Wednesday 4 November, 2020

बगळा

बगळा

बऱ्याचदा नकळत आपल्याकडून असं काहीतरी घडतं की ते आपल्याला स्वतःलाच पटलेले नसतं, पण अनावधानाने घडतात काही गोष्टी. सुधारायचं, म्हटलं तरी वेळ निघून गेलेली असते. वेळ जातो तसे ते आपणही विसरतो. पण कधीतरी आठवण आलीच तर मग मनात एक ' गिल्ट ' तयार होतो. प्रत्येक चुकणाऱ्या माणसाकडून अधून-मधून असे
' गिल्ट ' तयार होत असतात. संधी मिळाली तसे हे गिल्ट सुधारत पुढे जाणे म्हणजे जीवन!

परवा अशाच एका गिल्ट मधून मी बाहेर पडलो, त्याचा हा अनुभव...

' बगळा ', या प्रसाद कुमठेकरांच्या कादंबरी विषयी आताशा बरच छापून आलंय. जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आहे. जाणत्या वाचकांना या पुस्तकाची ओळख झाली आहे. समीक्षकांनी त्यावर लिहिलंय. अजून ती कादंबरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अशी एक मित्र म्हणून नव्हे तर वाचक म्हणून मनापासून इच्छा आहे.

प्रसाद, खरं तर माझा कॉलेजचा सिनियर, जो कॉलेज संपल्यानंतर भेटला. थेट मुंबईत. म्हणजे कॉलेज पुण्यात, पण मी गेलो त्यावेळी तो पास आऊट होऊन बाहेर पडलेला. २००५ ते ०७ या वर्षात आम्ही दोन-तीन वेळा भेटलेलो. त्यावेळी तो रेडिओ, टी व्ही साठी लिहीत होता, प्रोमो दिग्दर्शन करत होता. नंतर मी ही त्याच मार्गाला लागलो. ऑफिस वेगवेगळी असल्यामुळे आमची खास अशी भेट झाली नाही. पण तो मला पहिल्या भेटीतच आवडला होता. सबब, छोट्या गावातून शिक्षणाच्या माहेर घरी म्हणजे पुणे विद्यापीठात आणि कॉस्मोपोलिटन मुंबईत येऊनही त्यांनी आपली मराठवाडी सोडली नव्हती आणि मी ही आपला पुणेरी न होता खान्देशीच राहिलो होतो!

नंतर खूप वर्षांनी म्हणजे २०१५ मध्ये झी टी व्ही ला  असताना श्रीनिवास गड्डंम या प्रोमो दिग्दर्शक मित्राने तो करीत असलेल्या सिनेमाचे रीडिंग ऐकण्यासाठी आपल्या घरी बोलावले. त्यावेळी आम्ही साधारण सहा-सात जण होतो. तिथं पोहचल्यावर सुखद धक्का बसला, सिनेमाचा लेखक प्रसाद होता. प्रसाद स्वतःच न्यारेशन देणार होता. खूप वर्षांनी हा ' शहरातील गाववाला ', बघून आनंद झाला. 

रात्र वाढू लागली तशी गोष्ट पुढे जात होती. ग्रामीण मराठी घरातील अनेक संदर्भ त्यात होते. इतर अमराठी मित्रांना ते संदर्भ समजून सांगायला मी देखील प्रसादला थोडीफार मदत करत होतो. गोष्ट मस्तच होती. पण मला खूप प्रश्न पडले होते. त्यात सर्वात आघाडीवरचा प्रश्न होता, सिनेमाच्या व्यावसायिक गणिताचा.
कथा अत्यंत निरागस होती आणि प्रसादनी तितक्याच ताकदीने आणि साधेपणाने मांडली होती. पण त्या काळात आमच्यापैकी बहुतेकांच्या डोळ्यांवर जणू टीव्ही मध्ये अनेक वर्ष काम करून तिथल्या टीआरपीची आणि व्यावसायिक गणितांची झुल चढली होती. त्यामुळे ती निरागस कथा माझ्या पर्यंत पोहोचूनही खोलवर मुरली नव्हती, भिडली नव्हती. किंबहुना माझ्या वर झालेल्या टी व्ही च्या गल्लाभरू संस्कारांमुळे मी तिच्या पर्यंत पोहचू शकत नव्हतो.
" अमुक मिनिटात पंच, तमुक मिनिटात इमोशन्स " या फॉर्मुल्यात मी अडकलो होतो आणि ' बगळा ', कुठल्याही फॉर्मुल्यात बसणारी नव्हती!

मी प्रश्न विचारत राहिलो. प्रसाद आणि श्रीनिवास उत्तर देत राहिले. घरी निघतांना मला जाणवलं मी उत्साहाच्या भरात ' अती ' विचारलं की काय? पण त्या दोघांनी मात्र मला तसं जाणवू दिलं नव्हतं. तरीही, मला उगीचच असं काहीतरी वाटत होतं. वर म्हटल्या प्रमाणे हा एक गिल्ट मला चिकटला होता.

त्यानंतर, कदाचित निर्मात्या अभावी त्या सिनेमाचे काम राहिले आणि प्रसादनी कथेला पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे ठरवले. याविषयी मला अजिबात कल्पना नव्हती. दीड - दोन वर्षांनी मी सरळ पुस्तक प्रकाशनालाच गेलो. दादरच्या छबिलदास शाळेत एका छोटेखानी कार्यक्रमात पुस्तकाचे अनावरण झाले. कार्यक्रमात जयंत पवार ' बगळा ' विषयी भरभरून बोलले. मी आणि माझा गिल्ट, कोपऱ्यात बसून साऱ्या मान्यवरांचे बोलणे लक्षपूर्वक एकूण घेत होतो.

पुढे माझ्या चित्रपटाच्या कामात व्यस्त झालो. पुस्तक वाचायचं राहिलं होतं.
विशालच्या ' लपाछापी ' च्या प्रीमियरला प्रसाद पुन्हा भेटला. पण त्यावेळी तो दुसऱ्या सिनेमाच्या प्रयत्नात होता. मग आम्ही फक्त एकमेकांच्या सिनेमाच्या प्रॉडक्शन विषयी बोलत राहिलो.

