Thursday, 7 May 2020

काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका लढवय्या कामगार नेत्याचा आज स्मृती दिवस🙏

बाळू बंडू पाटील-
काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका लढवय्या कामगार नेत्याचा आज स्मृती दिवस🙏


आज दादांचे दहावे पुण्य स्मरण. नेहमीच लिहीत असतो. पण दादांविषयी लिहायचं म्हटलं की लेखणी पुढे सरकतच नाही. असं नाहीये की मी ते टाळतो. पण किती आणि काय काय लिहायला हवं हे समजत नाही. आणि गेली दहा वर्ष हे सतत होतंय माझ्या बाबत...

दादा गेले तेंव्हा ते ६३ वर्षांचे होते तर मी २८ चा.
माझा प्रवास नुकताच कुठे सुरू झालेला तरं दादांचा अवघ्या त्रेसष्टव्या वर्षीच तो सुफळ संपूर्ण झाला होता.
खरंतर, त्याच्याही दोन तीन वर्ष आधीच!

' जगणं ' पूर्ण झालं असं ठरवता येतं नाही खरंतर. पण तरीही, प्रत्येक व्यक्ती जी जन्माला येते तिचं प्रारब्ध ठरलेलं असतच. तिथवर फक्तं किती जलद आणि किती सुरळीत तुम्ही पोहचता हे महत्वाचं. क्वचित नशीबवान लोकांचा तो प्रवास इतक्या सहज होतो, जसा दादांचा...

एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून असेल किंवा नवरा आणि नंतर वडील या सर्वसामान्य भुमिकांसोबतच दादांचे सामाजिक आयुष्य देखील मोठे होते. आपण जगतो स्वतः साठीचं, पण ते करत असतांना देखील आपण राहतो त्या ठिकाणचे तेथील लोकांचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव खूप कमी लोकांना असते. ती जाणीव दादांना होती. जी सतत त्यांच्या कृतीतीतून समोर येतं राहिली अगदी शेवट पर्यंत.

त्याकाळचे आयुष्य प्रत्येकाचेच खडतर होते. खासकरून ग्रामीण भागातून शिकून पुढे आलेल्या आणि काहीतरी करु पाहणाऱ्या तरुणांचे.
खूप मोठे कुटुंब. वडील आणि ज्येष्ठ भावाच्या अकाली जाण्याने न कळत्या वयात जबाबदाऱ्या चे ओझे.
तारुण्यातील उसळत्या वयात देखील स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालून वास्तववादी जगण्याचा स्वीकारलेला मार्ग. कुटुंबाशी आणि जन्माला आलो त्या गावं पांढरी शी जोडलेली घट्ट नाळ कधीच सैल पडू दिली नाही दादांनी.

दादा चा दादाभाऊ...
आणि
बाळू चा बाळासाहेब झाला...
आपण म्हणतो म्हणून हा प्रवास होत नसतो. तो लोकांनी तुमचं कामं बघून तुम्हाला आदरपूर्वक बहाल केलेला असतो.

अजूनही काही विशेषण होतीच.
शेतकऱ्याच्या समस्यांवर पोट तिडकीने बोलणारा तरूण,
आधीचा कॉम्रेड, नंतरचा समाजवादी...
एक विचारी शिवसैनिक ते कामगारांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणारा लोकप्रिय, कामगार नेता.

हा प्रवास निश्चितच सोपा नसणार. न्हवता.
आज सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक लोकं इतरांसाठी काही करण्याआधीच त्या कामाची प्रसिध्दी कशी होईल याची पुरेपूर काळजी घेत असतात.
अश्या वेळी खासकरून दादांचं वेगळेपण जाणवतं.
कुठल्याही प्रसिद्धीसाठी किंवा वयक्तिक फायदा होतो म्हणून त्यांनी कामं केली नाहीत. जे ही केले ते अगदी उत्स्फूर्त. आतून आलेले. त्यात दुसऱ्यावर उपकार करण्याचा ना कधी आव आणला ना कधी गर्व केला.

सुरवातीपासूनच त्यांच्या कामात आणि व्यक्तिमत्त्वात वेगवेगळ्या विचारसरणीचा प्रभाव होता. कुठल्याही एकाच विचारात त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही.
आज यांची सत्ता म्हणून फक्तं त्यांचाच उदोउदो करायचा, लागुंनचालान करायचे, स्वतःचा फायदा फक्तं बघायचा...
हे त्यांनी कधीच केले नाही.
याउलट, वेळोवेळी तत्कालीन परिस्थितीला अनुसरून स्वतःच्या विचारात त्यांनी बदल करून घेतला. या मागे फक्तं त्या विचारांचा आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्यांसाठी कसा उपयोग होईल हा एकच निकष लावला.

