Saturday, 5 September 2020

जगणं समजून घेतांना १

#जगणं समजून घेतांना

नाव: गोदू सीताराम बोरसे

व्यवसाय: मेंढपाळ

पाऊस सुरू होऊन महिना झाला आता. कमी-अधिक प्रमाणात तो सर्वीकडे पडतोय, बऱ्यापैकी हिरवळ झाली आहे. तुम्ही बाहेर पडलात आणि आजूबाजूला बघितलं तर अनेक डोंगररांगा, माळरानं हिरवीगार झालेली दिसतील. त्यातील एक हमखास दृश्य म्हणजे त्या उंच डोंगरावर चरणाऱ्या शेळ्या, मेंढ्यांचा मोठाच मोठा कळप आणि त्यांच्या मागे हातात काठी घेऊन एखाद्या दगडावर बसलेला मेंढपाळ.

आपल्याला नेहमीच तो दुरून बघण्याची सवय. फार फार तर कधी हायवेला नाहीतर गावाकडच्या एखाद्या वाटेवर मध्येच हा कळप आडवा जातांना दिसतो. बंदिस्त कारमध्ये बसून मग जोरात हॉर्न वाजवला जातो. बाईक असेल तर हॉर्न सोबत एक्सलेटर ही पिळल जातं, जेणेकरून त्या आवाजाने घाबरून, झटक्यात त्या मेंढरारांनी आपल्याला वाट द्यावी, इतकंच त्यांचं अस्तित्व असतं आपल्यासाठी. 

परवा अश्याच एका डोंगरावर भटकताना या गोदू मेंढपाळाची भेट झाली आणि मग काही काळ गप्पा. तसं, या लोकांना बोलतं करणं महाकठीण. पण गोदू बराच बोलका वाटला. कदाचित दुपारच्या टळटळीत उन्हात निर्मनुष्य डोंगरावर त्या मेंढरांच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त अजूनही कुणी आहे ही भावना त्याच्यासाठी सुखावणारी असेल. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून तरी तसं वाटलं. पन्नाशीकडे झुकणार वय. खुरटी दाढी. डोक्यावर लाल पटका. गोदू म्हणाला गेली पंचवीस-तीस वर्ष तो हे काम करतोय. जवळपास शंभर च्या आसपास मेंढर. त्यांना दररोज असं माळरानावर न्यायचं. ही जनावरं हुशार असतात. कळपात राहतात. शिस्तीत चरतात. एखादं दुसरं असतं आगाऊ म्हणून लक्ष द्यावं लागतं इतकच. गोदू च्या म्हण्याप्रमाने शेळी आणि मेंढी एकत्र फार खुशीन राहत नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे, फक्त मेंढरच आहेत. 

आम्ही बसलो होतो तिथून बरोबर समोरच्या डोंगरावर ती मेंढर चरत होती आणि गोदू इतक्या दुरून त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता. माझ्या मनात विचार आला, ही माणसं असं एकटं बसून दिवसभर काय विचार करत असतील. त्यांच्या मनातही भविष्याची स्वप्न असतील का? येणाऱ्या काळासाठी ते देखील आपल्याच सारखी तजवीज करण्यासाठी धडपडत असतील का? कधी नैराश्य त्यांच्या वाटी आलं तर ते त्याचा सामना कसा करत असतील? शहरात- गावात घर बांधून राहणाऱ्या सुरक्षित- सुशिक्षित समाजाबद्दल त्यांच्या मनात सुप्त असूया असेल का? त्यांच्या कळपासमोरून भरगाव वेगाने जाणाऱ्या तरुणांच्या मोटारसायकल बघून त्यांच्या मुलांना काय वाटतं असेल?

गोदू म्हणाला, पावसाळ्याची चार पाच महिने बरी जातात. चारा भरपूर मिळतो. पण त्या नंतर मात्र भटकंती सुरू होते. वाट मिळेल तीकडे. दूर च्या प्रांतात. कधी गुजरातच्या सोनगड, व्यारा, सुरत च्या दिशेनी तर कधी मध्य प्रदेशातील खेतिया, देवास, खंडवाकडे. नाहीतर महाराष्ट्रातीलच जवळपासच्या जिल्ह्यात. सोबत त्यांच्या प्रमाणेच एक किंवा दोन कुटुंब. कधी बैलगाडी कधी पायी, सोबत चालती मेंढर. सहा सात महिन्यात ती मोठी होतात. मग त्यातीलच काही विकली जातात तर काही नवीन जन्माला येत राहतात. त्यामुळे कळपाची संख्या मेन्टेन रहाते. 

