Thursday, 18 June 2020

गंध (भाग तीन)

गंध (भाग तीन)


[भाग एक आणि दोन वाचण्यासाठी याच टाइम लाईन वर खाली स्क्रोल करू शकता]



कदाचित जुलै चा शेवटचा आठवडा असेल. श्रावणाचा भुरभूर पाऊस. मोकळा वारा. चेहऱ्यावर सतत केस येत होते ते एका हातानी बाजूला करत होतो तर दुसऱ्या हातानी ट्रक च्या मागील लॉरी चा दांडा घट्ट पकडून ठेवला होता. डोळे बंद करून आता जवळपास दहा मिनिटे झाली होती. थोडे अस्वस्थ आणि गरगरल्यासारखे वाटत होते. पण डोळे उघडून चालणार नव्हते. तशी सक्त ताकीद दिली होती अन्या नी. ट्रकनी आता एक मोठा वळसा घेतला तसा माझा तोल मी कसाबसा सावरला. दुसऱ्या हातानी चेहऱ्यावरचं  पाणी पुसून काढलं. तोच कॅबीन मधून अन्या ओरडला, आता उघड डोळे...

समोर धो धो वाहणारे लहान मोठे धबधबे. डावीकडे अक्षरशः खोल दरी. बाजूला प्रचंड हिरवळ. निसर्ग जणू नुकताच यौवनात आला होता तिथे. मी मात्र ते दृष्य बघून भारावून गेलो होतो. मातीचा गंध सुटला होता. ट्रक वळणं घेतं चालू होता. वेग तितकाच होता पण पावसाचे सपकारे चेहऱ्यावर जोरात पडत होते.  पावसाळ्यातील आंबोलीचा तो नितांत सुंदर घाट मी पहिल्यांदाच पहात होतो. मोकळ्या वाऱ्याचा तो ‘बेधुंद गंध’ मी आपल्या आत शोषून घेत होतो.

आपल्याकडे ‘वय झालं’ कि लोकं काशीला जातात तसे ‘वयात आले’ कि गोव्याला जाण्याची प्रथा आहे. माझं गोव्याला जाणं मात्र योगायोगाने झालं. नाशिकला कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो. तिथे शहराच्या मध्यवर्ती भागात एका उचभ्रू कॉलनीत, जणू खास स्ट्रगलर्स साठीच निर्माण केलेली एक जुनी इमारत आहे. तिचं नावं, गीताई. जुन्या काळातील बांधकाम. पोक आलेल्या भिंती. जवळपास प्रत्येक भिंतीवर माणसाच्या रक्तावर पोसल्या जाणाऱ्या 'ढेकुण' या प्रजातीचे अस्तित्व. एखादा कार्यकर्ता भर रात्री गॅलरीत अस्वस्थ येरझरा मारतांना दिसला कि समजायचं गडी नवखा आहे. अजून याला ‘त्यांच्याशी’ जुळवून घ्यायला अवकाश आहे. पट्टीचा गीताईकर मात्र इथे घोरत झोपतो! एका रूम मध्ये तीन किंवा चार पलंग. आणि चार ते पाच रूम्स मिळून एक टॉईलेट बाथरूम. त्यामुळे इथे 'सरव्हाइव' करणारा, ‘जातीचा स्ट्रगलर’ असला पाहिजे. खरंतर मलाही तोवर माझ्यातील या गुणाची जाणीव नव्हती!

वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे, मेडिकल रीप्रेझेन्टेटीव्ह, मार्केटिंग एक्सेकेटीव्ह, हॉटेल मध्ये काम करणारे वेटर्स ते टेम्पो ड्रायव्हर्स. अश्या सर्व ‘फायटर्स’ चा मुक्त वावर त्या इमारतीत होता. त्यातही विद्यार्थ्यांची संख्या अधिक. मी कॉलेज ची तीनही वर्ष तिथे होतो. आणि विद्यार्थांपॆक्षा या इतर मंडळींशीचं माझी जास्त मैत्री. त्यात ड्रायव्हर्स ची संख्या अधिक.

