स्वतःच बेड शीट, पांघरायची चादर, टॉवेल.. धुवून घडी करून कपाटात ठेव,
तर कधी, नागलीच पीठ उरलय त्यात अजून एकदाआंधन घालता येईल याच्या सूचना दे.
सोबत तीळीची चटणी कुठे ठेवली आहेउपमाकरण्यासाठी रवा भाजून कुठे ठेवला ते सांग,
किंवा सरबत-लस्सी करायची तर पिठी साखर दळून कुठल्या डब्यात भरली आहे,
मुंग्या लागतात म्हणून शेंगदाणे फ्रीज मध्ये कोणत्या कोपऱ्यात ठेवलेत याच्या सारख्या सूचना...

लोणचे संपत आले म्हणून गेल्या आठवड्यापासून हिचीसारखी बडबड...
मोहरी पडलीय घरात, फक्तं टेरेस वर जाऊन चार कैऱ्या तरी तोडून आण..”, म्हणून मागे लागलेली.. खरं तरं, ती लोणचं खातच नाही पण मला मात्र लोणच्याशिवाय भागत नाही म्हणून तिची ही धडपड...!

एक ना हजार गोष्टी तिच्या डोक्यात चालेल्या...साक्रीला जाण्याआधीच शेजारी फोन करून कामवाल्या बाईला निरोप देणे.. मग, नेमकी ती कामाला येते त्याच वेळी तिला शेजाऱ्यांच्या फोनवर गाठून, गोडी गुलाबीने कामावर येण्यासाठी पटवणे.
गेल्या चार महिन्यात साक्रीत कुणा कुणाकडे ‘दारावर-बारावर’, जायचे आहे याची यादी बनव. कुणाच्या हळदीला, बारश्याला कुठली साडी किंवा गिफ्ट देता येईल याचा हिशेब ही इथूनच करून ठेवलाय तिने...

आज ती गावाला जाणार म्हणूनकोपऱ्यात तिची बॅग भरून ठेवलेली...
सामान मावत नाही म्हणून मदत करायला गेलो तर नकार देत स्वतःच चेन लावायचा प्रयत्न करत होती... मगं मीच बळजबरीने सर्व सामान बाहेर काढलं आणि पुन्हा नव्याने बॅग भरायला घेतली... तर त्यात हा मोठाऐवज...!

बिना आल्याचा चहा तिला घोटवत नाही (ऐनवेळी तिकडे आणून द्यायला कुणी नाही) म्हणून आल्याचा छोटा तुकडा...
ओवा-शोपा ची छोटी डबीहिरवी मिर्ची,
कुलदेवीला जाताना नेता येतील म्हणून दोन नारळ,
होळी-पाड्व्या पासून खास आखाजी साठी जपून ठेवलेले साखरेचे हार कंगण..
कामवालीला आणि इतरांना वाटता येतील अश्या कापडी पिशव्या..
देव्हाऱ्यातील वातींसाठी, दुधाची साय साठऊन तयार केलेले तूप..
संगु दीदी ला तिचा किचन ओटा धुवायला कामी येईल म्हणून छोटा ब्रश (लाखांत टर्न ओवर असलेल्या कंपनीची मालकी असलेली मुलगी !)
...पण तुम्ही तिला म्हणूच शकता नाहीत, कि हे तिकडे देखील मिळू शकते...
तीच उत्तर ठरलेलं असत...
मिळायला काय सर्वीकडे सर्व मिळत, पण आणायची आठवण कोण ठेवणार...
खरंय तीच...आठवण ठेऊन एखादी गोष्ट जपून ठेवायला आईचच काळीज असायला हवं !      

तिच्या सर्वात जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे दर मंगळवारी घरी भरणारे स्वाध्याय केंद्र. पण गेल्या काही महिन्यांपासून तिला ते अस्वस्थ करत होते. मुंबईला आली तरी साक्रीला स्वाध्याय केंद्र चालावे म्हणून तिची धडपड...मंगळवारी दिवसभर ती संध्याकाळी भारती माई च्या फोन ची वाट बघत असते. आज केंद्र भरले होते का, किती बायका आल्या होत्या हे ऐकण्यास तिचे कान आतुर झालेले असतात...या वेळी जातांना ती मनाशी कसली तरी तयारी करत असावी असं वाटलं...कदाचित स्वाध्याय केंद्र बंद होणे कसे टाळता येईल याबद्दल विचार करत असावी...

कसं असत नाही माणसाच, जे दूर आहे, त्याची सतत ओढ असते आणि जवळ आहे ते देखिल सोडवत नाही. एकीकडे जिथं तिचा जन्म गेला ते गावं, जिथे जोडीदारा सोबत संसार केला आणि खूप अपेक्षेने बांधले ते घर...
तर दुसरीकडे शहरात राहवत नाही तरी मुलगा-सून आणि नातीची असलेली ओढ.
आयुष्य असं विभागल गेलंय तीच. पण तिची तक्रार नसते कधीच, जिथे असेल तिथे समाधानी.

पूर्वी शिक्षणासाठी घर सोडलं तेंव्हा आई-दादा घरून निघताना हजार सूचना द्यायचे. पोहचला कि नाही याकडे त्याचं लक्ष लागून राहायचं आणि मी मात्र बिनधास्त.
पण आता उलट झालय, असं वाटतं. वयस्कर आईला आरामदायी बस मध्ये बसवल तरी खिडकी बाहेरून हात हलवताना जीव कासावीस होतो, सतत तिला सूचना देत राहतो...
पोहोचली तरी तिकडे एकटी कशी राहील याचच मन काळजी करत राहत...
पण गेल्या काही वर्षात एक अनुभव आलाय, वेळ सर्व काही शिकवते माणसाला.
आईला एकट जगायलाही...आणि
आपल्याला तिच्याशिवाय राहायलाही...!