गेलं वर्ष मात्र खूप कठीण होतं म्हणाला, कुठला तरी आजार आला आणि अनेक मेंढर अचानक तोंडात फेस येऊन जागीच मरायला लागली. खंडीभर (वीस) मेंढरात तीन-चार रोज मरायची म्हणाला. काही कळपात तर सकाळी मेंढरांना घेऊन जाणारा मेंढपाळ संध्याकाळी फक्त हातात काठी आणि डोळ्यात पाणी घेऊन परतायचा. 

शासनाकडून काही अनुदान किंवा भरपाई मिळते का विचारले तर गडी हिरमुसला. म्हणाला काहीतरी योजनाबिजना आहेत पण आम्हाला त्या फार समजत नाही. मेडिकल स्टोअर्स मध्ये औषध मिळतात ती यांना देतो. कधीतरी गावात व्हेटर्नरी डॉक्टर येतो. त्याची मदत मिळते पण बराच काळ तर आम्हीं परक्या मुलुखात हिंडत असतो. 

एखादा शेतकरी शेतात मेंढी बसवण्याचे दिवसा प्रमाणे पैसे देतो. आठ नऊ दिवस मग आम्ही त्या एकाच ठिकाणी पाल ठोकून राहतो. शेतकऱ्याला खत मिळतं, आम्हाला जागा आणि मिठमिरचीला पैसा. उन्हाळ्यात मात्र कांदा, मका सारखी पिकं काढून झाल्यावर उरलेला पाला पाचोळा खाण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा द्यावा लागतो.

माळरानावर पाल ठोकून राहताना भीती वाटत नाही का? या माझ्या प्रश्नावर मात्र त्याला हसू आलं. 

अनेक वर्ष आम्ही असेच जगतो. चोरण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही, त्यामुळे चोराबिरांची भीती वाटतं नाही. फक्त कधी कुठे बिबट्या किंवा इतर जंगली जनावर आले की काळजी घ्यावी लागते. रात्री आम्ही आलटून पालटून जागतो, झोपतो. 

बऱ्याचदा एखाद्या शेतात चुकून मेंढर घुसली तर शिव्या खाव्या लागतात, प्रसंगी मारही बसतो. पण आम्ही कधीच काही बोलत नाही. बोलून आपलंच नुकसान होतं, आपण परक्या मुलखात असतो म्हणून गुमान ऐकून घ्यावं लागतं.

आमची मुलं या मेंढरात वाढतात त्यांच्यातीलच एक होऊन जातात. त्यांना जीव लावतात. जमलंच तर शाळेत जातात नाहीतर दिवसभर या कळपामागे. वर्षाकाठी शंभर मेंढी असलेला मेंढपाळ दीड ते दोन लाख रुपये कमावतो. त्यात त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 

...................

...................

इथून पुढे, त्या मेंढपाळाचे जगणे, त्याचे उत्पन्न, त्याचे तुमच्या जीवनाशी, तुमच्या पगाराशी तुलना...मग तुमचं सुंदर जीवन, समाधान वगैरे गोष्टी मी इथं लिहीत नाही कारण त्या व्हाट्सअप विद्यापीठात आपण रोजचं वाचत असतो आणि तरीही आपल्याला हवं तसंच जगत असतो. त्यामुळे ते लिहिण्याला आता अर्थ नाही!

आपल्याकडे, ' जिप्सी ' या नावानी खूप साऱ्या कविता, ललित लिहिलं जातं. तिथे त्या साहित्यिकांना जिप्सी या शब्दाचा ' भटक्या ' हा अर्थ अभिप्रेत असतो.

या जिप्सी चा मात्र सध्या ट्रेंड आहे. आपल्या प्रोफाईल वर तो ऍड करून ग्लॅमर वाढवता येतं, असा समज!

एखादा अनेक नोकऱ्या बदलत असतो म्हणून स्वतःला जिप्सी म्हणतो तरं दुसरा वेगवेगळ्या गावातील त्याच्या रहिवासाला. एखादा कॉर्पोरेट क्षेत्रातील बिगी देखिल आपल्या नेहमीच्या फॉरेन टूर्स मुळे ट्विटर हॅण्डल वर स्वतःला 'कॉर्पोरेट जिप्सी', म्हणून डिफाइन करतो, तर एखादा ' हरले ' किंवा ' एनफिल्ड ' वाला हौशी एलिट प्रवासवीर (मराठीत कुल ट्रॅव्हलर) इंस्टा वर स्वतःला जिप्सी म्हणवून घेतो. 