' बगळा ' माझ्या पासून अजूनही दूरच होती. मध्ये दादरच्या आणि पार्ल्याच्या मॅजेस्टिक मध्ये चक्कर झाले पण बगळा उपलब्ध नव्हती. फायनली गेल्या आठवड्यात ऑनलाईन उपलब्ध झाली. आलेल्या पार्सलला दोन दिवस स्पर्श न करण्याचा क्वारनटाईन नियम मोडून घाईघाईत बगळा वाचून काढली.
आणि खरं सांगतो, माझा गिल्ट कमी होण्याऐवजी आणखी वाढत गेला. इतक्या उच्च दर्जाची कलाकृती त्यावेळी आपल्या आत पोहचू शकली नाही, या विषयीचे ते फ्रस्ट्रेशन असावे.

लिखाणातील इतका साधेपणा, अत्यंत नवीन धाटणीची मांडणी. खास उदगीर शैलीतील बोली आणि मुख्य म्हणजे आपण ज्या प्रोटगोनिस्ट ची गोष्ट वाचत आहोत तो कुठेही बोलत नाहीये. त्याला सोडून आख्खे जग त्याच्या विषयी बोलतय. इतरांच्या या बोलण्यातून बगळा चा नायक, चिंतामण सरदेशमुख आपल्याला उलगडत जातो. ही लेखन शैली अत्यंत कल्पक आहे.

शेवटी प्रसादशी तासभर त्याच्या बगळ्या बद्दल, त्यातील पात्रांबद्दल, प्रसंगांबद्दल भडभडून बोलून घेतलं आणि हलका झालो.

मला अजूनही कळत नाहीये, मी हे सर्व का लिहितोय? खरंतर मी पुस्तकाविषयी लिहायला हवं. लिहिण्यासारखं खूप आहे. पण मी हा माझा अत्यंत वैयक्तिक अनुभव सांगत बसलोय.

पण खरं सांगू का, यात माझा स्वार्थ आहे. या कथेत ' चिंत्या ' ला बोल लावणाऱ्या अनेक खलनायकापैकी मी ही एक नव्हतो ना? हा प्रश्न माझं मन खात होता.
या पुस्तकाच्या वाचनाने माझा पाच वर्षाचा गिल्ट धुवून निघालाय. आता सर्व निरभ्र झालंय. ' बगळा ' समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं बाह्य आवरण फाडून टाकावं लागेल. वय वाढतं तशी निरागसता हरवते म्हणतात. बालपणीची निरागसता टिकवून ठेवणं फार कठीण. ती तशीच आठवून, कागदावर मांडणं तर त्याहून कठीण. प्रसादनी मात्र आपल्या लिखाणात ती सहजता, निरागसता कायम ठेवली आहे, यातच त्याच्या लेखन शैलीचे सार आले.

कुणी कितीही दगड, धोंडा म्हटलं तरी तुमच्या जवळ असणाऱ्या हिऱ्याला त्यानी काही फरक पडत नाही. कितीही अंधार असला तरी त्याचा प्रकाश कोण आणि किती वेळ आडवू शकणार...

प्रसाद, तुझ्या या पुस्तका नंतर तुझ्याकडून खूप अपेक्षा वाढल्यात अश्या पुणेरी छाप घोषणांना तू बळी न पडता, बिन महत्वाच्या अपेक्षांच ओझं न बाळगता अशाच साधेपणाने लिहीत राहावे, यासाठी तुला शुभेच्छा.

(मी समीक्षक वैगरे नाही. त्यामुळे कथानक काय, पात्र कशी आहेत, काळ कुठला या विषयी इथं फार लिहीत नाही. अनेकांनी त्यावर भरपूर लिहिलंय.
त्यातील दोघांची लिंक इथ देतोय. पुस्तकाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी हे लेख महत्वपूर्ण ठरतील. शेवटी इतकंच म्हणेल, प्रत्येकानी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे.)

https://www.aksharnama.com/client/article_detail/1077

And

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/editorial/samwad/novel-by-prasad-kumthekar/amp_articleshow/59930246.cms

(' बगळा ', ही कादंबरी पुढील लिंक वर ऑनलाईन ऑर्डर करू शकता.)

https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4790380271385541066

बोल्ड

बोल्ड

(सेन्सॉर कविता ) 

' ती ' ला नवरा असतो
' त्याला ' बायको असते
तिला मुलगा असतो
त्यालाही मुलगी असते
त्याचा संसारात जीव असतो
तिलाही आपलं घरटं हवसं असतं

त्याला त्याची बायको खूप आवडते
तिला नवऱ्याचे ज्याम कौतुक असते
दोघांची दोन वेगवेगळी घरटी असतात
आनंदी सुखी चित्रा प्रमाणे भासतात.

तिला कधीतरी ' तो ' दिसतं असतो
त्यालाही ' ती ' ओझरती दिसतं असते

.................
.................

वाचक अर्थ काढायला मोकळे,
म्हणून कविता इथेच संपते!


(आता कवितेच मेकिंग...)

लोकं या कवितेला ' बोल्ड ' म्हणणार असतात
वाचतांना ' जजमेंटल ' होणार असतात 
कुणी काल्पनिक म्हणून सोडून देणार असतो
कुणी सिरियस होऊन त्याच्या ' तिची ' आणि 
तिच्या ' त्याचा ' शोध घेणार असतो.

तरीही,
कुणी तरी लिहायलाच हवं 
असं त्याला वाटत असतं...
कवी शब्द जुळवतो
वाचक भुवया उंचावतात
कवी सुरुवात करतो
वाचक आतुर होतो
कवी पुढे जातो
वाचक आंबट होतो
कवी थांबतो
वाचकाला मात्र पुढचं वाचायचं असतं

कवी हिम्मत एकवटतो...
वाचक वाचून खुश होतो

पब्लिकली विचारलं तर म्हणतो 
काही लिमिट, हे अति होतंय...
एकांतात, मात्र स्वतः ला शोधतो

एक चौकट असते
म्हणे, त्याचे काही नियम असतात

कवी पुढे लिहिणार नसतो...

वाचकाने समजून घ्यायला
त्याची पात्रे
अमृता-इमरोज इतकी इंटेन्स नसतात
बच्चन-रेखा सारखी रोमँटिक नसतात
नसतात, विनोदी दया-बबिता सारखी

ती असतात तुमच्या आमच्या सारखी 
हाडा-मांसाची!
म्हणून कवी तिथेच थांबतो
सोबत कविताही!