नाशिक च्या MIDC मध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या नव्या कोऱ्या गाड्या देशभरात पोहचवणारे हे ड्रायव्हर मित्र मला कोलंबस किंवा वास्को द गामा सारखे भासत. दररोज संध्याकाळी त्यांच्याशी होणाऱ्या गप्पा मला फेसिनेटिंग वाटत. कुणीतरी नुकतंच देहरादून, शिमला, दिल्ली, कोचीन किंवा पणजी ला गाडी पोहचवून आलेला असे. बाबा-शिबा (चहा ची दुकानं) वर कटिंग चहा पितांना एखादा प्रवासाचा किस्सा ऐकवायचा, आणि मी भारावून जायचो. अन्या त्यांत सर्वात कलंदर. एकदम बिनधास्त. मला तो वास्तव किंवा सडक चा संजय दत्त वाटायचा. भांग ची गोळी दाढेखाली ठेवली की गाडीचा स्पीड शंभर वरून दीडशेवर कसा फटक्यात जातो, हे तो इतक्या आत्मविशासाने सांगायचा की नाईन्टीजच्या सिनेमातील एखादी निरागस हिरोईन, लाकुडतोड्या हिरोच्या प्रेमात न पडता याच्या प्रेमात पडली असती!

मला ही मंडळी आपल्यात सामावून घेत याच मुख्य कारण होत, मी त्यांचे किलोमीटर चे हिशोब लिहून द्यायचो. वाचलेल्या ऐतिहासिक कादंबरीतील किस्से ऐकवायचो. आणि मुख्य म्हणजे ‘कोकाटे इंग्लिश स्पिकिंग’ चा कोर्स वाचून पाठ केलेले इंग्रजी वाक्य, मुलगी समोर आली की कसे फेकायचे हे बोलून दाखवायचो. खरंतर, मी बोललेल्या त्या वाक्यांमध्ये किती योग्य इंग्रजी होतं याची मला देखील गॅरंटी नव्हती पण त्या मित्रांना मात्र ते खरं वाटत असावं, बहुतेक!

त्या दिवशी संद्याकाळी, मी निवांत बरमुडा घालून फिरत होतो. जिन्यातच अन्या भेटला. घाईत होता. म्हणाला, येतोस का पणजीला. मी हो म्हणताच माझा हाथ धरून खाली ओढून नेऊ लागला. म्हटलं, अरे रूम वर जाऊन ट्राउजर तर घालू दे...पण ऐकेल तो अन्या कसला. त्यानी माझ्या रुममेट ला खालूनच हाक दिली. चौथ्या माळ्यावरून त्यानी ट्राउजर फेकली. ती न घालता, तशीच खांद्यावर टाकून मी अन्यासोबत त्याच्या नव्याकोऱ्या आयशर ट्रकच्या केबिन मध्ये शिरलो. आयुष्यातील पहिल्या रोमांचक प्रवासासाठी.

वाटेत पुणे, कराड, सातारा, येथून भाजीपाला नेणाऱ्या शेतकरी, व्यापारी, दुधवाले, शेळी-मेंढी नेणाऱ्यांना लिफ्ट देत आम्ही पहाटे कोल्हापुरात पोहचलो. अन्यासाठी ती वरकमाई. रात्री वाटेत दाढेखाली भांगेची  गोळी ठेऊन गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर वर, क्लीनर च्या भूमिकेत असणारा मी मात्र डोळ्यात तेल घालून नजर ठेऊन होतो. आंबोली येण्याआधी अन्यानी मला केबिन सोडून पाठीमागे पिटाळले होते. त्याच्या मते तिथे उभे राहून मी जास्त फील घेऊ शकणार होतो. वर, घाट येत नाही तोवर डोळे बंद करण्याचा मेलोड्रामा! अर्थात, सिनेमा प्रमाणे तोही तितकाच हिट ठरला होता. ज्याचा इम्पेक्ट मला आज चौदा वर्षानंतरही एका परक्या भूमीत जाणवत होता...

