Thursday, 14 May 2020

गंध (भाग एक)

गंध (भाग एक)


बाहेर पक्षांचा चिवचिवाट होतोय. नुकतंच उजाडलं आहे. पौर्णिमेच्या नंतर ची पहाट. शेजारच्या ताईंनी आज जरा लवकरच झाडांना पाणी दिलंय बहुतेक. ओल्या मातीचा गंध सुटलाय छान.
मी बागेतून पुदिना तोडून आणला. पाण्याला आता मस्त उकळ फुटलाय. थोडी चहा पत्ती आणि काही पुदिना ची पाने...येणारा जास्तीत जास्त गंध मी नाकात साठवून घेतोय.
एका क्षणात डोक्यातील एका मागे एक सर्व फोल्डरस, सब फोल्डरस आणि त्यातील असंख्य फाईल्स ओपन होतायत...

या वासात किती पावर असते नाहीं! फार पूर्वीचं, दूरवरच आठवायला लागतं. अश्या कुठल्या संवेदना असतील अशी कोणती तारं जोडली जात असतील जी क्षणात तुम्हाला भूतकाळात नेतात. माझा आणि या गंधाचा असा नेहमीच संबंध येतो. कधी हा गंध स्वतः माझ्या वाटेल येतो तरं कधी मी प्रयत्नपूर्वक त्याला आडवा जातो.

हे गंध तरी किती प्रकारचे... कसले कसले... कधी फुलांचे, कधी पदार्थांचे, कधी व्यक्तींचे तरं कधी जागांचे...


पहाटेचा चहा म्हटला की मला इंजिनिअरिंग कॉलेज च्या नवख्या दिवसांची आठवण येते. शहरापासून दूर छोटसच टाऊन. तिथून वाहणारी नदी आणि त्यावर मोठा लांबलचक पुल. त्याला लागून असणाऱ्या छोट्या गल्लीत झाडांनी वेढलेले षटकोनी आकाराचे तीन मजली हॉस्टेल. सर्वात वरच्या माळ्यावर माझी रूम. मधोमध मोकळी जागा.

सकाळी उठल्या बरबोर चहा ही जुनी सवय. तीन माळे उतरून आळस देतं देत हॉस्टेल च्या बाहेर पडायचं. काही पाऊले चालल की छोटी चौफुली लागायची. एक रस्ता शहरा च्या दिशेने तर  दुसरा पुल ओलांडला की कॉलेज कडे जाणारा. 

राजू भाऊ पहाटे चार पासून आपलं चहा च दुकान सुरु करायचा. कधी सोबत म्हातारी आई असायची तर कधी एकटाच. जुनी कोळश्याची शेगडी, ज्याला उजव्या बाजूला एक हैंडल असतं. ते फिरवले कि कोळसा गरम होतो. वर पितळी केटली. त्या कोळश्याचा वास जणू चहा मध्ये मिसळून जायचा. थंडी च्या दिवसांत किमान दोन तीन कप एकाच वेळी मी प्यायचो. चहा सोबत त्या धुंद वासाला हि आत ओढून घ्यायचो....

पहिल्यांदाच घर आणि गावं सोडून बाहेर पडलो होतो. समर व्हेकेशन क्लासेस च्या नावानी एक सोपस्कार करावा लागतो छोट्या गावातील मुलांना. पालकांना आणि एकूणच सिस्टीम ला वाटत असत कि हे क्लास लावले म्हणजे आपली मुलं एकदम आय आय टी किंवा मेडिकल ला सिलेक्ट होतील वैगरे. मी हि त्यातलाच.