अज्ञाताची ओढ

अज्ञाताची ओढ

पहाटेच धुकं... अभ्र, कुंद आकाश
थंड बोचऱ्या संध्याकाळी...
अडकून राहिलेलं काही... 
कितीतरी दिवस, कदाचित खूप वर्ष.

पूर्ण होण्याची इच्छा नाही आता... 
बस्स, ते तसचं टिकून रहावं इतकचं

वय सरत तसं, निसटून जातं बरचसं...
काही नैसर्गिक, 
काही परिस्थिती मुळे
तर काही सोडून देतो, आपणच

शरीर आणि मन
ऍडजस्ट करत राहतात,
जुळवून घेतात...जुळवावाच लागतं
जगणं असचं असतं

मागे उरतात अडकून राहिलेले,
शब्द, आवाज, स्पर्श तर कधी फक्त गंध
आठवणींचा कोलाज बनतो

दिवसाच्या कुठल्या तरी आवडत्या प्रहरात 
हा कोलाज मग उडत राहतो...
खास करून चाहूल लागणाऱ्या दिवसात

त्याला चाहूल खूप आवडते...
एकटा असला की माणसांची 
साचून राहिला की प्रवासाची 
कोरडा असला की शब्दांची 

गर्मीने हैराण झाला की मृगाची चाहूल
ढगाळ पावसात गुदमरला की थंडीची चाहूल

आता थंडी पडणार म्हणून आतुर
पण या वर्षी जसा, खूप पाऊस पडूनही तो भिजलाच नाही...
थंडीत तरी हुडहुडी भरावी,
बोटे आणि हाथ आखडून जावेत
ओठ फुटून त्यातून रक्ताचे ठिपके गळावे
गाल सुजून खपले पडावेत
गारठ्याने गोठून टाकाव्यात
सर्व काळज्या, अवास्तव अपेक्षा आणि थांबलेले आजूबाजूचे जग...

संपून जावा हा काळ 
उद्यासाठी, नवीन आठवणी तयार व्हाव्यात
अनेक कथा, नवीन पात्र, नवीन जगणं बघता यावं
थांबून राहण्यात अर्थ नाही, 
म्हणून वाहत रहावं... 
नितळ स्वच्छ होतं जावं
वाहता वाहता एक दिवस
जेथून आलो तिथं पुन्हा एकरूप व्हावं...

अनोळखी तो...

बऱ्याचदा तुमचं एखाद्याशी रक्ताच नातं नसतं. मैत्रीही नसते, ओळखं म्हणावी तर तसही नाही काही! 

तरीही, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आतून वाटतं राहतं. रोजचा संबंध नसतो, खरं नावही माहीत नाही. घर, मोबाईल नंबर वैगरे तर दूरच्या गोष्टी!  अनोळखी वक्तीबद्दल असे वाटण्याला काय म्हणतात मला माहिती नाही...

पण, मला आज ' त्याच्या ' बद्दल असं वाटतंय हे मात्र खरं!

रुखरुख, अस्वस्थ, चटका लावणारं असं काहीतरी.

नौपाडा पोलीस स्टेशन ते माझे घर फार अंतर नाही. पुन्हा माझी पेट्रोलिंगची ड्युटी असल्यामुळे तलावपाळी, तीनहाथ नाका, कॅडबरी पूल, रेल्वे स्टेशन, कोपरी हा सर्व भाग माझ्या रोजच्या जगण्यातला. गेल्या काही वर्षांत इथं काम करत असातांना बऱ्याच गोष्टी सवयीच्या होऊन गेल्यात. पोलिसाच्या नोकरीत तुम्हाला नाट्यशास्त्रातील नऊही रसांचा रोजच अनुभव येत असतो आणि आम्ही देखिल त्याचा निर्विकार मनाने स्वीकार करत असतो. त्रासही होतो बऱ्याचदा पण हळूहळू सवय होत जाते. 

जसा ' तो ' सवयीचा होऊन गेला होता. 

थोडे थोडके नाही तर गेली तीन वर्ष! पूर्वी कुठं राहायचा माहिती नाही. पण मला पहिल्यांदा दिसला तो भवानी मातेच्या मंदिरा बाहेर. माझ्या पेट्रोलिंगच्या गजबजलेल्या एरियात माझा हा जरा निवांत क्षण. 

ठाण्यातील मार्केटचे हे मध्यवर्ती ठिकाण, त्यामुळे सतत लोकांचा वावर. पुन्हा स्टेशनची गर्दी. त्यामुळे आम्ही कायम माणसांनी वेढलेलो. या मंदिराच्या बाहेर मात्र मी क्षणभर का होईना माझी पांढरी मार्शल बाईक थांबवतो. बऱ्याचदा मंदिरात जातही नाही, वेळही नसतो. पण बाहेर फुलवाल्याच्या दुकानाबाहेर रेंगाळतो. फुलांचा तो गंध मला माझ्या गावच्या मंदिराची आठवण करून देतो. 

तो पहिल्यांदा मला तिथेच दिसला. मी न विचारताही म्हणाला, "फूलवाला जरा बाहर गया साहब इसलिए मैं बैठा काउंटर पर, आपको दे दूं क्या कुछ फूल माला वगैरा..." 

त्याच्या सोबतचा हा पहिला सवांद. 

नंतर मात्र तो रोज दिसू लागला. फूलवाल्याच्या दुकानापासून डावीकडे कोपऱ्यात एक मिनी बस उभी राहायची. त्यात तो रहायचा. तिथंच स्वयंपाक करायचा, तिथंच आंघोळ, तिथेच झोपणे. थोडक्यात ती बस म्हणजे त्याच घर होती.

हळूहळू त्याच्याविषयी काही गोष्टी कळू लागल्या. चोवीस-पंचवीस वर्षांच्या या तरुणाने बिहारच्या कुठल्यातरी खेड्यातून पोटापाण्यासाठी मुंबईची वाट धरली होती. अनेक ठिकाणी काम करून तो आता या ड्रायव्हरच्या नोकरीत स्थिरावला होता. सतत हसत राहायचा. मला कमाल वाटायची, हा माणूस दिवसभर शहराच्या ट्रॅफिकमध्ये बस चालवतो, राहायला डोक्यावर छत नाही म्हणून मच्छर चावतात तरी कंपनीच्या या बस मध्येच झोपतो आणि तरीही खुश राहतो!