जितक्या उत्स्फूर्तपणे शरद जोशींच्या शेतकरी कामगार पक्षाचा बिल्ला स्वतःच्या छातीवर अभिमानाने मिरवला तितक्याच उत्साहाने लाल बावट्यात कामगारांचे हक्क मिळतं नाहीं म्हणून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घ्यायला देखील मागेपुढे बघितले नाही.

आपल्या बुद्धीला पटेल तसे ते विचार मांडत राहिले.
आज जेंव्हा त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वेळोवेळी मांडलेल विचार मी वाचतो तेंव्हा आश्चर्य वाटतं, कुठलीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसतांना, कुठलेही मार्गदर्शन नसतांना हा माणूस स्वतः मध्ये असे बदल करून घेत होता. काळासोबत चालत होता. त्यावेळी ' आपला महाराष्ट्र ' आणि ' लोकमत ' या दोन्हीं वृत्तपत्रात त्यांचे कॉलम होते. त्यात शेतकरी आणि कामगार या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर ते लिहीत.

पोरा बाळांचे शिक्षण आणि लग्न लाऊन त्यांना मार्गी लावणे यात काही खास असत असं नाही. कमीअधिक प्रमाणात ते सर्वच पालक करत असतात. पण मुलं वाढत असतानां आपण त्यांना कुठले संस्कार देतो. आपल्या कृतीतून कोणते विचार त्यांच्या आत पेरतो या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलं नेहमीच. सतत आर्थिक विचार करत राहणे. संपत्ती मिळवण्यासाठीच फक्तं कामे करणे हे त्यांना मंजूर न्हवते. दोन वेळचे छान पोट भरते ना यात ते समाधानी असायचे.

असमाधान होतं ते सामाजिक व्यवस्थेबद्दल,
शेतकरी आणि कामगारांच्या पिळवणूकी बद्दल,
वेळोवेळी आपल्याला नवनवीन अनुभव मिळायला हवेत आणि जर ते मिळतं नसतील तर त्याबद्दल वाटणारं असमाधान, मोठमोठ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित व्हावे, त्यातील चांगले ते घ्यावे वाईटाचा उहापोह करू नये असं ते मानत.

साक्री तालुका आणि पांझरा कान सहकारी साखर कारखाना हे त्यांचे कार्यक्षेत्र. देशाच्या नकाशात अगदी नगण्य. महाराष्ट्राच्या समाजकारणात किंवा राजकारणात याचा फार काही प्रभाव आहे अशी परिस्थिती ना तेंव्हा होती ना आज आहे. धुळे जिल्हा तसा नेहमीच दुर्लक्षित. पण दादांनी मात्र आपल्या या छोट्या कार्यक्षेत्राला नेहमीचं मोठं मानलं.

मला आठवतात साक्रीच्या शेतकी संघातील त्यांच्या गाजलेल्या सभा, तहसील कचेरी समोरील रास्ता रोको, कारखान्यातील गेट मीटिंग, उसाला भाव मिळायलाच हवा म्हणून गावोगावी फिरून केलेले लोकपरीवर्तन, कारखान्यातील व्यवस्था आता भ्रष्ट झाली आहे आणि ती उलथून द्यायला हवी हे जाहीर सभेत मांडतांना ते कधी डगमगले नाहीत की कुणाच्या प्रभावाखाली आले नाहीत. मला पद द्या, निदान आश्वासन तरी... असं म्हणून कधी त्यांनी नेत्यांच्या प्रचारासाठी मांडवली केली नाही.
प्रचार केला तेंव्हा ते सामान्य कार्यकर्तेच राहिले. प्रस्थापितांना डावलून जेंव्हा कारखान्याची नवीन कार्यकारणी निवडून आली तेंव्हा देखील या मंडळींनी आपला उपयोग करून घेतला असं वाटतं असूनही ते सत्तेच्या सकारात्मक परिवर्तना कडे आशेनी बघत होते. लोकांमधून निवडून दिलेल्या, तोवर सर्व सामान्य असलेल्या या पैनल कडून त्यांच्या देखील प्रगतीच्या अपेक्षा होत्या.

पण ज्यावेळी, त्या अपेक्षांचा, स्वप्नांचा भ्रमनिरास झाला त्यावेळी त्यांनी तिक्याच आक्रमकतेने त्यांचा विरोधही केला. समोरून दाखवलेल्या आमिषांना नाकारलं. खरंतर, अश्या काही ' डील ' मिळतं होत्या ज्यांनी किमान आयुष्यभराची तजवीज झाली असती. पण फक्तं स्वतःचाच स्वार्थ बघेल तो कामगार नेता कसला.

बाळू पाटील हा असाच बिनधास्त कामगार नेता होता.
बस्स, झोकून द्यायचं स्वतःला हेचं त्यांना माहीत. आजही त्यांच्या समकालीन नेत्यांशी, कामगारांशी, शेतकऱ्यांशी आणि अगदी विरोधकांशी बोलतांना देखील त्यांच्या विषयी आदरच व्यक्त होतो.