त्यावेळी, वाटतं वर्षातील सहा सात महिने आपल्या लेकराबाळांना घेऊन मेंढरांचा कळप आणि त्याला सांभाळणारा तो 'रियल जिप्सी मेंढपाळ'  उन्हातानात, वाऱ्या-पावसात, डोंगर दऱ्यात जेंव्हा फिरत असेल, त्याला जसं हे जगणं जाणवत असेल. ते खरोखरच सोशल मीडिया च्या जिप्सी प्रोफाईल इतकं कुल असेल का? ग्लॅमरस असेल का?

#जगणं समजून घेतांना

( ' गंध ' ही भूतकाळातील अनुभवांवर आधारित 'नॉस्टॅल्जिक सिरीज', आणि 

'कातरवेळ चा कोलाहल की कल्ला' ही सभोवतालच्या जागा, परिस्थिती, घटनांवर आधारित लेखमाला लिहितोच आहे.

सोबत, ' जगणं समजून घेतांना' ही मला भेटलेल्या, भेटत राहणाऱ्या, आडवाटेवरच्या माणसांची गोष्ट ही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातील हा पहिला लेख)


सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे

सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे

हल्ली वाचकांना, प्रेक्षकांना अगदी झपाटून टाकेल असं साहित्य किंवा सिनेमा फार कमी प्रमाणात येतात या विषयी खूप बोलले जातं. काही प्रमाणात ते खरं हि असावं. पण अपवाद असतातच.

मी नुकतीच रंगनाथ पठारे यांची वर्षभरापूर्वी पब्लिश झालेली, जवळपास आठशे पानांची , ' सातपाटील कुलवृत्तान्त ' ही महाकादंबरी नुकतीच वाचून संपवली आहे. अजूनही माझ्या डोक्यात त्या कादंबरीतील पात्रे कोलाहल माजवतायात. गेला आठवडाभर हे सतत होत आहे. या सात दिवसात कादंबरी वाचनाशिवाय मी दुसरे काहीही करू शकलो नाहीये!

इतकी गुंतवणूक ठेवणारी लेखनशैली, गेल्या सातशे वर्षांच्या इतिहासाची जोड देत, काही संशोधनातून तर काही लेखकाच्या प्रतिभेतून निर्माण झालेली पात्रे आपल्या समोर येतात आणि आपण त्यात अगदी वाहत जातो.

हे असं फार क्वचित माझ्या सोबत होतं. ब्रेकिंग बॅड किंवा हाऊस ऑफ कार्ड्स या सारख्या सिरीज बघतांना. किंवा वॉर अँड पिस ही लिओ टॉलस्टॉय ची महाकादंबरी वाचतांना,  भालचंद्र नेमाडेचीं हिंदू, श्री ना पेंडसे यांची तुंबाडचे खोत वाचतांना पूर्वी असं झालेलं मला आठवत.

सातपाटील कुलवृत्तांत ही देखील याच कुळीची कादंबरी मला वाटते. 

मराठी वाचकांना कादंबरी म्हणजे, श्रीमान योगी, छावा, महानायक, पानिपत, ययाती इत्यादी वीस तीस वर्ष जुन्या कलाकृतींची नेहमी आठवण येत असते. या सर्व निश्चितच त्या त्या काळातील महान कलाकृती. पण मराठी वाचक बऱ्यापैकी त्याच त्या काळात आणि वाचनात अडकून गेलेला दिसतो. त्यामुळे आजही भरपूर नवीन लिहिलं जातंय याकडे त्याच जरा दुर्लक्षच होत असं खेदाने म्हणावं लागतं.

त्या दृष्टीने सातपाटील कुलवृत्तांत ही काही महिन्यांपूर्वी आलेली दीर्घ कादंबरी महत्वाची आहे.