पोलीस स्टेशनला हजेरी लावली की मी माझी बाइक घेऊन पेट्रोलिंगला निघायचो. रात्री दहाच्या सुमारास तिकडून जायचो त्यावेळी त्याची बस नसायची. पण साडेअकरा - बाराच्या दरम्यान दुसऱ्या राऊंडला मात्र त्याची बस माझं लक्ष वेधून घ्यायची कारण तिथून फोडणीचा खमंग वास बाहेर यायचा! तो बसच्या खिडकीतून नेहमी हाक मारायचा, "साहब एक बार हमारे हाथ का खाना चख कर तो देखो, आप भी याद रखोगे " 

मला वाटतं ते खोटं नसावं, त्याच्या फोडणीचा वासच इतका टेस्टी होता. बऱ्याचदा इच्छा असूनही मी टाळायचो कारण ड्युटीवर असताना अशा आमिषांना दूर ठेवायचं असतं, इतक्या वर्षांच्या सर्व्हिस मध्ये माझ्या अनुभवांनी मला शिकवलं होतं. 

त्या दिवशी मात्र पर्याय नव्हता. रात्री साडेबाराची वेळ असावी. मी नेहमीप्रमाणे राऊंड वर होतो तिथून जात असतांना त्याच्या बसमधून जोरात ओरडण्याचे आवाज यायला लागले. मी आणि माझा सहकारी धावत तिथं गेलो. आत बघतो तरं  काही गर्दुल्ले त्याला मारत होते. तो बिचारा गयावया करत होता. त्या गर्दुल्याना त्याच्या बस मध्ये बसून दारू प्यायची होती. त्याने नकार दिला म्हणून ही मंडळी त्याला बिहारी म्हणून शिव्या देत होती, मारत होती. पोलिसांना बघताच ते पळाले. आम्ही तिथं पोहचलो म्हणून तो वाचला नाही तर त्याच काही खरं नव्हतं. 

गर्दुल्ले आता निघून गेले होते, बसमध्ये तो एकटाच होता. त्याच्या स्टोव्ह वर चिकनची भाजी शिजत होती आणि चेहरा मात्र सुजला होता. मी त्याला गेले सहा महिने बघत होतो पण दुरूनच. आज पहिल्यांदाच त्याच्या बस मध्ये शिरलो होतो आणि समोरचे दृश्य बघून चकित झालो. ती बस इतकी टापटीप होती की मला आश्चर्य वाटलं. 

एका कोपऱ्यात कपडे सुकवण्याची दोरी, बाजूला एक लोखंडी ट्रंक त्यात त्याचे कपडे घडी करून ठेवलेले. कोपऱ्यात महादेवाचा फोटो समोर दोन पेटत्या अगरबत्ती आणि त्यांचा सुवास त्यात त्याच्या फोडणीचा वास. एकूणच आपण बस मध्ये नाही तर एखाद्या छोट्या पण नीटनेटक्या संसारी घरात आहोत असा मला भास होत होता. 

त्या दिवसानंतर मात्र त्यानी सलाम साहब, म्हटलं की मी हसून त्याच्या सलामचा स्वीकार करायला लागलो. 

त्याच्या बस जवळ रात्री चहा विकणाऱ्या पोऱ्याची सायकल उभी राहायची. रात्रपाळीला जाणारे आणि रात्रपाळी करून पहाटे परतणारे या सर्वांना  हे सायकलवाले चहा पुरवत असतात. आम्ही ही कधीतरी तिथं चहा प्यायचो. त्यावेळी तो आमच्यापाशी येऊन गप्पा मारायचा. त्याच्या गावाकडच्या गोष्टी सांगायचा. घरी म्हाताऱ्या आई-वडिलांना ज्या दिवशी बँकेतून पैसे पाठवायचा त्या दिवशी तो फार आनंदी असायचा. एकदा ' सत्तू ' नावाचा पदार्थ त्यानी बनवला होता. तो त्यानी आम्हाला बळजबरी खाऊ घातला. तो पदार्थ खाऊन मला माझ्या आईच्या हाथच्या पुरणपोळीची आठवण झाली होती. 

कधी सिग्नल वर, तीन हाथ नाक्याच्या पुलाखाली तर कधी कापूरबावडी परिसरात चालत्या बसच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूने आवाज आला तर मी समजून जायचो, हा तोच! 

तो सलाम साहब इतकंच म्हणायचा. त्यामुळे तेवढ्या गर्दीतही तो लक्षात राहून जायचा. 

खरंतर, मी काम करतो त्या स्टेशन आणि कोपरी परिसरात प्रचंड गर्दी असते. अनेक व्यवसायिक आहेत, दुकानदार, कामगार-मजूर, फेरीवाले, अशी बरीच पोटापाण्यासाठी या शहरात राबणारी माणसं आहेत. काही चांगली तर काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं असतात. आमची पोलिसांची नजर हमेशा या लोकांकडे लक्षपूर्वक बघत असते. 

पण या तीन वर्षात या मुलासोबत मात्र फार न बोलता ही ओळख निर्माण झाली होती. कदाचित मला ड्रायव्हर या जाती विषयी थोडी अधिकच कणव असावी. पोलिसात भरती होण्यापूर्वी मी देखील ड्रायव्हरची नोकरी केली होती, गाडी चालवून पूर्ण भारत पालथा घातला होता आणि त्याच पैशातून माझं शिक्षण झालं होतं. 

... आणि शेवटी माझ्या तेरा वर्षाच्या नोकरीत आणि अडतीस वर्षाच्या आयुष्यात बघितली नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती करोना मुळे निर्माण झाली. २०-२२ मार्च च्या दरम्यान संपूर्ण देशात आणि आमच्या ठाणे शहरात देखील टाळेबंदी जाहीर झाली आणि सर्व उद्योग ठप्प झाले. ज्यांना घर होती ती मंडळी सुरक्षित आपल्या घरातच राहिली पण ज्यांना घर नव्हती ती सर्व लोक रस्त्यावर उघडी पडली. सुरवातीच्या आठवड्यात लोकं थोडी फार खाण्यापिण्याची मदत करत होते नंतर मात्र तेही थांबलं. दुकान बंद, बाजार बंद, भयंकर परिस्थिती होती. 