कारखान्याचे माजी चेअरमन आणि तालुक्यातील आदरणीय नेते स्वर्गीय रामराव पाटलांपेक्षा दादा खूप लहान. पण रामराव पाटलाना दीर्घ आयुष्य लाभलं. एका भेटीत ते देखील दादांविषयी भरभरून बोलले.
दादा गेले त्यावेळी म्हसदी चे चळवळीतील नेते बाळासाहेब देवरे यांचे पत्र आलेले. वय झालं म्हणून त्यांना प्रवास झेपत नव्हता. पण त्या पत्रात त्यांनी दादांबरोबर च्या स्नेहा विषयी खूप लिहिलेलं.

झेड पी चे नानासाहेब नागरे, कधी भेटले तरं दादांच्या पहाटे फिरण्याच्या शिस्ती विषयी बोलतातच. उपर, दादांसारखा
'फिजिकली फिट ' माणूस जर असा अचानक जाऊ शकतो तर आमची काय बिशाद... त्यामुळे आम्हीं व्यायाम करणेच सोडले असे मिश्किलपणे सांगतात.

ज्येष्ठ वकील जिभाऊ मराठे असतील, कारखान्यातील माजी व्हाईस चेअरमन डॉ. अशोक पाटील असतील किंवा माजी शिक्षक आमदार जे यू ठाकरे... भेटले तर आवर्जून दादांच्या आठवणी काढतातच.
एकदा स्टार माझा मध्ये असताना नाथाभाऊंच्या भेटीचा योग आलेला त्यावेळी त्यांना मी त्यांच्या साक्रीतील जुन्या भेटीची आठवण करून दिली त्यावेळीं मिशी वाला कामगार नेता म्हणून त्यांना देखील दादा आठवले होते.

मी खूप लहान होतो. शाळेच्या दिवसांत जगाशी काही देणे घेणे नसते फार. त्यामुळे बिन्धास्त असायचो. घरी खूप लोकं यायची. ते सवयीचच होतं आम्हाला. कारखान्यात त्या वेळचे एक एम. डी. होते कुणीतरी पश्चिम महाराष्ट्रातले.
ते नेहमीच घरी यायचे चहा आणि गप्पा मारायला. एकदा आमच्या एका शेजाऱ्यांनी त्यांची टर उडवयची म्हणून त्यांना विचारलच..."काय हो, रोजचं काय कामं असतं तुमचं दादांकडे?" त्यावेळी, त्या एमडी साहेबांनी विचारनाऱ्यालाच उलट प्रश्न केला होता... "आपण पंढरपूरला विठ्ठलाकडे का जातो...!"

एकदा दादा दोन दिवसांचा मुक्काम करून मुंबईहून परतले होते आणि आपल्या सहकाऱ्यां सोबत स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या भेटी विषयी भरभरून बोलत होते. कारखान्याची कामगार शाखा त्यांनी शिवसेनेशी सलग्नित केली होती. पुढे तालुका भर शिवसेनेच्या असंख्य शाखा उभारल्या. तो काळ त्यांच्यासाठी सर्वाधिक झपाटलेला काळ असावा असं वाटतं. आजही जुन्या साक्रीतील भाडणे रोड चे मंडप डेकोरेटर्स युसुफ भाई मला शिवसेना वाले दादासाहेब का छोकरा म्हणूनच बोलावतात.

ते कॉम्रेड होते. शिवसैनिक होते. समाजवादी होते. आपल्या उद्देशांसाठी जी विचारसरणी कामं करेल तिचा स्वीकार करायचा हा हेतू स्पष्ट होता. ते नेते कमी आणि कार्यकर्ता अधिक होते.

मधल्या काळात कारखाना बंद पडला आणि तालुक्याच्या प्रगतीलाच जणू घरघर लागली. अनेक कामगार देशोधडीला लागले. शेतकर्यांचे हक्काचे उसाचे उत्तप्न दुरावले. दादांना त्यावेळी खूप त्रास झाला. स्वतच्या आर्थिक बाजूला सावरता सावरता इतर कामगारांना जमेल तशी ते मदत करत होते. चळवळ थंडावली होती. अनेक नेत्यांचे उंबरठे झिजवले. कारखाना चालू व्हावा म्हणून पुढाकार घ्या अश्या विनवण्या केल्या. पण परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.