_____________________________________________

पुस्तकाच्या पाठीमागे छापलेला गोषवारा इथं देतोय:-

या कादंबरीचा गर्भित लेखक हा मराठीतला आजचा एक महत्त्वाचा लेखक आहे. कोणी कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे आपल्या हाती काहीच असत नाही. हा लेखक मराठा जातीत जन्मलेला आहे. आपण कोण, कुठले, आपले पूर्वज कुठून आले, याचे कुतूहल सर्वांना असतेच. तसे ते या गर्भित लेखकालाही आहे. तसा शोध घेत काळात तो सातशे वर्षे मागे जातो. अशा अनेक टप्प्यांवर शोध घेताना तो जाती, धर्म, मानवी नाती आणि मानवी समुहांचे एकमेकात मिसळणे अनुभवतो. बौद्धिक पातळीवर तो हजारो वर्षे मागे जातो. तो आपले मराठा असणे याचा व्यापक अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. ते पुन्हा त्याच्या विश्वभानाच्या उजेडात तपासतो आणि मांडतो. आपल्या कुळाचा शोध घेण्याच्या प्रयत्नाने सुरू झालेली ही गोष्ट एका माणसाची, त्याच्या कुळाची न उरता एकूण मानवी आत्मभानाच्या प्रकाशाची गोष्ट होऊन जाते. हे सारे एका विस्तीर्ण पटलावर एका बृहद् कहाणीच्या रूपात या कादंबरीतून प्रकट होते.

_____________________________________________

आपली मराठी भाषा आणि संस्कृती किती महान आणि अनेक भाषांना, संस्कृतींना जन्म देणारी आहे हे उदाहरणासह लेखक आपल्याला पटवून देतो. त्यासाठी लेखकाने केलेले दीर्घ संशोधन आणि अभ्यास आपल्या लक्षात येईल. 

आज जिथं तीन तासांचा सिनेमा दोन ते दीड तासांवर आलाय, कादंबरी अडीचशे-तीनशे पानात संपते. वृत्तपत्रातील ललित कॉलम्स देखील छोटे झालेत. दीर्घकथा लघु झाल्यात, लघुकथा तर इतक्या आकुंचन पावल्यात की त्यांना मायक्रो किंवा टाइनी कथा का म्हणू नये हा प्रश्न पडतो. या सर्वांमागे प्रमुख कारण सांगितलं जातं ते आजच्या वाचकाचं आणि प्रेक्षकाचं क्षणात ' डायव्हर्ट ' होणं कारण मनोरंजनाची अनेक साधन मोबाईल- इंटरनेटमुळे त्याच्या बोटाच्या टीप वर आहेत आणि तो क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट होऊ शकतो ही चॉईस त्याला नवीन तंत्रज्ञानामुळे मिळाली आहे. 

अश्या वातावरणात, आपल्या पूर्वजांचा शोध घेत जाणारी, आठशे पानांची महाकादंबरी, स्वतः च्या लिखाणावर सतत कन्विक्षण ठेवून लिहिणे, त्यासाठी अनेक वर्षे खर्ची घालणं, आणि ती वाचतांना आपल्या लेखन शैली नी वाचकांना अगदी खिळवून ठेवणं, हे सोपं काम नाही. त्यासाठी लिखाणाची असाधारण प्रतिभा लेखकाच्या अंगी असावी लागते. रंगनाथ पठारे यांच्या या नव्या कलाकृतीला सलाम. 



श्रावणाचा नॉस्टाल्जिक महिना, देऊळ, श्रद्धा आणि माझा सिनेमास्कोप धर्म

 

श्रावणाचा नॉस्टाल्जिक महिना, देऊळ, श्रद्धा आणि माझा सिनेमास्कोप धर्म

आमच्या क्षेत्रात, कॅमेर्‍यातून शूट करतांना आम्ही,
' सिनेमास्कोप ' नावाचं एक तंत्र वापरत असतो. ज्यात वर आणि खाली एक काळी पट्टी असते आणि मध्ये उरलेल्या भागात, आपल्याला हवं ते दृश्य चित्रित करायचं असतं.
मी, ही वर आणि खाली असलेली काळी पट्टी माझ्या रियल जगण्यात सुद्धा जोडून घेतली आहे. त्यामुळे वरखाली असणाऱ्या त्या काळ्या स्ट्रीप मध्ये मला नको असलेले दृश्य लपवून देतो आणि फक्त हवं तेवढंच, मनाला पटणारे, भावणारे, तितकंच बघतो.

सध्या धर्म, श्रद्धा आणि अध्यात्म म्हटलं की या सिनेमास्कोप ची फार गरज जाणवते. त्या वरच्या आणि खालची काळ्या स्ट्रिप चा आकार मात्र दिवसेंदिवस मोठा होतं चालला आहे!