रस्त्यावर राहणारे उपाशी होते. त्यात ' तो ' ही होता. बस मध्ये कोंडून बसलेला. आता रात्री त्याच्या बस मधून फोडणीचा वास येणं बंद झालं. आमच्या सर्व पोलीस दलाला जमेल तशी आम्ही मदत करत होतो. अन्नाचे पॅकेट्स या लोकांना पुरवत होतो. त्याला ही चार पाच-वेळा ते पॅकेट्स मी जाऊन दिले. आमच्या ड्युटीवर प्रचंड ताण होता. आपल्या घरात सुरक्षित असलेले माझे कॉर्पोरेट मध्ये मोठं मोठ्या पदावर काम करणारे मित्र मला व्हाट्सअप वर काळजी घेण्याचा सल्ला देत होते. गावाकडून म्हातारे आईबाप रोज फोन करायचे. घरी गेल्यावर दुरूनच बायकोशी बोलावे लागायचे. तिला नुकताच चौथा महिना लागला होता त्यामुळे तिची काळजी घेणं गरजेचं होतं. कमी अधिक प्रमाणात माझ्या सर्वच पोलिस मित्रांची परिस्थिती अशीच होती त्यातही आमचे वरिष्ठ आमचं मनोबल वाढवत होते. 

या सर्व धावपळीत त्याला मी विसरून गेलो होतो. काम वाढली होती. करोनानी मोठं संकट उभं केलं होतं. त्या दिवशी रात्री बस समोरून जात असताना मला तिथं कुणीच दिसलं नाही म्हणून मी सरळ बसच्या आत गेलो. तर आत मध्ये तो मला बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला लागलीच खांद्यावर टाकले आणि जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. त्यावेळी दवाखान्यातील स्टाफ ही अशा पेशंटला घ्यायला नकार देत होता किंबहुना घाबरत होते. मी त्यांच्या विनवण्या करत होतो. शेवटी PPE किट घातलेल्या डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर आणलं. 

माझा युनिफॉर्म मात्र घामानी आणि मातीने माखला होता. दुसऱ्या दिवशी माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरं सोडून दूर आपल्या गावी परतत होते. मिळेल ती बस, ट्रक, रिक्षा सर्विकडे माणसच माणसं! 

मी यापूर्वी अनेक वर्ष गणपती विसर्जनाची ड्युटी केली होती, शिवजयंतीच्या गर्दीतही लोकांना शिस्तीत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, मोहरम, ईद, मोर्चे, राजकीय पक्षांच्या सभा या सर्वीकडे गर्दी आणि माणसं पहिली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यााठी माझ्या खाकीच्या कर्तव्याला अनुसरून प्रामाणिक ड्युटी केली होती. 

पण...

या करोना महामारीची परिस्थिती अत्यंत भयंकर होती! मोबाईल वर सतत वाईट बातम्या येत होत्या. एकामागून एक, आमचे सहकारी दवाखान्यात ऍडमिट होत होते. भीती भयंकर होती तरीही डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून माझे पोलीस मित्र रस्त्यावर उभे होते. 

दुसऱ्या दिवशी तो जरा बरा झाला. मात्र सतत रडत होता म्हणून दवाखानावाल्यांनी मला फोन करून बोलावून घेतलं. मी जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मला नेहमी त्याचा हसरा चेहरा बघण्याची सवय होती, अगदीं लोकांनी त्याचे मारून तोंड सुजवले होते त्यावेळी देखील त्याचा चेहरा हसरा होता. 

आज मात्र त्याचा रडवेला चेहरा बघून मला  कसंसंच वाटलं. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची आठवण काढून तो सारखा रडत होता. तीन दिवस उपाशी असल्यामुळे तो बेशुध्द झाला होता. आम्ही त्याला पोटभर खाऊ घातलं. सोबत दोन दिवस पुरतील इतक्या पोळ्या बांधून दिल्या. इलेक्ट्रॉलचे सात - आठ पाकिट आणि दोन-तीन पाण्याच्या बाटल्या त्याच्या हवाली करून मुलुंड टोलनाक्यावर  बिहारकडे निघालेल्या एका ट्रक मध्ये त्याला बसवलं आणि निरोपाचा हाथ वर केला. तो म्हणाला...

" साहब हम लोग तो पहुंच जाएंगे अपने गांव लेकिन आपका क्या होगा ? इस महामारी में आप लोग नहीं जाओगे क्या अपने गांव...? " 

मी त्याला म्हणालो, 

" ये पुरा देशी ही हम पुलिसवालों का गाव है, हम कहां जाएंगे?"

पण त्या एका क्षणात, गावी असलेले माझे म्हातारे आई-वडील माझ्या डोळ्यांसमोर येऊन गेले. या महिन्याची त्यांची औषधे पाठवायचे राहून गेली होती. ती मला काहीतरी व्यवस्था लाऊन पाठवावी लागणार होती, तोवर गावी शेजारी राहणाऱ्या मित्राला तात्पुरता त्यांची मदत करण्यासाठी मेसेज लिहावा म्हणून मी मोबाईल हातात घेतला...

तर, शाळेतील मित्रांच्या व्हॉट्स-ऍप ग्रुप वर कुणी घरी बसून पिझ्झा बनवला होता तर कुणी चायनीज! ती मंडळी लॉक डाऊन मध्ये खाण्यापिण्याचे प्रयोग करत होती आणि कमेंट टाकून एकमेकांच कौतुक करत होती मी देखील तिथं एक कमेंट टाकली...

मित्रांनो, तुम्ही घरातच रहा, 

तुमच्या सुरक्षेसाठी आम्हीं खाकीवाले आहोत रस्त्यावर...


(ठाणे पोलीस मधील मित्र भूपेश भामरे याच्या अनुभवावर आधारीत लिहिलेली कथा)










माझ्या बापाचा स्पर्श

 माझ्या बापाचा स्पर्श


जेंव्हा खेळता खेळता, माझी चिमुरडी जोरात धावत येऊन मला कवटाळते,

माझ्या पोटाला तिचं नाक, ओठ, चेहरा घासला जातो,

खरं सांगतो, त्या वेळी मला माझ्या बापाच्या पोटाचा स्पर्श आठवतो.