आंबोलीच्या घाटात अनुभवला तसाच वारा, चेहऱ्यावर उडणारे तेच पाण्याचे थेंब, फक्त समोर डोंगर-दरी एवजी अथांग समुद्र. शब्दशः निळाशार समुद्र! दोघेही ठिकाणी तीच अनुभूती तोच गंध! फक्त इथे, आधी डोळे बंद कर असं सांगणारा कुणी अन्या न्हवता तर जहाजेतील कॅफे मध्ये काम करणारी एक रशियन तरुणी होती, इतकाचं काय तो फरक. ब्लॅक जीन्स, व्हाईट टी आणि ब्लॉन्ड हेअर्स. काही वेळापूर्वी मी कॉफीची ऑर्डर केलेली आणि पुन्हा आपल्या डेक वर जाऊन बसलो होतो. तिचा आवाज आला म्हणून आपली कॉफी रिसीव करण्यास गेलो तर चेहरा ओळखीचा वाटला. मात्र कुठे बघितलंस आठवत न्हवत. पण तसं विचारावं तरी कसं... निदान काहीतरी बोलावं, त्यातून कदाचित कळू शकेल, म्हणून हळूच विचारलं...how much time it will take to reach, Hydra? तिने सरळ उत्तर न देता मला फक्त close your eyes म्हटलं. यावर what? ही माझी स्वाभाविक प्रतिक्रिया होती. पण इतक्या सुंदर तरुणीला नकार कसा द्यावा म्हणून मी निमूट डोळे बंद केले. त्यावर तिने आता turn behind म्हटले. मी पाठी वळलो. तिच्या पुढच्या सूचनेचे पालन करत. पण पाच मिनिटे कुठलीही हालचाल न्हवती. वाटलं, हि विसरली कि काय आपल्याला सांगून...आता जहाजही डावीकडे वळतंय असं जाणवलं. कदाचित आपला तोल जाईल म्हणून  बाजूच्या लोखंडी रॉडला मी घट्ट पकडून घेतलं. त्या गडबडीत डोळे उघडलेच... 
समोर अत्यंत मनोहारी दृश्य. दूरवर ते छोटेसे आयलंड. त्यावर एक टेकडी. या टेकडी वरच वसले होते Hydra हे गाव. अगदी एका रेषेत पायऱ्या पायऱ्यांवर वसलेली घरे. जवळपास सर्वच घरांचा रंग पांढरा शुभ्र. त्यावर घराबाहेर लावलेल्या हिरव्या झाडांची रंगबेरंगी फुले. व्हाईट बॅकग्राउंड वर मस्त कॉन्ट्रास्ट करत होते. मला ते नाताळच्या परीकथे प्रमाणे वाटले. शाळेत असतांना चित्रकला वहीच्या मुखपृष्टावर असायचे तसे. मी पाठमोरा वळलो तर दूर एका टेबलावर ती आवारावर करत होती. दुरूनच स्माईल देत तिने डोळे मिचकावले. मला तिचा हा मेलोड्रामा अगदीच अन्यासारखा वाटला. दोनो भी हिट थे!

किनाऱ्यावर जहाज लागले तसं समोरच्या एका फलकानी लक्ष वेधून घेतलं. या गावात कुठलेही वाहन अलाउड नव्हते. एक तर खेचरावर बसून किंवा पायी फिरायचं होतं, असा नियमच होता. काठाला लागून असणाऱ्या रस्त्यावर रेस्टोरेंटसची लांब रांग. त्यात बाहेर छान खुर्च्या ठेवलेल्या. एक कॉफी ऑर्डर करून तिथे तुम्ही दिवसभर बसू शकणार होतात, समोरचा निळाशार समुद्र बघत. जस जसे वर जावे तशी वेगवेगळी घरं. कुठे वस्तू संग्रहालय तर कुठे कसले तरी सरकारी कार्यालये. रहिवाश्यांची घरं अजून वरच्या टप्प्यात. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्या कोपऱ्यावर असणाऱ्या छोट्या चर्चनी. अगदी एकटेच. शांत. टेकडीच्या वरच्या शेंड्यावर. आतमध्ये येशूची छोटी मूर्ती, भोवती साडी सारख्या रंगीत कापडाने केलेले डेकोरेशन. अगदी साधेच. आम्ही लहानपणी वर्ग सजावटीला करायचो तसे. गव्हाच्या खळानी चिकटवलेले कागदाचे रंगीबेरंगी पताके. चमकीच्या दोऱ्या. असे काहीसे त्याचे रूप. तिथे एक खिडकी होती. त्यातून ढुंकून बघितले तर खाली दूरवर पसरलेला अथांग समुद्र. झोंबणारा वारा. काही वेळापूर्वी कुणीतरी पेटवलेली कॅण्डल तिचा सौम्य प्रकाश त्या छोट्याश्या जुनाट चर्च मध्ये भरून राहिलेला सॅन्टेड कॅन्डलचा गंध मला दूरवर कुठेतरी नेत होता...