सोशल मीडियाच्या जगात तर, तत्त्वज्ञानाचं एक नवीन पर्व निर्माण झालं आहे. ज्यात अनेक संशोधनवीर, साहित्यिक, धर्मपंडित आपापले रिसर्च पेपर्स लेखाच्या माध्यमातून जोमाने जगासमोर मांडत असतात. त्यांचा सॅम्पल साईज किती किंवा रिसर्च साठी त्यांनी कुठली पद्धत अवलंबली आहे याबद्दल माहिती नाही पण त्यांच्या आग्रही लिखाणाबाबत मात्र कमाल वाटते.

सध्या पूर्वीचं सर्वच नाकारायच किंवा त्यावर सतत शंका घेत राहायची हा ट्रेण्ड आहे आणि त्यात धर्म तर सर्वात आघाडीवर. ज्याला जमेल तसा तो त्याचा अर्थ काढून मोकळा होतोय. तुझा ' बाबा ' (अध्यात्मिक गुरू) मोठा की माझा चमत्कारी यावर, देखील चढाओढ दिसते.

गेली अनेक वर्षे, मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणून  पाडव्याला उभारत आलेली गुढी उभारायची नाही... त्याच्या मागचं शास्त्रीय कारण विसरून कुठल्यातरी नवीन मांडलेल्या थेअरी ला खरं मानायच...कुणी म्हणालं, सत्यनारायण पूजा करायची नाही कारण ब्राम्हण ती कधीच करत नाहीत...

सर्वांसमक्ष, मंदिरात जायचे नाही गेलात तरं तुम्ही कट्टर वाटाल...कुठल्याही व्हॉट्स ऍप ग्रुप वर श्री राम म्हणायचं नाहीं की जय माता दी लिहायचं नाही... त्यांनी तुमच्या सेक्युलर असण्यावर शंका घेतली जाईल...

रस्त्यावर कुणी ओळखीचं भेटलं की पारंपरिक पद्धतीने म्हणत आलेलो रामराम म्हणायचं नाही तर फक्त नमस्कार म्हणायचं...
आता तर प्रत्येक धर्मानेच नाहीतर जातींनी, त्यातल्या पोटजातींनी, आपापली नवीन शब्दमाला तयार केली आहे. ज्यात जशा घोषणा आहेत तशा प्रत्येकाचे वेगवेगळे झेंडे आहेत त्यांचे रंग आहेत. अहो, फोन रिसिव्ह करतांना
' हॅलो ' ऐवजी कुठला शब्द उच्चारायचा हे देखील ठरलेलं आहे!

एखादी पूजा फक्त त्यासाठी नाकारायची, कारण ती सांगणारा म्हणे स्वतः आपल्या घरी तसली पूजा कधीच करत नाही. बरं, नसेल करत. त्या कथेचा कुठलाही सिग्निफिकँस नसेल, हे ही मान्य.
पण ती पूजा होतं असताना घरात निर्माण झालेली प्रसन्नता विसरून कसं चालेल?

आरती नसेल पाठ. स्त्रोत्र ही नसतील माहीत. पण इतरांनी ते म्हणताना मला ते कानात काठोकाठ साठवून घ्यावे असे वाटत असेल तर? त्या वाटण्याला काय म्हणावं? आणि लहानपणापासून जे करत आलो आहे, त्याच काय करायचं? गोंधळ होतोय का? मुद्दामहून तो वाढवला जातोय का? तुम्हीं एकदाचं काय ठरवून टाका बाबांनो...!

आपण जन्म घेतो, तिथून पुढे ज्या समाजात, गावात वाढतो तेथील जिवन पद्धती, अभ्यासक्रमातील संकल्पना, भेटणारी माणसं, ठिकाणं, जागा... नकळत आपला पिंड घडवत असतात. त्यालाच तर आपण ' संस्कार ' म्हणतो. जे संस्कार वर्षानुवर्ष स्वीकारले जातात, टिकतात त्याला
' संस्कृती ' म्हणतो आणि रोजच्या जगण्यात आणि आपल्या कामात ऊर्जा देणाऱ्या श्रध्देला ' धर्म ' म्हणतो. हिचं तर व्याख्या आहे. अजून वेगळं काय असणार आहे?

गेल्या काही वर्षात कामाच्या व्यापात श्रावणाचा महिना तसा कळायचा देखील नाही. मुंबईतील धावपळीच्या जगण्यात नाही म्हटलं तरी लिमिटेशन्स येतंच.