दुपारी कधी माझं अंग दुखतं म्हणून ती पाठीवर जेंव्हा चालते

तिची छोटी छोटी पावले माझ्या अंगावर जेंव्हा काळजीपूर्वक हालचाल करतात, 

माझ्या शरीराचा शीन घालवतात,

तेंव्हा, तिच्या रोल मध्ये मी आणि माझ्या जागेवर माझा बाप असतो

खरं सांगतो, त्या वेळी माझ्या बापाच्या पाठीचा, कमरेचा, पायाच्या तळव्यांचा स्पर्श मला आठवतो.


बाईकवर जेंव्हा ती मला घट्ट धरून बसते, 

मी तिला गावाकडच्या गोष्टी सांगत असतो,

त्या वेळी खरं सांगतो, 

आपल्या गावाची, नात्यांची गोडवी सांगणारे  माझ्या बापाचे शब्द, माझ्या ओठातून नकळत बाहेर पडत असतात.


तिला शाळेत सोडून जेंव्हा मी बाहेर पडतो, 

टाटा करणारा हाथ जेंव्हा खाली घेतो,

तेंव्हा खरं सांगतो, 

एस्टी स्टँड वर सोडायला आलेल्या, 

डेपो मधून बाहेर पडणाऱ्या गाडीच्या खिडकीतून बेकरीच्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या,

माझ्या बापाचा टाटा मला आठवतो.


शेविंग करतांना, माझी चिमुरडी जेंव्हा जवळ येते,

मी गम्मत म्हणून तिला ब्रश लावतो,

ती हसत तेथून पळ काढते,

मी पुन्हा आरश्याकडे वळतो

खरं सांगू,

त्या पांढऱ्या फोम मध्ये मला माझ्या बापाचा चेहरा दिसतो...


निलगिरीच्या तेलाने, 

मला लहानाचे मोठे करणाऱ्या माझ्या बापाच्या शरीराला मालिश करतांना,

मला जाणवतो तो शेवटचा स्पर्श,

इथून पुढे जन्मभर तो स्पर्श मिळणार नसतो,

त्याच्या शिवाय जगायचं असतं

मी दुःखी असतो

मोडलेला असतो

खरं सांगतो, 

त्यावेळी, मला कल्पना नसते,

हा स्पर्श मला मुलीच्या सहवासात पुन्हा मिळणार असतो...


Saturday 5 September, 2020

जगणं समजून घेतांना १

#जगणं समजून घेतांना

नाव: गोदू सीताराम बोरसे

व्यवसाय: मेंढपाळ

पाऊस सुरू होऊन महिना झाला आता. कमी-अधिक प्रमाणात तो सर्वीकडे पडतोय, बऱ्यापैकी हिरवळ झाली आहे. तुम्ही बाहेर पडलात आणि आजूबाजूला बघितलं तर अनेक डोंगररांगा, माळरानं हिरवीगार झालेली दिसतील. त्यातील एक हमखास दृश्य म्हणजे त्या उंच डोंगरावर चरणाऱ्या शेळ्या, मेंढ्यांचा मोठाच मोठा कळप आणि त्यांच्या मागे हातात काठी घेऊन एखाद्या दगडावर बसलेला मेंढपाळ.

आपल्याला नेहमीच तो दुरून बघण्याची सवय. फार फार तर कधी हायवेला नाहीतर गावाकडच्या एखाद्या वाटेवर मध्येच हा कळप आडवा जातांना दिसतो. बंदिस्त कारमध्ये बसून मग जोरात हॉर्न वाजवला जातो. बाईक असेल तर हॉर्न सोबत एक्सलेटर ही पिळल जातं, जेणेकरून त्या आवाजाने घाबरून, झटक्यात त्या मेंढरारांनी आपल्याला वाट द्यावी, इतकंच त्यांचं अस्तित्व असतं आपल्यासाठी. 

परवा अश्याच एका डोंगरावर भटकताना या गोदू मेंढपाळाची भेट झाली आणि मग काही काळ गप्पा. तसं, या लोकांना बोलतं करणं महाकठीण. पण गोदू बराच बोलका वाटला. कदाचित दुपारच्या टळटळीत उन्हात निर्मनुष्य डोंगरावर त्या मेंढरांच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त अजूनही कुणी आहे ही भावना त्याच्यासाठी सुखावणारी असेल. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून तरी तसं वाटलं. पन्नाशीकडे झुकणार वय. खुरटी दाढी. डोक्यावर लाल पटका. गोदू म्हणाला गेली पंचवीस-तीस वर्ष तो हे काम करतोय. जवळपास शंभर च्या आसपास मेंढर. त्यांना दररोज असं माळरानावर न्यायचं. ही जनावरं हुशार असतात. कळपात राहतात. शिस्तीत चरतात. एखादं दुसरं असतं आगाऊ म्हणून लक्ष द्यावं लागतं इतकच. गोदू च्या म्हण्याप्रमाने शेळी आणि मेंढी एकत्र फार खुशीन राहत नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे, फक्त मेंढरच आहेत. 

आम्ही बसलो होतो तिथून बरोबर समोरच्या डोंगरावर ती मेंढर चरत होती आणि गोदू इतक्या दुरून त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता. माझ्या मनात विचार आला, ही माणसं असं एकटं बसून दिवसभर काय विचार करत असतील. त्यांच्या मनातही भविष्याची स्वप्न असतील का? येणाऱ्या काळासाठी ते देखील आपल्याच सारखी तजवीज करण्यासाठी धडपडत असतील का? कधी नैराश्य त्यांच्या वाटी आलं तर ते त्याचा सामना कसा करत असतील? शहरात- गावात घर बांधून राहणाऱ्या सुरक्षित- सुशिक्षित समाजाबद्दल त्यांच्या मनात सुप्त असूया असेल का? त्यांच्या कळपासमोरून भरगाव वेगाने जाणाऱ्या तरुणांच्या मोटारसायकल बघून त्यांच्या मुलांना काय वाटतं असेल?