गावी आमच्या घरी एक प्रथा होती. काहीही चांगल घडलं किंवा कसला शुभारंभ असला की कुळदेवीला जाऊन नारळ फोडायचे. ही देवी गावापासून पस्तीस चाळीस किलोमीटर दूर. तिथे जाणारी वाट बऱ्यापैकी खडतर. एक नदी आणि दोन नाले ओलांडले की उंच टेकडीवर चढणारा निमुळता रस्ता. त्या नदी, नाला आणि टेकडीचा रस्ता आला की वडील मला आणि आईला आपल्या राजदूत मोटारसायकल वरून खाली उतरवत. बापाच्या कर्तव्याला अनुसरून त्या खडतर रस्त्यावरचे दणके एकटेच अनुभवत, गाडी पार करायचे. आम्ही मग तो रस्ता पायी तुडवायचो. सूर्यफुलांची सुंदर शेती पार केली की माळरानावर ते छोटेसे देऊळ लांबूनच दृष्टीस पडायचे. ते बघून मनाला मिळणारे समाधान आजही कायम आहे. आई वडील त्या वाटांवर आपल्या संसाराच्या, भविष्याच्या गोष्टी करत. मी मात्र त्या वाऱ्यासोबत त्यांचं हसणं, कुजबुजणं कानात साठवत असे. आजही चर्चच्या खिडकीतून येणाऱ्या त्या वाऱ्यासोबत मला त्यांचं ते कुजबुजणं ऐकू येत होते. वडील जाऊन आता बरीच वर्ष झाली होती. आई दूर गावी एकटी. पण जणू ते दोन्ही तिथे पलीकडे कोपऱ्यावर बसून पूर्वीसारख्या गप्पा मारतायत. चर्चच्या त्या इवल्याश्या खिडकीतून ते ध्वनी माझ्या कानावर पडतायत आणि मी ते आवाज पुन्हा एकदा कानात साठवून घेतोय...

कसलीतरी चाहूल लागली आणि जहाजेची घंटा कानावर आली. मी माघारी फिरलो. उताराच्या त्या पायऱ्यांवर मात्र मला मघासच्या त्या मुलीला कुठे बघितले, तिचा आणि अन्याचा काय संबंध, ट्रक वर केलेली चौदा वर्षांपूर्वीची गोवा ट्रीप आणि हा ग्रीस चा टुअर...हे सर्व एकामध्ये एक गुंतल्यासारखं वाटायला लागलं...आपण एखादी गोष्ट पूर्वी ही कधीतरी अनुभवल्यासारखं, देजावू...! आणि क्षणात ट्यूब पेटली. आठवली, परवा रात्री एथेंसच्या गल्लीतील स्ट्रीपबारची ती रात्र...     

(क्रमश.)

Friday, 5 June 2020

छोटी सी बात


छोटी सी बात-

न जाने क्यों, होता हैं ये जिंदगी के साथ,
अचानक ये मन किसी के जाने के बाद,
करे फ़िर उसकी याद, छोटी छोटी सी बात...

सत्तर च्या दशकातील दक्षिण मुंबई. सुंदर. शांत. उपनगरातून अनेक तरुण तरुणी मरीन लाईन्स च्या परिसरातील ऑफिसात कामाला येतात.
त्यातलाच एक... मध्यम वर्गीय, अरुण.
रोज सिटी बस नी ये जा करतो.
एके दिवशी त्याला बस स्टॉप वर एक सुंदर तरुणी दिसते. तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडतो. तिचं नावं प्रभा.