लहानपणी मात्र हा काळ खास वाटायचा. शाळा सुरू होऊन महिना झालेला असायचा. नवीन वर्गात, मित्र जुनेच असले तरी प्रत्येक विषयाचे शिक्षक वेगवेगळे. बसण्याच्या जागा वेगवेगळया. नवीन वह्या पुस्तकांचा गंध, शाळेतून घरी परततांना श्रावणाच्या भुरभुर पावसात भिजताना, रस्त्यावरच्या डबक्यातील पाणी एकमेकांवर उडवत चालतांना, जगाची फिकीर नसायची. कुणी आपल्याला बघत तरं नाही ना? असं मुर्खासारखे दंगा मस्ती करत रस्त्यावर चालतांना कुणी आपल्याला नावं तरं ठेवत नसतील ना? असे प्रश्न कधी पडत नसत. अज्ञानात सुख म्हणण्यापेक्षा, निरागसतेच समाधानी जगणं होतं ते!

जसा वागण्यात मोकळेपणा होता तसाच स्वतः च्या श्रद्धा जपण्यात देखील स्वातंत्र्य होते. जग काय म्हणेल याची फिकीर नव्हती.

लहानपणी घरी सत्यनारायण पूजा असली की सकाळ पासून लगबग असायची. केळीची पाने, नारळ, झेंडूची फुलमाळ, सुटी फुले, दुर्वा, कापूर, अबीर यांची जमावाजमव.
माळ्यावर पडलेले बाजोट ( चौरंग ) शोधले जायचे, लाल कापडात गुंडाळून ठेवलेली सत्यनारायणाची फोटो फ्रेम काळजीपूर्वक बाहेर काढली जायची.
भटजी येण्याआधी जमेल तसा सर्व सामान आम्ही ठरलेल्या जागेत गोळा करून ठेवायचो. तरीही महाराज आले की अमुक आणा किंवा तमुक काही राहिले वैगरे सूचना करायचे. मग तेवढ्या पुरता गडबड व्हायची. शेवटी सर्व मिळाले की पूजा पार पडायची. भटजी कथा सांगायचे त्याकडे फार लक्ष नसायचं. पूजा संपल्यानंतर मिळणारा शिऱ्याचा प्रसाद, केळी वैगरे टाकून बनवलेले पंचामृत, यांवरच आमचं लक्ष असायचं!
घरभर पसरलेला उदबत्तीचा दरवळ, कापूरचा गंध... सगळं कसं प्रसन्न वाटायचं. नेहमीपेक्षा तो दिवस वेगळा वाटायचा.

पुढे कुणाकडे वास्तू पूजा असेल किंवा कसलीतरी शांती, हवन... त्यावेळी देखील ही प्रसन्नता कायम असायची.

श्रावणात साक्रीला शाळेच्या पाठीमागे असलेल्या मावल्यांच्या देवळात निवद-भोंन (नैवेद्य) चे ताट घेऊन जाताना मस्त वाटायचं. वाटेत वर्गातल्या मुली दिसल्या की लांबूनच स्माईल एक्सचेंज झाली तरी अख्खा दिवस मोहरलेला वाटायचा. तिथं वाहिलेले ते अन्न चिमण्या, कावळे खायचे तेंव्हा गम्मत वाटायची.

बाजूला असलेल्या, महादेवाच्या देवळात मात्र श्रावणात आनंदला उधाण यायचं. सार्वजनिक व्यायमशाळेच्या बाजूला आणि पाठीमागे नदी असणाऱ्या या मंदिरा बाबत काय सांगू? या दगडी मंदिराची रचना इतकी सुंदर होती की पुढे अनेक वर्ष कुठल्याही कथा-कादंबरीत गावातल्या देवळाचे संदर्भ आले तरी हे मंदिर डोळ्यासमोर उभे राहायचे.

नववी किंवा दहावीला, मराठीच्या अभ्यासक्रमात आम्हाला, ' कातरवेळ ' नावाचा धडा होता. या कथेची नायिका लग्न करून पहिल्यांदाच माहेरी येते, दिवसभर गावात फिरते. तिला कुठे शाळेचे शिक्षक भेटतात, तर कुठे वर्गमैत्रिणी. तिचं आपलं सर्विकडे सासरच कौतुक चाललेलं असतं. अगदी मावशीकडे जाते, मावसा तिच्या प्रतिष्ठित सासऱ्यांबद्दल विचारतात तेंव्हा त्यांच्याविषयी बोलतांना अभिमानाने तिचा उर भरून येतो.
संध्याकाळी मात्र घरी परतल्यावर कुणीही नसतं. सारेजण देवळातल्या कार्यक्रमात गेलेले असतात. तिला फार एकट वाटतं. तुळशी समोर बसून ती विचार करत असते आणि त्याच वेळी तिला गावातल्या ' त्या ' मंदिराची आठवण येते. दहावीत असताना महादेवाच्या याच मंदिराच्या पाठीमागे तिला तिच्या वर्गमित्राने गणिताच्या पुस्तकात लपवून प्रेमपत्र दिलेलं असतं...