क्लास जिल्ह्याच्या ठिकाणी. राहायला क्लास पासून जवळच असलेल्या गल्लीतील, एकदम छोटीशी रूम. शेजारी पिठाची गिरणी. दिवसभर या गिरणीचा आवाज आणि पिठाची धूळ. डोकं जड़ व्हायचं. त्यात पहिल्यांदा घराबाहेर पडलो म्हणून होम सिक वाटायचं. मेस चे जेवण खाऊन कंटाळा आलेला. संद्याकाळी क्लास सुटला कि त्या रूम वर परत यायचो. गिरणी बंद करून मालक स्वयंपाकाला लागलेला असायचा. दिवसभर पिठाचा वास आणि गिरणीच्या आवाजाची जागा आता त्याच्या छोट्या स्टोव्ह नि घेतलेली असायची. स्टोव्ह वर शिजणाऱ्या खिचडीचा खमंग वास यायचा. त्या नुसत्या वासानी आपण गावी घरी आहोत हि फिलिंग यायची. घराचं महत्व जाणवायला लागायचं. आई दिवसभर काम करून सर्वांसाठी स्वयंपाक करते, वडील कसे नौकरी करून थकून जातात. सर्वच कसे कुटुंबासाठी राबतात. आपल्याला मात्र तिथे असतांना या सर्वांची कधीच का जाणीव नसायची. एका क्षणात विचारांची शृंखला सुरु व्हायची. त्या कोवळ्या वयात फक्त ‘खिचडी’ च्या वासाने हि जाणीव व्हावी...कमाल आहे!



इंजीनिआरिंग ड्रोप आउट चा शिक्का घेऊन अजून मोठ्या शहरांत गेलो. अगदी ठरवून. कधीही न परतण्यासाठी. प्रंचंड निराशा. अगदी दिशाहीन मार्ग. तासंतास फक्त लायब्ररीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हरवून जायचं. हातात पडेल ते वाचायचं. स्पर्धा परीक्षांची पुस्तके, कादंबऱ्या, कविता...अगदी काहीही. रात्री उशिरा सर्वीकडे सामसूम झाली कि उरलेसुरले पेपर्स, कात्रण वाचून ग्रंथपाल आणि मी दोघेही लायब्ररी बंद करून बाहेर पडायचो. शहरातल्या उच्चभ्रू कॉलनीतील तो शांत रस्ता. अगदी ओळीने बंगले. त्यातल्या मधोमध असणाऱ्या छोट्या बंगल्या च्या कुंपणाला लागुनच पारिजात चे झाडं होते. त्या पांढऱ्या फुलांचा सडा रस्ताभर पडलेला असायचा. कुंपणाच्या भिंतीला लागून अगदी छोटेसेच शंकराचे देऊळ होते. तिथे कुणीतरी संद्याकालचा दिवा पेटवलेला असायचा. त्या दिव्याचा मंद प्रकाश आणि पारिजात चा तो धुंद करणारा सुवास...कितीतरी वेळ मी तिथे नुसताच उभा असायचो, दिव्यातील उरलेले तेल संपेपर्यंत...


दिवाळी निमित्त सुट्टीत गावी पोहचलो कि, एस टी स्टेन्ड ते घरी पोहोचेपर्यंत प्रत्येक गल्लीत त्यावेळी  एक वास हमकास यायचाच. उत्सव डीस्टेम्पर! जब घर की रोनक जगानी हो, दीवारों को जब सजाना हो...नेरोलेक नेरोलेक. या जाहिरातीचे जिंगल आणि त्या नव्या कोऱ्या रंगाचा वास. प्रंचंड फ्रेश वाटायचं. आमच्या मातीच्या घराला जेंव्हा हा रंग लावायचो तेंव्हा हळूहळू तो भिंतीच्या आता मुरायाचा, त्याचे छोटे छोटे बुडबुडे निघायचे, कुणी खिदी खिदी करून हसतोय जणू. त्या रंगाच्या हसण्यात आपणही मिसळून जायचं आणि उत्साहाने दिवाळीच्या मंगल सणाला सामोरे जायचे. रंगाचा वास मला आजही नव्या उम्मेदीचा, नव्या स्वप्नांचा वाटतो.