आता प्रभा ला बघता यावे म्हणून अरुण रोजचं तिचा पाठलाग करू लागतो.
घराकडच्या रस्त्यावर, बस स्टॉप वर ते थेट तिच्या ऑफिस पर्यंत. पण तिच्याशी बोलण्याची अरुण ची कधीच हिंमत होत नाहीं. याचं कारण म्हणजे अरुण चा लो कॉन्फिडन्स!

एव्हाना प्रभा ला देखील कळले असते की अरुण तिच्या पाठी आहे. किंबहुना तिला तो आवडायला ही लागतो. पण बोलण्याची सूरवात करणार कोण...!

वेळ जात राहतो पण कुणीच बोलतं नाहीं. अरुण ला शेवटी खंडाळ्याच्या एका रिटायर्ड आर्मी ऑफिसर विषयी कळते. तो त्यांच्याकडे जातो. कर्नल ज्युलियस नागेंद्रणाथ सिंघ अत्यंत मजेदार व्यक्तिमत्त्व असतात.
पण तितकेच शिस्तशीर. ते अरुण ला ट्रेन करतात.

या ट्रेनिंग नंतर खरच अरुण चा कॉन्फिडन्स वाढतो का?
तो प्रभा ला प्रपोज करतो का?
प्रभा खरोखर अरुण शी इंप्रेस होते का?

या सर्वांचे उत्तर हवे असेल तर हा सिनेमा नक्की पहा. हलका फुलका... निरागस, तरुण आणि आपल्या प्रत्येकातील अरुण आणि प्रभा साठी.

Nostalgia-
आजही साऊथ मुंबईत गेलो की मी अरुण प्रभा चे ऑफिस शोधत असतो. लोणावळा खंडाळा ला गेलो तर नजर हळूच कर्नल नागेंद्रणाथ सिंघ याच्या बंगल्याची वाट हीच तरं नाहीं ना हा प्रश्न विचारत असते... इतका या सिनेमाचा इम्पॅक्त आहे!

(लहानपणी अमोल पालेकर, फारूख शेख, विद्या सिन्हा, दीप्ती नवल, राकेश रोशन, विनोद मेहरा, देवेन वर्मा यांचे सिनेमे टी वी वर लागले की मुड जायचा. हे कसले हिरो... फायटिंग करत नाही, स्टाईल करत नाही म्हणून बोअरिंग वाटायचे. पण जसं जसं कळायला लागल, या सर्वांच्या प्रेमात पडत गेलो. त्यात बासू चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी, सई परांजपे हे दिग्दर्शक किती ताकतीचे आहेत याची जाणीव होत गेली. काल्पनिक अँग्री यंग मॅन किंवा समाज उलथवून टाकणारे खोटे समाजभान न दाखवता त्यांनी आपल्या जगण्यातील, आजूबाजूच्या समाजातील गोष्टींत नाट्य शोधले आणि त्याला रुपेरी पड्याचे वलय देखील प्राप्त करून दिले.

माझ्या मध्यमवर्गीय जगण्यात कुणा सेक्रेड गेम्स चा गणेश गायतोंडे बघण्यात नाहीं...
गंग्ज ऑफ वासेपूर चा सरदार खान माझ्या संस्कारात बसत नाही...
सलमान चा दबंग मला जवळच्याच काय, दूरवरच्या  पोलीस स्टेशनला ही कधी भेटलेला नाही...
एक मुलगी सोडून दोन पटवणारा, कुछ कुछ होता है चा राहुल मला इंप्रेस करतो, त्याच्या सारखं बनावस वाटतं पण थियेटर बाहेर पडताच मला रियालिटी लक्षात येते आणि राहुल, वेगळ्या सोसायटीतील दूरवरचा वाटायला लागतो.
आणि प्रीती ला बळजबरी करणारा कबीर सिंगचं काय तरं, त्याचा मित्र होणे देखील माझ्या मनाला पटणार नाही...

मला कनेक्ट होतो तो, बासू चटर्जी यांचा नायक... अरुण. अगदीं माझ्या सारखा,
माझ्या मित्रांसारखा...

बासुदा, तुम्हीं खूप दिलंय... भावपूर्ण श्रद्धांजली.