शाळेच्या दिवसातील हा आमचा सर्वात आवडता धडा. अरिविंद गोखले यांनी १९३२-३४ साली ही कथा लिहिली असेल. पुढे ती अभ्यासक्रमात आली. पण इतक्या वर्षांनी देखील त्या कथेतील ते मंदिर, तिथला ओटा , तो गंध मला माझ्या गावातील या मंदिरात जसाच्या तसा जाणवायचा. उमलणाऱ्या वयात मंदिराच्या पार्श्वभूमीवर आधारित ती प्रेमकथा वाचून मोहरुन यायचं.

काही वर्षांपूर्वी आम्ही, मराठवाड्यातील आंबेजोगाईला
' तप्तपदी ' या सिनेमाचे शूटिंग करत होतो. सिनेमाचा काळ स्वातंत्र्य पूर्व दशकाचा होता. त्यावेळी देखील अगदीं तसेच मंदिर आम्हीं शोधून काढले होते. तिथे देखील नायक नायिकेच्या भेटीचे दृश्य चित्रित केले होते.

कसं असतं नाहीं, बालपणी कुठली तरी केलेली कृती, किंवा वाचनात आलेली कथा, बघितलेला प्रसंग... तुम्हीं पुन्हा आयुष्यात पुढे कुठेतरी जगत असतात. त्याचे संदर्भ असे कुठेतरी पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटत असतात.

गुरुवारी मात्र गावाच्या बाहेर असलेल्या दत्ताच्या मंदिरात जायची आम्हाला ओढ असायची. मंदिरात जावेच लागेल अशी सक्ती कधीच नव्हती. तरीही आठवडाभर दत्ताच्या देवळात जाण्यासाठी आम्ही गुरुवारची वाट बघायचो. गावाबाहेर नदी ओलांडली की काही अंतरावर हे सुंदर मंदिर आहे. त्याचा मोठा परिसर. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हे मंदिर अनेकांच्या भेटीचे हमकास ठिकाण होते. सुरवातीला वडिलांसोबत मोटारसायकल वर जायचो. दसरा-दिवाळी, प्रत्येक सणाची सुरुवात या मंदिराच्या भेटीने व्हायची. पुढे  मित्रांसोबत फिरण्याचे ती हक्काची जागा झाली. त्या फिरण्यात एक प्रकारचा, स्वातंत्र्याचा फिल असायचा. गावं सोडलं तरी कधी कॉलेजला एडमिशन मिळाली म्हणून, नौकर लागली म्हणून, लग्न झालं म्हणून अश्या अनेक प्रसंगांना नकळत त्या मंदिराकडे पाय वळतात. त्यात कुठलीही जबरदस्ती नसते, अंधश्रद्धा नसते.