गोदू म्हणाला, पावसाळ्याची चार पाच महिने बरी जातात. चारा भरपूर मिळतो. पण त्या नंतर मात्र भटकंती सुरू होते. वाट मिळेल तीकडे. दूर च्या प्रांतात. कधी गुजरातच्या सोनगड, व्यारा, सुरत च्या दिशेनी तर कधी मध्य प्रदेशातील खेतिया, देवास, खंडवाकडे. नाहीतर महाराष्ट्रातीलच जवळपासच्या जिल्ह्यात. सोबत त्यांच्या प्रमाणेच एक किंवा दोन कुटुंब. कधी बैलगाडी कधी पायी, सोबत चालती मेंढर. सहा सात महिन्यात ती मोठी होतात. मग त्यातीलच काही विकली जातात तर काही नवीन जन्माला येत राहतात. त्यामुळे कळपाची संख्या मेन्टेन रहाते. 

गेलं वर्ष मात्र खूप कठीण होतं म्हणाला, कुठला तरी आजार आला आणि अनेक मेंढर अचानक तोंडात फेस येऊन जागीच मरायला लागली. खंडीभर (वीस) मेंढरात तीन-चार रोज मरायची म्हणाला. काही कळपात तर सकाळी मेंढरांना घेऊन जाणारा मेंढपाळ संध्याकाळी फक्त हातात काठी आणि डोळ्यात पाणी घेऊन परतायचा. 

शासनाकडून काही अनुदान किंवा भरपाई मिळते का विचारले तर गडी हिरमुसला. म्हणाला काहीतरी योजनाबिजना आहेत पण आम्हाला त्या फार समजत नाही. मेडिकल स्टोअर्स मध्ये औषध मिळतात ती यांना देतो. कधीतरी गावात व्हेटर्नरी डॉक्टर येतो. त्याची मदत मिळते पण बराच काळ तर आम्हीं परक्या मुलुखात हिंडत असतो. 

एखादा शेतकरी शेतात मेंढी बसवण्याचे दिवसा प्रमाणे पैसे देतो. आठ नऊ दिवस मग आम्ही त्या एकाच ठिकाणी पाल ठोकून राहतो. शेतकऱ्याला खत मिळतं, आम्हाला जागा आणि मिठमिरचीला पैसा. उन्हाळ्यात मात्र कांदा, मका सारखी पिकं काढून झाल्यावर उरलेला पाला पाचोळा खाण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा द्यावा लागतो.

माळरानावर पाल ठोकून राहताना भीती वाटत नाही का? या माझ्या प्रश्नावर मात्र त्याला हसू आलं. 

अनेक वर्ष आम्ही असेच जगतो. चोरण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही, त्यामुळे चोराबिरांची भीती वाटतं नाही. फक्त कधी कुठे बिबट्या किंवा इतर जंगली जनावर आले की काळजी घ्यावी लागते. रात्री आम्ही आलटून पालटून जागतो, झोपतो. 

बऱ्याचदा एखाद्या शेतात चुकून मेंढर घुसली तर शिव्या खाव्या लागतात, प्रसंगी मारही बसतो. पण आम्ही कधीच काही बोलत नाही. बोलून आपलंच नुकसान होतं, आपण परक्या मुलखात असतो म्हणून गुमान ऐकून घ्यावं लागतं.

आमची मुलं या मेंढरात वाढतात त्यांच्यातीलच एक होऊन जातात. त्यांना जीव लावतात. जमलंच तर शाळेत जातात नाहीतर दिवसभर या कळपामागे. वर्षाकाठी शंभर मेंढी असलेला मेंढपाळ दीड ते दोन लाख रुपये कमावतो. त्यात त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 

...................

...................

इथून पुढे, त्या मेंढपाळाचे जगणे, त्याचे उत्पन्न, त्याचे तुमच्या जीवनाशी, तुमच्या पगाराशी तुलना...मग तुमचं सुंदर जीवन, समाधान वगैरे गोष्टी मी इथं लिहीत नाही कारण त्या व्हाट्सअप विद्यापीठात आपण रोजचं वाचत असतो आणि तरीही आपल्याला हवं तसंच जगत असतो. त्यामुळे ते लिहिण्याला आता अर्थ नाही!

आपल्याकडे, ' जिप्सी ' या नावानी खूप साऱ्या कविता, ललित लिहिलं जातं. तिथे त्या साहित्यिकांना जिप्सी या शब्दाचा ' भटक्या ' हा अर्थ अभिप्रेत असतो.

या जिप्सी चा मात्र सध्या ट्रेंड आहे. आपल्या प्रोफाईल वर तो ऍड करून ग्लॅमर वाढवता येतं, असा समज!

एखादा अनेक नोकऱ्या बदलत असतो म्हणून स्वतःला जिप्सी म्हणतो तरं दुसरा वेगवेगळ्या गावातील त्याच्या रहिवासाला. एखादा कॉर्पोरेट क्षेत्रातील बिगी देखिल आपल्या नेहमीच्या फॉरेन टूर्स मुळे ट्विटर हॅण्डल वर स्वतःला 'कॉर्पोरेट जिप्सी', म्हणून डिफाइन करतो, तर एखादा ' हरले ' किंवा ' एनफिल्ड ' वाला हौशी एलिट प्रवासवीर (मराठीत कुल ट्रॅव्हलर) इंस्टा वर स्वतःला जिप्सी म्हणवून घेतो. 

त्यावेळी, वाटतं वर्षातील सहा सात महिने आपल्या लेकराबाळांना घेऊन मेंढरांचा कळप आणि त्याला सांभाळणारा तो 'रियल जिप्सी मेंढपाळ'  उन्हातानात, वाऱ्या-पावसात, डोंगर दऱ्यात जेंव्हा फिरत असेल, त्याला जसं हे जगणं जाणवत असेल. ते खरोखरच सोशल मीडिया च्या जिप्सी प्रोफाईल इतकं कुल असेल का? ग्लॅमरस असेल का?

#जगणं समजून घेतांना

( ' गंध ' ही भूतकाळातील अनुभवांवर आधारित 'नॉस्टॅल्जिक सिरीज', आणि 

'कातरवेळ चा कोलाहल की कल्ला' ही सभोवतालच्या जागा, परिस्थिती, घटनांवर आधारित लेखमाला लिहितोच आहे.