मातीचा गंध म्हटला कि मला आठवतात पुणे विद्यापीठातील पायवाटा. ज्ञानेश्वर भवन, मेन बिल्डींग, बॉईज होस्टेल ते ओपन कॅन्टीन, एलीस गार्डेन पासून मेन बिल्डींग पर्यंतचा निमुळता रस्ता आणि औंध गेट ते जयकर ग्रंथालया कडचे नागमोडी वळण. धो धो पडणारा पाऊस. छत्री नाही कधीच सोबत. त्यामुळे धावत कुठल्यातरी ओट्याच्या आडोशाला उभे राहायचे. लवकरात लवकर, ओल्ड कॅन्टीन, अनिकेत किंवा ओपन कॅन्टीन यांपैकी जी जवळ असेल तीच्या आवारात पळत जायचे. ओल्या कपड्यात कटिंग चहा पिण्याची मजा शब्दात सांगता यायची नाही! त्या भारावलेल्या दिवसात कुणीतरी छत्री ऑफर केली आणि एक नवीन गंध या सर्वात मिसळून गेला. या गंधांनी रोमांच उभे राहत. भारावलेले दिवस मंतरलेले होऊन जात. हा गंध वेडी स्वप्न बघायला लावणारा होता. बिनधास्त होता. बंधन झुगारून देणारा, स्वतंत्र होता...       


विद्यापिठा समोर एका अरुंद गल्लीत एक छोटेसे गणपती मंदिर होते. त्याची रचणा जरा विचित्र वाटायची. एखाद्या छोट्या चाळीत किंवा वाड्यात शिरल्याप्रमाणे आत जायचे, सुरवातील तिथे राहणारी काही बिऱ्हाड दिसत. त्यांच्या घरातील स्वयंपाकाचा, वेगवेगळ्या फोडणींचा वास पार करून आत गेलं कि ते सुंदरस देवूळ दिसे. उदबत्तीचा वास या सर्व वासात मिसळून एक नवीनच गंध तयार व्ह्यायचा. तिथे डोळे मिटून बसले कि खूप शांत वाटायचं. मी त्याला माझ्या अध्यात्माचा गंध म्हणून ओळखतो. तो आजही मला अधूनमधून भेटत राहतो. त्यासाठी नेहमीच देवळात जाण्याची मला गरज भासत नाही. नौकरी करत असतांना चहा चे निम्मित करून मी ऑफिस खाली फेरफटका मारून येतो तिथे हा गंध मला भेटतो., एखाद्या शुटींग सेट वर संध्याकाळचा शॉट घेण्याची तयारी चालू असते, केमरामन लायटिंग करत असतो, कलाकर, स्पॉट बॉय, प्रोडक्शन यांची लगबग चालू असते. या साऱ्या गोंधळात मी कोपऱ्यात बसून हा गंध अनुभवू शकतो आणि त्याचा अध्यात्मिक आनंद हि घेऊ शकतो, अगदी दिग्दर्शक म्हणून डेड लाईन आणि जबाबदारी असली तरी...!

बऱ्याचदा मुंबईतल्या ट्राफिक मध्ये, स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यांवर, दादर किंवा परळच्या एखाद्या सिग्नल वर जेंव्हा एखादा पोऱ्या मोगऱ्याच्या फुलांची माळ विकत असतो, कुणीतरी म्हातारा आडोशाला अगरबत्ती घ्या म्हणून ओरडत असतो...अश्यावेळी अगरबत्ती, पारिजात-मोगऱ्याच्या त्या गजरयासाठी   नियमांचे काटेकोर पालन करणारा, माझ्यासारखा नेमस्थ, सिग्नल वर खोळंबून पाठीमागच्या ड्रायव्हर्स च्या शिव्या हि खाऊ शकतो. कारण त्या क्षणाला तो गंध मला माझ्या कार च्या बंदिस्त केबिन मध्ये हवा असतो. माझी अध्यात्मिक अनुभूती होण्यासाठी...

(क्रमश.)

No comments:

Post a Comment