निसर्गाचं वरदान लाभलेले ' कोकण ' मला जगातील सर्वात जिव्हाळ्याची सुंदर जागा वाटते. जन्मापासून कितीतरी वर्ष या कोकणाशी माझा अजिबात संबंध नव्हता. खानदेशातील आमच्या मराठी शाळेत, कोकणात उतरत्या छपराची कौलारू घरे असतात, कोकणातील कष्टाळू माणसे तिथल्या समुद्रातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करतात, इतकीच माहिती होती. पण भूगोलाच्या पुस्तकात कोकणच्या समुद्र किनाऱ्याचे, तिथल्या टुमदार घरांची,  ब्लॅक अँड व्हाईट चित्र खूप आकर्षिक वाटायची. पुढे मात्र या कोकणची इतकी नाळ जोडली गेली की पुन्हा पुन्हा तिथं जाण्याची कारणे मी शोधू लागलो. मुद्दामहून झी टीव्ही च्या सिरीयलचा प्रोमो शूट करण्यासाठी असेल किंवा स्टार माझा, अाय बी एन लोकमत या टीव्ही चॅनेल्सच्या जाहिरातींसाठी... अनेक प्रोडक्टसाठी मी मुद्दामहून अश्या कॉन्सेप्ट लिहिल्या ज्या फक्त कोकणात शूट करता येतील.  ' बारायण ' हा माझा सिनेमा देखील पूर्णतः कोकणाच्या मातीत शूट झालेला आहे.
आणि या सर्वांमागचं प्रमुख कारण आहे ते कोकणातली अनेक सुंदर मंदिर.
लाला चिऱ्याच्या भिंती, त्यावर वाढलेलं शेवाळ, पुढे भला मोठा लाकडी मंडप. वर कौलारू छत. खालच्या फरशीवर नुसतं बसून राहिलं तरी डिवाइन वाटतं. तासनतास मग मी एकाच ठिकाणी बसून राहतो. जोवर कुणी बोलवायला येत नाही, अगदीं तोवर. त्यावेळी, मनात कुठलीही प्रार्थना नसते, आरती म्हणत नाही, नारळ फोडत नाही की गुलाल उधळत नाही. मला फक्त गाभाऱ्यातील तो मिणमिणता दिवा आणि उदबत्तीचा गंध आपलासा वाटतो. कोकणातल्या अश्या अनेक पुरातन देवळांना मी भेटी दिल्या आहेत. तिथं जाऊन भरून पावलो आहे.

तुम्ही देशातील कुठल्याही प्रांतात जा. बहुतांश ठिकाणी मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या डोंगरावर एक छोटंस देऊळ असतं. तिथं पोहोचण्याची वाट ही दिसत नाही बऱ्याचदा. तरी इतक्या उंचावर ते कुणी बांधल असेल? हा प्रश्न मला नेहमी सतावत असतो.
गड किल्ल्यांची भटकंती करतांना, उंच डोंगरावर शेंदुराने फासलेले ते पुरातन दगडी मंदिर मला शहरातील किंवा खास भक्ती स्थळ म्हणून नावाजलेल्या भव्य मंदिरा पेक्षा जास्त कनेक्ट होतं.

मुंबई सारख्या महानगरात पहिल्यांदा गेलो तेंव्हा बोरिवलीतील गोराई या ठिकाणी सहाव्या माळ्यावरचा फ्लॅट राहायला मिळाला... तिथल्या खिडकीतून दूर गोराईची खाडी दिसायची सोबत एका मंदिराचा कळस... सूर्यास्ताला ते दृश्य खूपच मनमोहक वाटायचं. पण सोबत मोठा कचरा डेपो देखील होता तिथं. त्यामुळे एक विशिष्ट वास भरून राहायचा तिथल्या वातावरणात.
पण वर म्हटल्या प्रमाणे सिनेमास्कोप तंत्राने मी तो कचरा डेपो काळ्या पट्टीत झाकून, मंदिराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे सूर्यास्ताचे ते मोहक दृश्य तासंतास बघत बसायचो.

परवा पेरेजपूर च्या पाठीमागे असणाऱ्या सालटेक च्या डोंगरावर बसलो होतो. सूर्यास्ताची वेळ. समोर मेंढरांचा मोठा कळप परतीच्या वाटेवर होता. पायथ्याच्या शेतातील खळ्यात बैलांच्या गळ्यातील घुंगारांचा येणारा आवाज, परतीच्या वाटेवर असणाऱ्या पक्षांचा चिवचिवाट, खाली गावातील मंदिरातून टेप वर लावलेल्या भजनाचे कानावर पडणारे स्वर... मला उगीच भरून आलं. डोळे बंद करून मी ते सर्व आवाज आपल्या आत साठवून घेतं होतो. माझ्या जगण्यातील हा सर्वात आवडता क्षण होता. हाच माझा धर्म. हेचं माझं अध्यात्म.

माझ्या मनातील या भावना सांगण्यासाठी कुठल्याही कट्टरतेची उभ्या आयुष्यात मला गरज पडली नाही.
कुणा विशिष्ट पक्षाचा झेंडा मला फक्तं या कारणासाठी हातात घ्यावा असं वाटलं नाही...
मला वाटतं नाही, माझ्या आत खोलवर मुरलेला हा धर्म असा सहज कुणीतरी काढून नेईल... त्यामुळे मला कधीही इनसीक्यूअर वाटत नाही.
ती माझी वयक्तिक जगण्याची पद्धती आहे, जन्मापासून जे जगत आलोय, तोच माझा धर्म आहे.

(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)