सोबत, ' जगणं समजून घेतांना' ही मला भेटलेल्या, भेटत राहणाऱ्या, आडवाटेवरच्या माणसांची गोष्ट ही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातील हा पहिला लेख)


सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे

सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे

हल्ली वाचकांना, प्रेक्षकांना अगदी झपाटून टाकेल असं साहित्य किंवा सिनेमा फार कमी प्रमाणात येतात या विषयी खूप बोलले जातं. काही प्रमाणात ते खरं हि असावं. पण अपवाद असतातच.

मी नुकतीच रंगनाथ पठारे यांची वर्षभरापूर्वी पब्लिश झालेली, जवळपास आठशे पानांची , ' सातपाटील कुलवृत्तान्त ' ही महाकादंबरी नुकतीच वाचून संपवली आहे. अजूनही माझ्या डोक्यात त्या कादंबरीतील पात्रे कोलाहल माजवतायात. गेला आठवडाभर हे सतत होत आहे. या सात दिवसात कादंबरी वाचनाशिवाय मी दुसरे काहीही करू शकलो नाहीये!

इतकी गुंतवणूक ठेवणारी लेखनशैली, गेल्या सातशे वर्षांच्या इतिहासाची जोड देत, काही संशोधनातून तर काही लेखकाच्या प्रतिभेतून निर्माण झालेली पात्रे आपल्या समोर येतात आणि आपण त्यात अगदी वाहत जातो.

हे असं फार क्वचित माझ्या सोबत होतं. ब्रेकिंग बॅड किंवा हाऊस ऑफ कार्ड्स या सारख्या सिरीज बघतांना. किंवा वॉर अँड पिस ही लिओ टॉलस्टॉय ची महाकादंबरी वाचतांना,  भालचंद्र नेमाडेचीं हिंदू, श्री ना पेंडसे यांची तुंबाडचे खोत वाचतांना पूर्वी असं झालेलं मला आठवत.

सातपाटील कुलवृत्तांत ही देखील याच कुळीची कादंबरी मला वाटते. 

मराठी वाचकांना कादंबरी म्हणजे, श्रीमान योगी, छावा, महानायक, पानिपत, ययाती इत्यादी वीस तीस वर्ष जुन्या कलाकृतींची नेहमी आठवण येत असते. या सर्व निश्चितच त्या त्या काळातील महान कलाकृती. पण मराठी वाचक बऱ्यापैकी त्याच त्या काळात आणि वाचनात अडकून गेलेला दिसतो. त्यामुळे आजही भरपूर नवीन लिहिलं जातंय याकडे त्याच जरा दुर्लक्षच होत असं खेदाने म्हणावं लागतं.

त्या दृष्टीने सातपाटील कुलवृत्तांत ही काही महिन्यांपूर्वी आलेली दीर्घ कादंबरी महत्वाची आहे.

_____________________________________________

पुस्तकाच्या पाठीमागे छापलेला गोषवारा इथं देतोय:-

या कादंबरीचा गर्भित लेखक हा मराठीतला आजचा एक महत्त्वाचा लेखक आहे. कोणी कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे आपल्या हाती काहीच असत नाही. हा लेखक मराठा जातीत जन्मलेला आहे. आपण कोण, कुठले, आपले पूर्वज कुठून आले, याचे कुतूहल सर्वांना असतेच. तसे ते या गर्भित लेखकालाही आहे. तसा शोध घेत काळात तो सातशे वर्षे मागे जातो. अशा अनेक टप्प्यांवर शोध घेताना तो जाती, धर्म, मानवी नाती आणि मानवी समुहांचे एकमेकात मिसळणे अनुभवतो. बौद्धिक पातळीवर तो हजारो वर्षे मागे जातो. तो आपले मराठा असणे याचा व्यापक अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. ते पुन्हा त्याच्या विश्वभानाच्या उजेडात तपासतो आणि मांडतो. आपल्या कुळाचा शोध घेण्याच्या प्रयत्नाने सुरू झालेली ही गोष्ट एका माणसाची, त्याच्या कुळाची न उरता एकूण मानवी आत्मभानाच्या प्रकाशाची गोष्ट होऊन जाते. हे सारे एका विस्तीर्ण पटलावर एका बृहद् कहाणीच्या रूपात या कादंबरीतून प्रकट होते.

_____________________________________________

आपली मराठी भाषा आणि संस्कृती किती महान आणि अनेक भाषांना, संस्कृतींना जन्म देणारी आहे हे उदाहरणासह लेखक आपल्याला पटवून देतो. त्यासाठी लेखकाने केलेले दीर्घ संशोधन आणि अभ्यास आपल्या लक्षात येईल. 

आज जिथं तीन तासांचा सिनेमा दोन ते दीड तासांवर आलाय, कादंबरी अडीचशे-तीनशे पानात संपते. वृत्तपत्रातील ललित कॉलम्स देखील छोटे झालेत. दीर्घकथा लघु झाल्यात, लघुकथा तर इतक्या आकुंचन पावल्यात की त्यांना मायक्रो किंवा टाइनी कथा का म्हणू नये हा प्रश्न पडतो. या सर्वांमागे प्रमुख कारण सांगितलं जातं ते आजच्या वाचकाचं आणि प्रेक्षकाचं क्षणात ' डायव्हर्ट ' होणं कारण मनोरंजनाची अनेक साधन मोबाईल- इंटरनेटमुळे त्याच्या बोटाच्या टीप वर आहेत आणि तो क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट होऊ शकतो ही चॉईस त्याला नवीन तंत्रज्ञानामुळे मिळाली आहे. 

अश्या वातावरणात, आपल्या पूर्वजांचा शोध घेत जाणारी, आठशे पानांची महाकादंबरी, स्वतः च्या लिखाणावर सतत कन्विक्षण ठेवून लिहिणे, त्यासाठी अनेक वर्षे खर्ची घालणं, आणि ती वाचतांना आपल्या लेखन शैली नी वाचकांना अगदी खिळवून ठेवणं, हे सोपं काम नाही. त्यासाठी लिखाणाची असाधारण प्रतिभा लेखकाच्या अंगी असावी लागते. रंगनाथ पठारे यांच्या या नव्या कलाकृतीला सलाम.