शिकण्याच्या वयात, कामगाराच एखादं पोरगं आठवडे बाजारात खाट लाऊन बसलेले दिसलं तरी त्यांना जेवण जात नसे.
अनेक कामगार, कुणी किराणा दुकानात झाडू मारताना दिसे तरं कुणी गावी स्थलांतरित झाला अशी बातमी येई. दादा स्वतःही आपलं सर्वच गमावून बसले होते. त्यात एखादा कारखान्याच्या कॉलनीतील तरुण घरी पेढे घेऊन यायचा, शहरात नौकरी लागली सांगायचा त्यावेळी दादांना खूप आनंद होत असे.

वेळ गेला तसा तालुक्याला कारखान्याचा विसर पडला. देशोधडीला लागलेले कामगार तर अनेकांच्या हसण्याचा विषय होते. पूर्वी सुटाबुटत फिरणारे कसे उधारी मागत फिरतात असे टोमणे ऐकायला मिळतं. त्यावेळीं इतरांसाठी दादांना खूप वाईट वाटे. दादांनी कधी उधारी केली नाहीं की कुणाचे पैसे बुडवले नाहीत. स्वतःचा सन्मान जसा होता तसाच शेवट पर्यंत त्यांनी अबाधित ठेवला. त्यांना नंतरही लोकं कामगार नेते बाळासाहेब म्हणूनच आदराने वागवत.

मागे गावच्या शेताकडे भटकत होतो. दुपारचं कडकडीत ऊन. माळरानावर बैलगाडीच्या आडोशाला कुणीतरी रुमाल टाकून झोपलेलं. माझ्या तिथून जाण्याची चाहूल लागली म्हणून तो माणूस झटक्यात उठला आणि रामराम म्हणाला. जवळपास सत्तरीकडे झुकणार वय. चेहऱ्यावर सुरकुत्या. पण भल्या मोठ्या पिळदार मिश्या. पाऊस पाण्याच्या दोन गोष्टी करून मी निघालो तर ते विचारायला लागले...
"भाऊ, तू कोणा आंडोर (मुलगा)...?"
मी म्हणालो, बाळू पाटील. सत्तरीतील तो रांगडा म्हातारा झटक्यात खाली बसला आणि ढसा ढसा रडायला लागला. दादांच्या आठवणीने त्याला गहिवरून आले होते. तो कारखान्यावर चौकीदार म्हणून कामाला होता. आणि ही नोकरी त्याला दादांमुळे मिळाली होती. "आमच्या सारख्यांवर तुझ्या बापा चे लई उपकार रे पोरा..." म्हणून मला आशीर्वाद देत होता.

तशीच एक म्हातारी आजी भेटली एका गावात. ओळख सांगितली तर म्हणाली, " मी अशी अनाथ. माले ना पोरेबाळे, ना वावर... पण दादाभाऊ नी माले पगार चालू करी दिंता..."
संजय गांधी निराधार योजनेत अनेक निराधरांची कामे दादांनी केलेली. म्हातारी त्यातीलच एक होती.

मध्यंतरी, एक चुलत काका मुलींच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. पण हवं तसं जमत नव्हतं. बऱ्यापैकी कंटाळले होते. मला म्हणाले, " दादाभाऊ राहता ते अशी परिस्थिती मनावर येऊच नहीं देता..."
' दादाभाऊ च्या भावकितले ' म्हणून आमची तालुक्यात ओळख होती. त्याचा आम्हाला अभिमान वाटायचा. दादाभाऊ सोबत राहिला तरी त्याच्या नुसत्या असण्यानी समोरच्यावर वजन पडायचं, असं त्याच व्यक्तिमत्त्व होते, म्हणाले. त्यांना जमेल तसं ते सांगत होते. पण मला त्यांच्या भावना कळतं होत्या.

दादांचे वास्तव्य साक्रीला. पण पाच भावंडात देखील छडवेल चे त्यांचे घर बाळू पाटलांचे घर म्हणून अनेकांना माहीत होते.

तालुक्यातील शेतकरी, कामगार, अनाथ, गोरगरीब, नातेवाईक, भावकितील अशी अनेक उदाहरणं आहेत.
साक्री गावातील सिंधी समाजातील व्यापारी असतो किंवा मुस्लिम व्यावसायिक सर्वांकडून हाच अनुभव येतो.

आज दादांना जाऊन दहा वर्ष झाली.
खरंतर एक आख्ख दशक.
आज लोकं रक्ताच्या नात्यांना विसरतात तिथे अजूनही कधी गावाकडे गेलो तर एखादा कुणीतरी भेटतोच, दादांची आठवण काढणारा. त्यांच्या कामामुळे, आम्हाला आशीर्वाद देणारा. त्यावेळीं वडील म्हणून दादांचा खूप अभिमान वाटतो. आणि स्वतः ची कीव ही येते. आम्हीं फक्तं आपल्या पुरतेच जगतोय दादा. तुमच्या सारखं आम्हाला नाहीं जमलं... जमणार ही नाहीं कदाचित. म्हणून तुम्हीं वेगळे होतात दादा.

No comments:

Post a Comment